Friday, 30 December 2016

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-१


      पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर मी अघाशासारखा सर्वांच्या पुढे गेलो नाही. "ब्रेवे जब ६०० की हो... तो तेज सायकल चलाने का कोई मतलब नहीं होता..." सहज आणि सुलभपणे जो वेग मिळेल त्या वेगात मी सायकल चालवत होतो. मला सुरुवातीपासुनच शरीरावर ताण घेण्याची आणि हृदयाची धडधड वाढवण्याची बिल्कुल ईच्छा नव्हती. तर भेटणारा प्रत्येकजण म्हणायचा "आज काय झाले? एवढा हळू का चाललाय?" आणि जोरात गेलो असतो तर हेच म्हणाले असते ८७ नंबर जोरात सुटलाय वगैरे. प्रत्येक ब्रेवेमध्ये मी जो आराखडा बनवतो त्याचेच कटाक्षाने पालन करतो. कोण काय म्हणेल याचा मी कधीही विचार करत नाही आणि करुही नये. आणि ईतर रायडर्स जे बोलतात ती त्यांची सहज प्रतिक्रीया असते, त्यात कोणाचाही ईतर काहीही उद्देश नसतो. पाषाणवरुन चांदणी चौकाकडे जाताना काही रनर्स उलट्या दिशेने धावत येत होते आणि त्यातल्या एकानेही रीफ्लेक्टीव घातलेले नवह्ते. खाली बघत सायकल चालवत जात असताना मी तर एकाला उडवलाच असता पण नशीब मी समोर पाहीले म्हणुन अनर्थ टळला नाहीतर माझी ६०० ची ब्रेवे ईथेच संपली असती. हे रनर्स उलट्या दिशेने का पळत येतात कोणास ठाऊक? यांना आपल्या सुरक्षेची काळजी नसते का? ब्रेवेमध्ये मी सहसा कोणत्याही टिममध्ये सहभागी होत नाही, स्वबळावर मी एकटाच सायकल चालवतो. पण जर कोणी माझ्याबरोबर येऊ ईच्छीत असेल आणि मला कोणताही अडथळा होणार नसेल तर माझी काहीही हरकत नसते आणि नसेलही. यावेळेस माझ्याबरोबर वाघमारे सर आणि विशी उपाध्याय होते. ते माझ्या वेगात सायकल चालवत होते त्यामुळे मला काहीच प्रोब्लेम नव्हता. 

