Wednesday, 9 January 2019

माझा होम ट्रेनर

माझा होम ट्रेनर

      ट्रायथलॉनवाल्यांच्या नादाला लागुन सरतेशेवटी मीसुद्धा एक होम ट्रेनर विकत घेतला. आता ट्रायथलॉनसारखा महागडा शौक पाळायचा म्हणजे खर्च तर होणारच. सस्ती चीजोंका शौक हम नहीं रखते वगैरे डायलॉग सिनेमात शोभुन दिसतात परंतु प्रत्यक्ष जीवनात खर्च करताना खिशाला काय परवडतंय हा विचार सर्वप्रथम करावा लागतो. मोर नाचला म्हणुन लांडोर नाचवण्यात काही अर्थ नसतो. म्हणुन मी खिशाला परवडेल असा एक साधासुधा जपानच्या कंपनीचा होम ट्रेनर विकत घेतला. माझ्या ट्रेनरला चार पाय, पाच गियर. एक रोलर, चाकाला मगरमिठी मारणारे दोन जबडे, एक लांबलचक वायर आणि तिला जोडलेला एक नॉब आहे. या नॉबने रोलरचे फ्रिक्शन कमी-जास्त करता येते. त्याचा रंग काळा आहे म्हणजे त्याला कोणाची नजर लागण्याचा प्रश्नच नाही. त्यावर “मेड इन जपान” लिहण्याऐवजी प्रत्यक्ष जपानचा छोटासा झेंडाच छापलेला आहे. तर असा आहे माझा होम ट्रेनर. माझा होम ट्रेनर मला फार आवडतो. माझ्या होम ट्रेनरवर माझे खुप प्रेम आहे आणि होम ट्रेनरवर सायकल चालवण्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. ज्यादिवशी मी ट्रेनर घेतला त्यादिवशी कामाला मी चक्क दांडी मारली. ट्रेनर सकाळी घेतला आणि मला दुपारी कामाला जायचे होते. मी जेव्हा ट्रेनरची सर्व जोडाजोड केली तेव्हा त्याच्यावर राईड करण्याचा मोह मला आवरता आला नाही. घरात ट्रेनर आला आणि त्याच्यावर राईड करायचे सोडुन कामाला जाणे माझ्या जीवावर आले. मारते है ना दांडी यार...असे म्हणत मी त्यादिवशी रजा घेतली. एखादी नाविन्यपुर्ण आणि त्यातल्या त्यात हवीहवीशी वाटणारी वस्तु घरात आली की तिला सर्व प्रकारे हाताळुन पाहील्याखेरीज आणि तिचा सर्व प्रकारे उपभोग घेऊन ती सांगितल्याप्रमाणे आहे की नाही हे पाहण्याची मला फार हौस असते आणि ते पाहील्याशिवाय मला चैनही पडत नाही. मीच काय मला वाटते प्रत्येक व्यक्तीला असेच वाटत असावे.

      ट्रायथलॉनसाठी होम ट्रेनर घेऊन आता जवळजवळ नऊ महीने झालेले आहेत. याचे फायदे तोटे मी बऱ्यापैकी अनुभवत आहे तर या अनुभवावरुन माझ्याकडे असलेल्या ट्रेनरविषयी लिहण्याचा हा खटाटोप करत आहे जेणेकरुन माझ्या सायकल चालवणाऱ्या मित्रांचे होम ट्रेनरविषयीचे औत्सुक्य कमी होण्यास मदत होईल.

होम ट्रेनर कोणी घ्यावा?

