SR ची Brevet
श्वाल्बे टायर प्रसन्न झाल्यामुळे आणि माझ्या अचानक उफाळून येणाऱ्या मुर्खपणामुळे ३०० च्या ब्रेवेटला मोठ्ठा DNF मिळालेला होता. त्यामुळे या कॅलेंडर वर्षात २००, ४०० आणि ६०० चे ब्रेवेटस यशस्वीरीत्या पुर्ण करुनही मी सुपर रॅंदोनिअर झालो नव्हतो. ६०० ला अपयश येऊन SR झालो नसतो तर समजण्यासारखे होते पण ३००च्या अपयाशामुळे SR होता आले नाही ही नक्कीच दुख वाटण्यासारखी बाब होती. आणि मी दुःखी होतो. १२ मार्चला ३०० चे ब्रेवेट पुर्ण करून या दुखावर मला फुंकर घालायची होती. त्यामुळे चातक पक्ष्याप्रमाणे मी १२ मार्चची वाट पाहत होतो. रेकॉर्ड बनवणारे सायकलपटु संतोष होली यांनी मला फोन करून माझ्याबरोबर ३०० ची ब्रेवेट करण्याची इच्छा व्यक्त केली तेही त्यांच्या मारीचवर (गियर नसलेली सायकल). अशा प्रकारे रँदोनियर्सची संख्या वाढत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. या कॅलेंडर वर्षात माझ्या मित्र परीवारातील पुणे रँदोनियर्सचे सभासदत्व घेऊन ब्रेवेट पुर्ण करणारे संतोष होली हे ४ थे सायकलपटु. याअगोदर युवराज सोनार यांनी २०० ची ब्रेवेट पुर्ण केली तर आशुतोष वाघमारे आणि धनंजय कोंढाळकर यांनी पहील्याच वर्षात सुपर रँदोनियर्सचा किताब मिळवला. माझ्यासारख्या न्युनतम व्यक्तीचे निमित्त होऊन रँदोनियर्सची संख्या अशीच वाढत राहो ही सदिच्छा.
मार्च महीना सुरू झाल्यापासुन ऊन्हाची तीव्रता वाढत चालली होती. ऊन्हामध्ये सायकल चालवण्याचा सराव व्हावा म्हणून मी भर दुपारी एक शिरवळची राईड करून आलो होतो. ४०० ची ब्रेवेट करताना मांड्याना क्रॅम्प आले होते त्यामुळे टॉयलेटला बसायचेसुद्धा वांदे झाले होते. त्यानंतर ६०० ला जाताना मी आवश्यक पुर्वतयारी करूनच गेलो होतो.६०० ची ब्रेवेट पुर्ण केल्यानंतर शारीरीक क्षमतेमध्ये (सायकल चालवणे) वाढ झाल्याचे जाणवत होते. आणि १०००ची ब्रेवेट होऊन गेल्यावर असे वाटले की केली असती तर बरे झाले असते. १००० चा विषय डोक्यात घुसलाय हे वेगळे सांगायला नकोच. एवढ्या ब्रेवेट्स केल्यानंतर आता बीरआरएम मध्ये काय काय करावे याची थोडीफार अक्कल आली आहे.
१२ मार्चला पहाटे साडेचारचा अलार्म लावलेला होता पण साडेतीनला मला अचानकपणे जाग आली, पहील्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये रस्त्यावरील दिव्याचा लख्ख उजेड पसरलेला होता. तेवढा उजेड पाहुन मला ६ वाजुन गेल्यासारखे वाटले. ते पाहुन माझ्या काळजात धडकीच भरली. बाप रे आता ब्रेवेटचे काय होणार? असे म्हणत मी पळतच गॅलरीमध्ये गेलो आणि आजुबाजुला सर्वत्र अंधार पाहुन खुप खुप समाधान वाटले. पुन्हा आतमध्ये जाऊन घड्याळात पाहीले तर साडेतीन वाजलेले होते. एकदा जाग आल्यानंतर मी पुन्हा झोपण्याचा विचार मी सोडुन दिला. थंड पाण्याने आंघोळ केली. सर्व आवश्यक सामग्री, खाण्याच्या वस्तु आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पंक्चरवरचे सर्व उपाय बरोबर घेऊन मी पुणे विद्यापीठला पोहोचलो. ब्रेवेटमध्ये सायकलींग करताना मला प्रेरणा देणारे वाक्य मी सुरुवातीला म्हणतो आणि मगच सायकलला टांग मारतो "बचेंगे तो और भी लढेंगे". आता लढाया वगैरे करण्याचे दिवस नाहीत पण सायकल चालवण्याचा पराक्रम दाखवता येतो.
