Thursday, 21 April 2016

सांदन व्हॅली


सांदन व्हॅली
           एकाच दिवशी अनेक कार्यक्रम आले की मी नेहमी संभ्रमात पडतो की आता नक्की काय करायचे? माझ्या आयुष्यात असे प्रसंग खुप वेळा आलेले आहेत की सायकलिंग, ट्रेकींग, क्रिकेट सामना किंवा एखाद्या मित्राच्या फार्म हाउसवर पार्टी या सर्वांचा दिवस एकच आलेला असतो. आणि या सर्वांमधून मला एकच पर्याय निवडुन बाकीच्या पर्यायांवर पाणी सोडावे लागते. १९ मार्च शनिवार हा त्यापैकीच एक दिवस. शिखर फाउंडेशनने सांदन व्हॅली ट्रेक १९ आणि २० मार्चला आयोजित केलेला होता. शनिवारी सकाळची शिफ्ट दुपारी ३ वाजता सुटली की तसेच सांदन व्हॅलीकडे प्रस्थान करावयाचे होते. व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये याची सविस्तर माहीती आलेली होती. चहा, नाष्टा व दोन वेळा जेवणाच्या सोयी सहीत रात्रीची झोप तंबुच्या कॉलनीत घेता येणार होती. आपण फक्त पाण्याच्या बाटल्या आणि पांघरुण घेऊन जायचे की सांदन व्हॅली ट्रेक मार्गी लागणार होता. 

    पण नेहमीप्रमाणे माझ्यासाठी १९ मार्चला त्रिधा मनस्थिती झालेली होती. १९ मार्चला भारत वि. पाकीस्तान हा टी-२० वर्ल्ड कप मधला सामना कलकत्त्यात रात्री ८ वाजता सुरु होणार होता आणि त्याचदिवशी आमलकी एकादशीचा उपवाससुद्धा होता. एकादशीचा उपवास माझ्यासाठी जीव की प्राण आहे. सांदन व्हॅली खुप दिवसापासुन मनात आणि मेंदुत वळवळ करत होती. या दोन गोष्टींपुढे क्रिकेट सामना बघण्याचा विचार मी सोडुन दिला. क्रिकेट सामना रेकॉर्ड करुन ट्रेकवरुन परत आल्यानंतर पुन्हा पाहता येईल पण सांदन व्हॅली ट्रेक शिखरच्या मित्रांबरोबर पुन्हा करण्याची संधी लवकर मिळणार नाही हे मात्र नक्की होते. आता उरला प्रश्न फक्त एकादशी उपवासाचा. उपवासाची खिचडी बरोबर घ्यायचे ठरवले. आणि उपवासाची माहीती शिवाजी आंधळेंना दिल्यावर त्याने त्वरीत तुकाराम बांडेंना फोन करुन दोन-तीन व्यक्तींसाठी खिचडी बनवण्याची व्यवस्था केली. "वो ही सही होय जो राम रचि राखा" अशा रितीने एकादशी उपवासाचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला. आणि आता कुठलाच विषय शिल्लक न राहील्यामुळे सांदन व्हॅलीला न जाण्याचा विषयच नव्हता.

           ड्रायव्हींगचा त्रास न घेता ट्रेकला जायला मिळणे हे एक सौभग्यच. ३२ सीटर बस केलेली होती. बसमध्ये एकाने स्वयंचित्रखेचकदंडुका आणला होता. त्याच्यासहाय्याने आम्ही बसमध्येच चार ते पाच ग्रूप सेल्फी काढल्या. साधारण ५ तास प्रवास केल्यानंतर आम्ही साम्रद गावात पोचणार होतो. कुशल ट्रेकर्सबरोबर ट्रेकला जाण्याचा फायदा म्हणजे आपल्या मेंदुला कसलाही त्रास द्यावा लागत नाही. फक्त ज्या सुचना येतील त्या व्यवस्थित पाळल्या की काम फत्ते. एका मेंदुपेक्षा १० मेंदु केव्हाही श्रेष्ठच. कोणता मार्ग निवडायचा यावर बरीच चर्चा होऊन जो सोपा आणि जवळचा होता तो निवडुन आम्ही रात्री ९:३० वाजता साम्रद गावात पोहोचलो. शिखर टिममध्ये एकापेक्षा एक अनुभवी ट्रेकर्स आहेत. त्या अनुभवाचा फायदा नव्याने येणा-या ट्रेकर्ससाठी एक पर्वणीच असते.

