Saturday, 10 March 2018

अदृश्य सायक्लिस्ट

अदृश्य सायक्लिस्ट

तसा त्याला अदृश्य म्हणता येणार नाही कारण मला तो नेहमी दिसतो, तेही रात्री पावणेबाराच्या सुमारास. मी साडेअकरा वाजता कामावरून सुटलो की सुसाट निघतो. रस्ता एकदम मोकळा असतो, ना पायी चालणाऱ्यांची लुडबुड ना राँग साईडने येणार्‍यांचा अडथळा ना कसले सिग्नल ना ट्रॅफिक. रस्त्यावरचे दिवेच काय ते सोबतीला असतात. यामुळे १४व्या मिनिटाला मी जुन्या हायवेवर येतो म्हणजे बरोबर रात्रीचे पावणेबारा वाजलेले असतात. हा अदृश्य सायक्लिस्ट बरोबर त्याच वेळेस वल्लभनगर ते कासारवाडी किंवा फार तर फुगेवाडी या पट्ट्यात झलक देऊन जातो. त्याची फक्त झलकच दिसते. जेव्हा मी दिवसा त्या भागातुन जातो तेव्हा मला तो कधीही दिसलेला नाही.
त्याच्याकडे काळी कुळकुळीत घोडा सायकल असते, ती पाहीली की सायकलचा जुना जमाना डोळ्यांसमोर यावा, त्याने जुन्या स्टाईलचे जाड आणि चौकोनी खिसे असलेले थंडीचे जॅकेट घातलेले असते, वाढलेली पांढरीशुभ्र दाढी, गडद सावळा रंग, दादा कोंडके सारखी विजार तर कधी पायजमा असतो. आतापर्यंत त्याने मला ५ वेळा झलक दिली आणि ती कशी दिली हे फार गंमतीशीर आहे.
हायवेला लागलो की माझा वेग सहसा ३०च्या खाली येत नाही. एकदा मी वल्लभनगर ते कासारवाडी दरम्यान असाच सायकलला वेग दिलेला असताना ही स्वारी रस्त्याच्या कडेने एकदम मंद गतीने चाललेली होती. माझे लक्ष गेले पण म्हटले आता एवढी स्प्रिंट मारताना ब्रेक दाबण्यात काही अर्थ नाही, पुन्हा भेट झाल्यावर या काकांशी नक्की बोलायचं. त्या आठवड्यात शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी हा अदृश्य सायक्लिस्ट दिसला. दिसला म्हणजे झलक दाखवुन गेला. तेच ठिकाण आणि तीच रात्रीची वेळ. माझ्यापासुन थोड्या लांब अंतरावर तो सायकल चालवत होता मी त्या जॅकेटवरून ओळखले की हाच तो. अब बच के कहा जाओगे? असे म्हणत मी क्रँक जोरात फिरवायला सुरुवात केली आणि दोघांमधील अंतर सपासप कमी करू लागलो. जेअरडी पुलाजवळ मी त्याला गाठणार तेवढ्यात तो डाव्या बाजुला भोसरी कडे वळाला. मला काही तिकडे जायचे नव्हते त्यामुळे मी त्याच वेगात सरळ हायवेने निघुन गेलो. मनातल्या मनात म्हटले थोडक्यात भेट हुकली.
त्यानंतर माझी शिफ्ट बदलली. पुन्हा त्याच वेळेला तिथुन सायकल चालवायला जवळजवळ ९ दिवसांचा कालावधी लागला. यामुळे हा सायक्लिस्ट माझ्या विस्मरणात गेला होता. वल्लभनगरच्या कॉर्नरला एकदा देशी दारूच्या फुटलेल्या बाटलीने माझ्या सायकलच्या चाकाचे वायुहरण केले. तेथील पेट्रोल पंपाच्या पुढे जाईपर्यंत रिम डांबरी रोडवर घासण्याचा आवाज यायला लागला. मी लगेच रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याखाली सायकल उपडी केली. झुरळ उपडे पडल्यावर जसे त्याला हालचाल करता येत नाही तशी सायकलही उपडी करून ठेवली की निपचित पडुन राहते, कितीही पाय हलवले तरी काहीही फरक पडत नाही. रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना