Tuesday 5 February 2019

ताजची कॉफी आणि बरंच काही


 कथा ताजच्या कॉफीची
          यावर्षीच्या इंटरटाटा क्रिकेट स्पर्धेसाठी माझी टाटा मोटर्स पुणेच्या मुख्य संघात निवड झाली. टाटा मोटर्स पुणेच्या मुख्य संघात खेळाण्याचे माझे खुप दिवसांचे स्वप्न यावर्षी पुर्ण झाले. खरंच यासारखा आनंद नव्हता. आता निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ट्रायथलॉनच्या सरावामुळे शारीरीक फिटनेसमध्ये झालेली सुधारणा मला क्रिकेट खेळताना खुप उपयोगी पडते. प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यात एक वेळ अशी येतेच की चेंडु कसा टाकायचा आणि बॅट कशी पकडायची याचे तंत्र जरी माहीत असले तरी शारीरीक फिटनेस अभावी कितीही ईच्छा असली तरीही क्रिकेट खेळता येत नाही. शारीरीक फिटनेस या समस्येला मी आता पुर्णविराम दिलेला आहे. 
          रविवारी संध्याकाळी वाजुन २० मिनिटांनी डेक्कन एक्सप्रेस छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये धडक्ली आणि आम्ही १५ क्रिकेटर्स मुंबईची टॅक्सी करुन मरीन ड्राईव लगतच्या शेटयु विंडसर हॉटेलमध्ये दाखल झालो. मला रुम पार्टनर म्हणुन कोणीही चालले असते कारण या क्रिकेट संघातील सर्व खेळाडु माझे चांगले मित्र आहेत. संदिप आणि मी यापुर्वीच्या दौऱ्यामध्ये एका रुममध्ये राहीलेलो होतो. यावेळेस मी, संदिप आणि दिनेश योगायोगाने एकाच रुममध्ये आलो. आम्ही खुप वर्षांपासुन खुप सारे क्रिकेट एकत्र खेळत असल्यामुळे आमची मैत्रीही लक्ष्मण-द्रविडच्या भागीदारीप्रमाणे बहरत गेलेली आहे. त्यामुळे दौऱ्याच्या पहील्या रात्रीपासुनच आमच्या रुममध्ये हशा, मस्करी आणि खेचाखेचीला उधाण आले होते. हसुन हसुन आडवे होण्याची वेळ आली होती. शेवटी कसेबसे आम्ही झोपण्याचे ठरवले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी टाटा पॉवरबरोबर मॅच खेळायची होती. पण झोपता झोपता संदिपने एक गोड बातमी आम्हाला दिली ती म्हणजे यावेळेस आपण हॉटेल ताजमध्ये कॉफी प्यायला जाणार आहोत. हे ऐकुन आमच्या रुममध्ये आनंदाची लहर पसरली.
          दरवर्षी आपण येतो आणि ताज हॉटेलसोबत नुसते बाहेरुन फोटो काढतो याला काही अर्थ नाही, यावर्षी आपण आत जायचे आणि कॉफी प्यायचीच मग काहीही झाले तरी चालेल. एकदा तरी जिवाची मुंबई करु की राव, या विचाराने आमच्या रुममध्ये जोर धरला होता. अजुन एक विशेष म्हणजे आम्ही मुंबईत दाखल झाल्या झाल्या कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्याची बातमी पेपरमध्ये झळकली होती. पण आम्हाला डान्सबारपेक्षा ताजच्या कॉफीचेच जास्त आकर्षण वाटत होते. ताजमध्ये कॉफी पिण्याची ईच्छा पुर्ण होईल की नाही याबद्दल साशंकता असल्यामुळे आम्ही हे प्रकरण जेवढे गुलदस्त्यात ठेवता येईल तेवढे गुलदस्त्यात ठेवले होते. याची कुठेही वाच्यता करत नव्हतो. नाहीतर व्हायचा पचका! यावेळेसचा दौरा खरंच विशेष होता. यावेळेस राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था एखाद्या रणजी संघात खेळ्णाऱ्या खेळाडुंनाही लाजवेल अशी होती. त्यामुळे सर्व खेळाडु जोशमध्ये होते आणि त्यामुळेच आम्ही सर्व सामने जिंकत चाललो होतो. संघातील सर्व खेळाडुंमध्ये आनंदाची लहर पसरलेली होती. आम्ही असाच एक आनंदी दिवस निवडला आणि ताजकडे जाण्याचे ठरवले.
