माझी पहीली हाफ मॅरेथॉन
ब्रेवे (बीआरएम) करताना मी कधीही पळ काढलेला नाही पण ब्रेवे करता करता मला पळण्याची सवय अवश्य लागली. ब्रेवे करणारे बरेचसे मित्र धावण्यातही अग्रेसर आहेत. त्यांच्याच संगतीचा परीणाम दुसरे काय. सायकलिंगसाठी लागणाऱ्या पायाच्या स्नायुंना थोडा वेगळा व्यायाम मिळावा म्हणून मी कधीतरी ५ किमी धावण्याचा सराव करतो आणि तेही ६०० सारखी मोठी ब्रेवेट जवळपास आलेली असेल तर. यावर्षी तर मी कहरच केला ५ किमी धावता धावता १० किमी दोन वेळा पळालो. पहील्यांदा धावलो तेव्हा ३ दिवस पाय खुप दुखत होते. दुस-यांदा १० किमी धावलो तेव्हा मात्र काहीच त्रास जाणवला नाही. आणि इथेच सगळा घोळ झाला तो असा की या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे मला २१ किमी धावण्याची दुर्बुद्धी सुचली. हो दुर्बुद्धीच. त्यात भर म्हणजे टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना रोटरी क्लबच्या रनॅथॉनमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रवेश फीसुद्धा भरण्याची गरज नव्हती. टाटा मोटर्सही या स्पर्धेचे एक प्रायोजक आहेत. फुकट ते चांगलेच. मग काय मागचा पुढचा विचार न करता अर्ध्या मॅरेथॉनला (रनॅथॉन) नाव नोंदणी केली. नाव दिले की काम झाले. रनॅथॉनचा टि-शर्ट, टाईमचिप आणि बिब नंबर (१५६४) आदल्या दिवशीच मिळाले होते. आता फक्त प्राधिकरणात जाऊन धावाधाव करण्याचे काम बाकी होते. माझी पहीलीच हाफ मॅरेथॉन असल्यामुळे मी अनुभवी मित्रांशी सल्लामसलत करुन माझ्या शंका-कुशंका दुर करुन घेतल्या आणि २१ किमी धावण्यासाठी सज्ज झालो.
मॅरेथॉनच्या दिवशी भल्या पहाटे म्हणजे साडेचारला ऊठावे लागले. सर्वकाही आटोपुन बायपास मार्गाने साधारण ६ वाजता प्राधिकरणातील शिवाजी चौकात पोचलो. एक छानसा आडोसा शोधुन गाडी पार्क केली जेणेकरुन जॅमर लागला जाणार नाही आणि रनॅथॉनच्या स्टार्ट पॉइंटला पोचलो. तिथली जय्यत तयारी पाहुन तर माझे डोळेच दिपले. अनोळखी ठिकाणी अनोळख्या स्पर्धेत जर ओळखीचे कोणी भेटले तर खुप दिलासा मिळतो. तिथे मला आयसीसी सायकल ग्रुपमधील मित्र भेटले. ते या स्पर्धेसाठी वोलंटीयर म्हणून काम पाहणार होते. अजित पाटील, गजु, विशी, मंदार आणि इतर बरेचजण होते. त्यांनी मला खुप शुभेच्छा दिल्या. स्पर्धेची सगळी व्यवस्था चोख होती. त्या मोकळ्या मेयर बंगलो प्लॉटमध्ये डीजेचा आवाज मस्त घुमत होता. तीन ते चार ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावलेल्या होत्या. त्या स्क्रीनवर स्पर्धेच्या इतर सुचनांबरोबर रनॅथॉनचा नकाशासुद्धा दाखवला. मला तेच हवे होते. त्यानंतर थोड्याचवेळात रिता जाधव यांचा झुंबा नाच चालु झाला. त्या झुंबाच्या तालावर मी थोडे आळोखे पिळोखे देऊन अंग मोकळे करुन घेतले. त्यानंतर पायांची थोडी ताणाताण सुद्धा करुन घेतली. २१ किमी धावण्याचे आव्हान मला पेलेल की नाही याबाबत मी जरा साशंक होतो. पण आदल्यादिवशीच फेसबुकवर बिब नंबरचा फोटो वगैरे टाकुन ढिंढोरा पिटलेला होता की २१ किमी धावायला चाललोय म्हणून. आता एवढी पोस्ट टाकलीच आहे तर करु या पुर्ण रनॅथॉन. उगीच हाराकीरी नको. जिवाभावाच्या मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा वाया तरी कशा जाऊ द्यायच्या. हे फेसबुक ना मला कधी कधी एक अदृश्य किंवा एक आभासी प्रेरणा देऊन जाते. जे मला वाटते माझ्यासाठी चांगले आहे. जे जे चांगले ते ते घ्यावेच.
