सलग ६०० किमी सायकलिंग....
Pune Randonneurs :
Date: 9th January, 2016
Start Time: 06:00
Starting Point
Pune University
Route Map:
Facebook:
Event Details on AIR site:
माझे सुपर रँदोनिअर होण्याचे स्वप्न मला पुर्ण करायचे आहे आणि त्यासाठी मला ४० तासात ६०० किमी चालवणे आवश्यक आहे. या ४० तासांत सायकल चालवणे, नाष्टा, जेवण, विश्रांती, झोप आणि पंक्चर वगैरे सायकलची कामे निघाली तर तीसुद्धा या ४० तासातच उरकायची आणि ६०० किमी अंतर पार करायचे. सलग ४० तास सायकल चालवण्याचे ओझे पेलताना पंक्चर आणि ब्रेकडाउनची तलवार सतत डोक्यावर टांगलेली असते. महागडे टायर्स आणि महागड्या सायकल्स वापरण्याचे कारण म्हणजे बीआरएममध्ये ब्रेकडाउन आणि पंक्चरच्या धोक्याचे प्रमाण खुप कमी करणे होय.
९ जानेवारीला पुणे रँदोनियर्सचे ६०० किमी चे ब्रेवेट होते. नविन वर्षातील हे पहीलेच ब्रेवेट. ज्या मार्गावर ४०० किमी सायकल चालवली त्याच मार्गावर थोडे अंतर वाढवून ६०० किमी सायकल चालवायची होती. ४०० च्या बीआरएममध्ये माझी एवढी वाट लागलेली की त्यापुढचा ६०० चा आकडा ऐकुनच माझ्या काळजात धस होऊन पोटात गोळा येत होता. त्यामुळे ६०० किमी सायकलिंग मी ४० तासात पुर्ण करू शकेल की नाही याबाबत मलाच खात्री वाटत नव्हती. जेमतेम वेळेत मी ६०० ची बीआरएम पुर्ण करू शकेन पण मग झोपेचे काय? झोपेसाठी वेळ कुठुन आणायची? झोपायलाच मिळाले नाही तर मग माझे काय होईल? न झोपता ४० तास सायकल चालवता येईल का? मला सायकल चालवताना झोप तर येणार नाही ना? कोणत्याच प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. मग मी ठरवले की लढु या.. होईल ते होईल. डर के आगे ६०० किमी है. . आणि अगदीच नाही जमले तर टेम्पोत सायकल टाकून घराचा रस्ता धरायचा. ठरले तर मग. ६०० चे ब्रेवेट करायचेच. काहीही होवो. बचेंगे तो और भी लढेंगे...
प्रत्येक बीआरएममधुन काही ना काही तरी शिकायला मिळाले होते. ३०० ची बीआरएम टायर पंक्चर करून गेली त्यामुळे नुसती ट्युब बरोबर न ठेवता पंक्चर किटही सोबत असायला पाहीजे हे शिकलो. ४०० च्या बीआरएम मध्ये अँटी पंक्चर टेपने स्पीडची कशी वाट लागते हे शिकलो. त्यामुळे ६०० च्या बीआरएमला अँटी पंक्चर टेप काढुन ठेवला होता. अँटी पंक्चर लिक्वीडही आणले होते पण रोलिंग जड होईल म्हणुन तेही वापरले नाही. छोटा हवेचा पंप आणि फक्त पंक्चर किट बरोबर घेतले. यावेळेस अल्ट्रालाईट सॅक पाठीवर घेणार होतो. सॅकमध्ये खाण्याचे पदार्थ, इलेक्ट्रॉल हवेचा पंप वगैरे वस्तु ठेवायच्या होत्या. यावेळेस सायकलवर जास्त वजन टाकायचे नाही असे ठरवले होते. ९ जानेवारीला सायकल कारच्या कॅरीअरवर आडवी बांधुन विद्यापीठापर्यंत गेलो. ६०० ची बीआरएम बरोबर ६ वाजता सुरू झाली. कौस्तुभ, धीरज (नानु), संग्राम, यशोधन, राहुल गाढवे आणि राहुल कोंढाळकर हे सर्वजण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी विद्यापीठ मेन गेटवर हजर होते. फरहदने निघा म्हटल्यावर मी त्या सर्वांचा निरोप घेतला आणि पॅडलवर जोर देऊन सायकलला गती दिली.