     साम्रद गावात पोचल्यावर आम्ही कुठे टिव्ही चालु दिसतोय का ते पाहु लागलो पण कुठेही भारत-पाक सामना पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता किंवा गर्दी आढळ्ली नाही. याचा अर्थ या अतिशय दुर्गम भागातील लोकांना क्रिकेट सामना पाहण्याव्यतिरीक्त ईतरही बरीच महत्वाची कामे होती. आम्हीच तेवढे कर्मदरिद्री निघालो. बस पार्कींगसाठी जागा शोधुन तंबु कॉलनी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले. ३२ जणांना झोपायला जागा पुरेल एवढे तंबु एका रेषेत उभारुन एक छान कॉलनी तयार झाली होती. झोपायची व्यवस्था झाल्यानंतर आम्ही पोटाच्या व्यवस्थेकडे वळालो. आमचा मोर्चा तुकाराम बांडेंच्या घराकडे वळला. सर्वांची जेवणाची व्यवस्था अंगणातच केलेली होती. संतोष झेंडे आणि मला एकादशीचा उपवास असल्यामुळे आम्ही खिचडी खाण्यासाठी घरामध्ये बसण्याचे ठरवले. घरात प्रवेश करतोय तर काय समोर १८ ईंची टिव्हीवर भारत -पाक सामना सुरु होता. पाकीस्तानची फलंदाजी उरकलेली होती. भारताला विजयासाठी ११८ धावांचे लक्ष्य १८ षटकांमध्ये गाठायचे होते. पावसामुळे हा सामना १८ षटकांचा करण्यात आलेला होता. विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकुन भारताला हा सामना एकहाती जिंकुन दिला. भारताचा संपुर्ण डाव पाहायला मिळाला. मॅच पाहण्यासाठी ट्रेकला कलटी दिली नाही तेही बरेच झाले म्हणायचे. काच-या बटाटा आणि गावरान तिखट हिरवी मिरची टाकुन केलेली साबुदाण्याची खिचडी अप्रतिम झालेली होती. ते आठवले की अजुनही ती चव जिभेवर रेंगाळते. खिचडीवर खरपुस समाचार घेतल्यानंतर उपवासामुळे येणारी ग्लानी बिल्कुल जाणवली नाही. भारत-पाक सामना पाहायला मिळाला त्याचबरोबर उपवासाची खिचडी सुद्धा मनासारखी मिळाली. अजुन काय हवंय मग? आता झोप हवी होती. बांडेंच्या घरापासुन मोर्चा तंबुच्या कॉलनीकडे वळवला. राजेश चिंचवडे, भास्कर मोरे, संतोष झेंडे आणि मी असे आम्ही चौघेजण एका तंबुत झोपलो. झोपण्याअगोदर राजेशने दिलेल्या सर्व सुचना मी पाळल्या. तंबुच्या बाहेर ठेवलेले बुट उघड्यावर ठेवल्यास रात्री कुत्री पळवुन नेतात त्यामुळे बुट तंबुच्या कापडाखाली ठेवावेत ही राजेशने दिलेली सुचना मी तंतोतंत पाळली. कोणी घोरतंय का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न गॅस प्रकरण करणारे कोणी नाही ना? या दोन्ही गोष्टी तंबुत झोपण्यासाठी खुप बाधक आहेत. आमच्या तंबुत हे असे काही झाले नसावे कारण पहाटे ऊठल्यावर कोणीही याबद्दल तक्रार केली नाही. 

