Wednesday 3 February 2016

कोकणदिवा

कोकणदिवा

कोकणदिवा ट्रेक पुन्हा एकदा करण्याचे कारण म्हणजे कोकणदिव्याची ओढ. कोकणदिवा म्हणजे कोकणदिवाच. एखाद्या हॉटेलची चव आवडली तर आपण आवर्जुन पुन्हा त्याच हॉटेलमध्ये जातो. कोकणदिव्याचे अगदी तसेच आहे. तिथे एकदा जाऊन आल्यावर त्याठिकाणी पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. गर्द झाडीने वेढलेला कोकणदिवा, दाट जंगलातुन जाणारी वाट, थोडीच पण फणा काढुन अंगावर आलेली चढण, एैसपैस कोरीव गुहा, काळनदीचा पसारा आणि आठही बाजुंनी दिसणारे सह्याद्रीचे विलोभनीय रूप. त्याच्या माथ्यावरून होणारे स्वराज्याच्या राजधानीचे दर्शन तर तसेच डोळ्यात साठवुन घ्यावेसे वाटते. कोणाला आवडणार नाही? कोकणदिव्यावरून रायगड खुप सुंदर दिसतो हे ऐकल्यावर राजे स्वतः रायगड पाहण्यासाठी कोकणदिव्यावर येऊन गेले होते. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाही येथे येण्याचा मोह आवरला नाही तर आपण कोण? त्याकाळी रायगडाला जागता पहारा देण्यासाठी कोकणदिवा डोळ्यात तेल घालुन उभा राहत असे.
गर्द झाडीने वेढलेला कोकणदिवा

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही कोकणदिव्याला जायचे ठरवले. बरोबर घ्यावयाच्या सर्व वस्तुंची यादी मित्रांना दिली. नेहमीच्या होकार आणि नकाराच्या नाट्यानंतर अखेर आम्ही ६ मावळे तयार झालो. विजय वसवे, गणेश परदेशी, महेंद्र दळवी, संतोष झेंडे, सुनिल गुरव आणि कल्पेश कोथमिरे असे आम्ही सहा जण मिळुन सोमवार दि. २५ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजुन ५५ मिनिटांनी धायरीफाटा सोडून पानशेतमार्गे महेंद्रच्या पांढऱ्या शुभ्र टाटा सफारी स्टोम मध्ये बसुन घोळच्या दिशेने निघालो. पानशेत धरणाजवळचा चढ पार केल्यानंतर आम्ही रात्रीच्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी गाडी थांबवून खाली उतरलो. सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती. बोलणारे आणि ऐकणारे आमच्याशिवाय कोणीच नव्हते. एखाद दुसऱ्या रातकिड्याचा आवाज अधूनमधून येत होता. पांढराशुभ्र चंद्रप्रकाश सगळीकडे पसरलेला होता. चंद्राचे ते मनमोहक रूप आकाशात अधांतरी तरंगत होते. पानशेत धरणाचे पाणी आणि आजूबाजूच्या सर्व वनस्पती त्या स्वच्छ चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होत्या. असा स्वच्छंदपणे चंद्रप्रकाशाचा आनंद घेता आला पाहीजे. ती मजाच वेगळी. रात्रीचे सव्वा अकरा वाजत आले होते. घोळ पर्यंतचे ३० किमी अंतर अजुन पार करायचे बाकी होते. जास्त उशिर होईल म्हणून आम्ही लगेच गाडीत बसलो.