     ६०० च्या ब्रेवेमध्ये उपासमार होऊ नये म्हणून मी बरीचशी रसद सोबत घेतली होती. विशेषकरुन ही रसद रात्रीच्या वेळी कामी येणार होती जेव्हा हॉटेल्स आणि दुकाने बंद असतात. त्यामुळे मला कसलीही चिंता वाटत नव्हती. आज कापुरहोळजवळ एकही अपघात झालेला नव्हता हे विशेष नाहीतर दरवेळेस त्या चौकात एकतरी अपघात झालेलाच असतो. कापूरहोळच्या पुढे गेल्यावर शुभेच्छा देण्यासाठी राहुल कोंढाळकरचा फोन आला. सायकल थांबवुन त्याच्याबरोबर बोललो. त्याने दिलेल्या माहीतीनुसार धनंजय कोंढाळकर आणि युवराज सोनार यांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम सुरु झाली होती. त्यानंतर खंबाटकीच्या पायथ्याला जोशींच्या हॉटेलमध्ये चहा घेतला आणि खंबाटकीवर चढाई सुरु केली. आज बर्याच चारचाकी गाड्या बंद पडल्यामुळे घाटातील वाहतुक तुंबलेली दिसत होती. आम्ही सायकलवाले महागड्या कार्सना मागे टाकत घाटातुन न थांबता पुढे पुढे जात असताना त्या कार्सवाल्यांच्या पराभुत नजरा आमच्यावर रोखल्या जात होत्या. हतबल होऊन त्या तुंबलेल्या गर्दीत अडकुन पडले होते बिचारे. खंबाटकीच्या माथ्यावर थोडी विश्रांती घेऊन हृदयाची धडधड शांत केली. पाण्याचे घोट घशाखाली उतरवले आणि सातार्याकडे सुसाट निघालो. भुइंजच्या पुढे कृष्णा नदी ओलांडुन पाचवड मागे टाकले आणि वेण्णा नदी ओलांडुन सातार्यात प्रवेश केला. सातार्याकडे जाताना सातार्याचे दोन सायकलपटु भेटले. धनंजय जगताप हा  तर आयसीसी ग्रुप मेंबर निघाला. त्यामुळे त्याच्याबरोबर गप्पांचा ओघ वाढला. निरोप घेताना त्याने मला पतंजलीचा एनर्जी बार भेट म्हणुन दिला. सातार्यातील मुख्य पुलाचे काम अजुनही रेंगाळत चाललेले आहे मागच्या वर्षीसुद्धा हीच बोंब होती. सातार्यानंतरच्या खिंडीचा उतार सुरु होण्याअगोदर एक पाण्याची बाटली विकत घेतली. ईथुन आता डायरेक्ट चेकपॉईंट गाठायचा असे ठरवुन मी आणि विशी सुसाट निघालो. उतार संपल्यानंतर उजव्या हाताला प्रियांका शू मॉलची जाहीरात वाचली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे चपलांचे दूकान (मॉल) असा जाहिरातीचा फलक पाहीला. तेव्हाच ते पाहण्याची इच्छा झाली होती पण ब्रेवे मध्ये वेळ वाया घालवायचा नव्हता. जेव्हा कधी कारने या मार्गावर येइल तेव्हा नक्की भेट द्यायची असे ठरवुन मी पुढे निघालो. सातारा ते उम्ब्रज हे अंतर पार करताना नेहमीप्रमाणे ते गावागावात भुजंगासन करून थांबलेले फ्लायओव्हर्स म्हणजे एक डोकेदुखीच ठरते. त्यांच्यावर चढायचे आणि उतरायचे जीवावर येते. तरीसुद्धा या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी वेग वाढवला होता कारण खंबाटकीपर्यंत आम्ही म्हणावा असा वेग घेतलेला नव्हता. 

     पुढे या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स आणि त्यांना जोडलेल्या ट्रॉलीची गर्दी वाढायला लागली. हे ट्रॅक्टर्स सायकल चालवणार्यांना चांगलाच अडथळा निर्माण करतात त्याचे कारण म्हणजे यांचा संथ वेग. सायकलच्या वेगाशी साधर्म्य असल्यामुळे त्यांना ओव्हरटेक करुन पुढे जाताना इतर वाहनांचा खुप त्रास होतो आणि खुप काळजी घ्यावी लागते. पाठीमागुन कोणते वाहन येत आहे का यावर बारीक लक्ष ठेऊनच ओव्हरटेक केलेली बरी. उरमोडी आणि तरळी नदी ओलांडल्यानंतर आम्ही उम्ब्रजमध्ये आलो. तासवडे तोलनाक्याचा पहीला चेकपॉइंट आता फक्त ५ किमी राहीला होता. नक्की वेळ आठवत नाही पण साधारण सव्वाच्या दरम्यान आम्ही तिथे पोचलो. ओमकार आणि योगेश रॅंदोनियर्सची वाट पाहत थांबलेले होते. आम्ही सही शिक्का घेऊन पाणी आणि केळींचा आस्वाद घेतला. ३०० ची ब्रेवेट करणारा अजुन कोणीही पोचला नाही असे योगेश म्हणाला. तेवढ्यात परीतोषसुद्धा पोचला. एक-दोन कार्सवाल्यांनी चेकपॉइंटवर थांबुन उंब्रजजवळ एका सायकलवाल्याला गंभीर अपघात झाल्याचे सांगितले. आमच्या सायकल्सकडे पाहुन तो आमच्यातलाच असावा असे समजुन सर्वजण आम्हाला त्या अपघाताची वार्ता देऊ लागले. एकामागोमाग एक असे बरेचजण आमच्याजवळ थांबुन अपघाताची माहीती सांगु लागले. परीस्थितीचे गांभीर्य ओळखुन ओंकारने कार काढली आणि त्वरीत अपघातस्थळी रवाना झाला. काय झाले? कोणाचा अपघात झाला? पुढे काय झाले? हे आम्हाला काहीही कळु शकले नाही.

