Monday, 19 August 2019

मिशन मंगल

मंगळयान

     खुप दिवसांनी सौ. ला सिनेमाला घेऊन गेलो. मंगलयान या मोहिमेत महिलांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांचा मुख्य सहभाग ऐकिवात आहेच तो सौ. ला दाखवण्याची खूप इच्छा होती. मल्टिप्लेक्सला जायला मला बिलकुल आवडत नाही (अनावश्यक महागडे असल्यामुळे)  त्यामुळे नीलायम चित्रपटगृहाची तिकीटे ऑनलाईन बुक केली आणि पीएमपीएमएल बसने नीलायम गाठले (ट्रॅफिक आणि पार्कींगच्या समस्येमुळे पुणे शहरात कार वापरणे बंद केले आहे). शंभर रुपये बाल्कनी आणि हवे ते सीट निवडण्याची मुभा असल्यामुळे सिनेमा योग्य कोनातून पाहता येईल आणि ध्वनी स्पष्ट ऐकु येईल अशा सीट निवडल्या.

     सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचे तर हा सिनेमा फार मोठया बजेटचा आहे असे मला बिलकुल जाणवले नाही. चित्रपटाच्या बजेटचा बराचसा भाग हा यान अवकाशात सोडताना चित्रित केलेल्या दृश्यांवर खर्च झालेला आहे आणि तेही विशेष गुंतवणुक न करता कारण फॉक्सस्टार हिंदीने हॉलिवूडच्या स्पेस विषयावरील सिनेमाचे वापरून झालेले तंत्रज्ञान या सिनेमासाठी वापरलेले आहेे. तिकडचे वापरून झालेलेेेे फेकुन देण्याअगोदर ईकडेे आणण्याचा प्रकार आजकाल सर्रास पाहावयास मिळत आहे. फेकुन देण्याअगोदर त्याचा सुयोग्य वापर झाला हे चांगलेच झाले. संपूर्ण सिनेमात रॉकेट अवकाशात सोडताना चित्रित केलेली दृश्ये डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत (धन्यवाद हॉलीवुड). बाकी सिनेमा फार बंदिस्त आहे. एक मोडकंतोडकं ऑफिस, विद्या बालनचे घर, इसरोची संगणकांनी भरलेली कार्यशाळा आणि एखाद दुसरे मेट्रो आणि पबमधील दृश्य सोडले तर सिनेमा कुठेही बाहेर जात नाही. झिंगाट गाणी नाहीत की कमी कपड्यातील नृत्यही नाहीत (प्रोड्युसरचे धन्यवाद). 

    विक्रम गोखले, दिलीप ताहील, संजय कपुर इ. लोकांना अजुनही सिनेमात काम करायला घेतले जाऊ शकते याचा प्रत्यय आला. जरी त्यांच्या चेहऱ्यावर कितीही सुरकुत्या लोंबकळत असल्या तरीही. अपवाद संजय कपुरचा त्याच्या गळ्याभोवती भयंकर सुरकुत्या लोंबकळताना दिसत आहेत. आम्ही पैसे देऊन मोठ्या पडद्यावर हेच बघायचे का? बजेट कमी असले तरी प्रोक्षकांचाही थोडा विचार करावा. बाकी गोखलेंनी वजन कमी केलेलं दिसतंय जरा बारीक दिसत होते. विद्या बालन आणि वजन कमी याचा पहील्यापासुन कुठेही संबंध आलेलाच नाहीये त्यामुळे नो कॉमेंटस. शरमन जोशीने मात्र स्वतःची वाट लावुन घेतलेली आहे चांगला बटाट्यासारखा बहरलाय. अक्षय कुमारच्या सिनेमात तापसी पन्नु पहायला मिळतेच पण सोनाक्षी सारखी अभिनेत्री दुय्यम भुमिकेत पाहुन आश्चर्य वाटले. हाणामारीची आवश्यकता नसलेल्या सिनेमात अक्षय कुमारला घेणं हेच माझ्यासाठी आश्चर्य होते. नेहमीप्रमाणे त्याच्या व्यवसायिक अंदाजात त्याने त्याची भुमिका वठवली आहे. सिनेमात अक्षय हाच एकमेव महागडा अभिनेता घेतलेला आहे. बाकी इतर जे जाडे ढोले लोक्स सिनेमात घेतले आहेत ते पाहुन वजन वाढलेल्या लोकांना नक्कीच दिलासा मिळु शकतो. 

    अब्दुल कलाम आणि त्यांच्या मित्राने मिळुन उडवलेले भारताचे पहीले रॉकेट याचे फक्त श्वेतधवल फोटो दाखवण्याऐवजी त्याचे  व्हिडीओ चित्रीकरण करून दाखवले असते तर पहायला खुप छान वाटले असते. (अग्नीपंख). 

     होम सायन्स टु रॉकेट सायन्स - घरातील साध्या साध्या गोष्टींचे तंत्रज्ञान रॉकेट उडवण्यासाठी वापरणाऱ्या महीलांना सॅल्युट! मग ते पुरी तळणे असो की शिल्लक राहीलेले अन्न दुसऱ्या दिवशी वापरणे असो. 

नोकरी सांभाळत मुलांना सांभाळुन घेणारी विद्या बालन बघण्यासारखी आहे. नोकरी, घर आणि मुले सांभाळणे खरच एक दिव्य आहे. हमरीतुमरीवर येणारा बाप आणि डोक्यावर बर्फ ठेवलेली आई यात आई विद्या बालन नक्कीच भाव खाऊन जाते. 

संजय कपुरचे माधुरीबरोबर गाजलेले एक गाणे आजही त्याला रोजीरोटी मिळवुन देत आहे. 😆 त्यामुळे अशा अभिनेत्याने रंगवलेले पात्र मला नंतर नंतर अनावश्यक वाटु लागले होते. 

   सिनेमात अवकाश उड्डाणाविषयीच्या तांत्रिक बाबी दाखवायला चांगला वाव होता पण म्हणावे तसे ते जमलेले नाही जिथे आपले सिनेमे हमखास मार खातात.  

सिनेमाची सुरूवात अपयशाने आणि शेवट उत्तुंग यशाने होतो. यावरून मला "जो जिता वही सिकंदर" सिनेमाची आठवण झाली. त्यातही असेच दाखवलेले आहे. शेवट गोड झाला की सर्व गोड. 

या सिनोमाचे कॅमेरावर्क भन्नाट आहे. विशेषकरून मंगलयान अवकाशात झेपावताना ज्याप्रकारे दाखवले आहे त्याला तोड नाही. मी फक्त ते पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा हा सिनेमा बघायला तयार आहे. एकंदरीत सहकुटुंब या सिनेमाचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही जर वेळ असेल तर. 

   सिनेमा संपल्यावर सारसबाग पावभाजीवर यथेच्छ ताव मारला आणि पीएमपीएमएलने घरी परतलो. आपण प्रभासचा साहो सुद्धा पहायला जाऊ हं (मध्यंतरात ट्रेलर दाखवला होता). 

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...