"रामनामाचे मिसाईल"
(द्वारा विजय वसवे)
रामायणातील कथा अतिशय कर्णमधुर आहेत आणि त्या ऐकायला लागले कि असे वाटते त्या कधी संपुच नयेत. या मधुर कथा ऐकताना असे वाटते कि कोणीतरी कानांमध्ये अमृत सोडत आहे. कानांचे अमृतपानच जणु. कारण हरीकथा ऐकणे हेच कानांचे मुख्य काम आहे किंवा यासाठीच देवाने आपल्याला कान दिले आहेत हे पुराणांमध्ये सांगितलेले आहे. सदरचा संवाद हा व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आम्ही चार मित्र व्हिडीओ कॉलवरच होतो (व्हाटसअपवर चारच लोकांना घेता येते). मी त्यांना रामनामाच्या लॉंचिंगची कथा ऐकवली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे रामनामाचे लॉंचिंग काय प्रकार आहे....ऐका तर
तर झाले असे कि सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपुचा वध केल्यानंतर लाखो-हजारो वर्ष भगवंतांचा कोणताच अवतार झालेला नव्हता. त्रेतायुग सुरु झाले होते तरीही मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यप्राण्यांना सत्ययुगासारखीच कठोर तपश्चर्या करावी लागत होती. युग बदलले परंतु युगधर्म बदललेला नव्हता. मोक्षप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर असणा-या व्यक्तींचे पराकोटींचे कष्ट कमी करण्यासाठी भगवंतांनी ब्रम्हदेव आणि महादेव यांना बरोबर घेऊन रामावतार आणि रामनाम यांचा भविष्यात येणा-या युगांसाठी सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम बनवण्याचे ठरवले. "सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम" श्रीमदभगवदगीतेत भगवंतांनी सांगितले आहे "ऊर्ध्वमुलं अध:शाखं" याचा अर्थ या भुलोकावर जे जे काही तंत्रज्ञान आहे त्याचे सर्व मुळ ऊर्ध्वलोकांमध्ये आहे. जेव्हा रामनामाचा प्रोग्राम तयार झाला आणि पृथ्वीवर प्रभु श्रीरामचंद्रांचा प्रत्यक्ष अवतार होण्याअगोदर रामनामाच्या प्रभावाची चाचणी घेण्याचे ठरले. म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टींग करावयाचे ठरले. जसे आपण मनुष्य प्राणी एखादे मिसाईल किंवा अणुबॉंम्ब बनवला कि त्याची चाचणी घेतो किंवा सॉफ्टवेअर टेस्टींग करतात अगदी तसे. हि चाचणी कोणावर घ्यायची हा सुद्धा मोठा गहन प्रश्न होता. आता प्रश्न भगवंतांच्या नामाचा होता त्यामुळे चाचणीही त्याला साजेशी होणे आवश्यक होते. रामनामाच्या चाचणीसाठी अत्यंत वाईटातील वाईट परीस्थिती निवडण्यात यावी असे महादेवांनी सुचवले जेणेकरुन भविष्यात कोणालाही रामनामाच्या प्रभावावर शंका यायला नको. महादेव अगदी तेच बोलले जे भगवंतांच्या मनात होते. आता ही वाईटातील वाईट परीस्थिती किंवा व्यक्ती निवडण्यासाठी महादेवाने