     कराड जवळ यायला लागल्यावर आमच्या पोटात कावळे कोकलायला लागले होते. ठरल्याप्रमाणे आम्ही कराडमध्येच लंच करणार होतो. कराडकडे जातानासुद्धा पाठीमागुन येणारे बरेच कार्सवाले आम्हाला अपघाताची माहीती देतच होते. त्यांना आम्ही सांगायचो की आमचा माणुस कार घेऊन तिकडे गेला आहे. कराडमध्ये जाताना कोयना नदी ओलांडली. कराडमध्ये पोचल्यावर विशीने संगम हॉटेल निवडले पण तेथील गर्दी पाहुन मी काढता पाय घेतला आणि माझ्या नेहमीच्या गंधर्व पॅलेस हॉटेलमध्ये आलो. कराडमधला दुसरा फ्लायओव्हर संपला की लगेच डाव्या हाताला हे हॉटेल आहे. ईथे फ्रेश होण्याची सर्व व्यवस्था आहे. ताजातवाना झाल्यानंतर मी टोमॅटो सुप, व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंच्युरीयन मागवले. तेवढ्यात आशुतोष वाघमारे सरांचा फोन आला की कुठे आहात म्हणुन? मग त्यानाही आम्ही त्या हॉटेलमध्येच बोलावले. प्रत्येकाने आपापल्या आवडीचे पदार्थ मागवले. विशी, मी आणि वाघमारे सर एकत्र जेवलो आणि कोल्हापुरकडे निघालो. 

    कोल्हापुरकडे जाताना आम्हाला अक्षय आणि मनिश भेटले. मग आम्ही सायकल्सची ट्रेन तयार केली आणि  आमची सायकल एक्सप्रेस कोल्हापुरकडे सुसाट धावायला लागली. साधारण ३० किमी नंतर आमची ट्रेन विस्कटली. मी आणि विशी कोल्हापुरच्या दिशेने जाताना आम्हाला कमल भेटला. मग आम्ही कमलच्या मागोमाग निघालो. वारणा आणि पंचगंगा नदी ओलांडुन कोल्हापूरजवळ आलो तेव्हा सूर्यास्त व्हायला लागला होता. कागल एमआयडीसी आली तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली आणि आम्ही थंडीचा सामना करायला सज्ज झालो. अंधारातच कर्नाटकच्या सीमेमध्ये प्रवेश केला. सायकलवर मी पहील्यांदाच महाराष्ट्र राज्याची सीमा ओलांडत होतो. अंधारामुळे उतार कुठे आणि चढ कुठे तेच कळत नव्हते. पण सायकलला चांगला वेग मिळत होता. निप्पाणी मागे टाकल्यानंतर संकेश्वरचे वेध लागले. तवंदी घाटाची धास्ती होतीच मनामध्ये. पण तवंदी केव्हा सुरु झाला ते कळलेच नाही. थोडा चढ लागल्यावर जाणवले की हा तवंदी असावा. बराच वेळ सायकलवर बसल्यामुळे पायांच्या स्नायुंवर आलेला ताण कमी करण्यासाठी मी १०० मी अंतरापर्यंत सायकल हातात धरुन चालत चालत गेलो. चालल्यामुळे पायांच्या शिरा मोकळ्या झाल्यासारखे वाटायला लागले. घाट संपल्यावर उजव्या हाताला कावेरी हॉटेल दिसले. कर्नाटकातील संकेश्वर २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर राहीले असावे. आतापर्यंत साधारण २९० किमी अंतर पुर्ण झालेले होते. तवंदी घाट मागे टाकल्यानंतर त्यापुढच्या उताराचा रस्ता भन्नाट आहे. त्यावरुन मी सुसाट सायकल सोडली. तेवढ्यात माझा फोन वाजला आणि विशेष म्हणजे मी तो उचलला. विशीचा फोन होता..पंक्चर झाली म्हणाला. उतारामुळे मी जोरात पुढे आलो होतो. आमच्यामध्ये १ ते १.५ किमी चे अंतर पडले होते. उलट्या मार्गाने विशीकडे जायला निघालो तर उतारावरुन सर्व वाहने तुफान वेगात येत होती. ते पाहुन मी रॉंग साईडने (चूकीच्या बाजुने) जाण्याचे टाळले आणि तिथेच एका चौकात दिव्याखाली विशीची वाट पाहत थांबलो. उगीच अपघाताला आमंत्रण नको.

