Friday 2 March 2018

Chennai Full Iron Triathlon 2017

उलटया वाऱ्याची ट्रायथलॉन

चेन्नई फुल आयर्न ट्रायथलॉन फिनिशर 

Click this link for English version: 


पार्श्वभुमी:

साधारणपणे मी जुन-जुलै महिन्यात (२०१७) ट्रायथलॉनच्या भानगडीत पडलो. सायकल चालवण्यात पटाईत झालेलोच होतो, एक अर्धी मॅरेथॉन केल्याचा अनुभव पाठीशी होता आणि पोहायला तर मला बालपणापासुनच येत होते (हा माझा सर्वात मोठा गैरसमज होता). मागील वर्षात एवढ्या ब्रेवे (बीआरएम) केल्या की झोपेत सुद्धा पाय गरगर फिरत आहेत की काय असा भास होत होता. घे सायकल की जा पुणे बेंगाळुरु हायवेवर. सारखे सारखे NH4 वर सायकल चालवण्याचा अक्षरशः कंटाळा आला होता. एक वेळा सुपर रँदोनियर होता येईल कि नाही याची साशंकता असताना मी चांगला तीन वेळा सुपर रँदोनियर झालो आणि मी तृप्त झालो. आता मला बीआरएम करण्याची इच्छा होत नाही. या जीवापाड (किंबहुना जीव धोक्यात घालून) केलेल्या बीआरएमचे मेडल्सदेखील लवकर मिळत नाहीत, चातकासारखी वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे तर त्याचा आणखीनच तिटकारा वाटायला लागला होता. मला बीआरएमविषयी अप्रूप राहीले नव्हते, त्यामध्ये जाणवणारा थरार माझ्यासाठी संपला होता. आगळा-वेगळा थरार अनुभवण्यासाठी ऑगस्टमध्ये लेह लडाखला सायकलवर जाण्याचा बेत आखला होता पण तो काही यशस्वी होऊ शकला नाही. तर म्हटले सायकलवर जीव धोक्यात घालतोच आहे तर चला पाण्यातही घालण्यात काय हरकत आहे? पाण्याचाही पर्याय उपलब्ध असताना फक्त सायकलवरच जीव का धोक्यात घालावा? असा विचार करून मी पोहण्याचा सराव करायला सुरुवात केली. मला लहाणपणापासुन उत्तम पोहायला येते (गावठी स्टाईल). मला पाण्याची भीती वगैरे म्हणतात ती बिलकुल वाटत नव्हती. फक्त पाण्याच्या मध्यभागी गेल्यावर दम लागला तर काय? असा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा राहत असे. परंतु ट्रायथलॉनचे फोटो पाहिल्यावर असे लक्षात आले कि पाण्यामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत दोरी बांधलेली असते. दम लागला कि या दोरीला लटकुन आराम करता येऊ शकतो (बुडून मरण्याची शंका दुर झाली). यानंतर मी ट्रायथलॉनमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी करू लागलो. आयुष्यात कधीही ट्रायथलॉन केलेली नसताना जेव्हा मी कोल्हापुर ट्रायथलॉनला (Half distance triathlon) नाव नोंदवले तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या आणि त्यानंतर लगेच ही चेन्नईची Full Iron triathlon.

पूर्ण अंतर ट्रायथलॉन (Full Iron distance triathlon): १४०.६
३.८६ किमी (२.४ मैल ) पोहणे
४२.२० किमी (२६.२२ मैल) धावणे
१८०.२५ किमी (११२ मैल ) सायकल चालवणे
असे मिळून या स्पर्धेचे एकूण अंतर १४०.६ मैल आहे.

अतिउत्साहाने आणि अज्ञानाच्या भरात मी या स्पर्धेला आयर्नमॅन म्हणुन संबोधित असे परंतु माझ्या कोचने वेळेवर माझे हे अज्ञान आणि गैरसमज दुर केला. मला तर १४०.६ आणि ७०.३ हा काय प्रकार आहे हे सुद्धा व्यवस्थित माहीत नव्हते. यासाठी एक बुद्धिमान मार्गदर्शक पाठीशी असणे अत्यंत आवश्यक आहे.

"पूर्ण अंतर ट्रायथलॉन" (Full Iron Triathlon) हाच शब्दप्रयोग अचुक आहे. आयर्नमॅन किंवा हाफ आयर्नमॅन हे शब्दप्रयोग चुकीचे आहेत. "आयर्नमॅन" हा एक ब्रँड आहे आणि या ब्रँड अंतर्गत आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी ठरवुन दिलेल्या वेळेत ती ट्रायथलॉन पूर्ण केली तरच आपण "आयर्नमॅन" झालो असे म्हणणे योग्य ठरेल. आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेणे खूप खर्चिक आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या भारतात हि स्पर्धा आयोजित केली जात नाही, यात सहभागी व्हायचे असेल तर परदेशात जावे लागते. प्रवेश फि, विमानप्रवास, परदेशात राहणे या गोष्टी खूप खर्चिक आहेत. आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्याचे माझे स्वप्न आहे. त्यातल्या त्यात खिशाला परवडणारा देश शोधून या स्पर्धेत सहभागी होण्याचा माझा विचार आहे. एखादा दानशूर स्पॉन्सर मिळाला तर अतिउत्तम. नाहीतर आपला आशिया आहेच, फिलिपाइन्स किंवा मलेशिया.

पुण्यातील कौस्तुभ राडकर हे आतापर्यंत २० वेळा आयर्नमॅन झालेले आहेत. हे सांगण्याचे कारण एकच की लोकांना आयर्नमॅन म्हटले कि त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मिलिंद सोमण उभा राहतो. याच्यातून माझीही सुटका झाली नाही. माझे काही मित्र मला म्हणाले, "मिलिंद सोमणने केलंय तेच केले ना तू?" मी म्हटले, "हो, मेड इन इंडिया, तेच केलंय". यानिमित्ताने माझ्या नावाची चर्चा मिलिंद सोमण सारख्या महान ट्रायथलीटच्या नावाबरोबर झाली हे काय कमी आहे का? दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे पुण्यापेक्षा कोल्हापूरमध्ये आयर्नमॅनची संख्या जास्त आहे. कोल्हापूरमध्ये ट्रायथलॉनचे वेड जास्त आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