      होम ट्रेनर कोणी घ्यावा हा खरंच खुप महत्वाचा आणि तेवढाच क्लिष्ट प्रश्न आहे. ज्यांना कॅडेन्समध्ये सुधार करावयाचा आहे, ज्यांना चढावर सायकल चालवण्याचा वेग वाढवावयाचा आहे, ज्यांनी कोचला पैसे भरलेले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सायकल चालवायला जायला वेळ मिळत नाही, वातावरणातील बदल आणि ईतर परीस्थितीमुळे रस्त्यावर सायकल चालवायला जाणे शक्य होत नाही (उदा. बर्फ पडला, पाऊस पडतोय, शहराजवळच्या रस्त्यांवर होणारी वाहतुक कोंडी ईत्यादी) आणि सायकलचा वर्कआऊट करणे तर अपरीहार्य आहे अशा वेळी ट्रेनर कामास येतो. आणि खासकरुन आयर्नमॅन किंवा ट्रायथलॉनमध्ये नाव नोंदवलेल्यांना याचा खास उपयोग होतो. जेव्हा सायकलिंग पाठोपाठ लगेच रनिंगचा सराव करावयाचा असतो तेव्हा ट्रेनर हा उत्तम पर्याय आहे. ट्रायथलॉन ही होम ट्रेनरची खासियत. ज्यांनी नुकतेच सायकलिंग सुरु केलेले आहे अशांनी होम ट्रेनरच्या भानगडीत पडु नये. होम ट्रेनर हा सायकलिंगमधील दहावी नंतरचा अभ्यासक्रम आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याची किंमत जवळजवळ एका साध्या सायकल एवढीच असते आणि एखादी सायकल ट्रेनरला जोडल्याशिवाय त्याचा वापरही करता येत नाही. होम ट्रेनरची किंमत दहा-बारा हजारांपासुन ते काही लाखांपर्यंत असते.

ट्रेनरचे प्रकार 

      सर्वप्रथम आपण होम ट्रेनरचे प्रकार पाहु या. होम ट्रेनरचे तीन प्रकार असतात. डायरेक्ट ड्राईव्ह, रोलर ट्रेनर आणि फ्रिक्शन ट्रेनर (मॅग्नेटीक किंवा फ्लड).  पहील्या प्रकारातील डायरेक्ट ड्राईव्ह ट्रेनर हा डायरेक्ट सायकलच्या मागच्या चाकाची जागा घेतो त्यामुळे या ट्रेनरवर सायकल चालवताना मागचे चाक काढुन ठेवावे लागते. मागच्या चाकाचा वापर होत नसल्यामुळे टायर वगैरे बदलण्याचा आणि खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. हा ट्रेनर सर्वात महागडा असतो, म्हणजे एखादया रोडबाईकला साजेशी याची किंमत असते. याच्यातील सुविधाही तेवढयाच दर्जेदार असतात. सध्या फॉर्मात असलेले झ्विफ़्ट (Zwift ऑनलाईन सायकल चालवण्याचे एप्लीकेशन) वापरुन सायकल राईड करावयाची असेल तर हा डायरेक्ट ड्राईव्ह ट्रेनर उपयोगी पडतो. एखादया राईडमधील चढ-उतार आणि त्या रस्त्याची जशीच्या तशी आभासी प्रतिकृती तयार करुन आपल्या पायांना प्रत्यक्ष त्या रोडवर सायकल चालवण्याचा अनुभव घरच्या घरी सायकल चालवुन देता येऊ शकतो. एखादया चढावर जाणवणारा ताण जसाच्या तसा घरच्या घरी सायकल चालवुन अनुभवायला मिळणे ही एक पर्वणीच आहे. थोडक्यात जर तुम्हाला सिंहगडावर सायकल चालवायची असेल तर सायकल घेऊन सिंहगडावर जाण्याची आवश्यकता नाही. झ्विफ्ट आणि या डायरेक्ट ड्राईव्ह ट्रेनरच्या सहाय्याने आपण घरच्या घरी सिंहगडावर सायकल चालवण्याचा आनंद लुटु शकतो. तसेच आपल्या मित्रांबरोबर शर्यतही लावु शकतो अर्थातच त्यांच्याकडे सुद्धा डायरेक्ट ड्राईव्ह ट्रेनर आणि झ्विफ्ट एप्लीकेशनचे सभासदत्व असायला हवे. या झ्विफ्ट ऑनलाईन एप्लीकेशनची सभासद वर्गणी दर महीन्याला दहा अमेरीकन डॉलर एवढी आहे (सध्यातरी).