          आम्ही ताजकडे निघताना पंकज, सुशिल आणि सुरेश आमच्या रुममध्ये आले होते मग संदिपने त्यांनाही ताजमध्ये कॉफी पिण्यासाठी बरोबर घेतले आणि आम्ही सहाजण मिळुन ताजकडे निघालो. आमच्या सर्वांचा मित्र संदिप आहेर आज आमच्यासाठी सचिन तेंडुलकर म्हणजे देव होता. त्याचा एक मित्र ताजमध्ये कामाला आहे. त्याच्याशी फोनवर बोलुन कॉफी पिण्याची योग्य वेळ ठरवण्यात आलेली होती. ओळखीचा माणुस ताजमध्ये आणि त्याने या बिनधास्त असे सांगितल्यामुळे आमच्यामध्ये ताजमध्ये प्रवेश करण्यासाठी थोडेसे धाडस आले होते. सुरक्षाव्यवस्था एकदम चोख होती. विमानतळावर जशी सामानाची तपासणी करतात तशी हॉटेलमध्ये येणाऱ्यांजवळचे सामान तपासले जात होते. तेथील सुरक्षारक्षकाने माझ्या कमरेचा बटवासुद्धा (वेस्ट पाऊच) सुरक्षा तपासणी मशिनमध्ये सोडण्यास सांगितला आणि तो घेण्यासाठी पलीकडे जाऊन ऊभे राहण्यास सांगितले. बटव्यामध्ये कोणतीही घोकादायक वस्तु नसल्यामुळे तो सहीसलामत माझ्या हातात आला. इतरांकडे सुरक्षा तपासणी मशिनमध्ये टाकावे लागेल असे काहीही नव्हते. अशा प्रकारे प्रवेशचाचणी पार करुन आम्ही ताजमध्ये दाखला झालो. ताजमधील सौंदर्य डोळे दिपवणारे होते. डाव्या बाजुला स्वर्ग सजवलेला होता. त्याचे वर्णन मी शब्दात करु शकणार नाही. कारण पंचतारांकीत हॉटेलमधील वेगवेगळ्या विभागांना जी नावे असतात ती मलाच माहीत नाहीत तर लिहणार कुठुन? कशाला काय म्हणतात हे आम्हाला उमगत नव्हते. अलिशान खुर्च्या, महागडे सोफे, विवीध रंगांची फुले, वेगवेगळ्या आकाराचे नक्षीदार दिवे मंद प्रकाशात आणखीनच मनमोहक आणि उठावदार भासत होते. मनात येणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकणारे कोणीतरी बरोबर असायला हवे होते असे मनोमन वाटत होते. उजव्या बाजुच्या अलिशान दालनात खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली दिसत होती. संदिपच्या मित्राने फोनवर सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या बाजुला वळालो. परदेशी तसेच काही भारतीय नागरीक उत्तम दर्जाच्या वाईनचा आस्वाद घेण्यात गुंग झालेले होते. जिकडे पहावे तिकडे वाईनच्या बाटल्या कलात्मक पद्धतीने सजवुन ठेवलेल्या दिसत होत्या. ती वाईन पिणाऱ्या व्यक्तीही तेवढ़्याच रसिक आहेत असे वाटत होते. अजुनही आम्ही सर्वजण ताजच्या झगमगाटात दबकत आणि बिचकत बिचकत चालत होतो.