चेन्नई ट्रेकिंग क्लब:
चेन्नईमध्ये १९९९ सालापासून या पूर्ण अंतर ट्रायथलॉनचे आयोजन केले जात आहे आणि मी या २०१७ च्या १८व्या स्पर्धेत सहभागी होणार होतो. चेन्नई येथे होणारी ट्रायथलॉन ही भारतातील एकमेव Full Iron Distance Triathlon आहे. खरंतर वेळापत्रकाप्रमाणे ही स्पर्धा जुलैमध्येच होणार होती परंतु काही कारणास्तव ती डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. कोल्हापुरच्या डेक्कन ट्रायथलॉनमध्ये बेंगाळुरुच्या श्रवणबरोबर माझी मैत्री झाली आणि त्याच्याकडूनच मला चेन्नई ट्रायथलॉनविषयी माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता श्रवणने दिलेल्या लिंकवर क्लिक करून मी चेन्नई ट्रायथलॉनसाठी माझे नाव नोंदवले. मला सहभागी होता यावे म्हणूनच हि स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती कि काय असे मला वाटायला लागले कारण जुलैमध्ये तर माझे पायसुद्धा ट्रायथलॉनच्या पाळण्यात आलेले नव्हते. जे होते ते चांगल्यासाठीच. पांडुरंगाच्या इच्छेनेच सर्वकाही घडत होते. मला या स्पर्धेत सहभागी होता आले हे मी माझे भाग्य समजतो. सर्व तरुणींचे जीव कि प्राण असलेले मिलिंद सोमण यांनीसुद्धा चेन्नई येथील ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केलेली आहे.

दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट मला येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या स्पर्धेची प्रवेश फी. किती असेल प्रवेश फी? तुम्हाला काय वाटते? काही अंदाज? आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेचे प्रवेश शुल्क ४५००० ते ५०००० रुपयांपर्यंत असते (किती दिवस अगोदर नाव नोंदवतोय त्यावर अवलंबून). पुणे शहरात एखादी १० किमी पळण्याची स्पर्धा असेल तर त्याची प्रवेश फी सुद्धा १००० रुपयांच्या आसपास असते. चेन्नई ट्रायथलॉनची प्रवेश फी फक्त १००० रुपये होती, टी-शर्ट आणि मेडल हवे असल्यास ३५० रुपये ज्यादा असे एकूण फक्त १३५० रुपये. आहे की नाही मज्जा?

पुणे ते चेन्नई प्रवास:
माझ्यासारख्या सामान्य माणसाला विमानाचा प्रवास काय परवडणार? किंवा कशाला उगीच अंगापेक्षा बोंगा मोठा करायचा...म्हणून मी आपले चेन्नई एक्सप्रेसचे (रेल्वे) तिकीट बुक करून ठेवले. बुक केलेल्या दिवसापासून ते अगदी प्रवासाच्या दिवसापर्यंत ते तिकीट वाट पाहत ताटकळतच उभे राहिले होते. शेवटी कंटाळून रेल्वेचा नाद सोडून दिला आणि वोल्वो बसने जाण्याचा निर्णय घेतला. नंतर असे वाटले की विमानाचे तिकीट काढले असते तर बरे झाले असते कारण चेन्नईला जाईपर्यंत २५०० रुपयांना चुना लागायचा तो लागलाच होता.

संपूर्ण प्रवासात अभि लोंढेशी मी कायम संपर्कांत होतो. कधी निघालो, कुठे पोचलो हे सर्व एकमेकांना कळवत होतो. तो विमानाने चेन्नईला पोचणार होता आणि आम्ही दोघे एकाच रूममध्ये राहणार होतो. श्रवण सुद्धा त्याच हॉटेलमध्ये राहायला येणार होता. मॅक्स क्लासिक अपार्टमेंट, जुना महाबलीपूरम रोडला श्रवणने बुक केलेली होती. पुणे ते बेंगाळुरु आणि बेंगाळुरु ते चेन्नई हा प्रवास मी वोल्वो बसने केला. चेन्नईमध्ये बसमधुन उतरल्यावर मोबाईलमधील ऍपने रीक्षा बुक केली आणि ओला रिक्षाने थेट मॅक्स क्लासिक अपार्टमेंट गाठले. रिक्षावाला लुटारू स्वभावाचा नसल्यामुळे मला खूपच बोअर वाटले. आमची साधी बाचाबाची सुद्धा झाली नाही. मी पुण्याचा असल्यामुळे मला खूप चुकल्या चुकल्यासारखे वाटले. सलग २२ तास वोल्वोच्या निमआराम बसमध्ये प्रवास करून थकवा येण्याऐवजी मला खूप ताजेतवाने वाटायला लागले होते. शरीरातील प्रत्येक स्नायूचा थकवा नाहीसा झालेला होता. मागील २२ तासात मी कसलीही हालचाल करत नव्हतो, फक्त त्या निमआराम सीटवर निपचित पडून राहिलो होतो. पण यामुळे माझा सर्व थकवा नाहीसा होईल असे मला बिलकुल वाटले नव्हते. दैनंदीन धावपळीमुळे शरीरात जाणवणारा थकवा कुठल्या कुठे गायब झाला होता. माझ्यासाठी हे अनपेक्षित होते. पुढच्या वेळेस मी वोल्वो स्लीपर क्लासने जायचे ठरवले आहे (जर रेल्वे बुकिंग मिळाले नाहीतर).

माझा मित्र अभि चेन्नईमध्ये माझी वाट पाहत थांबलेला होता. मग आम्ही एकत्र जेवण उरकले आणि ट्रायथलॉनचा विचार करू लागलो. श्रवणने बुक केलेली सर्व्हिस अपार्टमेंट खूपच छान होती. दिवसाला १५०० रुपयांमध्ये खूप चांगल्या सुविधा उपलब्ध होत्या. मी सायकलची जोडाजोड करायला घेतल्यावर अभिने मदतीचा हात पुढे केला. तो सायकल विक्रेता असल्यामुळे मी खोलून आणलेला मागच्या चाकाचा डिरेलर पुन्हा चाकावर बसवण्यासाठी त्याची खूप मोलाची मदत झाली. नाहीतर मला खूप शोधाशोध करून महत्प्रयास करावा लागला असता एवढे मात्र नक्की. सायकल जोडून झाल्यावर आम्ही गप्पा मारता बसलो त्यामुळे झोपायला उशिरा झाला.