६:३० वाजत आले तरीही स्पर्धा सुरु झालेली नव्हती. काही स्पर्धक उभे राहुन राहुन कंटाळले होते त्यामुळे त्यांनी "लवकर चालु करा...लवकर चालु करा" अशा मोठमोठ्याने आरोळ्या दिल्यानंतर आम्हाला एकदाचे रांगेत ऊभे राहायला सांगण्यात आले. टाईमचिप हा प्रकार मी पहील्यांदाच पाहत होतो आणि तो घेऊन धावणार होतो. मी माझा भरोसेमंद साथी स्ट्रावा चालु केला आणि मोबाईल खिशात ठेऊन दिला. मला स्ट्रावाशिवाय करमत नाही. सायकल चालवायची असो वा पळण्याचा व्यायाम असो मी पहीले स्ट्रावा चालु करतो आणि मगच शुभारंभ करतो. मला स्ट्रावाफोबिया झालाय की काय कोणास ठाऊक?
फ्लॅग ऑफ झाल्यानंतर सगळे सुसाट पळत सुटले. त्या पिवळ्या टी-शर्टच्या गर्दीतुन कशीबशी वाट शोधत मीही गती घेण्याचा प्रयत्न करु लागलो. कोणालाही धक्का दिला नाही आणि कोणाचाही धक्का खाल्ला नाही. केवढा हा सुसंस्कृतपणा म्हणायचा! त्या पिवळ्या टि-शर्ट्मध्ये सगळे "यलो यलो डर्टी फेलो दिसत होते". त्या गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी मी थोडा वेग वाढवला आणि गर्दीतुन बाहेर पडलो. मग थोडे मोकळे मोकळे वाटु लागले. सकाळचे थंड वातावरण धावण्यासाठी पोषक वाटत होते. एकच किमी धावलो नाही तोच लगेच घशात कोरड पडायला सुरुवात झाली. घशाला चांगलाच दम भरला आणि किरकिर करू नकोस अशी विनंतीही केली. २१ किमी पळायचे आपल्याला आणि तु एवढ्या लवकर किरकीर करायला सुरूवात केली. थोडा शांत झाला बिचारा. एवढ्या पहाटे मी कधीही धावायचा सराव केलेला नव्हता. मी नेहमी संध्याकाळच्या वेळेस धावतो. पहीलीच अर्धी मॅरेथॉन आणि पहील्यांदाच एवढ्या सकाळी सकाळी पळत होतो. त्यामुळे घशाला कोरड पडली असावी असे मला वाटले. काही धावपटु हातात कसलातरी फलक घेऊन धावत होते. बारकाईने वाचल्यावर त्यावरील मजकुर कळला. २१ किमी २ तासांमध्ये. २१ किमी अडीच तासांमध्ये आणि सव्वादोन तासांमध्ये वगैरे. म्हणजे हे लोक पेसर्स होते बहुतेक. अर्धी मॅरेथॉन २ तासांमध्ये पुर्ण करायची असेल तर २ तासांचा फलक घेऊन धावणाऱ्या लोकांबरोबर धावावे एवढे मला कळले. काही अंतर सरळ मार्गाने धावल्यानंतर डावीकडे वळालो. जिथे वळण होते त्या ठिकाणी रस्त्यावर पांढरे बाण काढलेले होते त्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. आयसीसी ग्रुपचे मेंबर्स सायकलवरुन पहारा देत होते. "कमॉन विजय" म्हणत ते माझा पळण्याचा उत्साह वाढवत होते. पुढे गेल्यावर युटर्न घेतला. तिथे पाण्याच्या बाटल्या देत होते. मी पळता पळताच तिथल्या माणसाने हातात धरलेली पाण्याची बाटली हिसकावुन घेतली आणि तिचे झाकण गर्रकन फिरवले. पाण्याचे काही घोट घशाखाली गेल्यावर त्याची किरकिर थांबली. २०० मिली पाणी प्यायलो आणि ती बाटली पळता पळताच कचरा पेटीकडे भिरकावली. माझा नेम चुकला आणि ती बाटली कच-याच्या बॉक्समध्ये न पडता रस्त्यावर पडली. अरेरे स्वच्छ भारत अभियानाची मी वाट लावली होती. पण माझ्याकडे पर्याय तरी कुठे होता. पळता पळता ५ किमी कसे पुर्ण झाले ते कळले देखील नाही. एका क्षणाचीही उसंत न घेता मी शक्य होईल त्या वेगाने अंतर कमी कमी करत होतो.
रेल्वेपुलाखालुन जाणारा रस्ता आणि भोंडवे चौक मागे टाकत रावेतच्या संत तुकाराम पुलावर चढलो. रावेतमध्ये संत तुकाराम पुल कोठुन आला हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्याला आपण रावेतचा बास्केट ब्रीज म्हणतो त्याचे नाव संत तुकाराम पुल आहे. कळलं? पुलाच्या दुतर्फा ट्रॅफिक पोलिस आणि बरेचसे स्वयंसेवक आमच्या मार्गातील वाहनांना बाजुला करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पुल ओलांडल्यावर पुन्हा पाण्याची बाटली मिळाली. घाम पुसण्यासाठी छोटासा रुमालसुद्धा मिळाला. एनर्जल, संत्र्याच्या फोडी आणि लेमनच्या गोळ्या एका मोठ्या थाळीमध्ये पळणा-यांच्या समोर धरल्या जात होत्या. ज्याला जे आवडेल तो ते उचलत होता. या पट्ट्यामध्ये दोन लॅप करायच्या होत्या. पहीली लॅप पुर्ण केल्यावर माझ्या डाव्या हातावर भिंतीला रंग देण्याच्या ब्रशने बादलीतील शाईचा एक फटकारा ओढला गेला. आयसीसी क्लबच्या मित्रांनी पुन्हा माझा उत्साह वाढवला. अजितने मी पळत असताना माझ्याबरोबर सायकलसह सेल्फी काढली.