स्टार्टींग पॉईंट |
रेकॉर्डब्रेकर संतोष होली सोबत |
माझ्या आयुष्यातील पहीली २०० ब्रेवेट मी पसरनी घाटातुन पुणे-पाचगणी-पुणे मार्गावर केलेली आहे. त्यामुळे पसरनीचा अनुभव पाठीशी होता. या अनुभवाच्या जोरावर महाबळेश्वर चेकपॉइंट पर्यंत पोचण्यासाठी मी एक योजना आखली होती. पुणे विद्यापीठापासुन सुरू केल्यानंतर नाष्ट्यासाठी कुठेही थांबायचे नाही, फ्राईड राईस आणि बटाटा एका पाऊचमध्ये घेतलेले होते जिथे भुक लागेल तिथे थांबुन तोच नाष्टा करायचा आणि लगेच हॅंडल धरुन पॅंडल मारायला सुरूवात करायची. खाण्यापिण्यात फालतु वेळ वाया घालवायचा नाही हीच ती योजना होती. ब्रेवेटमधील सायकलिंगला मांड्यांच्या ताकदीबरोबर मेंदुची जोडही असावी म्हणजे प्रवास सुखकर होतो. सकाळच्या नाष्ट्यापेक्षा पसरनी घाट पार करून कट ऑफ टाईमच्या आत महाबळेश्वर चेकपॉइंटला पोचण्यास मी प्राधान्य दिले होते. अशा योजना आखताना मी माझी लायकी अवश्य विचारात घेतो. सकाळी घरातुन निघताना १०० ग्रॅम गाईचे तुप गरम करुन घेतलेले होते. सायकलिंग करताना काय खावे म्हणजे भरपुर शक्ती मिळेल याची शोधाशोध करत असताना मला लागलेला हा शोध. गाईचे तुप हे माझ्यासाठी अफलातुन शक्दातीदायक आहे (१०० ग्रॅमला ६५०kcal पेक्षाही जास्त). तुपामुळे दुपारी १२:३० पर्यंत पोटात कसलीही कमतरता जाणवली नाही.
पसरनी घाट सकाळी ११:३० वाजता |
या गॉगलमुळे डोळ्यांना कडक उन्हाऎवजी शांत आणि शितल वातावरण दिसत होते |
११ वाजुन ३७ मिनीटे |
१२ वाजुन १ मिनीट |
पसरनीची मनात पसरलेली भीती खरी ठरु लागली. उन्हाच्या तीव्रतेने मला पसरनीतच गाठले. काहीजणांनी तर उन्हाची तीव्रता आणि पसरनीच्या पसा-यासमोर शरणागती पत्करल्याचे ऐकण्यात आले. हे ऐकल्यावर बचेंगे तो और भी लढेंगे म्हणतच मी कासव मोडमध्ये गेलो. कासव मोड म्हणजे शरीरातील कमीतकमी शक्ती खर्च करुन जो वेग मिळेल त्या वेगाने न थांबता अंतर कापत राहायचे आणि पुढील प्रवासासाठी उर्जा शिल्लक ठेवायची. पाचगणी मार्केटच्या आसपास पोचल्यावर पोटातील कावळे कोकलायला लागले. प्रशांत तिडकेंचा सल्ला मी मनापासुन पाळतो तो हा "Drink before thirsty and Eat before hungry". मी लगेच सायकल बाजुला घेतली आणि छानश्या सावलीमध्ये बसुन भात आणि बटाटा फस्त केला. पोटात भर पडल्यावर थोडे बरे वाटले. उन्हाच्या त्रासातुन वाचण्यासाठी मी अजुन एक लढवलेली शक्कल म्हणजे माझा निळा निळा गॉगल. या निळ्याशार गॉगलमुळे वातवरणातील तीव्र ऊन डोळ्यांना जाणवायचे नाही त्यामुळे बाहेरील वातावरणात तीव्र ऊन याची माहीती मेंदुपर्यंत पोचत नव्हती. माझ्या मेंदुला मी मुर्खात काढले होते. "...All is Well...Allis Well..". ज्या रंगाचा चष्मा असेल त्या रंगाची दुनिया दिसते असे म्हणतात. मी माझ्या डोळ्यांना शांत शितल दुनिया दाखवली आणि त्यांनी तीच मेंदुपर्यंत पोचवली.