डोळे बंद करुन ध्यान लावले. त्यांना उत्तम व्यक्ती सापडला. व्यक्ती उत्तम नव्हता परंतु चाचणी घेण्यासाठी उत्तम होता. महादेव म्हणाले, "रामनामाचा प्रभाव जाणुन घेण्यासाठी वाल्ह्या कोळी नावाचा एक लुटारु आहे जो लोकांचे धन लुबाडुन त्यांना जीवे मारतो. एका व्यक्तीचा जीव घेतला कि तो एक खडा रांजणामध्ये टाकतो असे सात रांजण त्याने भरले आहेत. सध्या त्याच्या एवढी पापे असलेला दुसरा कोणीही व्यक्ती या पृथ्वीतलावर नाही आपण हे रामनामाचे मिसाईल त्याच्यावर सोडु." यावर त्रिदेवांचे एकमत झाले. आता हे रामनामाचे मिसाईल वाल्ह्यापर्यंत घेऊन जाणारा कोणीतरी हवा होता. एवढे परीणामकारक मिसाईल वाहुन नेणारा सुद्धा तेवढाच प्रभावी व्यक्ती असणे आवश्यक होते. कुठल्याही ऐ-यागै-याचे हे काम नव्हते. यासाठी त्रिदेवांनी एकमताने नारदमुनींची निवड केली. वीणा हातात धरुन प्रभुंचे गुणगान गाणारे नारदमुनी "नारायण...नारायण" म्हणत एका क्षणाचाही विलंब न करता तिथे हजर झाले. त्यांना जेव्हा सांगण्यात आले कि तुम्हाला वाल्ह्याची भेट घ्यायला जायचे आहे तेव्हा ते म्हणाले, "देवा, माझ्याकडुन असा कोणता अपराध घडला आहे ज्याची शिक्षा म्हणुन तुम्ही मला वाल्ह्याकडे पाठवत आहात?" नारदमुनींनी मंद स्मित करत गंमतीने भगवंतांकडे विचारणा केली. शिक्षा नाही नारद, तुम्हाला थोर कार्य पार पाडावयाचे आहे. सर्व मनुष्य जातीच्या उद्धारासाठी आम्ही एक नविन तंत्रज्ञान विकसीत केले आहे त्याची चाचणी घ्यावयाची आहे. त्यासाठी फक्त दरोडेखोर वाल्ह्याच पात्र आहे. त्यामुळे तुला हे मिसाईल घेऊन जावेच लागेल. भगवंतांच्या कामासाठी नारदमुनी सदैव तत्पर राहत असतात. पण ते पुन्हा एकदा म्हणाले, "देवा नारायणा, वाल्ह्यासारख्या दुष्टाला संपवणे तुमच्यासाठी काय अवघड आहे का? ईथुनच सुदर्शन चक्र सोडा बसल्या जागी काम होऊन जाईल. मला जाण्याची काहीच आवश्यकता नाही. पण तुमचा आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य आहे, हा मी निघालो."
अगदी बरोबर आहे भगवंतांसाठी वाल्ह्यासारख्यांना संपवणे म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट होती. मोठमोठे असुर आणि राक्षस भगवंतांनी लिलया निर्दाळलेले होते तर या वाल्ह्याची काय कथा. बसल्या जागेवरुन सुदर्शन चक्र सोडले असते तरी त्याचा कार्यक्रम उरकला गेला असता. पण वाल्ह्यामार्फत भगवंतांना विशेष कार्य करवुन घ्यावयाचे होते. भगवंत नारद मुनींना म्हणाले, "आता वाल्ह्या हा विशेष व्यक्ती आहे (स्पेशल कॅटेगरी), तुम्ही त्वरीत त्याच्याकडे प्रस्थान करावे." भगवंतांना वंदन करुन "नारायण..नारायण.." म्हणत नारदमुनी तिथुन अदृश्य झाले.
