रोडबाईक्सचा रणसंग्राम
|
दादोजी कोंडदेव स्टेडीयम, ठाणे |
महापौर चषक सायकल स्पर्धा, ठाणे
(कला-क्रिडा महोत्सव ठाणे महानगरपालिका)
ठाणे महापौर सायकल स्पर्धेची मला जेव्हा माहीती मिळाली तेव्हा ४० वर्षावरील पुरूषांची ही सायकल स्पर्धा हायब्रीड सायकलवर घेतली जाईल असे वेबसाईटवर दिसत होते. माझ्याकडे ट्रेकची हायब्रीड सायकल असल्यामुळे मी या रेसमध्ये भाग घ्यायचे ठरवले. परंतु जेव्हा स्पर्धा जवळ आली तेव्हा आयोजकांनी हायब्रीड श्रेणी रद्द करून कोणतीही सायकल वापरता येईल असे सांगितले. कोणतीही सायकल म्हणजे त्यात रोडबाईक आलीच. रोडबाईकच्या वेगाशी हायब्रीडचा वेग स्पर्धा करू शकत नाही याची मला पूर्ण कल्पना असुनही मी माघार घ्यायची नाही असे ठरवले. मला सायकल रेसमध्ये सायकल चालवण्याचा अनुभव घ्यायचा होता. आणि यातील सहभागामुळे मला व्यवसायिक सायकलपटुंचे सायकल चालवणे आणि त्यांच्या सायकल्स पहायला मिळणार होत्या. दुसरे म्हणजे सहभागी होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नव्हती आणि बाहेरगावावरून येणाऱ्या खेळाडुंसाठी जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. अजुन काय हवंय मग? मला फक्त पेट्रोलचा खर्च येणार होता आणि तोही माझ्या मारूती ८०० ला इतर वाहनांपेक्षा कमी येतो. तर मग चला "टुर द ठाणे" करूच असे ठरवले.
|
ड्युक्स नोज |
सर्व तयारी करून शनिवारी दुपारीच घर सोडले आणि NH4 वरून लोणावळ्याकडे निघालो. ट्रेक ७.२ ला कारमध्ये मागच्या बाजुला झोपवले होते त्यासाठी मागचे सीट आडवे केलेले होते आणि दोन्ही चाके काढलेली असल्यामुळे सायकल सामावण्यास कोणतीही अडचण आली नाही. आजपासुन तोलनाक्यावर पैसे घ्यायला सुरूवात झालेली होती. सरकारी योजनांचा आणि माझा छत्तिसचा अाकडा आहे. कधीच कसल्या सवलतींचा फायदा मिळाला नाही आणि मिळेल असेही वाटत नाही. ईथे तर साध्या तोलमाफीचाही फायदा मिळाला नाही. त्यामुळे सोमाटणे टोलनाक्यावर १०१ रुपये ची पावती घेतली थेट ठाण्यापर्यंत. ठाण्याला जाईपर्यंत आता कोणताही तोल भरावा लागणार नव्हता. खंडाळ्यानंतर ड्युक्स नोजचा फोटो घ्यायला थांबलो. त्यानंतर कुठेही न थांबता प्रवास सुरू ठेवला. वाशीफाट्यापासुनच हळूहळू ट्रॅफिक वाढायला सुरूवात झाली होती. ऐरोलीच्या अलीकडे जे बंपर टु बंपर ट्रॅफिक चालु झाले ते कळवा ब्रीज संपेपर्यंत काही संपले नाही. मला तर असे वाटायचे की फक्त पुण्यातच वाहतूक व्यवस्थेची बोंब आहे पण ठाण्यात तर पुण्यापेक्षाही आनंद आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम गुगल मॅपवर लॉक केलेले होते आणि मी मॅप डोळ्यासमोर धरूनच गाडी चालवत होतो. गुगल मॅपमुळे मोबाईलची बॅटरी पटपट उतरत होती. दुपारी २ वाजता सुरू केलेला प्रवास ७ वाजत आले तरीही संपण्याचे नाव घेत नव्हता. आज ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करून माझी वाट लागली होती. कळवा ब्रीज पार करेपर्यंत कळा आल्या होत्या. हेच अंतर सायकलवर पार करायला मला ६ तास लागले असते. तो कळवा ब्रीज ओलांडल्यानंतर दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये पोचायला फारसा वेळ लागला नाही. पार्कींगची जागा मिळायला त्रास होणे अपेक्षित होते पण स्टेडीयमच्या फाटकाबाहेरच व्यवस्थित जागा मिळाली.