आदल्या दिवशी:
सकाळचा नाष्टा उरकुन मी आणि अभि पोहण्याचे ठिकाण बघण्यासाठी जुन्या महाबलीपुरम रोडने सायकलवर निघालो. हो सायकलवरच, कारण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आणि एकच पर्याय असला की नखरे करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. स्विमिंगचे ठिकाण पाहून जरा धास्तीच वाटली. ज्या मार्गाने सायकल चालवायची होती आम्ही सायकल चालवायला तोच मार्ग निवडला होता. हायवेपासून ५ ते ६ किमीचा रस्ता खूपच भयानक वाटत होता. वाहनांची प्रचंड वर्दळ होती आणि त्यात भर म्हणजे असंख्य खड्डे होते. हे ५ किमी अंतर ट्रायथलॉनमध्ये चार वेळा ये-जा करावयाचे होते. असा रस्ता म्हणजे पुण्यामध्ये यावर सायकल चालवण्याचा विचारही मनात येणार नाही. पंक्चर होण्याची हमखास खात्री वाटत होती. पण आता काहीही पर्याय दिसत नव्हता. १८० किमी मधील हे २० किमी अंतर १ तासापेक्षा जास्त वेळ घेणार यात काहीही शंका उरलेली नव्हती. पोहण्याचे ठिकाण पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा रूमवर परत आलो. रूमवर आल्यावर आम्ही सायकल ठेवून दिल्या आणि जुन्या महाबलीपूरम रोडवर पायी फिरायला गेलो. चेन्नईमधील ऊन, वारा आणि दमट हवामान काय असते याची शरीराला ओळख करून द्यावयाची होती. पायी फिरताना आम्ही उसाचा रस, नारळाचे पाणी आणि चिकन तंदुरीचा आस्वाद घेतला. दुपारच्या वेळेस उन्हाचा जोर चांगलाच जाणवला.

इनडोअर कितीही सराव केलेला असला तरी शेवटी इव्हेंटमध्ये सर्व गोष्टी आऊटडोअरच करावयाच्या असतात. यासाठी चेन्नईच्या वातावरणाशी जुळवून घेणे खूप गरजेचे होते. या फेरफटक्यामुळे चेन्नईच्या वातावरणाशी आमची चांगलीच ओळख झाली. दुपारचे जेवण उरकल्यानंतर सर्व मित्रांशी संपर्क करायला सुरुवात केली. तोपर्यंत बेंगाळुरुचा श्रवण चेन्नईमध्ये दाखला झाला होता. पुण्यातील बरेच जण या ट्रायथलॉनमध्ये सहभागी झालेले होते. आम्ही सर्वजण एकत्र भेटलो आणि संध्याकाळी अग्नी कॉलेज कडे बीब घेण्यासाठी श्रवणच्या कारमध्ये रवाना झालो. स्वप्नील भोसले, वैभव रामतीर्थे, अभि लोंढे, श्रवण, मी आणि श्रवणचे दोन मित्र मंजुनाथ आणि शिव असे सर्वजण मिळून आम्ही अग्नी कॉलेजकडे गेलो. स्वप्नील आणि वैभव सायकलवर आले. चेन्नई ट्रेकिंग क्लबचे कार्यकर्ते हळूहळू जमा व्हायला लागले होते. आणि तेवढ्यात पीटरसुद्धा आला (खरंतर पीटर सर म्हणायला हवे पण हा व्यक्ती खूप अफलातून आहे). पीटरशी हस्तांदोलन करून माझी ओळख सांगितली आणि फुल ट्रायथलॉन आयोजित केल्याबद्दल खूप आभार मानले. तुमच्यामुळे माझे फुल ट्रायथलॉन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे असे आवर्जून सांगितले. परदेशात जाणे सध्यातरी बजेटमध्ये बसणारे नव्हते. यावर पीटरने फक्त मंदस्मित दिले.

आता सच्चीदानंद स्वामी मला भेटायला येणार होते. पुण्यापासून हजारो मैल दूर असलेल्या चेन्नईमध्ये राहणारे सच्चीदानंद स्वामी माझे फेसबुकवरील मित्र होते. प्रत्यक्षात कधीही भेट झालेली नसताना जी आपुलकी आणि प्रेम या व्यक्तीने दिले ते शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. कोल्हापूरला हाफ ट्रायथलॉन करताना यांचे धाकटे बंधू शिवानंद स्वामी यांची भेट झाली होती, शिवानंद स्वामी सुद्धा एक अवलिया आहे. आणि आता चेन्नईमध्ये फुल ट्रायथलॉन करताना थोरले बंधू सच्चीदानंद स्वामी माझ्यासोबत असणार होते. या दोघा भावांसोबत माझे काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असावेत त्याशिवाय हे होणे शक्य नाही. सच्चीदानंद स्वामींनी चेन्नईच्या वातावरणाची खूप आपुलकीने माहिती दिली. फुल ट्रायथलॉन करताना कोणतीही अडचण येऊ नये हाच त्यांचा उद्देश होता. नारळाचे पाणी आणि खोबरे अवश्य खा असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. स्वामींचा निरोप घेतल्यानंतर मी ट्रायथलॉनच्या तयारीला लागलो. 

सोबत आणलेले सर्व साहित्य नजरेखालून काढले. जेल, मिठाच्या कॅप्सूल्स, पीनट बटर, गॅटॉरेड असा सर्व लवाजमा सॅकमध्ये भरला. मी अजूनही ट्रायसूट घेतलेला नसल्यामुळे तिन्ही प्रकारांमध्ये घालण्यासाठी मी तीन प्रकारचे कपडे घेतले. पोहण्यासाठी शॉर्ट, गॉगल, ईअर प्लग, इ. घेतले. सायकलिंगसाठी जर्सी, बिब शॉर्ट, हेल्मेट, गॉगल, क्लिटचे शूज, ग्लोव्हज, सिपर बॉटल, छोटा पंप, दोन ज्यादा ट्यूब्ज, पंक्चरचे साहित्य आणि पाठीला लावायचा १ लिटर हायड्रेशन पॅक घेतला. रनिंगसाठी शॉर्ट, शुज आणि टोपी. स्विमिंगसाठी स्टॉपवॉच, सायकलिंगसाठी जीपीएस आणि रनिंगसाठी स्ट्रावा वापरणार होतो. मॅंगेनेचा चेस्ट स्ट्रॅप हार्ट रेट मॉनिटर सुद्धा लावणार होतो. माझ्याकडे अजुन गारमीन आलेले नाही माझे चंचल मन सारखे गारमीन गारमीन करत असते त्यामुळे ते घेतल्याशिवाय मोक्ष मिळेल असे वाटत नाही.  

