Friday, 4 December 2015

भारत वि. द. अफ्रिका चौथी कसोटी, फिरोजशहा कोटला

"दुरून क्रिकेट साजरे"

फिरोजशहा कोटलावर कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि अपेक्षेप्रमाणे फलंदाजी स्विकारली. अमित मिश्राऐवजी ऊमेश यादवला अंतिम संघात स्थान मिळालेले पाहुन आश्चर्य वाटले. मागच्या कसोटीत खेळपट्टीवर स्थिरावलेल्या आणि भारतासाठी धोकादायक भागीदारी रचु पाहणाऱ्या अमला आणि फॅफ डुप्लेसीला त्यानेच तंबुचा रस्ता दाखवला होता. कोटलाची खेळपट्टी काय रंग उधळते यावरच मिश्रा हवा होता की नको यावर बोललेले बरे. या मालिकेत मोहम्मद शमीला गोलंदाजी करताना पहायला आवडले असते, विंडीज विरूद्धच्या मालिकेत त्याने मध्यमवयीन झालेला चेंडु स्विंग (रिव्हर्स स्विंग) करून तळाच्या फलंदाजांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली होती.

विरेंद्र सेहवागला अखेरचा निरोप देणाऱ्या सामन्यात भारताने कासवाच्या गतीने सुरूवात करावी हे अतिशय दुखद. १२ ते १३ षटकांत अवघ्या १६ धावा झाल्या होत्या, कोणताही बळी गमावलेला नव्हता हेही थोडके नव्हते. मॉर्कल आणि बाउल्टने टिच्चुन गोलंदाजी केली. आज शिखर धवन हा मुरली विजयसारखा खेळत होता आणि मुरली विजय धवनसारखा. दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा ढासळत चाललाय असे म्हणायला हरकत नाही. कधीकाळी अशक्यप्राय झेल पकडणारे आफ्रिकेचे क्षेत्ररक्षक हल्ली सोपे सोपे झेल सोडायला लागलेत.

बचाव करायला जाताना चेंडूच्या रेषेचा अंदाज चुकल्यामुळे किंवा गोलंदाजाच्या कौशल्यामुळे मुरली विजयला एक चेंडु उजव्या हाताच्या कोपराजवळ जोरात लागला. मैदानात दोनहात करताना झालेल्या जखमा किंवा दुखापती एकतर तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करतात किंवा कधी कधी खच्चीकरणही होते. नोबॉलवर झेल पकडल्यामुळे एकदा विजय वाचला. पाहुण्यांचा ऑफस्पिनर आज भाव खाऊन गेला. विजयला त्याने बरोबर सापळ्यात पकडले. धवन आज चागला स्थिरावला होता पण पिड्टने त्याचा चांगल्या चेंडुवर बळी घेतला. ताहीर आज खुपच फाफाळलेला वाटला पुजाराने जेवणाअगोदर त्याच्या फुलटॉसवर मिडविकेटला स्विपच्या स्टाईलने मारलेल्या षटकाराने त्याचे अजुनच खच्चीकरण केले. त्यानंतर पुर्ण दिवसभर ताहीरला लय सापडली नाही. कप्तान अमलाने ताहीरवर म्हणावा एवढा विश्वास दाखवला नाही. सर्वकाही सुरळीत चालु असताना अॅबॉल्टच्या एका सरळ चेंडुने पुजाराचा बचाव छिन्नविछिन्न केला. द्रविडनंतर भिंत ही उपाधी मिरवणाऱ्या पुजाराचा बचाव प्रश्नचिन्ह निर्माण करणारा वाटला. त्यानंतर मैदानात उतरलेला कप्तान विराट कोहली अतिशय सुंदर फलंदाजी करत होता. त्याच्या सर्व हालचालींमध्ये आज लयबद्धता होती. त्याच्या कव्हर ड्राईव्हच्या फटक्यांनी तर डोळ्यांची पारणे फेडली. विराटच्या एकाग्रतेला कोणाची नजर लागु नये असेच वाटत होते.

शिखर धवनची तपश्चर्या पिड्टने भंग केली. एका चांगल्या चेंडुवर त्याने त्याला पायचित केले. रोहीत शर्माला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या पुण्यातील शिंदे लीगमध्ये जर त्याचासारखा फटका मारून फलंदाज बाद झाला तर त्याला पुढच्या मॅचला पाणी वाहायला ठेवतात. कसोटी क्रिकेटमध्ये गल्ली क्रिकेटचा फटका मारून बाद होणे लांच्छनास्पदच. त्यानंतर आलेला राहणे महादेवाचा वरदहस्त घेऊनच मैदानात उतरला होता. कोहलीला आज केवळ त्याचे दुर्भाग्यच रोखु शकत होते आणि घडलेही तसेच. त्याचा एक उत्कृष्ट स्वीपचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मांडीला लागुन हवेत उडाला आणि मग यष्टीरक्षकाने कमालीची चपळता दाखवत त्याचा झेल पकडला. साहाने कोणताही फटका न खेळता एक चेंडु सरळ त्याच्या पायावर घेतला, पंचांनी त्याला नाबाद कसे काय ठरवले हे पंचांनाच ठाऊक. चाचपडणारा साहा जास्त वेळ टिकु शकला नाही. अॅबॉल्टने त्याला तंबुचा रस्ता दाखवला.

सुस्थितीतुन भारताची अवस्था ६ बाद १३९ झाली. कोहली, शर्मा आणि साहा एकामागोमाग तंबुत परतले. जडेजाने परिस्थितीला साजेशी फलंदाजी केली. राहणेबरोबर जडेजा आणि अश्विनच्या भागीदारीमुळे भारत ७ बाद २३१ धावांपर्यंत पोचला. राहणेची स्वदेशातील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या या सामन्यात आपण अनुभवत आहोत, ती तशीच नाबाद ८९ वरून तीन अंकांपर्यंत पोचावी. याअगोदर १५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. राहणे धीरगंभीर तसेच प्रसंगी आक्रमक पवित्रा घेत हळुहळु धावसंख्येला आकार देत राहीला. आतापर्यंत त्याने दोन षटकार आणि ९ चौकार मारलेले आहेत. ८४ षटकांत २३१ धावा या सेहवागच्या लौकीकाला साजेशा नक्कीच नाहीत. सेहवाग जेव्हा सलामीला खेळायचा तेव्हा एका दिवसात संघाच्या कमीत कमी ३५० धावा व्हायच्याच.

मंदप्रकाशामुळे खेळ लवकर बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी राहणेचे शतक पाहण्याची खुप ईच्छा आहे आणि त्याचबरोबर भारताने ३०० चा टप्पा पार करावा एवढीच माफक अपेक्षा.

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...