      एवढ्या निसर्गमय ठिकाणी सुर्योदयाअगोदर जाग आली तर सोने पे सुहागा असतो. सर्वात अगोदर राजेशला जाग आली आणि एकामागोमाग एक आम्ही सर्वजण ऊठलो. निसर्गाच्या सानिध्यात सर्व नैसर्गीक क्रिया उरकल्यानंतर तंबुची कॉलनी गुंडाळुन बसमध्ये ठेवली. चारी बाजुंनी ऊंच डोंगर असल्यामुळे सुर्योदयाचा नजारा पहावयास मिळणे तसे कठीणच होते. सुर्याचा लाल गोळा अलगद क्षितीजावर उमटताना पाहावयास मिळाला नाही. आम्ही झोपण्याचे साहीत्य बसमध्येच ठेवले. मी आणि संतोष झेंडेने दोघात एकच सॅक घ्यायचे ठरवुन प्रत्येकाने ती निम्मा वेळ बाळगायची असे एका कराराद्वारे मान्य केले. पाण्याच्या बाटल्या, कॅमेरा, मोबाईल, वॉकींग स्टिक, पोहण्याचे साहीत्य, शक्तीवर्धक खाद्य आणि बॅटरी बॅंक क्वेचॉच्या सॅकमध्ये  भरले. पहीली तु घेतो का मी घेऊ? असे संतोषला विचारल्यावर तो म्हणाला अगोदर तु घे.

                 तुकाराम बांडेंनी सकाळी सहाच्या ठोक्याला ४० जणांना पुरतील एवढे कांदा-पोहे तयार ठेवले होते. मी सूर्यनारायणाची वाट पाहत होतो. एकादशीचा उपवास बारशीचा सुर्य उगवल्यावर सोडायचा असतो. सुर्यनारायणाला वंदन केले आणि वासुदेव श्रीकृष्णाचे स्मरण करून मी पोहे खायला सुरूवात केली. आमलकी एकादशी व्रताचा संकल्प कोणत्याही अडथळ्याविना मार्गी लागला होता. आता आम्ही सांदन दरीचा मार्ग धरणार होतो. सर्व ट्रेकर्स पोहे घशाखाली उतरवुन दरीकडे निघण्याच्या तयारीत होते. सांदन दरीकडे जात असताना पाठमोऱ्या नजाऱ्याकडे लक्ष गेले. सूर्योदयाच्या कोवळ्या किरणांनी अलंग, मदन आणि कुलंग या त्रिकुटाला सोनेरी मुलामा चढवला होता. जणुकाही ते सोनेरी पाण्यात स्नान करुन नुकतेच बाहेर आलेत असे वाटत होते. फोटो काढले का? किंवा इतर कोणताही प्रश्न जर कोणी विचारला तर "तो विषयच नाय ना" हा जितेंद्र जोशीचा डायलॉग(पोश्टर गर्ल सिनेमा मधला) प्रत्येकजण फार उत्साहाने म्हणत असे....तो विषयच नाय ना...या डायलॉगने संपुर्ण ट्रेकमध्ये चांगलीच करमणुक झाली. अलंग, मदन आणि कुलंगचे कोवळ्या सुर्यकिरणांनी सुवर्णलेपित झालेले रूप फार विलोभनीय दिसत होते. कळसुबाई शिखर मान वर करून सांदन दरीत कोणकोण चाललंय यावर लक्ष ठेवुन होते. काही ट्रेकर्स फोटो काढण्यात एकदम गुंग होते तर काहींना फोटो काढण्यात काहीही स्वारस्य दिसत नव्हते. काहीजण नेमुन दिलेली जबाबदारी पार पाडत होते. ट्रेकची सुरूवात सपाटीवर होऊन दरीतील पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने खाली उतरत जावुन तिथे युटर्न घेऊन तीव्र चढण चढुन पुन्हा साम्रदमध्ये आलो की ट्रेकची सांगता होणार होती. एका चिमुकल्यासह आम्हा ३२ ट्रेकर्सचा लोंढा दरीच्या तोंडावर एकट्या गाईडने थोपवुन धरला. सांदन दरीतला बाजीप्रभूच जणु तो. त्याच्या सुरक्षेविषयीच्या सुचना ऐकल्याशिवाय कोणालाही दरीत प्रवेश मिळणार नव्हता. विवेक तापकीर आणि प्रविण पवार यांनीसुद्धा सर्व ट्रेकर्सना आवश्यक मार्गदर्शन केले. 