ताम्हीणी घाटाप्रमाणेच दापेसर खिंड कडा खोदुन बनवलेली आहे आणि ते शेवटचे खोदलेल्या खडकातील वळणही हुबेहुब तसेच आहे. ताम्हीणी घाटाप्रमाणे भासणारी दापेसर खिंड ओलांडुन आम्ही घोळमध्ये प्रविष्ट झालो. रात्रीचे सव्वा बारा वाजले होते. मुक्कामाची एसटी पानशेतकडे तोंड करून उभी होती. तिच्याकडे बघतानाच ती निघण्याच्या तयारीत आहे असे वाटत होते. एसटी निघण्याची रोजची वेळ सकाळी ६ वाजता. एसटीच्या शेजारी डांबरी रस्ता एैसपैस रूंद होता. टाटा सफारी तिथे पार्क केल्यानंतर बाजुलाच आम्ही शेकोटी पेटवली आणि शेकोटीला लागुनच आमचा बिछाना टाकला. पांढऱ्या शुभ्र चंद्रप्रकाशात शेकोटीचा लाल पिवळसर अग्नी खुपच सुंदर दिसत होता. तिथे शेकोटीसाठी भरपुर प्रमाणात लाकुडफाटा उपलब्ध होता तेही २० फुटाच्या अंतरामध्ये. थंडी म्हणावी तेवढी जाणवत नव्हती. शेकोटीसाठी लागणारे इंधन गोळा करण्याचे काम सुनिल आणि संतोष यांनी चोख बजावले. गप्पाटप्पा, मस्ती आणि टाईमपास उरकल्यानंतर आम्ही रात्री अडीच वाजता झोपलो. महेंद्र आणि कल्पेश गाडीत झोपले आणि आम्ही चौघे उघड्यावर धरणीचे अंथरून, आकाशाचे पांघरूण आणि हाताची उशी करून झोपी गेलो. सुख हे मानण्यात असते. मानले तर मातीचे कणही माणिकमोती वाटतात. सारी दुखेः गोड वाटतात. अंथरुणावर पडल्या पडल्या सगळे घोरायला लागले होते.
शेकोटी

शेकोटी आणि अंथरुण


पहाटे ४ नंतर कोंबड्याच्या आरवण्याने जाग आली. खेडेगावातील हा नैसर्गिक अलार्म. हा अलार्म सेट करावा लागत नाही. पहाटे ४ वाजता वाजणार म्हणजे वाजणार तेही दहा-दहा मिनिटांच्या स्नुझने. पहाटे पहाटे थंडीचा गारठा चांगलाच पसरलेला होता. अंथरुणातुन बाहेर निघताच मी पहीली शेकोटी पेटवली. पहाटेच्या त्या बोचऱ्या थंडीमध्ये शेकोटीची ऊब शरीराला खुप गोडगोड आणि हवीहवीशी वाटत होती. ती शेकोटीची ऊब घेण्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. हळूहळू सगळे ट्रेकर्स जागे झाले. रस्त्याच्या कडेला जवळच पाण्याचा नळ होता. सकाळची वेळ असल्याने त्याने पाणी सोडायला सुरुवात केली. नळाच्या पाण्यामुळे आमच्याजवळचे पाणी जास्त खर्च झाले नाही. सकाळचे सगळे विधी आटोपुन होईपर्यंत तांबडं फुटलेलं होतं. एसटी चालु होऊन पानशेतकडे सुसाट निघून गेली. घोळवरून एसटीने पानशेतला जायचे असेल तर ४४ रूपये तिकीट आहे आणि स्वारगेटपर्यंत ९० रूपये तिकीट आहे. स्वारगेटवरून घोळ एसटी दुपारी ४ वाजता सुटते. शेकोटीची ऊब घ्यायला आलेल्या गाववाल्याने ही माहीती दिली. शाळेच्या बाजुला राहणार्‍या पोळेकर काकांनी आम्हाला चहाला बोलवले. त्यांनी आमच्यासाठी काळा गवती चहा बनवला. त्या काळ्या गवती चहाची चवच न्यारी होती. त्या काळ्या चहाबरोबर आम्ही बिस्कीटाचे पुडे उघडले. खुप मजा आली. त्यांना चहाचे ५० रूपये देऊन आम्ही निघालो (ते घेत नव्हते तरीही आम्ही दिलेच). त्यांनी पटकन एक मोठी पिकलेली पपई आणुन माझ्या हातावर ठेवली. पपई आकाराने मोठी आणि खुप छान होती. त्यांचे आभार मानुन आम्ही गाजराईवाडीकडे निघालो.
काळा गवती चहा येत आहे

