Thursday 19 March 2020

मलेशियामध्ये आयर्नमॅन व्हायचे असेल तर



मलेशियामध्ये आयर्नमॅन व्हायचे असेल तर....


मलेशियामध्ये आयर्नमॅन कोण होऊ शकतो/शकते?


     आयर्नमॅन ट्रायथलॉनमध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे या तीन क्रिडा प्रकारांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रिडा प्रकार पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या क्रमानेच करावयाचे असतात. मी आयर्नमॅन होऊ शकतो का? किंवा मला आयर्नमॅन व्हावयाचे असेल तर माझ्यामध्ये कोणती पात्रता असणे आवश्यक आहे? असा प्रश्न सर्वांच्या मनात येतच असेल. खरेतर यासाठी कोणतीही पात्रता नाही, आपल्यापैकी कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. ज्याला देवाने कमी संपत्ती आणि शारीरीक क्षमता जास्त दिलेली आहे अशा व्यक्तीने मलेशिया येथे आयर्नमॅन करावे. शारीरीक क्षमता कमी असेल तर ती वाढवण्यावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. नियोजनबद्द सराव करुन आयर्नमॅन होण्यासाठी लागणारा दम वाढवता येतो. ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे हे अंतर पुर्ण करणार्यालाच “आयर्नमॅन” असे संबोधतात. भारतात गोव्यामध्ये जी आयर्नमॅन स्पर्धा भरवली जाते ती पुर्ण केल्यावर आयर्नमॅन हा किताब मिळत नाही कारण तिथे फक्त १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणे या ट्रायथलॉनच्या अर्ध्या अंतराचा समावेश असतो. अर्धे अंतर असुनही तिथे भाग घेतलेल्यांना आपण आयर्नमॅन म्हणत असाल तर त्यात तुमचा दोष नाही. भारतातील जनता याबाबतीत अजुन साक्षर व्हावयाची आहे.  

मलेशिया आयर्नमॅनसाठी वेळेची मर्यादा -

एकुण वेळ - १७ तास
३.८ किमी पोहणे - २ तास २० मिनिटे
१८० किमी सायकलिंग - ८ तास १० मिनिटे
४२ किमी धावणे - ६ तास ३० मिनिटे
टिप: पोहणे आणि सायकलिंग या दोन्हींसाठी वेळेची मर्यादा १० तास ३० मिनिटे दिलेली आहे. जर पोहणे २ तासात उरकले तर सायकलिंगसाठी ८ तास ३० मिनिटे उपलब्ध होतात.

आयर्नमॅनसाठी आवश्यक सामग्री:

स्विमिंग - स्विमिंगसाठी फक्त टोपी, गॉगल आणि चड्डी लागते. या तिन्ही वस्तु उत्तम प्रतीच्या असाव्यात. टोपी डोक्याला रुतायला नको आणि गॉगलमध्ये धुके तयार होऊन आंधळी कोशिंबीर खेळायला लागु नये याची काळजी घ्यावी.

सायकलिंग - सायकल हलकी आणि उत्तम प्रतीची असावी जेणेकरुन १८० किमी सायकल चालवल्यानंतर पायांमध्ये थकवा जाणवणार नाही. आयर्नमॅन स्पर्धेत सायकलिंग करताना हेल्मेट सक्तीचे आहे. शुज, गॉगल, ग्लोव्ह्ज इ. सक्तीचे नाही. या वस्तु आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. पोहुन झाल्यावर सायकलिंगचे कपडे घालण्यासाठी कपडे बदलण्याची जागा नेमुन दिलेली असते.

रनिंग - रनिंगचा शुज उत्तम प्रतीचा असावा. शुज घेताना एक साईज मोठा घ्यावा म्हणजे सरावादरम्यान पायाची नखे शाबुत राहतात. सायकलिंग संपवुन रनिंग सुरु करताना आपण धावताना घालावयाचे कपडे घालु शकतो. त्यासाठी योग्य जागा दिलेली असते.