त्यादिवशी सकाळची थंडी चांगलीच जाणवत होती. मी अल्ट्रालाईट जॅकेट घातले होते. २००,३०० आणि ४०० च्या बीआरएमला ज्या मार्गावर सायकल चालवली त्याच मार्गावरून ६०० साठी निघालो होतो. NH-4 अगदी पाठ झालेला आहे. तो नेहमीचाच आपला कात्रज घाट. तोच दरीपुल. रस्ता जरी सरावातील असला तरी मी सरावाच्या वेळी जो गियर रेशिओ वापरतो तो बीआरएमला वापरत नाही. बीआरएममध्ये कोणताही चढाचा रस्ता आला की मी पॅडलजवळ पहीला गियर लावतो, यामुळे पायांचे फेरे वाढतात परंतु कमी टॉर्कमुळे शरीरातील शक्ती जास्त खर्च होत नाही. पुढे पहीला आणि मागे पाचवा गियर लावुन शरीरावर कोणताही अतिरिक्त ताण न देता कात्रज बोगदा सहज पार केला. कात्रज बोगदा पार केल्यानंतर कुठेही वेळ दवडली नाही. खंबाटकीची चढण सुरु होते तिथे नाष्ट्याचा ब्रेक घेतला. नाष्टा करत असतानाच आम्हाला टायर फुटल्यासारखा एक फटाक आवाज आला होता पण आवाज नक्की कशाचा आहे हे कळले नव्हते. नाष्टा करून निघताना कळले की धनंजयच्या सायकलचे पुढचे चाक चपटे झालेले आहे त्याचाच आवाज होता तो. व्हॉल्व्हच फुटलेला असल्यामुळे पंक्चर काढता येण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने सोबत ट्युब सुद्धा घेतलेली नव्हती. आता काय करायचे? हा गहन प्रश्न निर्माण झाला होता. माझ्याकडील ट्युबची साईज भिन्न असल्यामुळे त्याच्या सायकलच्या चाकाला बसणे शक्य नव्हते. नशिब बलवत्तर म्हणून निरज विश्वकर्मा सुद्धा त्याच हॉटेलात नाष्टा करायला थांबलेला होता. त्याला ट्युब आहे का विचारले? त्याने विचारता क्षणी लगेच त्याच्याकडची ट्युब काढुन दिली. ट्युब हातात पडल्यानंतर ३ मिनिटातच आम्ही सर्वांनी मिळुन चाकात ट्युब बसवली आणि पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. ऊन वाढायला लागल्यामुळे थंडीचे जॅकेट आणि फ्लिसची कानटोपी काढुन मी सॅकमध्ये ठेवली.
चाकातील अँटी पंक्चर टेप काढुन टाकल्यामुळे सायकलचा वेग थोडा का होईना पण वाढलेला जाणवत होता. नेहमीचाच रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरची सर्व वळणे, सर्व खड्डे, सर्व चढ, सर्व उतार, बाह्यवळणे आणि गतिरोधक वगैरे सर्व पाठ झालेले होते. एनएच-४ ची गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारत चाललेली आहे यात तिळमात्र शंका नाही. साताऱ्याचा चौक ओलांडल्यानंतर एका साध्या सायकलवाल्याने मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू केला. हे साधे सायकलवाले गुपचूप ओव्हरटेक करून कधीच जात नाहीत. तो ओव्हरटेक करणार आणि माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहत पुढे निघुन जाणार. साधी सायकल असुनही कशी तुझ्या गियरच्या सायकलला मागे टाकली असा रूबाब सुद्धा दाखवणार. मी थकलेलो असताना असा अनुभव बऱ्याच वेळा घेतलेला आहे. मी त्याला गियरच्या सायकलचा इंगा दाखवायचे ठरवले. मी त्याच्या बरोबरीनेच सायकल चालवायला सुरूवात केली. पुढेही नाही आणि मागेही नाही. त्याला वाटायचे की त्याने अजुन थोडी जोरात सायकल चालवली