बिब नंबरः
जुन्या महाबलीपूरम रोडपासुन ५ ते ६ किमी अंतरावर अग्नी कॉलेज आहे. महाबलीपूरमकडे जाताना उजवीकडे वळावे लागते. ट्रायथलॉनच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सहानंतर अग्नि कॉलेजमधे बिब मिळतो. गुडी वगैरेचा महागडा शौक इतर थाटमाट इथे औषधालाही पाहायला मिळणार नाही. "साधी व्यवस्था उच्च ट्रायथलॉन" (साधा जीवन उच्च विचार या म्हणीप्रमाणे). संयोजकांशी संपर्क केल्यास या कॉलेजमध्ये रात्री झोपण्याची व्यवस्था होऊ शकते. फुल डिस्टन्स वाल्यांचे टी-शर्ट उद्या सकाळी पोहण्याच्या ठिकाणी मिळतील असे सांगण्यात आले.

तिथे आदल्या दिवशी सायकल वगैरे जमा करून घेतली जात नाही. पहाटे ट्रायथलॉनला येताना सायकल बरोबर घेऊन यावे लागते आणि ती उघडया मैदानावर आडवी पाडून ठेवावी लागते. स्विमिंगला जाताना ट्रायथलॉनचे साहित्य एका बॅगमध्ये भरून ती बॅग तेथील स्वयंसेवकांकडे जमा करावी लागते. स्विमिंग उरकल्यानंतर ती बॅग पुन्हा आपल्याला मिळते. बॅगेतून सायकलिंगचे साहित्य घेऊन झाले कि ती बॅग पुन्हा तेथील संयोजकांकडे जमा करावी लागते. सायकलिंगची सुरुवात आणि शेवट वेगवेगळ्या ठिकाणी होतो. आपण जमा केलेली बॅग सायकलिंग जिथे संपणार असते तिथे पोचवली जाते. यामध्ये कसलीही चूक होत नाही. बॅगवर आपला बिब नंबर लिहलेला असतो. बॅगेवर नाव लिहुन ठेवल्यास तेथील गर्दीमध्ये आपली बॅग चटकन सापडु शकते.

ट्रायथलॉनच्या दिवशीः
आज १६ डिसेंबर, माझ्या लग्नाचा १९वा वाढदिवस. खरंतर सौ. ला घेऊन कुठेतरी रम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा दिवस. पण ते सोडुन मी या ट्रायथलॉनच्या प्रेमात पडलो होतो. या लग्नाच्या वाढदिवशी सौ. ने ट्रायथलॉन करण्यासाठी चेन्नईला जाण्याची परवानगी दिली यातच तिचा खुप मोठेपणा होता. काही झाले तरी हि ट्रायथलॉन पुर्ण करायचीच आणि या ट्रायथलॉनचे फिनीशर मेडल सौ. ला सप्रेम भेट द्यायचे असे मी मनोमन ठरवले होते.

भल्या पहाटे मी आणि अभि ट्रायथलॉनच्या साहित्याने भरलेली सॅक पाठीला लावुन सायकलवर निघालो. सायकल चालवत चालवत जेव्हा ट्रायथलॉनच्या ठिकाणी पोचलो तेव्हा त्या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप आलेले होते. ट्रायथॅलीटची जत्रा भरलेली होती. काल तर चिटपाखरू नजरेस पडले नाही आणि आज अचानक एवढे लोक आले कुठुन? हा प्रश्न मला पडल्यावाचून राहिला नाही. एक स्वयंसेवक सर्वांना आवश्यक सूचना सांगत होता. त्याच्या हातातील गार्मींनचे घड्याळ पाहुनच वाटले की हा निष्णात ट्रायथलीट असणार. त्या सर्व सुचना मी व्यवस्थित ऐकुन घेतल्या आणि त्यांचे अनुसरण केले. काल पीटरने सांगितल्याप्रमाणे सकाळी आल्या आल्या पहिला फुल आयर्न ट्रायथलॉनचा टी-शर्ट घेतला आणि सॅकमध्ये कोंबला. हि ट्रायथलॉन मी पुर्ण करेल की नाही याची मलाच खात्री नव्हती पण पैसे दिलेले असल्यामुळे मी तो टी-शर्ट पहीला घेतला. सायकल पार्क करण्यासाठी कसलाही थाटमाट नव्हता. सर्वांबरोबर मी सुद्धा माझी सायकल एका रांगेत गवतावर आडवी पाडून ठेवली. हेल्मेट सायकलला बांधून ठेवले. आजूबाजूला काय आहे हे पहाटे अंधारात काही कळले नाही पण जेव्हा उजेडात पाहीले तेव्हा कळले की बाजुलाच कब्रस्तान आहे. बाब्बोव! बरे झाले पोहण्याच्या अगोदर हे कळले नाही.

सॅकमध्ये रनिंगचे आणि सायकलिंगचे साहित्य वेगवेगळ्या बॅगेत ठेवले होते नाहीतर माझ्या वेंधळ्या स्वभावामुळे शोधाशोध करण्यात वेळ गेला असता. पोहून झाल्यावर पोहण्याचे साहित्य ठेवण्यासाठी एक रिकामी बॅगसुद्धा ठेवली होती. यावेळेस सायकलिंगचा स्वतंत्र शुज आणि रनिंगचाही स्वतंत्र शुज होता. माझ्या कोचच्या सल्ल्यानुसार मी पळण्यासाठी नायकेचा (विनफ्लो ३) शूज घेतला होता आणि कोचनेही न केलेले धाडस करून सायकलिंगचा शुजही (क्लिट) घेतला होता. त्यामुळे माझ्यासाठी हि ट्रायथलॉन म्हणजे एकदम राजेशाही थाट होता. सॅक काउंटरला जमा केली आणि पाण्यात उडी मारण्यासाठी सज्ज झालो. नितीन घोरपडे म्हणाले की हि आपली बीआरएमसारखी ट्रायथलॉन आहे "सेल्फ सपोर्टेड". तुम्ही जे युट्युबवर वगैरे फुल ट्रायथलॉनचे परदेशातील व्हिडीओ पाहिले असतील तर ते डोक्यातून पहिले काढून टाका. हा आपला मेड इन इंडीयाचा फंडा काही औरच आहे.