मधुर आणि मोठी पपई


नैसर्गीक अलार्म

घोळपासुन ४ कि.मी अंतराच्या कच्च्या रोडने आम्ही गाजराईवाडीमध्ये पोहोचलो तरीसुद्धा आम्हाला कोकणदिवा दिसत नव्हता आणि तसा तो रस्त्यावरून येताना कोणालाही दिसत नाही. एका वळणावरून जाताना त्याचे थोडेसे टोक नजरेस पडते पण त्यावरून तो कोकणदिवा असेल असे वाटत नाही. त्या परीसरातील सह्याद्रीचा विळखा अजब आणि अचंबित करणारा आहे. या विळख्यामुळे तिथे पोहचल्यावरसुद्धा कोकणदिवा आपल्या दृष्टीस पडत नाही. तो आपल्याबरोबर लपाछपीचा खेळच खेळतोय की काय असे वाटते. जवळच कुठेतरी लपुन "मी कुठंय?" असे विचारणाऱ्या लहान मुलासारखाच तो गाजराईवाडीच्या मागे असलेल्या छोट्या डोंगरामागे लपुन बसलेला आहे, मला शोधुन दाखवा असेच तर त्याला म्हणायचे नसेल ना? गाजराईवाडी चहुबाजुंनी तीव्र उतारांच्या डोंगरांनी आणि कड्यांनी वेढलेली आहे. तिथे खेळ खेळण्यासाठी सपाट मैदानाची जागा मिळणेसुद्धा दुरापास्त आहे. भातशेतीची वावरे तेवढी सपाट दिसतात. इथे गुरांसाठी मुबलक चारा उपलब्ध आहे. स्वयंपाकाच्या इंधनासाठी लाकुडफाटा अमाप आहे. भातशेतीसाठी लागणारे शेणखत उपलब्ध आहे. येथील सर्व शेती कोरडवाहु, परंतु पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वाडीत प्रवेश करताना वळणावर लागणाऱ्या ओढ्यामध्ये गावकऱ्यांनी मोठी टाकी खोदुन त्याभोवती भिंत बांधलेली आहे. या टाकीमध्ये १२ महीने पिण्याचे पाणी उपलब्ध असते. इथे चांदण्या रात्री येऊन तंबु ठोकुन सरळ मुक्काम करावा. मुक्काम करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. मुक्कामाजवळच पाण्याची व्यवस्था असल्यामुळे स्वयंपाक करणेसुद्धा खुप सोपे आहे.

झाडाची सावली पाहुन आम्ही सफारी पार्क केली. गाडीतुन आम्ही सर्वजण उतरलोच होतो तेच एका कुत्र्याने सफारीच्या चाकाजवळ येऊन तंगडी वर केली. गाजराईवाडीत आमचे हे असे अनोखे स्वागत झाले. त्या कुत्र्याला आम्ही सर्वांनी भरपुर शाब्दिक मार दिला पण त्याला काहीही फरक पडला नाही. त्यानंतर आम्ही निघण्याच्या तयारीला लागलो. कॅमेरे, मोबाईल, पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे साहीत्य आम्ही छोट्या सॅक्समध्ये घेतले आणि मोठ्या सॅक्स आणि झोपण्याचे साहीत्य गाडीमध्ये तसेच ठेवुन दिले. रस्ता माहीत असल्यामुळे गावातील लोकांजवळ चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. सॅक पाठीला लावुन आम्ही खिंडीचा रस्ता धरला. गावातले लोक या रस्त्याला खिंड म्हणतात. खिंडीच्या माथ्यावर आल्यावर कोकणदिव्याचे प्रथम दर्शन घडते. गर्द हिरव्या झाडीने वेढलेला कोकणदिवा दिमाखात उभा असलेला दिसतो. खिंडीच्या माथ्यावर मोबाईलला रेंज मिळते. खिंडीच्या उतारावरील वाट दाट झाडीतुन पुढे जाते. गुरांनी तयार केलेल्या पायवाटांमुळे मुख्य वाटेपासुन भरकटण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही ट्रेकर्सनी मुख्य वाटेवर दगडांचे मनोरे रचलेले आहेत. 
वाडीतुन खिंडीच्या माथ्यावर गेल्यावर