तर तो मला सहज मागे टाकु शकेल. त्याने वेग वाढवला की मी सुद्धा तेवढाच वेग वाढवायचो. अशी वेग वाढवावाढवी तीन वेळा झाली. त्यानंतर त्याची दमछाक झाल्यामुळे त्याला तो वेग कायम ठेवणे अशक्य झाले आणि त्याने माझ्याशी रेसचा नाद सोडुन दिला. चेकपॉइंट्स यादीत महींद्रा एक्झीक्युटीवचे नाव दिसल्यामुळे मी तिथे थांबुन योगेशला फोन करत होतो तेवढ्यात प्रशांत जोग तिथे आला आणि इथे चेकपॉइंट नाहीये असे त्याने सांगितले. मग मी तसाच पुढे प्रवास चालु ठेवला. वराडे चेकपॉइंटला मी १ वाजुन ५५ मिनीटांनी पोहोचलो तेव्हा अंतर पार झालेले होते १५६ किमी. पुढचा चेकपॉइंट शिरगांव एमआयडीसी येथुन ९० किमीवर होता. टाईम स्टँप आणि योगेशची सही घेऊन मी लगेच वराडे चेकपॉइंट सोडला. भुकेची चिन्हे दिसत नव्हती. तरीसुद्धा कराडमध्ये जेवणासाठी थांबलो. भुक लागण्याची वाट बघण्यात काहीही अर्थ नव्हता. हॉटेल गंधर्व पॅलेसमध्ये थम्सअपच्या मदतीने दाल राईस घशाखाली उतरवला आणि मी कराड सोडले. सातारा सोडल्यानंतर पुढे कोल्हापुरकडे जाताना रस्ता खरंच खुप छान आहे. सूर्यास्त होताना कोल्हापुरच्या जवळपास पोहोचलो होतो. अंधार पडल्यानंतर थंडीचा प्रभाव वाढण्याअगोदर थंडीचे कपडे अंगावर चढवलेले बरे म्हणुन मी रस्त्याच्या कडेला थांबलेलो होतो. तोच पाठीमागुन अद्वैत जोशी आला. त्याला एकट्याला सायकल चालवण्याचा कंटाळा आलेला होता. मग आम्ही दोघे मिळुन हॉटेल जयहिंद डिलक्सच्या दिशेने निघालो. स्ट्रावावर आम्ही दोघेही एकमेकांचे फॉलोअर आहोत हे आम्हाला एकमेकांची नावे विचारल्यावर कळाले. ६०० च्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट झाली. पॅडलवर पाय फिरवत आम्ही शिरगांवच्या दिशेने निघालो होतो. कधी एकदाचे हॉटेल जयहिंद येतंय असे झाले होते पण ते हॉटेल काही येत नव्हते. आम्ही एका भलत्याच जयहिंद हॉटेलमध्ये घुसलो, तिथे गेल्यावर कळले की आम्हाला हवे असलेले जयहिंद डिलक्स अजुन ३ किमी पुढे आहे. तेव्हा खुपच वैताग आला होता.
संध्याकाळी ७ वाजुन ५ मिनीटांनी दुसरा चेकपॉइंट हॉटेल जयहिंद डिलक्स येथे पोचलो. पार झालेले अंतर होते २४६ किमी. माझ्या मागोमाग धनंजय कोंढाळकर आणि प्रशांत जोग लगेचच आले. आम्ही सर्वांनी व्यवस्थित पोटपुजा आटोपल्यानंतर ८ वाजुन ३० मिनिटांनी शिरगांव सोडले. आशुतोष वाघमारे, धनंजय कोंढाळकर, प्रशांत जोग, अरूण ठिपसे आणि मी असे आम्ही पाच जणांनी मिळुन साताऱ्याकडे प्रस्थान केले. साताऱ्यात पहाटे ३ वाजता पोचुन २ तास झोपण्याचा विचार केलेला होता. कोल्हापुरची पाण्याखालची ऊसाची शेती थंडीच्या कडाक्यात भरच घालत होती. रात्रीच्या वेळी नदीजवळुन जाताना थंडीचे महाभयानक रूप काय असते याची परीचिती येत होती. नदीजवळच्या गारठ्याने शरीराला थंडीचे ठणके बसत होते. आणि थोड्या अंतरावर लगेच दुसरी नदी हजर असायची. शिरगांव ते सातारा या दोन चेकपॉइंट्स मधील अंतर १३३ किमी होते. हॉटेल साई इंटरनॅशनल मागे टाकताना खुप बरे वाटले. तेव्हा एक मैलाचा दगड पार केल्याचा आनंद झाला होता.