    बांध तोडल्यानंतर पाणी जसे लगेच गतीमान होऊन खळखळत पुढे सरसावत निघुन जाते तसे गाईडने ईशारा दिल्यावर काही द्रुतगती ट्रेकर्स त्या सांदन दरीमध्ये दिसेनासे झाले. मला कसलीही घाई नव्हती. मी कॅमेरा मुठीत आवळुनच पुढे सरसावलो. आज सांदन दरी माझ्या सायबरशॉट सोनी कॅमे-यामध्ये कैद होणार होती. आशियातील नंबर २ ची व्हॅली मी कैद केल्याविना थोडीच सोडणार होतो. या व्हॅलीत काही दिवसांपुर्वी एयरटेल ४जी ची जाहीरात शुट केली गेली आहे. जाहीरातीचा उद्देश काही का असेना पण त्यानिमित्ताने सांदन दरी संपुर्ण भारताला माहीत झाली. दरीत प्रवेश केल्यावर अरुंद कडयांची वाट पाहावी लागत नाही. ते आपल्या सोबतच दरीत उतरतात. सकाळची वेळ असुनही दरीच्या अरूंद भागात भरपुर सुर्यप्रकाश (किरणे नव्हेत) पसरलेला होता. सांदन दरीचे ते सौंदर्य मी डोळ्यात आणि अधुन मधुन कॅमे-यातही साठवत होतो. त्या ऊंच आणि अरूंद कडयांवर नजर थांबत नव्ह्ती. निसर्गाची किमया मी डोळे विस्फारुन आणि अचंबित होऊन पाहत होतो. त्या ऊंच आणि अरुंद कड्यांचे अस्तित्व थोड्याच अंतरापर्यंत आहे पण ते त्यांच्या अस्तित्वाची चांगलीच जाणीव करून देतात. त्या दोन्ही कडयांच्या मधुन चालण्याचा अनुभव काही औरच.

          सांदनविषयी जे जे वाचलेले होते  ते ते डोळ्यांसमोर तरळु लागले. पहीली नजर टाकल्या टाकल्या मला ती दरी म्हणजे एखाद्या खोल कि-वे सारखी वाटली. टेक्नीकल क्षेत्रात आणि तेही मशिनिस्ट असल्याने या दरीला मी सहज दिलेली उपमा. एका भल्या मोठया लोखंडी प्लेटवर १ मिमी जाडीच्या साईड अ‍ॅंड फेस कटरने खुप खोलवर कि-वे ऑपरेशन करुन ती तयार केलेली असावी असे मला वाटले. पावसाच्या पाण्याने कोकणात उतरण्यासाठी सह्याद्रीच्या कणखर खडकांशी झुंज देत सह्याद्रीच्या कडयांना भेदुन अलगद तयार केलेली वाट म्हणजे सांदन दरी. लाथ मारीन तिथे पाणी काढीन या म्हणीच्या उलट पाण्याने लाथ मारुन खडकांतुन काढलेली वाट म्हणजे सांदन दरी.

     सांदन दरी म्हणजे इंद्राने त्याच्या वज्रप्रहाराने  सह्याद्रीच्या छाताडावर खोलवर ओढलेली रेष आहे की काय असे वाटायला लागले कारण सह्याद्रीच्या कातळ, राकट आणि कणखर कडयांचे दगड भेदुन एवढी खोल वाट तयार करणे सोपे काम नाही. आणि अलगद खळखळणारे पावसाचे पाणी राकट रांगड्या सह्याद्रीच्या खडकांमध्ये एवढी मोठी भेग पाडु शकेल असे स्वप्नातही वाटत नाही. सांदन दरीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही हळुहळु पुढे सरकत होतो. आता कमरेएवढया पाण्यातुन चालत जाण्याची उत्सुकता वाढत चालली होती. त्या पाण्यातुन जाताना क्वेचॉची सॅक, मोबाईल, कॅमेरा आणि बॅटरी बॅंक कशी सांभाळावी याची चिंता होती. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष त्याठिकाणी पोचलो तेव्हा तिथे लाकडी फाटयांना खिळे ठोकुन सेंटरींगच्या ढाच्यासारखा एक छोटासा पुल बनवलेला होता. हा पुल एकतर सांदन दरीवर पैसे कमावणा-या गावक-यांनी बांधला असावा किंवा ट्रेकींगद्वारे पैसे कमावणा-या एखाद्या संस्थेने बांधला असण्याची शक्यता वाटत होती. या पुलामुळे पाण्याच्या थेंबालाही स्पर्श झाला नाही. पाण्यात जावे लागले नाही म्हणुन मला बरे वाटले की पाण्यात जायला मिळाले नाही म्हणुन मी दुखी झालो तेच कळत नव्हते. 

