Wednesday 30 December 2015

सायकलप्रवास दोन वर्षांचा झाला..

सायकलप्रवास दोन वर्षांचा झाला... 

३१ डिसेंबरला केलेले संकल्प टिकत नाहीत असे म्हणतात. नव्याचे नऊ दिवस या म्हणीलासुद्धा मागे टाकणारे हे संकल्प नऊ दिवससुद्धा टिकत नाहीत. आणि ते अगदी खरेही आहे. तरीही मी या दिवशी बरोबर दोन वर्षापुर्वी सायकल चालवण्याचा संकल्प केला होता आणि आश्चर्य म्हणजे तो अजुनही टिकुन आहे. 

माझ्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये एक गियर असलेली सायकल बरेच दिवस पडुन असलेली मी जाता येता पाहायचो. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या शिवाची सायकल होती ती. एकदा त्याची परवानगी घेऊन त्या सायकलवर मी पुणे कँटोन्मेंटची राईड करून आलो. आयुष्यात पहील्यांदाच गियरची सायकल चालवली. मला गियर कसे बदलायचे हे राहुल कोंढाळकरने शिकवले आणि त्या राईडमध्ये सायकलची पडलेली चेनही त्यानेच बसवून दिली होती. राहुल कोंढाळकर सोबत केलेली ती छोटीशी राईड माझ्यातील उत्सुकता, आवड आणि तृष्णा जागृत करून गेली होती. स्नेल कंपनीच्या त्या सायकलवर सुरू झालेला प्रवास अजुनही अविरत चालुच आहे. 

२ ते ३ महीन्याच्या कालावधीनंतर मला स्वतःची सायकल असावी असे वाटु लागले. गियरच्या सायकलबद्दल मला शुन्य ज्ञान होते. तरीही ३१ डिसेंबर २०१३ यादिवशी मी गियरची सायकल विकत घ्यायला गेलो. सर्वात स्वस्त १८ गियरची हिरो डर्ट बाईक ₹६५०० ला होती. तेव्हा मला ₹६५०० सुद्धा खुप जास्त वाटले होते. एवढी महाग सायकल असते का कुठे?  सायकलसाठी कशाला एवढे पैसे घालवायचे? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण गियरची सायकल त्याहुन स्वस्त नव्हतीच. त्यामुळे ती डर्ट बाईक घेण्याचे मी ठरवले. आरती सायकल्स हिंगणे खुर्द येथुन सायकल विकत घेतली आणि लगेच त्या सायकलवर टांग मारून मी थेट कात्रज घाटातील दरीपुल गाठला. आज कुछ तुफानी करते है या आवेशात. तेव्हा कात्रज बोगद्यापर्यंत सायकल चालवत जाणे म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट असल्यासारखे मला जाणवले. कारण दरीपुल येईपर्यंत माझा कार्यक्रम उरकला होता. डर के आगे कात्रज दरीपुल होता. खुप दम लागल्यामुळे मी माघारी फिरलो आणि घरी येऊन आराम केला. ३१ डिसेंबरला पार्ट्यांमध्ये रमण्याऐवजी मी सायकलमध्ये रमलो होतो. १२ वर्षे सिजन बॉल क्रिकेट खेळल्यानंतर मी क्रिकेट खेळणे सोडुन दिले. त्यानंतर सह्याद्रीमध्ये ट्रेक करण्याचा छंदही जडला होता. क्रिकेट आणि ट्रेकींग नंतर माझ्या छंदांमध्ये साईकलिंगची भर पडली.  

अधुन मधुन मी माझी डर्ट बाईक घेऊन राईडला जायचो. या सायकलवर १० किमी अंतरावरील डोणजेफाट्याला जायलासुद्धा माझा भाता फुलुन जायचा आणि दोन ते तीन ठिकाणी दम घेण्यासाठी थांबावे लागायचे. एकदा पानशेतच्या पुढे दापेसर पर्यंत (६५ किमी) ही सायकल घेऊन गेलो तेव्हा कळले की आपण घेतलेली सायकल ही तांत्रिकदृष्ट्या पुर्णपणे चुकीची आहे. लांब पल्ल्याची राईड करायची असेल तर ही सायकल स्वाहा करून योग्य सायकल विकत घेणे आवश्यक होते. हिरो डर्ट बाईकवर संध्याकाळची भाजी आणायला मंडईत जाणे उत्तम. या सायकलवर लांब पल्ल्याची राईड करणे म्हणजे कबुतराच्या पंखांकडुन गरूड भरारीची अपेक्षा ठेवण्यासारखे होते. त्यामुळे मी सायकल बदलण्याचा निर्णय घेतला. 