१२ वाजुन ५० मिनीटांनी भात+बटाटा |
दिव्या ताटेंनी या ब्रेवेटला स्ट्रॉबेरी फिल्डस नाव का दिले असावे ते ईथे गेल्यावर कळले. रसरशीत लालसर स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स सगळीकडे लागलेले होते. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचे मळेसुद्धा दिसत होते. मला फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह तात्पुरता आवरला. आणि मार्गक्रमण चालु ठेवले.
दिव्या ताटेंनी या ब्रेवेटला स्ट्रॉबेरी फिल्डस नाव का दिले असावे ते ईथे गेल्यावर कळले. |
स्ट्रॉबेरी स्टॉल्स १ वाजुन ३३ मिनीटे |
स्ट्रॉबेरी स्टॉल्स १ वाजुन ३३ मिनीटे |
घामावाटे वाहुन गेलेले शरीरातील घटक भरुन येण्यासाठी सोबत आणलेली पावडर पाण्यामध्ये मिसळुन सायकलला अडकवली आणि थोडी पोटामध्ये ढकलली. ईथुन पुढे सायकल चालवणे असह्य होऊ लागले होते. थोडा जरी चढ आला तरी तो नकोसा वाटत होता. काही चढांवर तर मी खाली उतरुन सायकल ढकलत घेऊन गेलो. संतोष होली माझ्या मागोमाग येतच होता आणि कमल तिलानी माझ्या पुढे होता. कमलने रस्त्याच्या कडेला सायकलचे खाली डोके वर पाय करुन ठेवले होते. त्याचा अपघात होता होता वाचला आणि त्याचवेळेस सायकलला काहीतरी बिघाड झाला असे त्याने सांगितले. इच्छा असुनही माझ्या अज्ञानामुळे मी त्याला मदत करू शकलो नाही. मी त्याचा निरोप घेऊन सायकलला टांग मारली.
तिथुन पुढे चढ येणे हळुहळु कमी झाले. वेण्णा लेकपर्यंत उताराचा रस्ता मिळाला. पण उताराचे सुख थोडयाच वेळात नाहीसे झाले. वेण्णा लेकपासुन सुरू झालेल्या चढाने शारीरीक क्षमतेचा अंत पाहीला. तो चढ पार केला की महाबळेश्वर चेकपॉइंट येणार एवढ्या एकाच सुखद विचाराने त्या सर्व वेदना सहन केल्या.
अपेक्षेपेक्षा थोडे अंतर अलीकडेच चेकपॉइंट दिसला. फरहदला पाहुन माझा हर्ष आणि उल्हास दोन्ही गगनात मावत नव्हते. २ वाजुन १८ मिनिटांनी महाबळेश्वर चेकपॉइंटवर झेंडा रोवला.
महाबळेश्वर चेकपॉईंट वेळेनुसार:(पुणे विद्यापीठापासुन ६ वाजुन २५ मिनिटांनी सुरुवात)
१. परेरा ड्वेन ( १२ वाजुन २ मिनिटे)
२. प्रथमेश सुर्यवंशी ( १ वाजता)
३. कुशल क्षीरसागर ( १ वाजुन ५ मिनिटे)
४. संतोष होली ( २ वाजुन १६ मिनिटे)
५. विजय वसवे ( २ वाजुन १८ मिनिटे)
६. हर्षद पवार ( २ वाजुन १८ मिनिटे)
(माझ्यानंतर आलेल्या रॅंदोनियर्सचा डेटा माझ्याकडे नाही)
ब्रेवेटमधला दुखाचा डोंगर ओलांडून झाला होता आता सुखाची हिरवळ पहायची होती. दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरात जवळजवळ बरेच रँदोनियर्स महाबळेश्वर चेकपॉइंटवर आले. यात बरेच जण काठावर पास झाले. एकाच चेकपॉइंटवर एकाच वेळी एवढे रँदोनियर्स मी कधीच पाहीले नव्हते. ब्रेवेट कार्डवर सही शिक्का घेतला. फरहदने सर्वांना स्ट्रॉबेरीज खायला दिल्या. ब्रेवेटचे नावच स्ट्रॉबेरी फिल्ड असल्याने स्ट्रॉबेरीज खाणे ओघाने आलेच. चेकपॉईंटवरील पाणी, केळी आणि ईलेक्ट्रालचा खरपुस समाचार घेतल्यानंतर साधारण २ वाजुन ५० मिनिटांनी मेढा घाटाच्या दिशेने निघालो.