        जसजसे आम्ही अंतर कापत पुढे जाऊ लागलो तसतशी ती दोन कडयांमधील अरुंद फट रूंद होऊ लागली. सांदन दरी हळुहळु अक्राळविक्राळ रूप धारण करू लागली. सांदनच्या विलक्षण सौंदर्याची भुरळ पडुन तिच्या प्रेमात पडलेल्यांना ती नकोशी वाटावी एवढी ती भयानक रुप दाखवु लागली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेले मोठमोठे दगड, मोठमोठे खडक, कड्यांचे निखळुन पडलेले अवशेष आणि या सर्वांच्या संयोगातुन तयार झालेला दमछाक करणारा दुर्दम्य मार्ग. तोही आपला आपण शोधायचा. तेथील खडकांच्या आकाराचा अंदाज घ्यायचा असेल तर तो फोटोमध्ये असलेल्या मानवी आकृतींवरून घेता येईल. जिथे पायाची ढेंग पोचेल आणि तो व्यवस्थित ठेवता येईल तिथे ठेऊन तोल जाऊ न देता मार्गक्रमण करत करत रॅपलींग करावे लागते त्यठिकाणी पोहोचलो. तिथे अपेक्षेप्रमाणे ट्रॅफिक तुंबलेले होते. अमुक ठिकाणी किती वाजता पोहोचलो? हे मला लक्षात ठेवावे लागत नाही फोटोच्या प्रॉपर्टीजमध्ये तारीख आणि वेळेची नोंद झालेली असते. त्यावरून लगेच कळते. या सांदन दरीकडे पाहुन असे वाटले की प्रत्यक्ष यमसुद्धा पावसाळ्यात या दरीमध्ये येण्याचे धाडस करणार नाही. 

        शिखर टीमने अजिबात वेळ न दवडता पटापट एकेका ट्रेकरला दोराने खाली सोडायला सुरूवात केली. संजय बाठे कमरेला दोर गुंडाळून नवशिक्यांसाठी बिलेयर झालेला होता. नेहमीच्या सरावातले क्लायंबर्स आल्यावर त्याने बिले द्यायचे बंद केले. रॅपलिंग करून खाली उतरल्यानंतरही कठीण मार्ग संपायचे नाव घेत नव्हता. दोन प्रचंड खडकांचा एकमेकांशी झालेल्या गुंत्यात एक अनोखा मार्ग तयार झालेला आहे. त्यामध्ये खाली वाकुन थोडे सरपटत पुढे सरकावे लागते. एक फुट ऊंचीच्या फटीतुन साधारण १० फुट अंतर सरपटत जावे लागते.