          कोपऱ्यातील सहा जणांना पुरेल एवढा टेबल निवडुन आम्ही स्थानापन्न झालो. स्थानापन्न झाल्यावर ताज हॉटेलचे मेनु कार्ड बघण्याची संधी मिळाली. कॉफी कितीला आहे बघ रे? पंकजने मेनु कार्डमध्ये पाहुन सांगितले की कॉफीची सुरुवात साडे-सहाशे पासुन आहे. संदिपचा मित्र येतच होता. तो येऊन आमच्याशी बोलला आणि संकोच बाळगु नका, बिनधास्त रहा, काय करायचे ते करा म्हणाला. तेव्हा कुठे आम्ही सावरलो आणि जरा धीट झालो. पण त्याला काय माहीत आम्हाला बोट पकडण्याची संधी दिली की आम्ही खांद्यापर्यंत जाऊ. संदिपच्या मित्राने आमच्यासाठी कॉफीच नाही तर ताजमध्ये जेवणाचीची व्यवस्था केलेली होती. आम्ही अगोदरच मेनु कार्ड पाहीलेले असल्यामुळे पाच जणांच्या जेवणाच्या खर्चाचा किती चुना लागेल याचा अंदाज घेतला आणि त्याला लगेच जेवण रद्द करायला सांगितले. ऊस गोड लागला म्हणुन मुळापासुन खाऊ नये आणि तसेही आम्हाला रोज पंचतारांकीत जेवण मिळतच होते. खुप समजावुन सांगितल्यावरच संदिपच्या मित्राने ऐकले परंतु कमीतकमी नेचो बिन्स तरी घ्यावेच लागेल म्हणाला. शेवटी नेचो बिन्स आणि कॅप्युचिनो कॉफी ठरली आणि संदिपचा मित्र त्याच्या कामाला निघुन गेला. तो गेला पण जाताना आम्हाला धीट करुन गेला. मग आम्ही मोबाईल घेऊन सरसावलो आणि जे फोटो काढायला सुरुवात केली ते विचारुच नका. आमचा फोटोंचा क्लिकक्लिकाट पाहुन एक कर्मचारी आम्हाला सांगायला आला की बाबांनो ईथे व्हिडीओ काढायला परवानगी नाही तुम्ही फोटो काढु शकता.
          नेचो बिन्स आमच्यापैकी कोणालाही आवडले नाही. ते खायचे कसे? इथुन सुरुवात झालेली. पण ताजचा मान राखत आम्ही ते बळेच घशाखाली उतरवले. त्याचे फोटो मात्र खुप आवडीने काढले. कॉफीबरोबर तीन प्रकारची साखर दिली गेली होती. यानिमित्ताने साखरेचे तीन प्रकार आज आम्हाला माहीत झाले. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही ताजचा संपुर्ण तळमजला फ़िरुन आलो. काचेच्या आत भिंतीवरुन पडणारे पाणी फार सुंदर दिसत होते. सगळीकडे धुंद करणारा मंदप्रकाश पसरलेला होता. एका कोपऱ्यात पियानो वादनही चालु होते. तळमजल्यावर महागड़्या चैनीच्या वस्तुंची दुकाने आहेत. आम्ही वॉशरुमचा फेरफटका आवर्जुन मारला. सेल्फी काढली नाही असे एकही ठिकाण शिल्लक ठेवले नाही. अजुनही कुठे कुठे फ़िरलो असतो पण वेळेचे बंधन होते. नंतर नंतर आम्ही एवढे बिनधास्त झालो होतो की मॅनेजरच्या खुर्चीवर बसुन फ़ोटो काढायलाही मागेपुढे पाहीले नाही. जे जे दिसेल त्याबरोबर आवर्जुन फोटो काढले. बाहेर पडताना ताजच्या स्वागतसुंदरीबरोबर फोटो काढण्याची सुशिलची ईच्छाही पुर्ण झाली.
          अशा रीतीने संदिप आहेर, विजय वसवे, सुर्यकांत भोसले, पंकज वाकचौरे आणि सुशिलकुमार बेंद्रे (पाटील) या सर्वांची मुंबईमधील एक संध्याकाळ ताजच्या भेटीमुळे अविस्मरणीय झाली. जिवाची मुंबई झाली. आयुष्यभर जपुन ठेवता येईल अशा आठवणींचा साठा सोबत घेऊन आम्ही ताजमधुन बाहेर पडलो. संदिप आहेर आणि त्याच्या मित्राचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.  







































मॅनेजर 










































      

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...