सपाटीवरील वाट

खिंडीचा उतार संपल्यानंतर मोकळ्या मैदानातुन जाणारी वाट पुन्हा दाट झाडीमध्ये शिरते. थोडे पुढे गेल्यावर रस्ता अडवून थांबलेले ते आडवे झाड आले. हे झाड रस्त्यात वाल्ह्या कोळीसारखे वाटमारी करायला थांबल्यासारखे वाटते. हा कोकणदिव्याकडे जाताना लागणारा सर्वात मोठा लँडमार्क. सगळ्यांनी त्याच्यावर बसुन फोटो काढले. कल्पेशला त्या झाडावर बसताना खुप कष्ट घ्यावे लागले. मग त्या आडव्या झाडावर आम्ही ग्रुप फोटो घ्यायचे ठरवले. सोशल मिडीयावर भाव खायला मिळावा म्हणून. ग्रुप फोटोसाठी एकेकजण त्या झाडावर चढु लागले. मी कॅमेरा धरुन उभा होतो. ९३ किलो, ८३ किलो, ७८ किलो असे तिघे बसल्यावरच ते झाड मेटाकुटीला येऊन त्याने जीव सोडला. एक आर्त किंकाळी देऊन त्याने आपला देह धरणीच्या दिशेने सोडला. दोन तुकडे होऊन रस्त्यातले आडवे झाड भुईसपाट झाले. पोझ देत असलेल्या ट्रेकर्सची एकच पळापळ झाली. एकजण पडता पडता वाचला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. हे सर्व अकस्मात घडल्याने या सर्व गोंधळात हातात कॅमेरा असुनही मला फोटो काढायचे सुचले नाही. आम्ही तिथुन निघताना त्या छिन्नविछिन्न झालेल्या झाडाजवळ दोन मिनिटे स्तब्ध ऊभे राहुन श्रद्धांजली वाहिली. पुण्यातील सर्व ट्रेकर्स मंडळींचे आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. यापुढे कोणालाही ते झाड दिसणार नाही. 
आडव्या झाडावर शेवटचा फोटो