     एकदा अक्राळ-विक्राळ रूप धारण केल्यानंतर अगदी शेवटपर्यंत सांदन दरी कुठेही सुखकर झाल्यासारखे वाटत नाही. प्रवाहातील खडकांचा आणि दगडांचा आकार कुठेही कमी झालाय असेही वाटत नाही. सांदन दरीचा प्रवास संपल्यानंतर डोहामध्ये पोहण्याची उत्सुकता लागली होती. फोटो काढण्यात कुठेही कंजुषपणा केला नाही. एकदम दिल खोल के फोटोची हौसमौज करुन घेतली. डोहाजवळ पोचलो तेव्हा जीवात जीव आला. आता त्या डोहामध्ये आम्ही मनसोक्त पोहणार होतो. डोहामध्ये स्वैर ढुंबण्याचा आनंद काही औरच..पाण्याच्या स्पर्शाने कसल्याही दुष्कर प्रवासाचा क्षीण दुर होऊ शकतो. तो अनुभव मी घेतला. पाण्याच्या स्पर्शामध्ये जादु असते म्हणतात ते काही खोटं नाही. डोहातील पाण्यात पोहल्यावर खुप ताजेतवाने वाटायला लागले. सर्व ट्रेकर्स डोहामध्ये मनसोक्त पोहले. पोहण्याच्या कार्यक्रमानंतर भेळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुधीर गायकवाड आणि राजेश चिंचवडे यांनी चटकदार भेळ बनवली. त्या चटकदार भेळीचा खरपुस समाचार घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सूरुवात केली.

            सांदन दरीतुन बाहेर पडुन डोहामध्ये पोहलो की ट्रेक संपला अशा अविर्भावात आम्ही निघालो. पाण्याच्या कुंडाजवळुन निघताना क्वेचॉची सॅक मी संतोष झेंडे कडे दिली. दोघांचे साहीत्य एकाच सॅकमध्ये घेऊन एकेकाने निम्मा ट्रेक संपेपर्यंत सॅक सांभाळायची असे आमचे ठरलेलेच होते. त्यामुळे इथुन पुढच्या प्रवासात माझ्याकडे कसलेही ओझे नसणार होते. आता सुर्य बरोबर डोक्यावर आलेला होता. ऊन्हाचे चटके काय असतात ते चांगलेच जाणवु लागले. थोडे अंतर पुढे आल्यावर आम्हाला एक अतिशय लाजिरवाणे दृश्य दिसले. एखाद्या उर्मटाने मुद्दाम ती अंतर्वस्त्रे तिथे फेकली असतील किंवा त्याठिकाणी एखादी अघटीत घटनाही घडलेली असेल. ज्यठिकाणी ट्रेकसाठी लहान मुले, मुली तसेच सर्व कुटुंब एकत्र येत असेल तिथे अशी दृश्ये दिसावीत हे लांच्छनास्पद आहे. सर्व ट्रेकर्स मित्रांना विनंती आहे की अशा गोष्टींना आळा घालणे जरी आपल्या हातात नसले तरी त्या दिसताच आपण त्यांचा नायनाट करावा. 

       आम्ही उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेकडे वळालो. करवंदाच्या जाळीवरची काळी मैना अजुनही हिरव्या रंगात होती. करवंदाच्या त्या जाळीला वळसा घातल्यावर मिनी कोकणकडयाचे दर्शन झाले. वरपर्यंत नजर टाकल्यावर पुढे काय वाढून ठेवले आहे याची पुर्ण कल्पना आली. कडक ऊन्हात ती ऊभी चढण पार करुन जायचे होते. सूर्यनारायण पूर्ण क्षमतेने त्यांच्या झळा सोडत होते. दहीहंडीमध्ये गोविंदाना वरच्या थरावर जाता येऊ नये म्हणून पाण्याचे फवारे मारतात तसे आम्हाला हि चढण चढता येऊ नये म्हणून सुर्यदेव आमच्यावर ऊन्हाच्या झळा फेकत होते. पण मी जराही डगमगलो नाही. कोणत्याही परिस्थितीत ही चढण पार करायचीच आणि तेही न थांबता असे मी ठरवलेलेच होते. पाण्याची बाटली संतोषजवळील सॅकमध्ये होती. संतोष माझ्या बरोबरीने चालेल अशी अपेक्षा होती परंतु तो खुप मागे पडल्यावर मी त्याचा नाद सोडुन दिला. आता माझ्याजवळ पाणीही नव्हते. मी सर्वात पुढे निघालो होतो. माझ्याबरोबर चालणारे ट्रेकर्स हळुहळु मागे पडायला लागले होते. त्या कडक उन्हातही मी न थांबता चालत होतो.