ट्रायथलॉनला सुरुवात करताना देवाला एकच प्रार्थना केली, "पांडुरंगा, एवढ्या वेळेस सांभाळून घे बाबा" आणि भगवद्गीतेतील चार श्लोक मनातल्या मनात उच्चारले. फुल ट्रायथलॉन करणारांचे खूप फोटो काढण्यात आले. फोटो काढत असताना मी फ्रँकॉईसशी ओळख करून घेतली पण बोलताना आम्हा दोघांनाही भाषेची समस्या जाणवली. माझं तोडकं मोडकं इंग्रजी त्याला कळत नव्हते आणि त्याचे अस्सल इंग्लिश (का त्याची मातृभाषाही इंग्रजी नव्हती कोणास ठाऊक?) उच्चार माझ्या डोक्यावरून जात होते. पण फ्रँकॉईस आपला दोस्त झाला एवढे नक्की. पोहण्याविषयी सांगितलेल्या सर्व सूचना व्यवस्थित ऐकल्यानंतर आम्ही पोहण्याच्या ठिकाणाकडे निघालो.

३.९ किमी पोहणे:
3.9 किलोमीटर पोहण्यासाठी इथे जुनी दगडाची खाण वापरली जाते. ही खोलवर पाण्याची खाण जवळजवळ दीडशे मीटर लांब आहे. याला एक फेरी पूर्ण केल्यास 300 मीटर अंतर पूर्ण होते आणि पूर्ण अंतर ट्रायथलॉन साठी या खाणीमध्ये 13 फेऱ्या माराव्या लागणार होत्या.

जेव्हा मी १८ तासाची कट ऑफ वेळ ऐकली होती तेव्हाच खरंतर मी निर्धास्त झालो होतो. यामध्ये स्विमिंगला वाट्टेल तेवढा वेळ लागला तरी माझे काहीही बिघडणार नव्हते. त्या पाण्यातून जिवंत बाहेर पडणे हा एकमेव एककलमी कार्यक्रम मी आखलेला होता. आणि त्यानंतर जो वेळ शिल्लक राहिल त्यात सायकलिंग आणि रनिंग पूर्ण करावयाचे असा प्लॅन केलेला होता. माझ्या आयुष्यात मी कधीही एवढे अंतर पोहुन पार केलेले नव्हते. ३.९ किमी पोहल्यानंतर माझे शरीर १८०किमी सायकल चालवायला आणि त्यानंतर ४२किमी धावायला कितपत साथ देईल याची काहीच खात्री देता येत नव्हती. मी पांडुरंगाचा धावा करत होतो. रामकृष्ण हरी मुखात उच्चारूनच पाण्यात सुर मारला. आता जे काही होईल ते त्याच्या ईच्छेनेच. "होई वो सही जो राम रचि राखा". पोहायला सुरुवात होण्याअगोदर त्या पाण्यात डुंबायला मिळाले. पाण्याच्या तापमानाशी शरीर समरस करून घेतले.

पहिली लॅप पूर्ण करायला मला साडेआठ मिनिटे लागली. प्रत्येक १५० मी नंतर घ्यावा लागणारा युटर्न खूप तापदायक वाटत होता आणि त्यात वेळही वाया जात होता. माझ्यासारख्या लिंबूटिंबू पोहणाऱ्यासाठी तर ती एक परीक्षाच होती. आणि प्रत्येक ३००मी अंतरानंतर बिब नंबर ओरडुन सांगावा लागत होता, त्यातही बराच वेळ जात असे. १० लॅप मी व्यवस्थित आणि अगदी आरामात पार केल्या पण शेवटच्या ३ लॅप कधी एकदा संपतील असे वाटत होते. डाव्या पायाच्या पोटरीमध्ये गोळा येतोय की काय असे वाटायला लागले तेव्हा मी दोरीला लटकून थोडा वेळ विश्रांती घेतली. हार्टरेट कमी झाल्यावर पुन्हा पोहायला सुरूवात केली. शेवटची लॅप सुरू केली तेव्हा मी खुप आनंदात होतो. आता पोहणे संपणार या विचारानेच मी खुप सुखावलो होतो.

एकदा शेवटचा बिब नंबर सांगितला एफ११६ आणि पाण्याच्या बाहेर आलो. स्टॉपवॉचमध्ये २ तास २६ मिनिटांची वेळ दिसत होती. तशी ही वेळ म्हणजे जरा जास्तच वाटत होती. पण ईथे स्विमिंग साठी कट ऑफ वेळ वगैरे काहीही नव्हते. याचा मला नक्कीच फायदा झाला. शरीरावर कोणताही अतिरिक्त ताण येऊ न देता बडे, आराम से स्विमिंग उरकले होते. पाण्यातुन बाहेर येऊन जमिनीवर पाय टेकवल्यावर मला स्थिर ऊभे राहता येत नव्हते. पडतोय की काय असे वाटल्यावर माझ्या एका मित्राने मला त्याच्या हाताचा आधार दिला. त्या आधाराने मी सावरलो. मंदगतीने चालत सायकलकडे निघालो. जाता जाता बॅगेज काऊंटरवर जमा केलेली सॅक घेतली. टॉवल लावुन सायकलचे कपडे परिधान केले. एक पीनट बटर, एक जेल आणि एक मीठाची कॅप्सुल घशाखाली उतरवली. हेल्मेट व गॉगल चढवला आणि हायड्रेशन पॅक पाठीला अडकवून सायकलिंगच्या मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज झालो. निघताना तेथे ठेवलेली केळी, मोसंबी, ओआरएस, चिक्की, कॅडबरी आणि पाणी यावर आडवा हात मारला आणि निघालो.

१८० किमी सायकलिंग:
पहिले पाच किलोमीटर अंतराचा रस्ता अतिशय खराब होता. सर्व रस्त्यावर खड्डेखुड्डे होते. एवढे खड्डे होते कि सायकलचे चाक व्यवस्थित जाईल असा एखादा तुकडा औषधाला सुद्धा सापडला नसता. यात भर म्हणून तेथे प्रचंड ट्रॅफिक होते. त्या अरुंद रस्त्यावर जेसीबी, बस, डंपर सतत ये-जा करता होते. त्यामुळे सायकल चालवणे हेच खूप अवघड झाले होते. वेगात सायकल चालवून वेळेमध्ये सुधार करण्याचा विचार मनात आणणे हा जणू एक गुन्हाच ठरला असता. पंक्चरबरोबर असलेली माझी जुनी सोयरीक पाहता मला असे वाटले की आता माझी सायकल नक्कीच पंक्चर होणार. परंतु सुदैवाने माझी सायकल पंक्चर झाली नाही. पुढे पाच किलोमीटर अंतर संपल्यानंतर उजवीकडे वळायचे होते. जुन्या महाबलीपुरम रोडने (OMR) सायकल चालवायची होती. त्या वळणावर एक कारवालीने मला अडथळा निर्माण केल्यामुळे अचानक ब्रेक दाबावा लागला आणि क्लिटचा कच्चा खेळाडू असल्यामुळे मी उजव्या बाजूला धाडकन पडलो. डांबरी रस्त्यावर गुडघा आपटला आणि छोटीशी जखम होऊन त्यातुन रक्त वाहू लागले. मस्त रक्तबंबाळ झालेल्या गुडघ्यातून आलेले रक्त पाहून माझी ट्रायथलॉन धोक्यात येते की काय असे मला वाटू लागले. ट्रायथलॉन तर मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नव्हतोच. गुडघ्यातून आलेल्या रक्तावर हातातील ग्लोव्जचा वायपर फिरवला आणि गुडघ्याकडे दुर्लक्ष करुन जुन्या महाबलीपूरम रोडवर सुसाट निघालो. मराठी मातीतील लढवय्यी वृत्ती अशा वेळी कामी येते.