तर कोण होता हा वाल्ह्या? वाटमारी करणारा दरोडेखोर. असा तसा नव्हता तो.. त्याच्या टप्प्यात एखादा गेला कि तो त्याचा कार्यक्रम करायचाच तो. छातीठोकपणे समोर येऊन आडवायचा आणि जे काही आहे ते टाक म्हणायचा. लपुन-छपुन त्याने कधीही वाटमारी केली नाही. जवळचे सर्व काढुन दिले तरी मारायचा अन नाही दिले तरी मारायचाच. वाल्ह्याचे दर्शन म्हणजे साक्षात यमाचे दर्शन! कोणाला गळा दाबुन, कोणाला कु-हाडीने, कोणावर तलवार तर पळुन जाणा-यांसाठी तो धनुष्यबाण वापरत असे. एकही माणुस त्याला हुलकावणी देऊन पळुन जाऊ शकला नाही. मी म्हणणारे सुद्धा बरेच जण आले. मी म्हणणारे म्हणजे, कोण कुठला वाल्ह्या...बघतोच त्याला म्हणणारे. असे कैक नमुने त्याच्याकडे येऊन यमसदनाला पोचले होते. त्रेतायुगाच्या सुरुवातीला म्हणजे लाखो वर्षांपुर्वी. अमेरीकन आणि युरोपिय लोकांच्या मर्यादित ज्ञानानुसार तेव्हा डायनासॉर सारखे भयंकर प्राणी पृथ्वीवर होते. तसेच ईतर हिंस्त्र श्वापदे आणि अवाढव्य सर्पही होते त्यांच्यासाठी मनुष्य म्हणजे केवळ एक ग्रास होता. अशा सर्व परीस्थितीत वाल्ह्या कोळी वर्षानुवर्षे लुटमारीचे काम पुर्ण एकाग्रतेने आणि यशस्वीपणे करत होता. त्याच्या बळाची बरोबरी करणारा कोणीही नव्हता. अशी लुटमार करुन त्याने भरपुर संपत्ती कमावलेली होती. त्याची पत्नी राजवैभव अनुभवत होती. सर्व काही सुरळीत चालले होते आणि अचानक त्याच्या वाटमारी करण्याच्या वाटेवर नारदमुनी प्रकट झाले.
मुखात "नारायण...नारायण.." एका हातात वीणा एका हातात चिपळ्या असे नारदमुनी वाल्याच्या शिकार करण्याच्या पायवाटेवरुन जाऊ लागले. वाल्याच्या टप्प्यात आल्याबरोबर तो हातात परशु घेऊन नारदमुनींसमोर ऊभा राहीला. त्यांनाही हेच अपेक्षित होते. वाल्या म्हणजे साक्षात यमदुताचे रुप. त्या घनदाट अरण्यात हातात शस्त्र घेतलेला वाल्या पाहीला कि भल्याभल्यांची त्रेधातिरपिट उडत असे. काहीजण जीवाची भीक मागायचे, हृदयाची धडधड वाढुन काहींना घाम फुटायचा, काहीजण पळत सुटायचे तर काहीजण प्रतिकार करण्याचा प्रयत्न करायचे. पण वाल्यासमोर सर्व व्यर्थ, त्याला टक्कर देणारा एकही माई का लाल भेटलेला नव्हता. आजपर्यंत तो सर्वांना पुरुन उरलेला होता. तो नारदमुनींवरही दरडावला "चल, तुझ्याकडे जे जे काही आहे ते सर्व मला काढुन दे आणि मरायला तयार हो" नारदमुनींनी पुन्हा एकदा नारायण नारायण केले आणि मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत ऊभे राहीले. रामनामाची ज्या व्यक्तीवर चाचणी होणार होती तो त्यांच्यापुढे प्रत्यक्ष ऊभा होता. भगवंतांच्या लिलेवर नारदमुनींना यत्किंचितही संशय नव्हता परंतु त्यांच्या जागेवर जर ईतर कोणी असते तर त्या वाल्याला पाहील्यावर हा काय भगवंताचे नाम जपणार? याला निवडला रामनामाच्या चाचणीसाठी? अशा कुशंका काढल्यावाचुन राहीला नसते. मृत्यु समोर ऊभा असतानाही मंदस्मित करत नारायण नारायण म्हणणारे नारदमुनी पाहुन वाल्याही आश्चर्यचकीत झाला. त्यालाही हे नविन होते. कारण आजपर्यंत त्याने असा प्रकार कधीही अनुभवलेला नव्हता. चेह-यावर कसलीही भिती नाही याउलट भगवंताच्या भक्तीचे तेज त्यांच्या चेह-यावर झळाळत होते.