          अशा दुर्गम भागात आणि रणरणत्या ऊन्हात सह्याद्रीच्या तीव्र चढावर सुंदर ललनांचे अचानक दर्शन व्हावे हा एक अलभ्य लाभच. मुंबईतील कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप होता. त्यांनासुद्धा साम्रद गावात जायचे होते. त्यांच्या जवळचे पाणी संपलेले होते आणि अवसानही. त्यांनी गोड आवाजात चोकशी केली की चढायला किती वेळ लागेल वगैरे. मला तरी कुठे माहीत होते किती वेळ लागेल? पण त्यांची अवस्था पाहुन तुम्हाला ३ तास लागतील असे ठोकुन दिले. त्या मंजुळ आवाजाच्या मोहात न पडता मी तिथुन लवकरात लवकर पळ काढला आणि माझे मार्गक्रमण चालु ठेवले.  माझ्यासाठी १ तास पुरेसा होता. आणि १ तासामध्ये ती चढण पार करुन पठारावर एका झुडुपाच्या सावलीखाली मी आराम केला. आता पोटात भुकेचा ढोंब उसळलेला होता. शिवाजी आंधळे आल्यावर मी तुकाराम बांडेंच्या घराकडे दुपारच्या जेवणासाठी निघालो. एकदम साधे जेवण असुनसुद्धा त्या जेवणाचा खरपुस समाचार घेतला. थकवा येईपर्यंत मी जेवण करत होतो. भरपुर कार्बोहाड्रेट्स शरीरात भरल्यानंतर मी जेवणाला पुर्णविराम दिला. बाकीच्या ट्रेकर्सला वर यायला खुप वेळ लागला. आमच्यातल्या काहीजणांनी त्या मुलींना सढळ हाताने मदत केल्याची माहीती मिळाली. मंजुळ आवाज असण्याचा असा फायदा होतो. 

  सगळ्यांची जेवणे उरकल्यावर आम्ही साम्रद गावाचा निरोप घेतला आणि पुण्याच्या दिशेने निघालो.

ट्रेक आयोजक: शिखर फाऊंडेशन 
ट्रेक खर्च:८५० रुपये

लेखक- विजय वसवे


ईथेच लावली होती तंबुची कॉलनी 

तुकाराम बांडेंचे घर आणि आंगण

३२ जणांसाठी कांदा पोहे

सांदन दरीकडे प्रस्थान

पाठमोरे अलंग, मदन आणि कुलंग

कोवळ्या सुर्यकिरणांनी दिलेली सोनेरी छटा

सांदन दरी प्रवेश

दोन्ही बाजुस ऊंचच ऊंच कडे






या पुलामुळे पाण्यातुन चालत जाण्याची संधी हुकली.


















ईथुन पुढे सांदन दरी अक्राळ विक्राळ रुप धरते






रॅपलींगचे ठिकाण

फोटोत दिसणा-या मनुष्याकृतीवरुन त्या खडकांच्या साईजचा अंदाज येईल

ये चल शेल्फी घेऊ


रॅपलींगच्या तयारीत, चेह-यावर थोडेसे टेन्शन









अवघड मार्ग ईथुन पुढे संपतो






डोहामधले स्वैर ढुंबणे



चटकदार भेळ


लाजिरवाणे कृत्य


कराराप्रमाणे संतोषने सॅकचे ओझे सांभाळले.


उजवीकडे वळा

सांदनच्या प्रवाहात शेवटची शेल्फी

काळी मैना

काळी मैना

मिनी कोकणकडा


मिनी कोकणकडा

कडक उन्हात जीवघेणी चढण सुरु


न थांबता एकटाच सर्वात पुढे आलो






वर चढुन आल्यावर दिसणारा रतनगड

कात्राबाईचा कडा

साम्रद गावाकडे

जेवणाची पंगत

साधे जेवण असुनही भरपुर प्रमाणात जेवण केले.

सावंतांना सांदन व्हॅली दाखवणारे यशवंत बांडे

साम्रद गावातुन


पुणे कडे प्रस्थान

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी



No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...