तिथून पुढचे दहा किलोमीटर अंतर हे प्रचंड ट्रॅफिकचे होते. बस, रिक्षा, ट्रक आणि टू व्हीलर्स हे प्रचंड त्रास देत होते. 15 किलोमीटर अंतरापर्यंत सायकलच्या वेगाशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता आली नाही. जो मिळेल त्यात समाधान मानुन मार्गक्रमण चालु होते. इतर वाहनांच्या तावडीतून शिल्लक राहीलेल्या रोडवर कसेबसे क्लिट सांभाळत पेंडलवर पाय फिरवत होतो. तिथून पुढील रस्ता अतिशय चांगला होता. जोडीला वाराही वाहत होता परंतु हा वारा वेगाला अडथळा करणारा नव्हता. ४५ किमी अंतरापर्यंत (यु-टर्न) वाऱ्याचा कसलाही अडथळा झाला नाही. यु-टर्न आल्यानंतर तेथील स्वयंसेवकांनी माझा रक्तबंबाळ झालेला गुडघा पाहिला आणि मेडिकलमध्ये पळत जाऊन डेटॉलची बाटली आणली. गुडघ्याचे रक्त पुसून काढले आणि काही त्रास होतोय का? गुडघा दुखतो का? याची आपुलकीने चौकशी केली. गुडघा दुखो अथवा ना दुखो मला त्याचा काहीही फरक पडणार नव्हता. काहीही झाले तरी मी हि ट्रायथलॉन पुर्ण करणारच होतो. चेकपॉईंटवर असलेल्या सर्व खाद्यपदार्थांचा मी खरपुस आस्वाद घेतला, याच्या जोडीला माझ्याकडचे पीनट बटर सुद्धा खाल्ले आणि तिथून निघालो. 

परतीच्या प्रवासातले पहिले ५ किमी आनंदात गेले. ५ किमी नंतर असा काही वारा सुरु झाला की ज्याचे नाव तेच. माझ्या आयुष्यात मी कधीही एवढ्या वेगात वाहणाऱ्या वाऱ्यात सायकल चालवलेली नव्हती. महत्प्रयास करुनही सायकलचा वेग २०-२१ च्या वर नेता येत नव्हता. त्यात माझी हायब्रीड सायकल आणि एरो बारसुद्धा नव्हते त्यामुळे त्या वाऱ्याने माझी चांगलीच फजिती केली. पहिले ५ किमी खराब रस्त्यामुळे वेग घेता आला नाही, त्यानंतर १० किमी ट्रॅफिक, त्यानंतर ३० किमी सायकल पळवली, येताना सुरुवातीचे ५ किमी सोपे गेले, त्यानंतर ३० किमी रस्ता छान होता परंतु प्रचंड वारा, ५ किमी पुन्हा ट्रॅफिक आणि शेवटचे ५ किमी पुन्हा तो खराब रस्ता. असे ९० किमी अंतर पूर्ण झाल्यावर माझा सरासरी वेग २५ किमी/तास आलेला होता. मी स्वतःला शाबासकी देऊन घेतली. चेकपॉईंटवर नाव नोंदवले आणि पुन्हा याच मार्गावरून अजून एक फेरी मारण्यासाठी निघालो. आता कुठे मध्यांतर झाली होती. सायकलवरून हायवेकडे जाताना डॉ. श्रीकांत केत अग्नी कॉलेजजवळ दिसले तसेच सच्चीदानंद स्वामी सायकलवर ट्रायथलॉनच्या ठिकाणाकडे जात असलेले पहिले पण त्या दोघांना फक्त हात दाखवून मी पुढे जात राहिलो.

चेन्नईमधील उलट्या वाहणाऱ्या वाऱ्याविषयी यत्किंचितही कल्पना नव्हती. त्या घोंघावणाऱ्या वाऱ्याचा गनिमी कावा लक्षात येईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले होते. सराव करताना कात्रज बोगद्याचा चढ वरखाली केला आणि परीक्षेला उलटे वाहणारे आले. उलट्या दिशेने वाहणारा वारा हा अभ्यासक्रमाबाहेरील आलेला प्रश्न होता. पीटरही म्हणाला की आजचा वाहणारा वारा हा नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाहत आहे. हे ऐकून तर वाऱ्याचा आणखीनच राग आला. पण इथे क्रोध येऊन काहीही उपयोग नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये शांत डोक्याने वाऱ्यासमोर बचावात्मक पवित्रा घेत जो काही वेग मिळेल त्यात समाधान मानून सायकल चालवत राहीलो. गुडघ्याचे दुखणे मान वर काढायला लागले होते, परंतु त्याकडे जेवढे दुर्लक्ष करता येईल तेवढे दुर्लक्ष करत राहिलो.

प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात. तशी या वाऱ्याला सुद्धा दुसरी बाजू होती. वाऱ्याचा फायदा असा झाला की तेथील दमट हवामान आम्हाला बिलकुल जाणवले नाही. चला हे हि नसे थोडके...! सायकलिंग संपता-संपता मला औरंगाबादचे नितीन घोरपडे भेटले. माझ्या गुडघ्याच्या वेदनांना मी त्यांच्यासमोर वाचा फोडली. व्यक्त केल्याने दुःख कमी होते असे म्हणतात. तर कसले काय अन कसले काय ....नितीनभाऊ ६ ठिकाणी रक्तबंबाळ झालेले होते. जखमी असूनही ते जोमाने सायकल चालवत होते. हि त्यांची लढावू वृत्ती पाहून मलाही हुरूप आला आणि माझे गुडघ्याचे दुखणे मी पूर्णपणे विसरून गेलो. माझे मित्र सच्चिदानंद स्वामी यांच्या सल्ल्यानुसार मी चेन्नईमध्ये नारळाचे पाणी दोनदा पिलो आणि त्याचे खोबरे न विसरता खाल्ले. नितीन घोरपडे यांनाही मी नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला. चेन्नईमध्ये आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर त्या आवडलेल्या गोष्टीला दाद देण्यासाठी सुपर असे म्हणतात. आपल्याकडे जसे लय भारी, एक नंबर, एकदम कडक म्हणतो तसे चेन्नईमध्ये "सुप्पर" असे म्‍हणतात. नारळपाणी विकणाऱ्या मावशींनी सुप्पर नारळ दिले. सुप्पर शब्द ऐकल्यावर त्या मावशिंनी एक छोटा नारळ स्वखुशीने दिला.