दुस-या लॅपसाठी त्याच मार्गावरुन पुन्हा धावण्याचा खुपच कंटाळा आला होता. आता अधुन-मधुन मी खिशातला मोबाईल काढुन स्ट्रावाचा आढावा घेत होतो. अजुन किती राहीलंय? एवढा एकच प्रश्न सारखा मनात यायचा. सुरुवातीला जोरात पळालेले काही धावपटु आता दमलेले दिसत होते. अधुन-मधुन ते पळण्याऐवजी चालत चालत प्रवास करत होते. मी त्यांना मागे टाकत पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. दुसरी लॅप पुर्ण करुन पुन्हा त्या पुलावर आल्यावर खुप दिलासा मिळाला. एक मानसिक समाधान की आता थोडेच अंतर राहीले आहे. भोंडवे चौकातुन रेल्वे मार्गाखालुन निगडी चौकाकडे निघालो. तिकडे जाताना थोडा थोडा चढ जाणवायला लागला. बर्याचशा थकलेल्यांना मी मागे टाकत होतो. त्या चढावरुन पळताना पाय दुखायला लागले होते. मग मी तिरके पळायला सुरुवात केली. ऊंटाची चाल. तिरक्या चालीमुळे पायांवरील ताण कमी व्हायला लागला. शेवटचे २ किमी अंतर बाकी असताना पायाला मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले. पण जशी जशी फिनिश लाईन जवळ यायला लागली तसा तसा माझा उत्साह वाढायला लागला होता. मी जरी ईतरांना मागे टाकत पुढे आलो असलो तरी मला एका महीलेने मागे टाकले. मी आश्चर्यचकीत झालो पण कौतुकही वाटले.
फिनिशलाईनच्या जवळ आलो तेव्हा तिथे लहान मुलांची शर्यत चालु होती. फिनिशलाईनजवळ शक्य होईल तेवढ्या जोरात पळालो आणि आणि माझी पहीली अर्धी मॅरेथॉन मार्गी लावली. आयुष्यात मी पहील्यांदाच २१ किमीची धावाधाव केली. थोडा मोकळा श्वास घेतला आणि खिशातला मोबाईल काढला. स्ट्रावाच्या आकड्यांवर नजर टाकली तेव्हा २ तास १३ मिनिटे झालेली होती. तिथेच एका मुलाकडुन माझा फोटो काढुन घेतला आणि मेडलसाठी शोधाशोध करु लागलो. मेडल्स संपली होती. एवढी धावाधाव करुन मेडल नाही म्हटल्यावर मी खुप दुखी झालो. रोटरी क्लबकडे मेडल वाटण्याची काहीच व्यवस्था नव्हती. ५, १० किमी पळणारे गळ्यात मेडल अडकवुन फिरत होते आणि मी २१ किमी पळूनही माझ्याकडे मेडल नव्हते. शेवटी पुन्हा आयसीसीचे मित्र भेटले आणि त्यांना माझी व्यथा सांगितली. गजुने लगेच शोधाशोध करुन माझ्या मेडलची व्यवस्था केली. खुप खुप धन्यवाद रे गजु!!
पळुन झाल्यावर बर्याच जणांनी डिजेच्या तालावर नाचण्याची हौस पुर्ण करुन घेतली. वरातीमध्ये नाचतात तसा डान्स पहायला मिळाला. नाचगाणे आटोपल्यानंतर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले आणि बक्षिस समारंभ सुरू झाला. पहीला आला तो कोल्हापुरचा पाटील. त्याने १ तास ७ मिनिटांत ही अर्धी मॅरेथॉन पुर्ण केली. एकेक मिनिटाच्या अंतराने दुसरा आणि तिसरा नंबर आला. बक्षिस समारंभ आटोपुन मी तिथुन निघालो.
अशा रीतीने माझी पहीली अर्धी मॅरेथॉन पुर्ण झाली. टाटा मोटर्सचे खुप खुप धन्यवाद!!
*या स्पर्धेचे सर्व निकाल आणि धावपटुंच्या वेळा ऑनलाईन उपलब्ध आहेत*
येथे क्लिक करा!
*या स्पर्धेचे सर्व निकाल आणि धावपटुंच्या वेळा ऑनलाईन उपलब्ध आहेत*
येथे क्लिक करा!
No comments:
Post a Comment