स्टेडीयमच्या आजुबाजुला ठाणे सायकल स्पर्धेचे फ्लेक्स सगळीकडे झळकत होते. स्पर्धकांचे प्रवेशअर्ज भरून घेण्यासाठी सर्व स्टाफ सज्ज होता. सर्व व्यवस्था चोख होती. प्रवेश अर्ज आणि वैद्यकीय तपासणी अर्जावर नाव, पत्ता, जन्मतारीख, रक्तगट, मोबाईल नंबर लिहुन सही केली. १६८ सेंमी ऊंची, ६८ किलो वजन, ९१ शुगर आणि १३०/८० बीपी. माझ्यासाठी हिमोग्लोबीनचे रिडींग महत्वाचे होते पण ते काही मिळाले नाही. मी ज्यांच्याबरोबर फोनवर बोललो होतो ते विजय अहिरे भेटले. मला बिब नंबर ३४ चे दोन स्टिकर मिळाले.
|
BIB No. 34 Vijay Vasve |
संयोजकांसाठी टीशर्ट, झेंडे, बिल्ले आणि इतर साहीत्य येऊन पडलेले होते. मी राहण्याच्या व्यवस्थेविषयी विचारले तेव्हा मला थांबण्यास सांगण्यात आले. स्टेडियमपासुन रूमवर जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली होती. माझ्याकडे कार असल्यामुळे मी मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता विचारला, तर सुनिल धुरी माझ्याबरोबर यायला तयार झाले. "दोस्ती इंपिरीया" मानपाडा, घोडबंदर रोडला आम्ही निघालो आणि धुरींच्या मार्गदर्शनाखाली मी गाडी चालवल्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. धुरींबरोबर सायकल स्पर्धा आयोजनाविषयी चांगली चर्चा झाली.
|
रात्रीचे जेवण |
|
मंडप व्यवस्था |
|
दोस्ती इंपिरीया, मानपाडा |
तळमजल्यावर मांडव टाकुन स्वयंपाक आणि जेवण एकत्र चालु होते. जेवणाची व्यवस्था उत्तम होती. जेवण उरकल्यावर मी रूमची काय व्यवस्था किंवा अवस्था आहे? रूम्स कशा आहेत? पाणी वगैरे आहे का? हे सर्व पाहण्यासाठी गेलो. मला १३२२ नंबरच्या रूममध्ये टाकले होते. म्हणजे १३ वा मजला आणि २२ नंबरची रूम आणि कोल्हापुराहुन आलेले डॉ. भांगे हे चावी घेऊन गेले आहेत अशी माहीती मिळाली. मी लिफ्टने १३व्या मजल्यावर पोचलो आणि पाहीले तर २२ नंबरच्या रूमला कुलुप होते. डॉ. भांगे कुठे गायब होते कोणास ठाऊक? झोपायची वेळ होत आली तरीही भांगे येइनात म्हणून आम्ही रूम बदलुन देण्याची विनंती केली. रूम नंबर २८ मध्ये झोपण्याची तयारी केल्यानंतर डॉ भांगे प्रकटले मग पुन्हा २८ नंबरमधला बिछाना २२ नंबरमध्ये आणला. कुठे गेला होता विचारल्यावर डॉक्टरने सांगितले की मित्राकडे दुध प्यायला गेलो होतो. डॉक्टरसुदधा ४० वर्षावरील शर्यतीत सायकल पळवणार होते. मग एखाद्या व्यवसायिक सायकलपटुप्रमाणे कोणी आहे का ४० च्या गटात म्हणून चौकशीही केली त्यांनी. रूममध्ये आम्ही चौघेजण होतो. दुसरा एकजण म्हणाला ४०च्या गटात १ किंवा २ च जण भारीतलेे रेसर आहेत, तुम्हाला एवढी स्पर्धा नाही. ते ऐकुन डॉक्टर खुष झालं. त्यात मीही सांगुन टाकलं की माझ्याकडे रोडबाईक नाहीये. डॉक्टरकडे मेरीडा रीयाक्टो५००० रोडबाईक होती. बिब नंबर जर्सीला लावण्यासाठी डॉक्टरने मला दोन सेफ्टी पिन्स दिल्या.
|
Merida Reacto5000 |
दुसरा रूमपार्टनर म्हणाला की या सायकलला टाईमट्रायल म्हणतात आणि त्याने बॉक्समधील त्याची रोडबाईक जोडायला घेतली. माझे सायकलिंगचे सर्व साहीत्य कारमध्येच होते, फक्त पांघरून घेऊन मी रूममध्ये आलो होतो. पडल्या पडल्या मला झोप लागण्याचे सुख मिळाले नाही कारण रूम पार्टनर फार बडबड करणारे होते. डॉक्टर तर दर तासाला ऊठुन काहीतरी खुडबुड आवाज करत होते. मला १ वाजता जाग आली, २ वाजता जाग आली आणि ३ वाजता जाग आली, जेव्हा जेव्हा जाग आली तेव्हा तेव्हा डॉक्टरचा काहीतरी खटाटोप चाललेला असायचा. मी ३ः३० ला रूम सोडली आणि कारकडे निघालो.