    यावेळात मी घरच्यांशी फोनवर बोलुन घेतले आणि व्हाटसअपवर काय काय आले ते पाहत होतो. तेवढ्यात एक ग्रामीण गृहस्थ (पेहरावावरुन) मोपेडवर (टिव्हीएस वगैरे) आला आणि माझ्या बाजुला थांबुन कन्नडमध्ये काहीतरी बडबडला. मला त्याची भाषा कळेना आणि त्याच्याबरोबर काय बोलावे तेही मला सुचेना.. मी फक्त त्याच्याकडे पाहत राहीलो. मी बोलत नाही पाहुन त्याने तोच प्रश्न दुसर्यांदा विचारला. यावेळेस त्याचा आवाज जरा वाढला होता. त्याने देशी घेतलेली होती. तिसर्यांदा तो दरडावलाच माझ्यावर. मी जर माझी दातखिळ उघडली नसती तर त्याने मला झोडपायला सुद्धा मागेपुढे पाहीले नसते. एवढा जोश आला होता त्याला. त्याच्या जोशमधला होश मी दुर केला असता तो भाग वेगळा. पण परमुलुखात पंगा नको म्हणून मी आपले मराठीत सांगुन टाकले, "मला कन्नड येत नाही..." मराठी भाषा ऐकुन ही पिडा टळेल असे मला वाटले होते. मी काय बोलतोय ते त्याला कळणार नाही आणि तो काय बोलतोय ते मला कळणार नाही. तु तुझ्या वाटेने मी माझ्या वाटेने. तर काय आश्चर्य तो म्हणाला, "कुठुन आलाय?" आईच्या गावात अन बाराच्या भावात..... त्याच्या मघाच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मी जास्त दचकलो. एवढ्या पटकन तर गुगल ट्रान्सलेटपण प्रतिसाद देत नाही. मग मी त्याला मराठीतच उत्तर दिले, "पूण्यावरुन सायकलवर आलोय..." आणि हे ऐकल्यावर तो उडाला. निम्मी उतरली त्याची. आलटुन पालटुन माझ्याकडे आणि माझ्या सायकलकडे पाहु लागला. कुठे चाललाय? कशासाठी करताय? बक्षिस आहे का? हे सामान्य प्रश्न विचारुन त्याने मला खुप बोअर केले. त्याला कटवण्यासाठी काय करावे सुचत नव्हते. शेवटी कसाबसा त्याला कटवला आणि सुटकेचा निश्वास टाकला.