तो पुन्हा एकदा कडाडला, "तुझ्याजवळ जे काही असेल ते काढुन मला दे" नारदमुनी म्हणाले, "बाबा दरोडेखोरा...तुला जे हवं आहे त्यातले माझ्याकडे काहीही नाही पण माझ्याकडे जे आहे ते त्याहुनही श्रेष्ठ आहे. तु म्हणत असशील तर ते मी तुला देऊ शकतो..नारायण..नारायण.." वाल्या म्हणाला, "ते तुलाच ठेव मी फक्त सोने, दागदागिने आणि नाणी घेतो आणि हे सर्व घेऊन झाल्यावर जीवही घेतो, तु आता मरायला तयार हो." नारदमुनींनी हातातली वीणा आणि चिपळया त्याच्याकडे दिल्या कारण तेच त्यांचे धन होते आणि म्हणाले,
"अरे पण कशासाठी करतोस तु हे सर्व?" तेच मंद गोड स्मित त्यांच्या चेह-यावर झळकत होते. कुठेही भयाचा लवलेशही जाणवत नव्हता. आणि नेमके हेच वाल्याला खटकत होते. मला घाबरत नाही म्हणजे काय?
"माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मी हे करतो पण याचे तुला काय?"
"कदाचित तुला माहीत नसेल कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तु जे काही करत आहेस ते घोर पाप आहे आणि हे पाप फेडण्यासाठी तुला नरकात जावे लागेल आणि तिथे तुला याची शिक्षा भोगावी लागेल" आणि नारदमुनींनी त्याला नरकात कशा प्रकारे पापांची शिक्षा दिली जाते याची सविस्तर माहीती दिली. आणि म्हणाले या सात रांजणात जेवढे खडे भरलेले आहेत तेवढया लोकांची तु हत्या केलेली आहेस आता तुझी घोर नरकातुन सुटका होणे शक्य नाही."
"मला एकट्यालाच का शिक्षा मिळेल? मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे पाप करतोय त्यामुळे तेदेखील या पापात सहभागी आहेत. माझ्या पापाचा वाटा ते देखील घेतील आणि मग मला कमी शिक्षा होईल"
"असे जर झाले तर उत्तमच पण तुला खात्री आहे का? ते तुझ्या पापांचा भाग स्विकारतील."
"मी त्यांच्यासाठीच हे सर्व करतोय त्यामुळे ते अर्थातच माझ्या पापात वाटेकरी होतीलच" वाल्याला मनापासुन खात्री होती.
मग नारदमुनी म्हणाले तुला एवढीच खात्री आहे तर एकदा त्यांना विचारुन ये म्हणजे नंतर समस्या यायला नको. हे ऐकल्यावर वाल्या मनसोक्त हसला आणि म्हणाला, "मी घरी विचारायला जातो म्हणजे तुला सहज पळुन जाता येईल नाही का?, मला एवढा वेडा समजतो आहेस का?"
मी कुठेही जाणार नाही असे नारदमुनींनी सांगुनही वाल्या काही ऐकेना. शेवटी त्याने नारदमुनींना झाडाला बांधुन ठेवले आणि मगच तो आपल्या कुटुंबीयांकडे विचारणा करायला गेला.