कारमधून सायकल बाहेर काढली आणि दोन्ही चाके जोडुन एक चक्कर मारून पाहीली. काहीही समस्या जाणवली नाही. नंतर पोटात थोडी भर टाकली आणि मी तीन हात नाक्याकडे निघालो. गुगल मॅप जिंदाबाद! कोणत्याही अनोळखी ठिकाणी रस्ते शोधण्यासाठी हा एक आपला हमसफरच. तीन हात नाक्यावर पोचलो तेव्हा तिथे तयारी चालु होती. फिनिशचा बोर्ड लावलेला होता. त्याच्या विरूद्ध बाजुला रेस सुरू होणार होती. म्हणून मी पलीकडे जाऊन थांबलो. हजेरीपत्रकावर BIB नंबर समोर नाव लिहुन सही केली.
|
रेस सुरु होण्याची वाट पाहणारे स्पर्धक |
|
पहीला फ्लॅग ऑफ |
|
मिर्झा बेग बिब नं १ |
खुप वेळ वाट पहावी लागल्यानंतर ४०च्या वरील पुरूषांना लाईनअप करायला सांगण्यात आले. मी स्ट्रावा चालु करून मोबाईल खिशात ठेवुन दिला आणि रस्त्याच्या पलीकडे निघालो.
५...४...३...२...१...०... सर्व सायकलपटु सरसावले आणि सुसाट निघाले. लाईनअपमध्ये मी मागेच होतो. त्यामुळे मी सपासप अंतर कापत पुढे निघण्याचा प्रयत्न करत होतो. लगेचच एका प्लायओव्हरचा चढ सुरू झाला. एका लॅपमध्ये असे ७ फ्लायओव्हर वरखाली करावे लागणार होते. मी ऑफसाईडने जोरात पॅडल मारत सर्वांच्या पुढे निघालो. अजुन तरी कोणी म्हणावा असा अॅटॅक केलेला नव्हता. रोडबाईक्सवाले एकमेकांचा अंदाज घेत आक्रमण करू की नको अशा मूडमध्ये दिसत होते. माझी हायब्रीड सायकल घेऊन मी १ मिनिट सर्व रोडबाईक्सच्या पुढे रेस लिड केली. तोपर्यंत मला ही रेस फार सोपी वाटत होती. त्यानंतर एकाने डाव्या बाजुने जोरदार अॅटॅक करायला सुरूवात केली. रोडबाईकवर जोरात मारलेल्या दोनच पॅडल्समुळे मी मागे फेकलो गेलो. आणि माझ्या शेजारून जाताना मला त्या बाईकची हवाही लागली. एवढा प्रचंड अॅटॅक होता तो. एका रोडबाईकने आक्रमण केल्यावर त्यामागोमाग सर्व रोडबाईक्सने जोरदार आक्रमण करून प्रचंड वेग वाढवला आणि क्षणार्धात त्या १०-१५ रोडबाईक्स माझ्या नजरेसमोरून क्षणार्धात नाहीशा झाल्या.
मी हळू नव्हतोच, आतापर्यंत कधीही न घेतलेला वेग मी घेतलेला होता. किंबहुना माझ्या सायकलने एवढा वेग कधीही पाहीलेला नव्हता. रोडबाईक्स उधळल्यानंतर आम्ही एकसारख्या वेगाने जाणारे ३-४ जण एकत्र सायकल चालवु लागलो. त्यात एक एमटीबी आणि एक सिंगल स्पीड रोडबाईक होती. मी ठरवलं की कमीत कमी यांना तरी हारवायचंच....काहीही होवोत. एमटीबी चालवणारा बिब नंबर १ होता आणि त्याने गोप्रो कॅमेरा हेल्मेटला लावलेला होता. "कोई चिटींग करेगा तो कॅमेरामें आनेवाला है..." सायकल चालवता चालवता तो म्हणत असे. पण खुप चिकाटीने सायकल चालवत होता. कधी कधी तो माझ्या पुढेही जात असे. सिंगल स्पीड रोडबाईक आमच्या खुप पुढे गेली होती. आम्ही जेव्हा पहीली लॅप पुर्ण करून यू टर्न घेऊन निघालो तेव्हा खुल्या गटातील रोडबाईक्स वाऱ्याच्या वेगाने आम्हाला मागे टाकत क्षणार्धात नाहीशा झाल्या. त्यावेळी मिर्झाच्या सायकलचा वारा मला जाणवला. माझ्या शेजारुनच गेला तो. दुसऱ्या लॅपमध्ये युटर्न कुठे आहे ते मला लवकर कळलेच नाही. दोनदा चुकीच्या ठिकाणी थांबलो.