ब्रेक तपासुन घेतले आणि मगच मी तीव्र उतारावर सायकल सोडली आणि त्यानंतर मागे वळुन पाहीले नाही. मेढा घाट पुर्ण झाडीने व्यापलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा भरपुर झाडे आहेत. उतारावर काहीही न करता पळणारी सायकल आणि वृक्षांची शितल छाया माझ्या मनास आणि शरीरास खुप प्रसन्न करत होती. दिव्या ताटेंनी सांगितल्याप्रमाणे तीव्र उतारावरून जाताना जागच्या जागी वळण आल्यावर खुप खबरदारी घेतली. मेढा घाटाचा हा तीव्र उतार मी अघाशासारखा संपवला.
रेकॉर्ड होल्डर संतोष होलीबरोबर महाबळेश्वर चेकपॉईंटला पोचलो.(२ वाजुन १८ मिनिटे) |
महाबळेश्वर चेकपॉईंटवर फरहदने दिलेल्या स्ट्रॉबेरी (२ वाजुन ४४ मिनिटे) |
महाबळेश्वर चेकपॉईंट वेळेनुसार:(पुणे विद्यापीठापासुन ६ वाजुन २५ मिनिटांनी सुरुवात)
१. परेरा ड्वेन ( १२ वाजुन २ मिनिटे)
२. प्रथमेश सुर्यवंशी ( १ वाजता)
३. कुशल क्षीरसागर ( १ वाजुन ५ मिनिटे)
४. संतोष होली ( २ वाजुन १६ मिनिटे)
५. विजय वसवे ( २ वाजुन १८ मिनिटे)
६. हर्षद पवार ( २ वाजुन १८ मिनिटे)
(माझ्यानंतर आलेल्या रॅंदोनियर्सचा डेटा माझ्याकडे नाही)
बरेच रॅंदोनियर्स एकावेळी एकाच चेकपॉईंटवर (२ वाजुन ४५ मिनिटे) |
ब्रेक तपासुन घेतले आणि मगच मी तीव्र उतारावर सायकल सोडली आणि त्यानंतर मागे वळुन पाहीले नाही. मेढा घाट पुर्ण झाडीने व्यापलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा भरपुर झाडे आहेत. उतारावर काहीही न करता पळणारी सायकल आणि वृक्षांची शितल छाया माझ्या मनास आणि शरीरास खुप प्रसन्न करत होती. दिव्या ताटेंनी सांगितल्याप्रमाणे तीव्र उतारावरून जाताना जागच्या जागी वळण आल्यावर खुप खबरदारी घेतली. मेढा घाटाचा हा तीव्र उतार मी अघाशासारखा संपवला.
मेढा घाटात सेल्फी (३ वाजुन १३ मिनिटे) |
उतार संपल्यानंतर उन्हाची ताप पुन्हा जाणवायला लागली. एकंदरीत हा प्रवास सुखकर नव्हताच. तापोळा वगैरे नाव पाट्यांमध्ये वाचले. महाबळेश्वर ते सातारा या मार्गातील जमेची बाजु म्हणजे या मार्गावर शितल छाया देणारे अनेक वृक्ष आहेत. उन्हाच्या झळा असह्य झाल्या की एखाद्या वृक्षाची सावली आसरा देत असे. थोडे फार ताजेतवाने वाटले की पुन्हा धर हॅंडल मार पॅंडल सुरु व्हायचे.
शितल छाया देणारा एक वटवृक्ष |
साता-याकडे (३ वाजुन ५४ मिनिटे) |
मजल दरमजल करत सातारा चेकपॉईंट गाठला. साता-याच्या अलिकडेच हा चेकपॉईंट लावलेला होता. ५ वाजले होते पण वातावरणातील गर्मी कमी होण्याचे नाव घेत नव्हती. सकाळी चेकपॉईंटला भेटलेला योगेश पुन्हा भेटला. योगेश शिंदे म्हणजे सर्व रॅंदोनियर्सला हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व, बीआरएमच्या नियमात बसणारी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तो सदैव तत्पर असतो आणि एवढे सगळे करुनही सतत हसतमुख राहणारा. चेकपॉईंटवर गेल्यावर त्याने आम्हाला डिशभरुन कलिंगड खायला दिले.