कराडच्या मार्गावर असताना एक चहाची हातगाडी दिसली म्हणुन चहा पिण्यासाठी थांबलो. बाजुला शेकोटीसुद्धा पेटवलेली होती. चहा आहे का विचारले तर त्याने मलाच प्रश्न विचारायला सुरूवात केली. कुठुन आलात? कुठे चाललात? बरेचजण गेलेत सायकलवर इथुन. तुम्ही एवढी सायकल का चालवताय? तुम्हाला कोणी हे करायला सांगितले आहे का? त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि सांगितले की हे कोणीही करायला सांगितलेले नाही, याला आपलीच ** आपणच मारून घेणे असे म्हणतात. मग तो दिलखुलास हसला. सायकल चालवतोय म्हणून त्याने मला दुधाचा चहा करून दिला, आणि साखर किती चमचे टाकु ते सुद्धा आपुलकीने विचारले होते. दुधाचा चहा घेऊन झाल्यावर मी कराडच्या दिशेने निघालो. पॅडल मारून मारून पायांचे तुकडे पडायची वेळ आली पण कराड काही येईना. कसेबसे एकदाचे कराड आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांचे बाहेरचे दिवे चालुच असायचे. त्या दिव्यांचा थोडासा उजेड रस्त्यापर्यंत पोचत होता. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात तो अंधुकसा उजेडही पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे भासत होता. अशाच एका उजेडातील कठड्यावर आडवा झालो. कपडे मळतील वगैरे हा विचारही मनात आला नाही. शरीराची दमछाक झालेली असताना कपडे चांगले ठेवुन कोणाला दाखवायचेत? बीआरएममध्ये कपडे वगैरे गोष्टींना दुय्यम स्थान असते. पॅडल मारून अंतर कापत राहणे ही प्राथमिकता. शरीरातील उर्जेची पातळी कमी होऊ नये म्हणून मी थोड्या वेळाच्या अंतराने जवळ असलेले खाद्य पदार्थ सतत खात होतो. रात्री २ नंतर सायकल चालवणे असह्य होऊ लागले आणि पोटातही कावळे कोकलायला लागलेले मग पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसुन जवळ असलेली शिदोरी संपवली.
कराड ते सातारा या अंतराने अंत पाहीला. गावोगावच्या फ्लायओव्हर्समुळे तयार झालेले कृत्रिम चढ उतार म्हणजे ६०० च्या बीआरएमसाठी काळ्या पाण्याची शिक्षा असल्यासारखे वाटत होते. या चढ उतारांमुळे वेग खुप मंदावला होता आणि सायकलिंग असह्य वाटत होती. मजल दरमजल करत कसाबसा सातारा खिंडीजवळ पोहोचलो. सातारा खिंडीचे निम्मे अंतर सायकलवरून खाली उतरून चालत पार केले. चालल्यामुळे पायाचे स्नायु मोकळे होण्यास चांगलीच मदत झाली. खिंड संपल्यावर लगेच उतार सुरू झाला त्या उतारावर सायकल सोडुन दिली ती थेट राज हॉटेलच्या दारातच थांबवली. मी तिथे पोचलो तेव्हा अद्वैत जोशी राज हॉटेल सोडण्याच्या तयारीत होता. पहाटे ४ वाजुन ४५ मिनीटे झालेली होती आणि २३ तासात आतापर्यंत ३८० किमी अंतर पार झालेले होते. मी योगेशची झोपमोड केली तरीही तो रागावला नाही. रूममधील सॅक घेऊन मी माझ्या जवळचा स्टॉक अपग्रेड केला आणि माझ्याकडील अनावश्यक वस्तु सॅकमध्ये ठेवून दिल्या. व्हाट्सअॅप ग्रूपमध्ये टाकण्यासाठी सेल्फि आणि एक फोटो काढला. ५ ते ५ः२० या वेळेत राज हॉटेलच्या पॅसेजमधील ब्लॉक्सवर एक गाढ डुलका घेतला. अंथरुणाच्या उबेत शिरलो असतो तर कदाचित त्या ऊबेच्या मोहातुन बाहेर पडताना खुप वेदना सहन कराव्या लागल्या असत्या किंवा गाढ झोप लागुन मला जागच आली नसती. गाढ डुलका घेतल्यानंतर थोडे ताजेतवाने वाटायला लागले होते. सर्व तयारी करून मी राज हॉटेल सोडण्याच्या तयारीत असताना धनंजय आणि प्रशांत राज हॉटेलवर पोहोचले होते. माझी विश्रांती घेण्याची वेळ संपल्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबलो नाही. झोपेतुन उठल्यावर सायकल चालवताना ताजेतवाने वाटावे म्हणून मी एक रेड बुल घशाखाली उतरवला आणि पुणे गाठण्यासाठी सायकलला टांग मारली.