दुस-या लॅपमध्ये शेवटचा यूटर्न घेतल्यावर मी माझा वेग वाढवला. ते दोघेही माझ्या पुढे होते. थोड्या अंतरावर एमटीबीला ओव्हरटेक केली पण तो फारच चिवट होता. माझ्या मागेच येत होता. अजुन थोडी वेगात सायकल घेतल्यावर पुढचा रोडबाईकवाला दिसला. त्याला गाठता गाठता शेवटचा फ्लायओव्हर आला. तसाच वेग कायम ठेवत शेवटच्या फ्लायओव्हरच्या चढावर मी सिंगल स्पीड रोडबाईकला ओव्हरटेक केली. तोही फार चिवट होता. लगेच माझ्या चाकामागे चाक घेऊन आला. फिनिशला खुप झुंज द्यावी लागणार हे उघड दिसत होते. फ्लायओव्हरचा छोटासा उतार सुरू झाल्यावर मी टॉप गियरमध्ये गेलो आणि जेवढ्या वेगात पँडलवर पाय फिरवता येतील तेवढ्या वेगात फिरवू लागलो. आयुष्यातील पहीली रेस पुर्ण करताना 'जो जिता वोही सिकंदर' मधील रेसचे दृश्य डोळ्यांसमोर तरळले होते. फिनिशच्याजवळ मी खुप जोरात सायकल चालवल्यामुळे आमच्यामध्ये अपेक्षित असलेली अटीतटीची लढत झाली नाही.
आमच्या वयोगटातील रेस केव्हाच संपली होती. ४२ किमी अंतर १ तासामध्ये पुर्ण करण्यात आले होते. माझ्याकडे रोडबाईक असती तरी फार काही फरक पडला असता असे मला वाटत नाही कारण रोडबाईकवर माझा सरासरी वेग ३४ ते ३५ च्या वर गेला नसता एवढे नक्की आणि हा वेग या स्पर्धेसाठी किरकोळ स्वरूपाचा होता. अभेद्य वेग असणाराच या स्पर्धेत जिंकु शकतो असे माझे वैयक्तीक मत बनले. अभेद्य वेग म्हणजे कोणीही आणि कितीही आक्रमण करून मागे टाकता येऊ न शकणारा. जमेची बाजु म्हणजे पुण्याच्या दोन महीलांना विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळाले.
बक्षिस समारंभ पार पाडुन मी लगेच पुण्याच्या दिशेने निघालो.
निकाल:
खुल्या ७० किमी स्पर्धेत,
१) दिपककुमार राय (नगर) ७०,०००
२) मच्छिंद्र पवार (सांगली) ५०,०००
३) मिर्झा बेग (मुंबई) ३०,०००
४) धीरेन बोयरा (मुंबई) १५,०००
५) प्रतिक पाटील (कोल्हापुर) १०,०००
६) यश थोरात (नवी मुंबई) ७,०००
७) निकेत पाटील (रायगड) ५,०००
८) ईराणी मेहेरजाद (ठाणे) ५,०००
९) मिहीर जाधव (बदलापुर) ५,०००
१०) प्रकाश ओवलेकर (सांगली) ५,०००
४० वर्षावरील पुरुष ४५किमी,
१) राजेंद्र सोनी (नवी मुंबई) २०,०००
२) राम जाधव (सांगली) १५,०००
३) आस्ताद पालखीवाला (मुंबई) १०,०००
४) निंजेल डेव्हीड स्मिथ (मुंबई) ७,०००
५)शेरविन नरोना (मुंबई) ५,०००
४० वर्षावरील महीला २२ किमी,
१) अंजली भालिंगे (पुणे) २०,०००
२) दिपाली जोशी (पुणे) १५,०००
३) फरोग मुकादम (ठाणे) १०,०००
४) कौल (ठाणे) ७,०००
५) नमिता (ठाणे) ५,०००
स्ट्रावावरील माझे रेकॉर्डींग
|
रेस संपल्यानंतर, पाठीमागे डॉ. भांगे |
|
पहील्या दहामध्ये आलेले विजेते |
|
आयुष्यात सर्वात जोरात सायकल चालवली |
|
स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावणा-या मिर्झा बेगबरोबर |
|
बक्षिस समारंभ |
|
जुडवा पार्कींग |
|
फेसबुकमित्र आबा कापसे आवर्जुन वेळ काढुन भेटायला आले. |
|
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आलेली बातमी |
Thanks & Regards
Vijay Vasve
9850904526
Pune