ट्रायसुट - या तिन्ही क्रिडा प्रकारांसाठी वेगवेगळे कपडे वापरण्यापेक्षा एकच ट्रायसुट घेतलेला केव्हाही उत्तम. ट्रायसुटमुळे कपडे बदलण्यामध्ये वाया जाणारा वेळ वाचतो. आयर्नमॅन ट्रायथलॉन मध्ये कपडे कोणते असावेत याबाबतीत कोणतेही नियम नाहीत परंतु मलेशिया हा मुस्लिमप्रधान देश असल्यामुळे शर्यतीदरम्यान तुम्ही कोणत्याही प्रकारचे अंगप्रदर्शन करु शकत नाही. उदा. चेन उघडी ठेवणे, टॉप काढुन कमरेच्या वरचा भाग ऊघडा ठेऊन पळणे वगैरे. हल्ली पाठीला खिसे असलेला ट्रायसुट सुद्धा मिळतो. त्या खिशांचा उपयोग जेल आणि मीठाच्या गोळ्या ठेवण्यासाठी होतो.

वेळ आणि अंतर मोजण्यासाठी साधने - आयर्नमॅन स्पर्धेत मोबाईल सोबत ठेवता येत नाही. पोहणे संपल्यावरच सर्वप्रथम वेळ पाहण्याची वेळ येते. यासाठी साधे पाणी न जाणारे आकडयांचे घडयाळ असेल तरीही पुरेसे आहे. सायकलिंगच्या वेळी मात्र अंतर मोजणारे साधन सोबत असणे आवश्यक आहे. यामुळे पुर्ण केलेले अंतर, उरलेले अंतर आणि उपलब्ध वेळ यांची सांगड घालता येते. सायकलिंगच्यावेळी आपण पार केलेले अंतर आपल्याला दिसणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एखादा साधा बाईक कम्प्युटरसुद्धा पुरेसा आहे. गार्मिन घेता येणे शक्य झाले तर सोने पे सुहागा!

मलेशियातील पोहण्याचे ठिकाण -

     पोहणे जरी समुद्रात असले तरी त्याठिकाणी लाटा फार कमी प्रमाणात किंवा नसतात म्हटले तरी चालेल. ट्रायथलॉनमध्ये पोहणे ही ज्यांची कमजोरी आहे त्यांनी हि स्पर्धा अवश्य निवडावी. येथे स्विमसुटची आवश्यकता नसल्यामुळे स्विमसुटचा अनावश्यक खर्च वाचतो. तसेच काही अंतर लाटांसोबत किनार्याकडे पोहत यावयाचे असल्यामुळे पोहण्याच्या वेळेमधे १० ते १५ मिनिटांची सुधारणा आपोआप होते.

सायकलिंगचा मार्ग -

     सायकलिंगचा मार्ग उत्तम आहे. ९० किमी चे दोन फेरे मारावयाचे असतात. यात दोन ते चार ठिकाणी साधारण ५०० मी अंतराचे चढ येतात जे सायकलवरुन उतरुन चालत पार केले तर अतिशय उत्तम. चढावर चालल्यामुळे पायाचे स्नायु मोकळे होतात आणि हृदयाची धडधड सुद्धा शांत होण्यास मदत होते. सायकलिंग करताना थोडेसे ऊन जाणवते परंतु आपल्या महाराष्ट्रातील ऊन्हात सायकल चालवण्याचा सराव असेल तर तेथील ऊन्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. आणि चढाला घाबरुन ईतर ठिकाणी जाण्याचा विचार करु नका, जगात कुठेही गेलात तरी सायकलच्या मार्गात चढ हा येणारच आहे. मलेशियातील चढ नक्कीच सुसह्य आहे हे मी तुम्हाला खात्रीपुर्वक सांगु शकतो.

धावण्याचा मार्ग -

     धावण्याचा मार्ग अतिशय सुखकर आहे. कुठेही कसलाही चढ नाही. धावायच्या वेळेला सुर्यास्त होत आलेला असतो त्यामुळे तेथील तापमान हे कमी झालेले असते. सुर्यास्त झाल्यानंतर तेथील तापमानाचा आपल्या धावण्यावर काहीही परीणाम होत नाही. आणि महत्वाचे म्हणजे तेथील लोक धावताना खुप छान मदत करतात. १६+१६+८ असे फेरे मारावयाचे असतात. धावण्याचा रस्ता सपाट आणि गुळगुळीत आहे.