तो अमावस्येचा काळाकुट्ट अंधार अजुनही रस्त्यावर पसरलेला होता. हाडे गोठवणारी थंडी मी म्हणत होती. पण मी कशाचीही पर्वा करत नव्हतो. कडाक्याच्या थंडीतही पायांनी पॅडल मारण्याचे कार्य अविरतपणे चालु ठेवले होते. भुईंज सोडल्यावर सुर्यनारायण आपल्या रथात आरूढ झाले. सगळा अंधकार नाहीसा झाला. भुइंज ते खंबाटकी बोगद्यापर्यंतच्या रस्त्याचे काम पुर्ण झालेले नसल्याने या पट्ट्यात मला सायकल चालवायला खुप भिती वाटत होती. भिती म्हणजे चाक पंक्चर होण्याची भीती कारण ३०० च्या वेळी याच पट्ट्यात माझी सायकल दोन वेळा पंक्चर होऊन मी DNF झालो होतो. त्यामुळे चाकासमोर फुल जरी आले तरीही मी ते चुकवत होतो आणि हे करताना एका नाट्यगीताच्या ओळी माझ्या ओठावर येत होत्या.
" काटा रूते कुणाला........
मज फुल ही रूतावे...... "
हा सर्व दैवयोग असतो. वेळ खराब असेल तर काहीही होऊ शकते. पंक्चरच्या भितीने या खराब रोडवर मी खुप सावकाश सायकल चालवली आणि सतत रामाचे नाम घेत होतो. रामरक्षा आठवत होतो,
"अपने भुजाओं के बलसे समस्त असुरों के कुलों का नाश करनेवाले रघुकुलवंशज हे प्रभु श्रीराम आप को मेरा सादर प्रणाम है... "
सकाळच्या मंगल समयी प्रभु श्रीरामांचे नामस्मरण केल्याने खुप प्रसन्न वाटत होते.
मी वाई फाटा मागे टाकला. खंबाटकी बोगद्याच्या अलिकडे चहा बिस्कीटावर ताव मारूनच पुढे मार्गस्थ झालो. खंबाटकी बोगद्याजवळील रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. खंबाटकीच्या बोगद्यात शिरताना खुप मोठे ओझे कमी झाल्यासारखे वाटत होते. ४२० किमी सायकलिंग पुर्ण झालेले होते. आता निरा नदीपर्यंतचा टप्पा खुप सोपा होता. सगळा रस्ता उताराचा आहे. निरा नदी ओलांडून शिरवळ मागे टाकले आणि पुणे हद्दीत शिरलो तेव्हा सकाळचे ९ वाजलेले होते. सौ. ला फोन करून ही गोड बातमी दिली आणि चांदणी चौकातील चेकपॉइंटवर यायला सांगितले आणि येताना मला ज्या वस्तु लागणार होत्या त्या आणावयास सांगितल्या. सकाळची वेळ असल्यामुळे सायकल चालवायला फारसा त्रास होत नव्हता त्यामुळे कात्रज बोगद्यापर्यंत मी सहज पोचलो. त्यानंतर नविन कात्रज घाटाच्या उतारावरून मी सुसाट सायकल सोडली. नवले ब्रीज, सिंहगड फ्लायओव्हर आणि वारजे चौक मागे टाकत मी चांदणी चौकात पोचलो.