      दुसरा प्रकार म्हणजे रोलर ट्रेनर. या रोलर ट्रेनरवर सायकलच्या चाकांना रोलरच्या सहाय्याने गती मिळते. सायकल एका जागेवर स्थिर असली तरी ती अधांतरी असते (सायकलला कोणताही आधार दिलेला नसतो). सायकल अधांतरी असल्यामुळे या ट्रेनरवर सायकल चालवताना थोडीशी जरी चुक झाली तरी अपघात होण्याची शक्यता असते. तळ्यात मळ्यात हातपाय गळ्यात. डायरेक्ट ड्राईव्ह आणि फ्रिक्शन ट्रेनरमध्ये सायकलवरुन पडण्याचा धोका नसतो कारण सायकल ट्रेनरला घट्ट बांधलेली असते आणि फक्त चाके फिरत असतात. रोडवर सायकल चालवताना जेवढे दक्ष रहावे लागते तेवढीच दक्षता रोलर ट्रेनरवर सायकल चालवताना घ्यावी लागते. रोलर ट्रेनरवर चढावर सायकल चालवण्याचा सराव करता येत नाही हा एवढा एकच मुद्दा बाजुला ठेवला तर सायकल चालवण्याचा खराखुरा आनंद हा रोलर ट्रेनरच देऊ शकतो.

      तिसरा प्रकार फ्रिक्शन ट्रेनर यामध्ये मॅग्नेटीक आणि फ्लड असे दोन प्रकार आहेत. जास्त वेळ वापर केला तर फ्रिक्शन ट्रेनरचा रोलर गरम व्हायला सुरुवात होते. गरम झालेल्या रोलरवर टायरचे घर्षण झाल्याने तो पटापट उगळायला सुरुवात होते. फ्रिक्शन ट्रेनरमध्ये हि समस्या नको असेल तर फ्लड असलेला ट्रेनर घ्यावा. सतत वापर करत राहीले तरीही घर्षणामुळे गरम होणारा रोलर फ्लडमुळे थंड राहतो.
  
ट्रेनरचा टायर (फ्रिक्शन)

      रोडबाईकचे नियमित वापरातील टायर ट्रेनरवर वापरल्यास त्यांची लवकर झीज होते आणि टायर बदलावा लागतो अशी ऐकीव माहीती मिळाल्यामुळे (मी हा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला नाही) मी परदेशातील महागडे टायर ट्रेनरवर वापरण्याचा मुर्खपणा करण्याचे टाळले. ट्रेनरवर भारतीय बनावटीचा नायलॉन टायर वापरावा ही सुपीक कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी ती लगेच अमलात आणली. रोडबाईकसाठी भारतीय बनावटीचा टायर म्हटले की एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे जीआरएल (गोविंद रबर्स लिमिटेड). ट्रेनरवर जीआरएल टायर वापरण्याची कल्पना अफलातुन यशस्वी झाली अफलातुन म्हणजे एवढी अफलातुन की मी घराबाहेर राईडला जातानासुद्धा त्याच टायरवर राईडला जायचो. पंढरपुर सायकलवारीला जाताना मी ट्रेनरवरील सायकल जशीच तशी घेऊन गेलो होतो आणि पंढरपुरवरुन आल्यावर टायर स्वच्छ करुन पुन्हा तशीच होम ट्रेनरला जोडली. ट्रेनरवर वापरायला लागल्यापासुन मला एकदाही टायर बदलावा लागलेला नाही. रोडबाईकला वापरुन झालेले जुने टायर ट्रेनरवर वापरण्यास काय हरकत आहे? असा एक जिज्ञासापुर्वक प्रश्न माझ्या मेंदुमध्ये आलेला आहे आणि याची अंमलबजावणी येत्या काळात होईलच यात काहीही शंका नाही. भारतीय बनावटीचे टायर हे होम ट्रेनरसाठीच बनवलेले आहेत, टायर खराब होण्याच्या चिंतेपेक्षा मला ट्रेनरचा रोलर खराब होतो की काय अशी भिती वाटायला लागली आहे.