सायकल पंक्चर (वायुहरण) होण्याचा हा पहीलाच प्रसंग. पंक्चरवर लिहता लिहता त्यासाठी वायुहरण हा नविन शब्द मला सुचलेला आहे. पंक्चरला वायुहरण संबोधिले जावे, ऐकायलाही छान वाटतंय. त्यावेळेस आजुबाजुला चिटपाखरू नव्हते. पार्टी करून घरी चाललेले, आपल्याच धुंदीत असलेले काही लोक ज्यांना सायकल आणि सायकलवाला यांच्याशी काही देणेघेणे नव्हते ते लोक नजरेस पडत होते. हायवेच्या मुख्य लेनमधून सुसाट जाणारी वाहने सोडली तर आवाज करणारे सुद्धा कोणी नव्हते. माझे सर्व लक्ष चाक पटकन पुर्ववत कसे होईल याकडे होते. मी माझ्या कामात मग्न होतो. तेवढ्यात "अय पंक्चर" असा मोठ्याने आवाज देत हा अदृश्य सायक्लिस्ट वेगात निघुन गेला. तो वेग पाहुन मी सुध्दा तोंडात बोट घातले. म्हातार्‍यामध्ये चांगलाच जोश होता. तो अदृश्य झाल्यावर माझ्या लक्षात आले की अरे हाच तो दोन वेळा झलक देणारा आणि ज्याला आपण मागच्या आठवड्यात गाठण्याचा प्रयत्न केला होता. तेच जॅकेट, तीच काळी कुळकुळीत सायकल, रापलेली पांढरी दाढी आणि तोच पावणेबाराचा सुमार. हे लिहताना सुद्धा मला थोडे आता भयचकित झाल्यासारखे वाटते आहे. तसे काही नसावे हा निव्वळ योगायोग असावा. पंक्चर काढल्यानंतर मी सायकलवर स्प्रिंट लावत झपाझप अंतर कापले पण तो सायक्लिस्ट कुठे अदृश्य झाला कोणास ठाऊक.
आतापर्यंत त्याने मला ३ वेळा झलक दिली. पण संभाषण एकदाही झाले नाही. पुढच्या वेळी याला नक्की गाठायचेच असा मी पक्का निश्चय केला. या पट्ट्यात मार्गक्रमण करण्याचे तीन पर्याय आहेत एक बीआरटी मार्ग, दुसरी मुख्य लेन आणि तिसरा सर्विस रोड. एकदा एका मोठ्या ट्रकमुळे सर्विस रोडवर ट्रॅफिक ठप्प झाले होते, एवढे की सायकलसुद्धा पुढे नेणे शक्य नव्हते. तेव्हा हे अदृश्य सायक्लिस्ट महाशय बीआरटीच्या मार्गातुन ऐटीत सायकल चालवत गेले. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांना ठेंगा दाखवत. आणि अर्थातच त्या मार्गातुन जाणारा तो एकमेव सायक्लिस्ट होता. बीआरटीच्या लेनमध्ये इतर लोक त्याच्या मागे का गेले नाहीत? तो घुसला कुठुन? बाहेर पडला कुठुन? हे मला पडलेले प्रश्न. यावेळेसही त्याची नुसती झलकच मिळाली.
पाचवा आणि शेवटचा प्रसंग तोही याच आठवड्यातला. कासारवाडीवरून सर्विस रोडने मी सुसाट सायकल चालवत निघालो. एक घोडा सायकलवाला लांब पुढे पुसटसा दिसत होता. पण पुसट दिसता दिसताच जसजसा मी त्याच्या जवळ गेलो तसा तो एटलस कॉप्कोकडे वळुन अदृश्य झाला. तो तोच होता की तो नव्हता हे सुद्धा मला ओळखता आले नाही. हो तोच होता. ती घोडा सायकल, ते जॅकेट मी विसरू शकत नाही.
हा अदृश्य सायक्लिस्ट म्हणजे माझ्या मेंदुला मिळालेला नविन खुराक आहे. जर भेटला तर सेल्फि काढुन नक्की पोस्ट करेल. आणि तसे विचार डोक्यात आणु नका जे सध्या माझ्या डोक्यात यायला लागले आहेत.
श्शश्शश्श... घाबरायचे नाही.
(मध्यरात्रीचे सायकलिंग)- विजय वसवे

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...