सूर्यास्त होता होता मी चेकपॉईंटला पोचलो. तेथील संयोजकांना माझा बीब नंबर एफ११६ सांगून मी सायकलचा अक्षरशः त्याग केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला. त्या भयानक वाऱ्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटण्याचा आनंद काय वर्णू मी? माझे मित्र सच्चिदानंद स्वामी माझी वाट पाहत थांबलेले होते. वेगवेगळ्या पोजमध्ये माझे चार-पाच फोटो काढल्यानंतर त्यांनी माझ्या हातातील सायकल घेतली. माझे फोटो काढण्यासाठी त्यांनी खास त्यांचा कॅमेरा आणलेला होता. स्वामींनी मला जी काही मदत केली ती खरोखरच खुप मौल्यवान होती. आणि त्यामुळे माझा भार खूप हलका झाला. दोस्त असावा तर असा. पोहणे आणि सायकलिंग पुर्ण केल्यानंतर ४२ किमी धावण्यासाठी १८ तासातील ६ तास ४४ मिनिटे शिल्लक राहिलेली होती.

४२ किमी धावणे:
३.९ किमी पोहणे आणि त्यानंतर १८० किमी सायकल चालवायला ११ तास १६ मिनिटे लागलेली होती. उरलेल्या ६ तास ४४ मिनिटांमध्ये ४२ किमी अंतर धावायचे होते. ४०४ मिनिटे भागिले ४२ करून मी एका किलोमीटरसाठी माझ्याकडे उपलब्ध असलेला वेळ काढला. सर्व परीस्थिती आटोक्यात होती. पळायला सुरुवात करण्याअगोदर मी पोटात साठलेले पाणी (सुसु) बाहेर सोडण्यासाठी जागा शोधू लागलो. एवढी लघवीला लागली होती की एकेक पाऊल टाकतानासुद्धा पोटात दुखण्याचा त्रास व्हायला लागला होता. लघवीच्या रंगावरून अंदाज आला की माझी एवढी काही वाट लागलेली नाहीये. हलका झाल्यावर सुरुवातीचे २ किमी अंतर मी चालत चालतच पार केले. कारण पायाचा एकुणेक स्नायु असह्य वेदनांनी ग्रस्त झालेला होता. १५ ते २० मिनिटांनंतर एकेक स्नायु प्रतिसाद यायला लागला. सर्वांचा होकार आल्यावरच मी धावायला लागलो.

५ किमीची पहिली फेरी पुर्ण केल्यावर माझा मित्र अभि लोंढे भेटला (अभी नही तो कभी नही). सकाळी पाण्यात उडी मारल्यानंतर जी आमची ताटातुट झाली त्यांनतर ही दुसरी भेट. सायकलवर क्रॉस झालो तेव्हा एकमेकांना हात दाखवला होता त्यानंतर ही झालेली भेट म्हणजे एकदम गळाभेट. दोघेही खुश होतो कारण दोघांचेही फुल आयर्न ट्रायथलॉन करण्याचे स्वप्न पुर्ण होणार होते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या मोहिमेवर निघालो. अजूनही सर्व परीस्थिती आटोक्यात होती. पळताना मी नेहमी गुणाकार भागाकार करून वेळेची सांगड घालत होतो. आता एवढे किलोमीटर झाले, एवढे शिल्लक राहीले, किती वेळ लागेल? किती वेळ शिल्लक आहे? याचा सतत आराखडा मांडत होतो. रनिंग करण्यासाठी स्वतंत्र शुज घेतला तो एक फारच चांगला निर्णय ठरला. कारण नायके विनफ्लो पायात घालुन पळताना त्या खरबुड्या रस्त्यांचे खड्डेखुड्डे बिलकुल जाणवले नाहीत. २१ किमी पूर्ण झाले. 

१० किमीची तिसरी फेरी चालू करताना सच्चिदानंद स्वामी स्वतः पुढाकार घेऊन सायकलवर माझ्या बरोबर निघाले. मला पेसींग करण्यासाठी. माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था त्यांनी अचूक हेरली. त्यावेळी मला काहीही सुचत नव्हते. कोणताही निर्णय घ्यावा कि न घ्यावा अशी परिस्थिती होती. हॉस्पीटलमध्ये आलेला पेशन्ट जसा असहाय्य असतो तशी माझी अवस्था होती. डॉक्टरच काय तो योग्य निर्णय घेऊ शकतात त्याप्रमाणे सच्ची स्वामी माझ्या मदतीला धावून आले. त्यामुळे त्यांचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. पळण्याच्या रस्त्यावर काही ठिकाणी एकदम अंधार बुडुक होता त्यामुळे मोबाइलची टॉर्च हातामध्ये धरून पळावे लागत होते. खरे सांगतो त्या अवस्थेत मोबाईल हातात धरून पळण्यासारख्या दुसऱ्या कोणत्याही वेदना नव्हत्या. मी अधूनमधून हाताची अदलाबदली करत होतो कधी डाव्या हातात तर कधी उजव्या हातात मोबाईल पकडत होतो.

काही ठिकाणी भटकी कुत्री मागे लागत होती आणि त्यांच्या भुंकण्याच्या प्रचंड त्रास होत होता. काही ठिकाणी गायींचा कळप रस्त्यावर सभा भरल्यासारखा बसलेला असायचा. त्याच्यातून रस्ता शोधणे प्रचंड अवघड जात होते. दर अडीच किलोमीटर नंतर येणारा चेकपॉईंट प्रत्येक वेळेस नवसंजीवनी देत होता. १० किमीच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर पोटऱ्या आणि मांड्यांवर वर रिलीफ स्प्रे भसाभसा मारला. त्यामुळे मांड्यांच्या वेदना खरोखर थोड्या कमी झाल्या. एका ट्रायथलीटच्या मागे लागलेली कुत्र्यांची फौज पाहून मला खूप भितीही वाटली आणि खूप हसूही येत होते. भीती वाटली कारण ही कुत्री जर माझ्या मागे लागली तर माझीही तीच अवस्था होणार होती.