सकाळी ११ वाजुन ५० मिनीटांनी चांदणी चौकातील सीसीडी चेकपॉइंटवर रिपोर्ट केले. सायकलिंगचे अंतर झाले होते ४८२ किमी. तिथे सही शिक्का देण्यासाठी कोणीच नव्हते. सेल्फि काढुन व्हाटसअॅप ग्रुपमध्ये टाकली. सौ. ने थर्मासमध्ये पाठवलेला गरमागरम चहा मारला. पाण्याचा स्टॉक भरून घेतला. थोडा वेळ शवासन केले आणि १२ः३० वाजता लोणावळ्याच्या दिशेने प्रस्थान केले. आता ऊन्हाचा जोर चांगलाच वाढायला लागला होता. संथगतीने पॅडलवर पाय हलवत हळूहळू अंतर कापणे चालुच ठेवले. जिथे सावली दिसेल तिथे २ मिनिटे थंड होऊनच मी पुढे जात होतो. हँडलबार बॅगमध्ये फ्राईड राईसची बॅग उघडी करून त्यात चमचा ठेवलेला होता. त्या चमच्याने मी सायकल चालवता चालवताच अधून मधून भात खात होतो. कधी कधी भाताचा घास तोंडातल्या तोंडातच घुटमळायचा. भाताचा घास घशाखाली उतरेनासा झाला कि तोंडात पाणी घेऊन त्या पाण्याच्या दाबाने मी तो घास घशाखाली ढकलत होतो. पोटात अन्न जाणे खुप महत्वाचे होते. ऊन्हाचा भयंकर त्रास होऊ लागला होता. मला गरगरायला लागले होते आणि चक्कर आल्यासारखे वाटायला लागले. आता चक्कर येऊन पडलो तर संपले सारे. समोरच झाडाच्या सावलीखाली एक रसवंती गृह दिसले तिथे मी २० मिनिटे विश्रांती घेतली आणि २ ग्लास आले व लिंबू टाकलेला ऊसाचा ताजा रस पिलो. सावलीमध्ये विश्रांती घेतल्यामुळे माझा सायकल चालवण्याचा उत्साह पुन्हा वाढला. तिथुन पुढे लोणावळ्यापर्यंत पोचायला मग काहीही त्रास झाला नाही. बचेंगे तो और भी लढेंगे.
३ वाजुन ५० मिनिटांनी लोणावळ्यातील मगनलाल चौकात पोचलो, तेव्हा ५४५ किमी अंतर पुर्ण झालेले होते. आता उरलेले ६० किमी अंतर पार करण्यासाठी माझ्याकडे ६ तास शिल्लक होते. थोडा वेळ विश्रांती घेऊन मी लगेच माघारी फिरलो. लोणावळा ते पुणे सायकल चालवायला खुप कष्ट पडत होते. कधी एकदा चांदणी चौकात पोचतोय आणि या सायकल चालवण्याच्या त्रासातुन मुक्त होतोय असे मला झाले होते. सायकलवर बसुन कसेबसे पाय हलवणे चालु होते. सायकलला गती देण्याचा विचारही मनात येऊ शकत नव्हता. देहुरोड मागे टाकुन बायपासला वळल्यावर अंधार पडु लागला होता. पुढची आणि मागची लाईट चालु करून मी मार्गक्रमण चालु ठेवले. वाकड, बालेवाडी, सुस रोड आणि पाषाण तलाव मागे टाकल्यानंतर बावधानचा नविन पुल फणा काढुन माझ्यापुढे उभा राहीला. त्याच्यापुढे मी पुर्ण शरणागती पत्करली. तो मी सायकलवरून उतरून चालत चालत चढलो. एवढी दमछाक झालेली असताना असे चढ जीवघेणे वाटतात.
७ वाजुन ३२ मिनिटांनी मी सीसीडीमध्ये प्रवेश केला. तिथे परफेक्ट सायकल ग्रूपचे सर्व सायकलपटु आणि मित्रमंडळी स्वागतासाठी सज्ज होते. त्यांनी एकच जल्लोष केला. माझ्यासाठी हे अनपेक्षित होते. सीसीडीमध्ये पोचल्यावर सायकल एका बाजुला कुठेतरी उभी करून मी जागा मिळेल तिथे आडवा पडणार होतो. पण मित्रांनी केलेला जल्लोष आणि स्वागत पाहुन माझा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला. मोठा पुष्पगुच्छ देऊन माझी कामगिरी गौरवण्यात आली. हे सर्व नियोजन श्री. राहुल कोंढाळकर यांनी केले होते. बीआरएमच्या व्हाटसअॅप ग्रुपमध्ये माझा फोटो टाकून ६०० चे ब्रेवेट पुर्ण केल्याची वर्दी दिली. सलग ३७ तास आणि ३२ मिनिटांच्या अथक परीश्रमानंतर ६०० किमी अंतर सायकलवर पार केले.
आता २००, ४०० आणि ६०० चे ब्रेवेट्स पुर्ण झालेले आहेत. पंक्चरमुळे अपुर्ण राहीलेले ३०० चे ब्रेवेट पुर्ण केल्यावरच मी सुपर रँदोनियर होऊ शकेन. आता मी ३०० च्या ब्रेवेटची प्रतिक्षा करतोय..
शोले मध्ये गब्बरचा जसा होली कब है? कब है होली? चा डायलॉग आहे
तसा डायलॉग मी सुद्धा म्हणत आहे...
३०० कब है? कब है ३००?
जयहिंद...!
No comments:
Post a Comment