मार्च महीन्यात कन्येच्या वाढदिवसाची शॉपींग करायला पुण्यात गेलो होतो. वाढदिवसाची शॉपींग झाल्यावर तसाच फडके हौदाजवळील सिंग सायकलमध्ये गेलो. तारीख होती ४ मार्च २०१४ यादिवशी प्रोव्हीलची एमटीबी सायकल ₹१४५०० ला घेतली. सिंग सायकलने माझी सायकल रिक्षामध्ये घालुन माझ्या घरी आणुन दिली. सायकल बदलल्यावर सायकल चालवण्याचा माझा उत्साह वाढला. आठवड्यातून एकदा सायकल चालवणारा मी त्यानंतर दररोज १० किमी सायकल चालवु लागलो. दर रविवारी लाईफ सायकलवाले ₹१०० वर्गणी घेऊन ६० किमीची राईड करत असत. दमछाक झाली किंवा सायकलला काही प्रोब्लेम झाला तर सोबत असलेल्या टेंपोमध्ये सायकल टाकुन आणण्याची सोय होती. बॅकअप टेंपोचा आधार असल्यामुळे मी खारावडे राईडला जायचे ठरवले. लाईफ सायकलबरोबर केलेल्या खारावडे राईडने माझी दमछाक केली पण त्यानंतर माझा दम वाढत गेला. खारावडे राईडला गेल्यामुळे वेगवेगळ्या सायकल्स पाहायला मिळाल्या आणि इतर सायकलपटुंची ओळखही झाली. त्यानंतर दम वाढवण्यासाठी मी रोज २० किमी सायकल चालवायला सुरूवात केली. साईकलिंगचे हे अंतर मोजण्यासाठी रनकिपर आणि स्ट्रावा या दोन अॅपची चांगलीच मदत झाली. विशेषकरून वेगवेगळ्या ठिकाणचे स्ट्रावाचे सेगमेंट मला भुरळ घालायचे. या सेगमेंटमध्ये माझे नाव पहील्या दहामध्ये असावे असे मला वाटु लागले आणि मी त्या अनुषंगाने सायकल जोरात पळवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काही मोजक्याच सेगमेंटमध्ये मी पहील्या दहामध्ये आहे. माझी सायकल चालवण्याची आवड वाढवण्यात स्ट्रावा सेगमेंटचा वाटा खुप मोठा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकदा मी स्ट्रावाचे ग्रँड फोंडो चॅलेंज पुर्ण करण्यासाठी १३० किमी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला. जुन महिन्यात १३० किमी सायकल चालवली खरी पण ती चालवताना माझे अतोनात हाल झाले. दुसरा ग्रँड फोंडो करायला पहिल्याच्या तुलनेत कमी हाल झाले पण इथुन माझा स्टॅमिना वाढत गेला. त्यामुळे माझे लांब पल्ल्याचे सायकलिंग सुरू होण्यालासुद्धा स्ट्रावाच जबाबदार आहे असे मी म्हणेन. १३० किमी ची राईड झाल्यानंतर मी पुण्याभोवतालचे घाट आणि गडकिल्ले सायकलने पार करायला सुरूवात केली. सिंहगड, पुरंदर, रायगड, लवासा, खंबाटकी घाट, ताम्हिणी घाट, पाबे खिंड, मरीआई घाट, पानशेत, लोणावळा, कापुरहोळ या सर्व ठिकाणी सायकलवर जाऊन आलो. दर रविवारी कुठे ना कुठे तरी सायकलिंगचा बेत व्हायचाच. महेश निम्हणबरोबर केलेली रायगड राज्याभिषेक सोहळ्याची सायकल राईड केवळ अविस्मरणीय. तसेच योगेश कानडे बरोबर केलेली लवासा राईडसुद्धा अविस्मरणीयच. या राईडला मी पहाटे अंधार असताना घराबाहेर पडलेलो संध्याकाळी अंधार पडल्यावरच घरी परतलो होतो. योगेश कानडे बरोबर एकदा खंबाटकी राईड करताना दिवसभर झालेली उपासमार आणि त्यानंतर शिवापुरमध्ये मटण भाकरीचा घेतलेला आस्वाद निव्वळ अप्रतिम आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे.