    विशी आणि कमल आले आणि उतारावरुन सुसाट गेले. जाता जाता मला चलो चलो म्हणुन हात दाखवुन पुढे निघुन गेले. मी त्यांची वाट पाहत थांबलो होतो का दुसर्या कोणाची मला तेच कळाले नाही. त्यांच्या मागुन मीही निघालो. संकेश्वर आता जवळ येत चालले होते. रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीला मी संकेश्वर कुठे आहे? असे आवर्जुन विचारत होतो. येथील लोकांना मराठी समजते हे मला चांगलेच कळुन चुकले होते त्यामुळे मी सरळ मराठीतच विचारत होतो. एक डावीकडे जाणार छोटा रस्ता दिसला पण तो संकेश्वरकडे जाणारा नव्हता. पुढे गेल्यावर संकेश्वरची पाटी आणि डावीकडे जाणारा बाण दर्शवलेला होता. पण तो रोड हायवेला समांतरच होता. पाटीवर विश्वास ठेऊन त्या सर्व्हीस रोडवर सायकल घातली. पुढे गेल्यावर संकेश्वरचा फ्लायओव्हर आणि डावीकडे संकेश्वरमध्ये जाणारा रस्ता दिसला त्यावरुन हा रस्ता संकेश्वरचाच आहे याची खात्री पटली. रस्त्यात भेटणार्या प्रत्येकाला आता मी हॉटेल राजधानी कुठे आहे ते विचारत होतो. हॉटेल राजधानी म्हणजे आमचा चेकपॉइंट होता. काही लोक उत्सुकतेपोटी कन्नडमध्ये प्रश्न विचारत होते, मी कन्नड येत नाही म्हटल्यावर लगेच मराठीत प्रश्न यायचा. त्या दमलेल्या अवस्थेतही मी यथाशक्ती त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होतो. सायकलवर जाता जाता संकेश्वरमध्ये अमिर खानच्या दंगल सिनेमाचे पोस्टर पाहीले. ही ब्रेवे संपल्यावर मीसुद्धा आमिरचा दंगल बघणार आहे. हॉटेलचा पत्ता विचारण्यासाठी सारखे थांबावे लागत असल्यामुळे मला थोडा उशिरच झाला. ९ वाजुन २५ मिनिटांनी मी हॉटेल राजधानीवर पोचलो. कमल माझ्या मागोमागच आला. योगेश शिंदे तिथेच होते. मी ब्रेवेट कार्डवर सही शिक्का घेतला आणि लगेच हॉटेल राजधानीच्या सेवकाला रात्रीच्या भोजनाची ऑर्डर दिली. पुन्हा तोच मेनु टोमॅटो सुप आणि व्हेज फ्राईड राईस. अशा रितीने ३०० किमीचा निम्मा प्रवास मी विशीबरोबर पुर्ण केला. या प्रवासाला जवळजवळ १५ तास १५ मिनिटे लागली.   
क्रमश:
भाग २ साठी क्लिक करा

या ब्रेवेची स्ट्रावावरील अ‍ॅक्टिव्हीटीसाठी क्लिक करा..



ब्रेवेमध्ये टोमॅटो सुपनेसुद्धा नशा येते

STRAVA ACTIVITY



टोमॅटो सुप आणि व्हेज मंच्युरीयन



आशिश जोशीबरोबर साई इंटरनॅशनल पहाटे ३ वाजुन ५० मिनिटे

हॉटेल राजधानीमध्ये कमलने काढलेला फोटो


फिनिशला पोचल्यावर सौ. शी बोलताना

राहुल कोंढाळकर आणि राहुल गाढवे यांनी फिनिशला केलेले स्वागत

राहुल कोंढाळकर आणि राहुल गाढवे यांनी फिनिशला केलेले स्वागत
सोबत ओमकार आणि अमित भरते

कमल

परीतोश


Finishers


proud finisher

Finisher using MTB

Drop bags

proud finishers

Finisher


Aashutosh Waghmare & other finishers

Yogesh Bhat


Before Kolhapur from left Vijay Vasve, Kamala and Vishi



proud finisher

RIP Dr. Shekhar Bendre


Hotel Gandharv palace Karad


माझ्या बंधुने ब्रेवे चालु असताना पाठवलेली बातमी आणि काळजीचा मेसेज...


No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...