सकाळची वेळ होती. वाल्याचे कुटुंबीय आता न्याहरी करण्याच्या तयारीत होते. वाल्याच्या बायकोचा थाट एखाद्या महाराणीला शोभेल असाच होता. नवर्याने लुटमार करुन आणलेले दागिने, वस्त्र व इतर संपत्तीचा ती पुरेपुर आनंद घेत होती. त्याकाळातील जगातल्या सर्वात महागातल्या महाग साडया, नखापासुन ते शिखापर्यंत घालता येणारे सर्व सुवर्णालंकार तिच्याकडे होते. एखाद्या महाराणीला शोभेल अशी तिची बडदास्त होती. एवढ्या सकाळी कधीच घरी न येणारा नवरा अचानक आलेला पाहुन तिला आश्चर्य वाटले. सुकामेव्याचा शिरा बनवलेला होता. ती वाल्याला म्हणाली, "आलाच आहात तर थोडा काजु घालुन केलेला शिरा खाऊन घ्या." पण वाल्याची शिरा वगैरे खाण्य़ाची मनस्थिती नव्हती. त्याला नारदमुनींनी भलत्याच कामाला लावलेले होते. फक्त विचारायचा अवकाश की आपली बायको हो म्हणणार आणि मग त्या मुनीकडे बघतोच असे वाल्या मनातल्या मनात पुटपुटला.
तो पत्नीस म्हणाला, "प्रिये, मी हे जे काही करत आहे ते कोणासाठी करतो?"
"अर्थात आमच्यासाठीच नाथ, यात शंका वाटण्यासारखे काहीच नाही"
"मग हे करत असताना माझ्याहातुन जे काही पाप घडत आहे त्यात तुही सहभागी आहेस ना?"
"हे कसं शक्य आहे? कुटुंबाचे पालनपोषण करणे तुमचे कामच आहे पण त्यासाठी तुम्ही पाप करत असाल तर त्यात मी बिल्कुल सहभागी नाही"
"हे काय बोलत आहेस तु?" वाल्या जवळजवळ हादरलाच...
"हो, जे खरे आहे ते बोलत आहे, तुमच्या पापात मीच काय पण मुलेही सहभागी नाहीत"
हा मार्ग तुम्ही निवडलेला आहे आम्ही तुम्हाला असे करायला सांगितलेच नाही. वाल्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शेवट्चा प्रयत्न म्हणुन त्याने आईवडीलांनासुद्धा विचारले. त्यांनी सुद्धा त्याच्या पापात सहभागी होण्यास नकार दिला.
कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आयुष्यभर केलेली एवढी सर्व पापे एकट्याला फेडावी लागणार या विचाराने तो भयभीत झाला होता. धैर्य एकवटुन तो नारदमुनींकडे परत आला आणि आल्या आल्या शरण गेला. मला आता तुम्हीच वाचवु शकता आणि या पापातुन मुक्त होण्याचा तुम्हीच मार्ग सांगा मी तुम्हाला शरण आलो आहे. नारदमुनींना त्याने मुक्त केले. त्यांचा वीणा आणि चिपळ्या परत केल्या आणि मनापासुन शरण गेला. "तदविधी प्रणिपातेन परीप्रश्नेन सेवया"
नारदमुनी म्हणाले यावर एकच उपाय आहे तो म्हणजे हरीनाम. भगवंताचे नामस्मरण करत रहा तुझी सर्व पापे नष्ट होतील. म्हण, "राम राम". वाल्याला हे काही म्हणता येईना. आता काय करावे ते नारदमुनींना कळेना. शेवटी ते म्हणाले, "मरा मरा" म्हण. मरा उच्चारण्यासाठी वाल्याला एकदम सोपे गेले. त्याच्या रोजच्या कामातला शब्द होता तो "मरा" "मरा..मरा..मराम..राम....राम" "मरा मरा" चे "राम राम " कधी झाले ते त्यालाही कळले नाही. नारदमुनी म्हणाले, "ईथे बस आणि जोपर्यंत मी परतुन येत नाही तोपर्यंत राम राम म्हणत रहा. असे सांगुन "नारायण नारायण" करत नारदमुनी भगवंतांकडे परत गेले.
रामनामाचे मिसाईल किती प्रभावी होते आणि आहे हे वेगळे सांगायला नको.
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम
रामकृष्णहरी🚩🚩🚩
ReplyDelete