याच दरम्यान एका सकाळ पुरवणीमध्ये बीआरएमच्या पारितोषिक वितरण समारंभाविषयी सुनंदन लेलेंचा एक लेख छापुन आला होता. त्या समारंभाला जे सायकलवर येतील त्यांनाच प्रवेश होता म्हणे. त्या लेखातले बीआरएम आणि रँदोनिअर हे शब्द माझ्या डोक्यावरून विमानात बसुन निघुन गेले होते पण विषय सायकलिंगचा असल्यामुळे माझे मन त्या बातमीभोवती घुटमळले. महेश निम्हण माझ्या सायकलिंगविषयीच्या बऱ्याचशा शंका दुर करत असे. त्याने अगोदर एक बीआरएम केलेली होती. त्याच्याकडुनच मला दिव्या ताटे आणि पुणे रँदोनिअर्सविषयी माहीती मिळाली. बीरआरएमविषयी माहीती मिळाल्यानंतर २०० किमी च्या बीआरएम मध्ये भाग घेऊन मेडल मिळवण्याची लालसा निर्माण झाली. १३.५ तासात २०० किमी अंतर पार होईल की नाही याबद्दल मलाच खात्री वाटत नव्हती. मी सराव वाढवण्याचे ठरवले. बीआरएमच्या लांब पल्ल्याचा सराव होण्यासाठी मी कामाला सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला. घरापासुन टाटा मोटर्सचे अंतर ३२ किमी आहे, दोन्ही बाजुचे अंतर मोजले तर जाऊन येऊन ६४ किमी साईकलिंग एकाच दिवसात होणार होते. कामावर जाण्यासाठी कंपनी बसची सुखसुविधा असताना ३२ किमी सायकल चालवत जाणे म्हणजे सुखामध्ये दुःखाला कवटाळण्यासारखे होते. पण मी ज्या समुद्राकडे निघालो होतो त्यासाठी मला माझ्या डबक्यातुन बाहेर पडावेच लागणार होते. डबकं सोडल्याशिवाय समुद्र दिसणे शक्य नव्हते. मी माझी झेप वाढवली. डबक्यातुन बाहेर उडी घेतल्यावर बरेचजण आश्चर्यचकीत व्हायला लागले. काहींनी माझा उत्साह वाढवला तर काहींनी खो घालण्याचासुद्धा प्रयत्न केला पण मी डगमगलो नाही.

मला सायकलच्या शर्यतीपेक्षा बीआरएम मध्ये सायकल चालवणे जास्त आवडते. माझी पहिली बीआरएम पुणे पाचगणी पुणे २०० किमी (सप्टें २०१४) मी ११.५ तासात पुर्ण केली. पहील्याच प्रयत्नात यश मिळाल्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला. त्यानंतर अलीबागची कोकण क्लाईंब ३००बीआरएम (ऑक्टो २०१४) १९ तासात पुर्ण केली. तेव्हा खोपोली घाटात माझी चांगलीच वाट लागली होती. नोव्हेंबर २०१४ नंतरच्या सर्व  बीआरएम गोव्यात आयोजित केल्यामुळे मी निराश झालो. कामावर सुट्ट्या टाकुन गोव्यात जाऊन बीआरएम मध्ये सायकलिंग करणे खिशाला परवडणारे नव्हते. यानंतर मी बीआरएमचा विचार सोडुन दिला. नोव्हेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान मी एकही बीआरएम केली नाही परंतु वार्षिक सभासदत्व घेऊन रायडर नंबर ८७ मिळवला होता.

३०० किमी ची कोकण क्लाईंब बीआरएम केल्यानंतर मला जाणवले की लांब पल्ल्याचे अंतर एमटीबी सायकलवर पार करणे खुप कष्टप्रद आहे. ३०० पेक्षा जास्त अंतर चालवण्याच्या दृष्टीने मी स्नेल कंपनीची साधी रोडबाईक घेऊन तिला QUANDO कंपनीचे हब बसवले, बॉटम ब्रॅकेट बिअरींगचा लावला आणि इम्पोर्टेड टायर्स टाकल्यानंतर ती सायकल २६ चा सुपरफास्ट सरासरी वेग देऊ लागली होती. ₹१४००० ची सायकल घेऊन तिच्यावर ₹६००० जास्त खर्च केले होते. दुर्दैवाने कोणत्याही बीआरएम मध्ये भाग घेण्याअगोदर माझी ही असेंबल केलेली सायकल चोरीला गेली.

हायवेवर, रात्री अपरात्री कुठेही सायकल चालवताना मला कधीही अपघाताची भीती वाटली नाही. पण काही भित्र्या स्वभावाचे मित्र जे स्वतः हायवेवर सायकल चालवायला घाबरतात मला अपघाताविषयी सांगुन घाबरवण्याचा प्रयत्न करायचे. सायकल चालवताना माझा एकमेव अपघात झाला आहे तोसुद्धा एका भटक्या कुत्र्यामुळे. डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या पायाचा गुडघा चांगलेच सोलटले होते. एक ब्रेक निकामी झालेला ट्रक भरधाव वेगात माझ्या जवळुन गेला होता. तसाच पुढे जाऊन त्याने तीन अवजड वाहने चेंबवली होती. एक फुटाच्या अंतरामुळे त्या ट्रकपासुन मी वाचलो होतो. सायकल चालवताना एकदा हायवेवर ₹५०० ची नोटही सापडली होती. सातारा राईडच्यावेळी भारतभर सायकलभ्रमण करणाऱ्या दोन परदेशी सायकलपटुंची गाठ पडली. त्यांच्याकडुन बरेच काही शिकायला मिळाले. आणि रिचर्ड हॅकेट कडुन एक भेटवस्तुही मिळाली. 

सायकलिंगसाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या वस्तु मी खरेदी करत गेलो. कुठेही कसलीही कसर ठेवली नाही. सिपर बॉटल्स, शॉर्टस, टी शर्टस, सायकलिंग जर्सी (बेलकीन), विंड चिटर, पुलओव्हर, जर्कीन्स, ग्लोव्हज, हेल्मेट, रिफ्लेक्टीव वेस्ट आणि बेल्ट, सीट पोस्ट बॅग, हँडलबार बॅग, हायड्रा पॅक, वेगळे पॅडल्स, ग्रीप्स, टो क्लीप्स, टॉर्च, टेल लँप, कॅरीअर, मोठा आणि छोटा हवेचा पंप, पंक्चर किट इ. यातल्या काही वस्तु दोन ते तीन प्रकारच्या सुद्धा आहेत. तसेच सायकलची काळजी घेण्यासाठी लागणारे सर्व टुल्स माझ्याकडे आहेत. माझी सायकल मी स्वतःच सर्व्हिसींग करतो. फक्त मला फाईन ट्युनिंग करता येत नाही. सायकलला लागणारे साहीत्य मी डेकॅथलॉन वाघोली, सुराना सायकल्स आणि लाईफ साईकल्स टिळक रोड येथुन घेतो.

खरंतर सायकल चालवणे ही कालबाह्य होत चाललेली संकल्पना. दुचाकीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सायकल हळूहळू पडद्याआड गेली. हल्ली तर अलिशान महागड्या कार चालवण्यातच लोक धन्यता मानतात. पण सध्या अत्याधुनिक कार एवढ्या झाल्या आहेत की त्या बघुन बघुन लोकांना कंटाळा आला आहे. पुर्वी एखादी मर्सिडीज कार दिसली तरी सगळे लोक तिच्याकडे पाहत राहायचे. हल्ली त्या महागड्या गाड्या कचऱ्यासारख्या झाल्या आहेत, प्रत्येक गल्लीत एकतरी आढळतेच. या महागड्या गाड्यांचे आता कोणालाही कौतुक राहीलेले नाही. पण तो जुन्या काळातला मर्सिडीजवाला फिल सध्या महागड्या सायकलला आला आहे. महागडी इम्पोर्टेड सायकल दिसली की लोक तिच्याकडे आणि ती चालवणाऱ्याकडे पाहातच राहतात. काहींना सायकल चालवणारे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात तर काहीजण सायकल चालवणाऱ्यावर अपरिहार्य जिज्ञासेतुन त्यांच्या मनात तयार झालेल्या प्रश्नांची सरबत्ती करतात. केवढ्याची सायकल?  इंम्पोर्टेड आहे का? कुठे मिळते? किती पळते? आणि किंमत ऐकल्यानंतर त्यांचे ते अचंबित होणे. तसेच सायकल आणि ती चालवणारा पाहीला की काही लोकांना त्यांच्यामधील काळाच्या पडद्याआड गेलेला सायकलपटु आठवतो. कधीतरी त्यांनी कुठेतरी सायकल चालवलेली असते त्याचे कौतुक सांगत बसतात आणि मला ते नाईलाजास्तव ऐकुन घ्यावे लागते. म्हणजे त्यांना सांगायचे असते की मी सुद्धा सायकल चालवलेली आहे.

लांब पल्ल्याची सायकलिंग करण्यासाठी १ ऑक्टोबर, २०१५ ला मी ट्रेक ७.२ हायब्रीड सायकल ₹३५००० ला विकत घेतली. तिच्यावर ४०० किमीचा टप्पाही पार झाला आहे. आता माझा डोळा ६०० वर आहे. २००,३००,४०० आणि ६०० च्या बीआरएम एकाच कॅलेंडर वर्षात करून मी सुपर रँदोनिअर होण्याचा प्रयत्न करणार आहे. 

तर हा आहे माझा दोन वर्षांचा सायकल प्रवास...  

आता फक्त सुपर रँदोनिअरचे लक्ष्य समोर आहे.

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...