पुण्यातील वातावरणामध्ये किंवा रस्त्यांवर केलेला सराव हा चेन्नईमध्ये ट्रायथलॉन करण्यासाठी उपयोगी पडत नाही. आमचे नशिब चांगले म्हणावे लागेल की काय कोणास ठाऊक धावताना हवा चांगली वाहत होती. सच्चिदानंद स्वामी यांनी शेवटचे 21 किलोमीटर माझ्याबरोबर सायकल चालवली आणि वेळोवेळी माझा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. मी थकलेला असताना... मला असह्य वेदना होत असताना त्यांनी जो शाब्दिक आणि नैतिक आधार मला दिला त्याला जगात कुठेही तोड नाही. धावताना माझ्यासाठी हृदयाचे ठोके जास्त महत्वाचे होतेे. ते १४० पर्यंत गेले की मी चालायला सुरुवात करायचो आणि खाली ११० पर्यंत आले की पुन्हा धावायला लागायचो. शेवटचे ५ किमी अंतर पुर्ण करण्यासाठी ज्या यातना भोगल्या ते लिहण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

फुल आयर्न ट्रायथलॉन पुर्ण केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी सुद्धा माझ्या शरीरात अवसान शिल्लक राहीलेले नव्हते. सलग १७ तास आणि ४४ मिनिटांत मी चेन्नई फुल आयर्न ट्रायथलॉन पुर्ण केली. ट्रायथलॉनचे मेडल घेतल्यानंतर कॅमेऱ्यासमोर पोज द्यायलासुद्धा सुधरत नव्हते. कसाबसा स्वतःला सावरत स्वामींच्या कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो. जिंदगीची हाड्याहाड्या करून घेतली होती. आयुष्यात पुन्हा ट्रायथलॉनमध्ये भाग घेशील का? असा प्रश्न जर कोणी त्यावेळेस विचारला असता तर त्याचे उत्तर मी बिलकुल घेणार नाही असेच दिले असते. "भाडमे जाये ट्रायथलॉन"... आणि घ्यायचाच नाही असे मनोमन ठरवले. केवढी हि दुरावस्था?? त्या परिस्थितीतही सच्चिदानंद स्वामींनी फिनिशर मेडल सोबत माझे फोटो काढले आणि नंतर मला ईमेलवर पाठवले. 

रूमवर पोचलेला श्रवण आम्हाला नेण्यासाठी कार घेऊन पुन्हा माघारी आला. खुप बरे वाटले. देव तुझे भले करो श्रवण. श्रवणनेच आमच्या सायकल कारच्या हुकला अडकवल्या आणि आम्ही कारमध्ये आरामशीर बसून हॉटेलवर पोचलो. श्रवण आणि त्याच्या मित्राचे मनःपुर्वक आभार. रूमवर पोचल्यावर मी मस्त अंघोळ केली. दिवसभर घामाने भिजलेल्या शरीरावर मीठाचे पांढरे थर तयार झाले होते. शरीर हे मीठाचे बनलेले असते या वाक्याशी मी पुर्ण सहमत झालो. आंघोळ केल्यावर जरा ताजेतवाने वाटायला लागले. मग जरा मोबाईलवर रमलो. सौ. ला मेसेज टाकला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. आनंदाने उल्हासित झालेल्या मन आणि शरीराला प्रचंड दमछाक होऊनही खुप वेळ झोप आली नाही. थोडा वेळ मनिष नांबियार बरोबर बोललो. त्याचे कौतुकाचे शब्द ऐकून फार बरे वाटले.

अशा रीतीने मी मेड इन इंडीया Full Iron triathlon फिनिशर झालो.

दुसऱ्या दिवशी हॉटेल रूमवर श्रवण आणि अभिच्या पायांना लाटणे मसाज करून दिले. दुखऱ्या पायांच्या मांडया आणि पोटऱ्या लाटण्याच्या त्या अलगद स्पर्शाने नक्कीच सुखावल्या असतील. परंतु अशा प्रकारचे मसाज हे फक्त अशा इव्हेंटच्या वेळेसच मिळेल याची नोंद घ्यावी.

परतीचा प्रवासः
बेंगळुर पर्यंतचा परतीचा प्रवास मी श्रवणच्या कारमध्ये त्याच्या दोन मित्रांसोबत केला. आता ते माझेही मित्र झाले आहेत. चेन्नई ते बेंगळुरू हायवेवर बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबूर येथील स्टार बिर्याणी हॉटेलमध्ये मस्त बिर्याणीवर ताव मारला. आम्ही चारपैकी दोघे शाकाहारी आणि दोघे मांसाहारी होतो. संध्याकाळी श्रवणने त्याच्या घरी माझा खूप छान पाहुणचार केला. भवानी वहिनींच्या हातचा रस्समचा अस्सल स्वाद खरंच खुप छान होता. श्रवणने मला बस स्टॅन्डपर्यंत जाण्यासाठी ओला कार बुक करून दिली आणि मी त्याच्या पाहुणचाराचा निरोप घेतला. बेंगाळुरु ते पुणे वोल्वो प्रवास अतिशय उत्तम झाला.

सोशल मिडिया:
रिक्रीएशनल ट्रायथलीट या व्हाटसअप ग्रुपचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अनिरबन मुखर्जी, कौस्तुभ राडकर, आदित्य केळकर, अतुल गोडबोले, झरीर बल्लीवाला, शारदा कुलकर्णी, विशी उपाध्याय आणि महाराष्ट्रातील इतर सर्व आयर्नमॅन व्यक्तींचे शतशः आभार. तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन असेच वेळोवेळी लाभत राहो.
तसेच इंस्टाग्रामवर ट्रायथलॉन करतानाचे सुंदर आणि आकर्षक फोटो टाकुन उत्साह वाढवणाऱ्या सर्व पाश्चिमात्य ललनांचे सुद्धा आभार. मला कशातून प्रेरणा मिळेल याचा काही नेम नाही. आणि फेसबुकवरील मित्रांना तर विसरूच शकत नाही. त्यांच्यासाठी मला एक गाणे म्हणावेसे वाटत आहे,
"एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो"
एवढा मोठा लेख वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद .


























#triathlon #triathlete #trilife #Chennai #Chennaitriathlon #swimbikerun #swim #bike #run #Full #FullIron #FullTriathlon #Iron


1 comment:

  1. Congratulations viju sir tumachya mule ironman Kay ast te tari samjal

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...