मोडलेल्या झाडाला श्रद्धांजली

उभी चढण सुरु

त्या वाटेने पुढे जात राहील्यावर डाव्या हाताला देवीचे मंदिर लागले. येथील देवीची मुर्ती पितळेची असुन खुप छोटी (तळहातापेक्षाही छोटी) आहे आणि ती मंदिराच्या बाहेर ठेवलेली आहे. त्या छोट्याशा दगडी मंदिराच्या आतमध्ये काहीही नाही. देवीला देवळात शोधण्याचा प्रयत्न करू नये. त्या मंदिरा भोवतालची छाया खुप शितल आणि थकवा मिटवणारी आहे. तिथे आई भवानीचा आशिर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे थोडासा उतार आणि हलकी चढण चढल्यावर आम्ही गवताळ मैदानावर आलो. इथे मुक्कामी राहीलेल्या ट्रेकर्सनी पेटवलेल्या चुलींचे अवशेष दिसत होते. हे छोटेशे गवताळ मैदान पाहुन मला अभ्यासक्रमातील तैगा प्रदेशांची आठवण झाली. अशा ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. प्रोफाईल पिक काढण्यासाठी हे ठिकाण उत्तम होते. अथक प्रयत्नानंतर आणि अनेकवेळा क्लिक केल्यानंतर एक फोटो मनासारखा निघाला. सध्या मी तोच प्रोफाईल पिक म्हणून ठेवला आहे. या ट्रेकला चालणे कमी आणि फोटो काढण्यासाठी पोजिंग करण्यात जास्त वेळ चालला होता. सर्व ट्रेकर्सचे समाधान होईपर्यंत मनसोक्त फोटो काढाकाढी खेळलो. कड्याजवळ उभे राहुन, गवतात झोपुन, गवतात व्यायाम करताना, ग्रूपने झुकझुक गाडी करताना, गळ्यात गळे घालून आणि ऐनवेळी जी पोज सुचेल ती घेऊन आमचा फोटोंचा धुमाकुळ बराच वेळ चालला. फोटोग्राफीचा ढेकर आल्यावरच आम्ही कोकणदिव्याकडे वळलो. गाजराईवाडीतुन ८ वाजुन १० मिनिटांनी निघालेलो आम्ही १० वाजता चढण सुरू होते तिथे होतो. २० मिनिटांचे अंतर कापायला आम्ही २ तास लावले अर्थात बाकीचा वेळ हा फोटोग्राफी करण्यात गेला. स्वतंत्रपणे ट्रेकला येण्याचा हा फायदा असतो, मनसोक्त आणि स्वच्छंदपणे वावरता येते.  एखाद्या ग्रूपमध्ये पैसे भरून गेलो तर त्यांचे सगळे नियम पाळावे लागतात आणि सारखे चला लवकर, चला लवकरचा तगादा ऐकावा लागतो. फोटो काढण्यासाठी एवढा मनसोक्त वेळ मिळालाच नसता. बरोबर १० वाजता सर्वांनी चढण चढायला सुरुवात केली. माझा बॅगचा पसारा आवरे पर्यंत मला ५ मिनिटे ऊशिर झाला.  मी सॅकमधुन वॉकींग स्टिक काढली आणि हवी तेवढी उंची सेट करून कोकणदिव्याच्या उभ्या चढणीवर पाय ठेवला. इथे पूर्वानुभव खुप उपयोगी पडतो. उभ्या चढणीवरून झपाझप पावले टाकत मी सर्वांना मागे टाकत १५ मिनिटांत गुहेजवळ पोहोचलो. संतोष २० मिनिटांत माझ्या मागुन आला. महेंद्र आणि कल्पेश सर्वात शेवटी आले त्यांना ४० मिनिटे लागली.

मृत खेकडा


गवताळ मैदान


प्रभुंचे नामस्मरण

आजचा मेनु

गुहेत आणि गुहेसमोरच्या अंगणात पुन्हा भरगच्च क्लिकक्लिकाट केला. सर्वांनी गुहेसमोर हवेत उंच उडी मारलेला फोटो यावा अशी फर्माईश केली. मग मी पण तुमच्यासाठी काय पण म्हणून कॅमेरा घेऊन सरसावलो. गुहेच्या प्रवेशद्वाराची चौकट आणि त्यात सूर्यप्रकाशात मारलेल्या उडीचा फोटो अफलातुन येणार होता. आम्ही सर्व गुहेत बसलो फक्त ज्याचा फोटो काढायचा आहे त्याला गुहेसमोर उडी मारायच्या तयारीत उभे रहायला सांगितले.  कल्पेशला १..२..३ मोठ्या आवाजात मोजायला सांगितले, ३ ऐकले की शक्य तेवढी उंच उडी मारायची आणि त्याचवेळेस मी ती उडी कॅमेऱ्यात कैद करणार होतो. सर्वांच्या उड्या व्यवस्थित कैद झाल्या आणि खुप वाहवा सुद्धा  झाली पण संतोषची उडी काही बसता बसत नव्हती. आम्ही त्याला खुप उड्या मारायला लावल्या तेव्हा कुठे एक चांगली उडी कॅमेऱ्यात आली. आम्ही ट्रेक पेक्षा फोटोग्राफी करून आणि फोटोंना पोज देऊन जास्त थकलो की काय असे वाटायला लागले. ११ वाजता सॉलीड भूक लागली होती. गुहेच्या थंडगार सावलीत आम्ही डबे उघडले आणि आक्रमण म्हणुन जेवणावर तुटुन पडलो. गुहेशेजारील टाक्यातील पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य आहे त्यामुळे जेवण करताना पुरेल एवढे पाणी आम्ही बरोबर आणलेले होते. 