होम ट्रेनर आणि प्रत्यक्ष रोड सायकलिंगमधील फायदे-तोटे

      प्रत्यक्ष रोडवर सायकल चालवणे आणि होम ट्रेनरवर सायकल चालवणे यामध्ये जमिन आसमानचा फरक आहे. प्रत्यक्ष रोडवर सायकल चालवताना एकसारखा रोड कधीच नसतो कधी चढ-उतार येतील तर रस्ता कधी एकदम सपाट असतो, वारा कधी उलटा वाहील तर कधी सुलटा, अधुन-मधुन ब्रेक दाबावा लागेल, खड्डे-खुड्डे चुकवावे लागतील, नजर कायम समोर (चूकीच्या दिशेने येणाऱ्या महान लोकांसाठी) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पंक्चरची तलवार कायम लटकत राहते. याच्या अगदी उलट परीस्थिती होम ट्रेनरवर सायकल चालवताना असते. उलटया-सुलटया वाऱ्याचा प्रश्नच नसतो (आपण फॅन लावला तरच वारा वाहतो), पंक्चरची भिती नसते, ब्रेक दाबावा लागत नाही, सायकलचा आणि आपला तोल सांभाळत पॅडल मारावे लागत नाहीत, चढ घ्यायचा की उतार हे पुर्णपणे आपल्या मनावर अवलंबुन असते आणि डोळे बंद करुनही आपण सायकल चालवु शकतो कारण समोरुन किंवा आजुबाजुने कुणीही येण्याची सुतराम शक्यता नसते. ट्रेनरवर सायकल चालवताना करमणुकीच्या साधनांचा पुरेपुर वापर करुन घेता येऊ शकतो, जो आपल्याला सुरक्षेच्या कारणामुळे रोडवर सायकल चालवताना घेता येत नाही. आपण सिनेमा पाहु शकतो, गाणी ऐकु शकतो, युटयुबवरील स्पिनिंग किंवा ट्रेनरचे व्हिडीओ पाहुन त्याप्रमाणे पॅडलवर पाय फिरवु शकतो, तुम्ही पीटर सगानचे चाहते असाल तर त्याचे व्हिडीओ पाहु शकता तसेच क्रिकेटचा लाईव सामना कुठे चालु असेल तर ट्रेनरवर सायकल चालवायला अजुन मजा वाटते. थोडक्यात वाटटेल ते करता येऊ शकते.

होम ट्रेनर सायकलिंगमधील उणिवा

      माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की घरामध्ये होम ट्रेनरवर सायकल चालवताना मला खुप म्हणजे प्रचंड घाम येतो आणि उकाडाही प्रचंड जाणवतो. या एकाच कारणामुळे मला होम ट्रेनरवर सायकल चालवायला फारसा उत्साह वाटत नाही. छतावर आणि जमिनीवर असे दोन-दोन पंखे एकावेळेस चालु ठेवले तरीही येणारा घाम काही कमी होत नाही.  

      आपण एकटेच सायकल चालवत असल्यामुळे एकटेपणा जाणवतो. रस्त्यावर सायकल चालवताना मित्रांशी गप्पा मारणे तसेच राँग साईडने येणाऱ्यांवर तोंडसुख घेण्याची मजाच वेगळी असते ती मजा घरामध्ये सायकल चालवताना येत नाही. सायकलवर बसल्या बसल्या पाणी, कॉफी यासारख्या गोष्टी आयत्या हातात मिळतात हे घरामध्ये सायकल चालवण्याचे एकमेव सुख आहे अर्थात सौ. चा मुड चांगला असेल तर. सायकल चालवता चालवता दाराची बेल वाजली तर सायकल चालवायचे सोडुन दरवाजा उघडायलाही जावे लागते. तसेच अंगातुन डबडबणारा घाम सायकलचे सर्व भाग चिंब करुन टाकतो. हरहुन्नरी आणि चंचल स्वभावाच्या व्यक्तीला ट्रेनरवर सायकल चालवणे खुप कष्टप्रद वाटु शकते.

      आणि जसा जसा ट्रेनर जुना होत जातो तसतसा त्यावर राईड करण्याचा उत्साह नाहीसा होत जातो आणि केलेली गुंतवणुक तशीच पडुन राहते. ट्रेनरमध्ये गुंतवणुक करण्याअगोदर जर माझ्या जवळच्या मित्रांपैकी कोणाला होम ट्रेनर वापरुन पहायचा असेल तर नाममात्र शुल्कामध्ये दोन-चार दिवसांसाठी माझा होम ट्रेनर मी देऊ शकतो. *अटी आणि शर्ती लागु राहतील. नाममात्र शुल्क आकारण्याचा उद्देश नविन व्यवसाय असा घेऊ नये.

ईति होम ट्रेनर!

लेखक- विजय वसवे


(माझी पोस्ट माझ्या नावासकट शेअर करायला माझी काहीच हरकत नाही)

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...