मलेशिया आयर्नमॅनसाठी येणारा खर्च -

     हा आपल्यासारख्या सर्व मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. २०१९ मध्ये मला आलेला खर्च तुम्हाला सांगतो त्यावरुन तुम्हाला अंदाज येईल. मार्च महीन्यात नाव नोंदणी सुरु झाल्या झाल्या नाव नोंदवल्यास अंदाजे ४५००० च्या आत नावनोंदणी होते. मी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणाकडुनही कसलेही आर्थिक सहाय्य घेतलेले नाही. सर्व खर्च मी माझा केलेला आहे. सरावादरम्यान तसेच स्पर्धेदरम्यान लागणारे माझे सर्व नुट्रिशन स्टेडफास्ट नुट्रिशनने प्रायोजीत केलेले होते. स्टेडफास्ट नुट्रिशन उत्तम प्रकारचे नुट्रिशन मिळाल्यामुळे माझे काम आणखीनच सोपे झाले होते.

नावनोंदणी - 45,000 (लवकर केली तर)

विमानप्रवास - 29,000 (मुंबई ते मुंबई सर्व प्रवास, ३ महिने अगोदर बुकिंग)

हॉटेल आणि जेवण - 10,000 (सोबतीला एक मित्र असेल तर)

किरकोळ खर्च - 10,000

एकुण खर्च - 94,000

 (हॉटेल आणि जेवणाच्या खर्चात काटकसर करून खर्च कमी करता येऊ शकतो)
परंतु सरसकट एक लाख खर्च येईल असे गृहीत धरूनच तयारीला लागावे. 

     आयर्नमॅन कुठेही केले तरी “आयर्नमॅन” हा किताब सारखाच असतो. परंतु हेच जर आपण युरोपात करायला गेलो तर यासाठी येणारा खर्च दिड लाख ते अडीच लाखापर्यंत जाऊ शकतो.

मलेशियाच का?

     आतापर्यंत ईथे कधीही स्पर्धा रद्द झालेली नाही. कोणत्याही कारणास्तव येथील पोहणे रद्द झालेले नाही आहे.  त्यामुळे येथे आपल्याला एक परीपुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पुर्ण केल्याचा आनंद घेता येतो. एवढा खर्च करून करून तिन्ही गोष्टी करायला मिळणे महत्वाचे आहे. नाहीतर काही ठिकाणी पोहणे रद्द झालेले आपण ऐकलेले आहे.

सराव -

     सुरुवात ऑलिम्पिक ट्रायथलॉन पासुन करावी. दोन ते तीन ऑलिम्पिक ट्रायथलॉन पुर्ण कराव्या. त्यानंतर  तीन-चार हाफ ट्रायथलॉनमध्ये भाग घ्यावा. त्यानंतर एक किंवा दोन फुल आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर मलेशिया आयर्नमॅनमध्ये भाग घेण्यास तुम्ही सज्ज आहात असे समजावे.

मलेशिया आयर्नमॅनसाठी तयारी कशी करावी हे आपण पुढच्या भागात पाहु या..

त्या स्पर्धेतील काही फोटो इथे टाकत आहे. हे फोटो माझा शालेय जीवनातील मित्र अभिजित म्हेत्रे याने माझ्यासाठी विकत घेतलेले आहेत. 


पोहण्याची जागा 

















#SteadfastAthlete #trilife #Ironman #triathlon #swimbikerun #swimriderun #140.6 #Malaysia #IronmanMalaysia #SteadfastNutrition 

5 comments:

  1. Informative, This will help me for my preparation. Waiting for next blog

    ReplyDelete
  2. This information is very helpful to prepare for ironman...Thank you gor describing iron man in very simple language

    ReplyDelete
    Replies
    1. I m happy that you liked it. Thank you 😊

      Delete
  3. ekdam soppe bhaste information and pics pahun khup bhari vatale

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...