कोकणदिव्याची गुहा

हवेतील उंच उडी

पोटोबा झाल्यानंतर आम्ही कोकणदिव्याच्या माथ्याकडे वळलो. राजांचा रायगड पाहण्यासाठी डोळे आतुरलेले होते. एकेक पाऊल सावधपणे टाकत आणि काठीचा आधार घेत घेत आम्ही कोकणदिवा सर केला. माथ्यावरून दिसणारे दृश्य निव्वळ अप्रतिम होते. आठही दिशांनी दिसणारे सह्याद्रीचे नयनमनोहर रूप, कातळ कडे आणि आकाशाला भिडणाऱ्या सुळक्यांपासुन ते अर्धगोलाकार ठुमकेदार डोंगरांपर्यंत सर्वकाही सह्याद्रीच्या सौंदर्यात भरच घालत होते. आणि समोरच ज्वलंत ईतिहासाचा साक्षीदार रायगड "उभाच राहीन मी" म्हणत दिमाखात उभा होता. मेघडंबरी, होळीचा माळ, जगदीश्वराचे मंदिर आणि राजांची समाधी डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. हे सर्व पाहुन मन तृप्त होत नाही तोच कोकणात जाणाऱ्या काळनदीचा पसारा नजरेस पडला. जानेवारी महीना संपत आलेला असतानाही तिच्यामध्ये थोडासा पाण्याचा ओलावा दिसत होता मग जुलै-ऑगस्टमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. एवढ्या उंचावरून ओसंडुन वाहणारी नदी पहायला काय मजा येईल ना? आजुबाजुचा सह्याद्रीचा पसारा एवढा विस्तृत आहे की रायगडाच्या डाव्या बाजुला दुरवर दिसणारा लिंगाणा सुद्धा तांदळातील खड्यासारखा हेरून शोधावा लागतो. लिंगाणा आणि लिंगाण्याच्या आजुबाजुचे दृश्य खुप छान दिसते. कोकणदिव्यावरून दिसणारे सह्याद्रीचे बहुरंगी रूप खरेच वैशिष्ट्यपुर्ण आहे. कोणत्याही दिशेला पाहीले तरी नेत्रांना सुखावणारे दृष्यच डोळ्यांना दिसते. 
पाठमोरा रायगड

रायगडाचे आणि काळनदीचे दृश्य


शिखरावर पोचल्या पोचल्या पहीला सौ. ला फोन लावला

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो (२०१६)

पाठीमागे लिंगाणा आहे, ओळखा पाहु कोणता?

शक्तीवर्धक प्येय

दुस-या बाजुने असे दृश्य दिसते

स्वराज्याची राजधानी

कोकणदिव्याच्या माथ्यावरुन दिसणारे सह्याद्रीचे नयनमनोहर दृश्य

परतीचा प्रवास सुरु

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी मी तिरंगा घेऊन आलो होतो. आम्ही सर्वांनी तिरंगा फडकावुन प्रजासत्ताक दिन साजरा केला. मनसोक्त आणि यथेच्छ फोटोग्राफी केल्यानंतर आम्ही कोकणदिव्याचा निरोप घेतला. कोकणदिवा उतरताना खरी कसोटी लागते. माती आणि मुरुमामुळे तीव्र उतारावरून उतरताना पाय घसरण्याची शक्यता आहे. दोन्ही हातात काठ्या असल्यास उत्तम. वाटेच्या कडेला असलेल्या कारव्यांना धरून उतरल्यास त्याहुन उत्तम. परतीच्या प्रवासात कुठेही वेळ न दवडता आम्ही थेट गाजराईवाडीला पोहोचलो. सफारीचा दरवाजा उघडल्या उघडल्या समोर पपई दिसली. एवढी मऊ झालेली होती की हातानेच दोन तुकडे करता आले. पपईच्या मधुर स्वादाने मन तृप्त झाले. गाजराईवाडीच्या पाणवठयावर आम्ही रीकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या आम्ही भरुन घेतल्या. आणि पुण्याच्या दिशेने निघालो....
पपई खाओ खुद जान जाओ


जय हिंद !!!






No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...