डावीकडुन तिसरा योगेश शिंदे (५ वाजुन ५ मिनिटे) |
चेकपॉईंट सोडताना योगेशने सांगितले की सातारा मुख्य चौकात जाऊन पुण्याकडे वळायचे आहे. त्याप्रमाणे मी सातारा चौकाकडे निघालो. आता मला खुप भुक लागलेली होती. तेवढ्यात सर्व व्यवस्था असलेले एक हॉटेल दिसले. पुढचा मागचा विचार न करता सायकल घेऊन त्या हॉटेलमध्ये शिरलो. सायकल लावायला सुरक्षित जागासुद्धा मिळाली.
सातारा मुख्य चौक ५ वाजुन ४६ मिनिटे |
बाथरुमला जाण्याअगोदर ऑर्डर देण्यासाठी वेटरला बोलावले. दाल तडका, जिरा राईस, थम्स अप आणि एक लस्सी ची ऑर्डर दिली. तो वेटर चतुर होता. त्याने माझी गरज ओळखली आणि म्हणाला,
"साहेब, त्यापेक्षा खिचडी भात चालेल का?"
"क्या बात है, चालेल नाही पळेल, ये घेऊन लवकर तोपर्यंत मी जाऊन येतो"
परत येईपर्यंत टेबलावर सर्व तयार होते. सतत सायकल चालवत राहील्यानंतर तोंडामधे एक प्रकारचा कडवटपणा आलेला असतो त्यामुळे भुक लागलेली असुनदेखील घशाखाली अन्नपदार्थ घ्यायला गेले की उलटी झाल्यासारखे होते अशावेळी थम्सअप कामास येतो. एवढा खिचडी भात खाल्ल्यानंतर एक लस्सीसुद्धा फस्त केली. सात वाजत आले होते. सुर्यास्त होऊन गेला होता तरीही थोडासा उजेड जाणवत होता. पोटात भर पडल्यामुळे आणि आता उन्हाचा त्रास जाणवणार नसल्यामुळे सायकल चालवणे सुखकर होणार होते. हॉटेलबाहेरच्या टपरीतुन दोन बिस्कीटचे पुडे घेऊन हॅंडलबार बॅगमध्ये ठेवुन दिले. भुक लागल्यासारखे वाटले तर बिस्कीटे नेहमीच कामी येतात.
खिचडी भात ६ वाजुन १० मिनिटे |
सातारा सोडल्यानंतर खंबाटकी बोगदा येईपर्यंत कुठेही थांबायचे नाही असे मी ठरवले होते. हा साधारण ४० किमीचा पट्टा आहे. या पट्ट्यातील ब-याच उड्त्या पुलांची कामे आता पुर्ण झालेली आहेत त्यामुळे आता सर्व्हीस रोडवर उतरण्याची गरज नाही. ज्याठिकाणी माझी सायकल पंक्चर झाली होती ते ठिकाण मी कधीच विसरू शकत नाही. त्याठिकाणावरुन जाताना दुख-या आठवणी जाग्या होतात. तिथुन जाताना थोडी भिती वाटत होती (पंक्चरची). केवढी ही धास्ती !
सायकल चालवता चालवता व्हाटसअप ग्रुपमध्ये अपडेट देणे चालुच होते. खंबाटकी बोगद्याजवळ थोडी विश्रांती घेतली. तिथुन थेट कापुरहोळ गाठले. अधुनमधुन बिस्कीटांवर ताव मारत होतो. अंधार असल्यामुळे फोटोग्राफीला काहीच वाव नव्हता. कापुरहोळमध्ये तिघा जणांचा ग्रुप माझ्यापुढे निघुन गेला. जाताना त्यांनी काही प्रोब्लेम आहे का? ते आवर्जुन विचारले. रॅंदोनिअर्सचा एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव नजर लागण्यासारखा आहे.
आता शेवटचा टप्पा शेष होता. कापुरहोळ ते औंध साधारण ३५ किमीचा शेवटचा टप्पा. कापुरहोळ सोडल्यानंतर मी मागे वळुन पाहिलेच नाही. जे तिघेजण माझ्या पुढे गेले होते ते मला वरवेजवळ भेटले. ३ लेनचा रोड जिथे २ लेनमध्ये छोटा झालाय तिथे त्यांच्यातला एकजण पडता पडता वाचला म्हणुन ते थांबले. अपघात होता होता वाचला बाकी काहीही झाले नाही. शिंदेवाडीच्या चढावर एक रॅंदोनियर खुपच हळु सायकल चालवत होता त्यामुळे मी त्याच्या पुढे जाऊ शकलो. संपुर्ण प्रवासात कुठेही कोणाशीही कसलीही तक्रार झाली नाही. कात्रजच्या बोगद्यात सायकल सोडल्यावर मी थोडा रीलॅक्स झालो. कात्रज घाटाच्या उतारावरील रम्बलर सायकलस्वारांसांठी खुप धोकादायक आहेत. उतारावरुन मिळालेला वेग एवढा तीव्र असतो की तेवढ्या वेगात रम्बलरवर सायकल गेली तर एखादा तरी कोलमडुन पडु शकतो.
कात्रजचा उतार संपल्यानंतर संतोष होली सायकलचा हॅंडल सरळ करत थांबले होते. मला वाटले की तो त्या रम्बलरचा प्रताप असावा. पुढे गेल्यावर वडगाव चौकात खुप मोठी वाहतुक कोंडी झालेली होती. पीएमपीएलची एक बस त्या पुलावर बंद पडली होती. सर्व बीआरएम चांदणी चौकात संपतात त्यामुळे तिथे पोचल्यावर तिथुन पुढे जायला मन तयार होत नव्हते. चांदणी चौक ते औंध अंतर कापत असताना संतोष होली पुन्हा माझ्या बरोबर आले.
औंधला रोडला आल्यावर शेवट कुठे होणार हे आम्ही शोधायला लागलो तेवढ्यात संजय करंदीकरांनी आम्हाला आवाज दिला. रात्रीची वेळ असुनही संजय करंदीकर सहकुटुंब येऊन Volunteer ची भुमिका पार पाडत होते. रात्री १ वाजुन २० मिनिटांनी माझे ब्रेवेट कार्ड मी त्यांच्याकडे सुपुर्द केले. मला जोग कुटुबियांचे खुप कौतुक वाटले ते एवढ्या रात्री प्रशांतचे अभिनंदन करण्यासाठी एन्ड पॉईंटवर हजर होते. त्यांच्यासोबत उमेशसुद्धा आला होता.
माझे सुपर रॅंदोनियर होण्याचे स्वप्न पुर्ण झाले. जे ठरवले ते पुर्ण करण्याचा आनंद काही औरच....आता दरवर्षी सुपर रॅंदोनियर होता यावे ही सदिच्छा!
जय हिंद !
३०० किमी बीआरएम पुर्ण करणारे (मी पुर्ण करेपर्यंत)
(पुणे विद्यापीठापासुन ६ वाजुन २५ मिनिटांनी सुरुवात)
१. कुशल क्षीरसागर ( ९ वाजुन ४७ मिनिटे)
२. प्रथमेश सुर्यवंशी ( ११ वाजुन ५७ मिनिटे)
३. हर्षद पवार ( १ वाजुन १८ मिनिटे)
४. विजय वसवे ( १ वाजुन २० मिनिटे)
४. संतोष होली ( १ वाजुन २० मिनिटे)
एका वर्षात सहा वेळ सुपर रॅंदोनियर होण्याचा भीम पराक्रम करणारे संजय करंदीकर यांच्याकडे ब्रेवेट कार्ड सुपुर्द करताना |
३०० बीआरएम शीट |
PS:
या बीआरएमशी संबंधीत लिंक्स;
१. सहभागी सायकलपटु (रॅंदोनियर्स)
http://www.audaxindia.org/event-e-534
२. बीआरएमचा मार्ग
http://www.audaxindia.org/route-card.php
३. अंतर आणि वेळमर्यादा
वेळ = २० तास
अंतर = ३०० किमी.
प्रवेश फी = ६५० रुपये.
४. राईडचे नियम;
बीआरएम मध्ये सायकल चालवण्याअगोदर हे नियम वाचणे आवश्यक आहे.
बीआरएम राईडचे नियम (संपुर्ण जगामध्ये लागु असलेले नियम)
भारतासाठी बीआरएमचे नियम (भारतासाठी लागु असलेले नियम)
५. फेसबुकवरील लिंक्स (Facebook Album Link)
फेसबुकवरील फोटोज
http://www.audaxindia.org/route-card.php
३. अंतर आणि वेळमर्यादा
वेळ = २० तास
अंतर = ३०० किमी.
प्रवेश फी = ६५० रुपये.
४. राईडचे नियम;
बीआरएम मध्ये सायकल चालवण्याअगोदर हे नियम वाचणे आवश्यक आहे.
बीआरएम राईडचे नियम (संपुर्ण जगामध्ये लागु असलेले नियम)
भारतासाठी बीआरएमचे नियम (भारतासाठी लागु असलेले नियम)
५. फेसबुकवरील लिंक्स (Facebook Album Link)
फेसबुकवरील फोटोज
No comments:
Post a Comment