Friday 30 October 2020

एवरेस्टींग आणि मी

सायकल चालवताना येणारा चढ ज्याला इंग्रजीत क्लाइंब असे म्हणतात, या क्लाइंबचं आणि माझं पहील्यापासुन वाकडं आहे. आयुष्यातली पहीली दहा किमीची राईड त्या राईडमध्ये या क्लाइंबने मला अक्षरश: रडवले होते. यापेक्षा अधिक काय बोलु आणि अधिक काय लिहु. सायकलिंगच्या सुरुवातीलाच चढाने दाखवलेली अशी भिती आजतागायत माझ्या मनावर कायम आहे. चढ म्हटले कि माझ्या अंगावर अजुनही काटा येतो. एक प्रकारची धास्ती घेतलेली आहे. लांब पल्ल्याच्या खुप सार्या बीआरएम (सायकलिंग) केल्या, चांगला तीन वेळा सुपर रॅंदोनियर झालो पण चढाबरोबरचे शत्रुत्व काही संपले नाही. मी नंतर नंतर तर या चढाला शरण जायला लागलो. नको जीवाला त्रास म्हणुन मी चढ आला कि सरळ सायकलवरुन उतरुन हातात सायकल धरुन चालत जायचो, "तु शिवाजी महाराज, तुला आठ बायका" असे त्या चढाला म्हणुन नमस्कार करायचो आणि आपला गुपचुप चालत जायचो. परंतु चढावर चालल्याने बीआरएम पुर्ण करण्याच्या वेळेमध्ये कधीही वाढ झाली नाही. चढावर पायी चालुनदेखील मी बर्याचदा पहील्या तीनमध्ये असायचो कधी कधी पहीला सुद्धा. त्यामुळे हि जी काही मी युक्तीची कल्पना शोधुन काढली होती ती फारच भन्नाट आहे अशी माझी खात्री झालेली होती आणि त्यासाठी मी माझीच पाठ थोपटुन घेतलेली आहे. (हाहाहा..)

चढावर सायकल चालवताना जास्त दमछाक होते, हृदयाची धडधड प्रचंड वाढते, पायांच्या स्नायुंवर अतिरीक्त ताण येतो, घाम येण्याचे प्रमाण वाढते (यामुळे शरीरातील इतर घटक झपाटयाने कमी होतात), घशात कोरड पडायला लागते त्यामुळे सतत पाणी प्यावेसे वाटते आणि पोटात साठवलेली कार्बोदके संपण्याचा वेग प्रचंड वाढतो त्यामुळे भूकही लगेच लागते. नुसता घाट किंवा घाट आणि थोडेफार अंतराची राईड असेल तर याचा फारसा परीणाम आपल्या शरीरावर होत नाही. परंतु हेच जर घाट आणि त्यासोबत २०० किंवा ३०० किमी अंतर पुर्ण करावयाचे असेल तर चढावर केलेल्या सायकलिंगमुळे असह्य वेदना होतात. मी एकदा पसरणी घाटात काही अंतर सायकल हातात धरुन पायी चालत गेलो होतो. ती ३०० किमी अंतराची बीआरएम होती आणि ती पुर्ण करणार्यांमध्ये मी सर्वप्रथम होतो. बर्याच रायडर्सना चढावर साकलवरुन उतरणे हे कमीपणाचे वाटते. "काय चालत चाललाय मर्दा.. बस सायकलवर आणि पळव" असे म्हणणारे लोकही भेटतात. पण त्यांना आपण कुठुन आलोय आणि अजुन किती अंतर पार करायचे आहे याची कल्पना नसते. सायकलशर्यतीसाठी हि रणनीती योग्य ठरणार नाही परंतु ज्या लांब अंतराच्या आणि दिर्घ कालावधीच्या राईडस आहेत त्यासाठी हि संजीवनी आहे. चढावर पायी चालण्याचा फायदा हा होतो कि पायांचे स्नायु मोकळे होतात, हृदयाची गती कमी होण्यास मदत होते, घाम येत नाही आणि पोटातील ऊर्जाही पटपट खर्च होत नाही. यामुळे शरीर आणि पाय ताजेतवाने राहण्यास मदत होते. हा यशस्वी झालेला फॉर्म्युला नंतर मी बर्याच ठिकाणी वापरलेला आहे अगदी मलेशिया आयर्नमॅनमध्ये सुद्धा.

तर अशा या चढाने मलेशिया आयर्नमॅनमध्येही माझा पिच्छा सोडला नाही. मलेशियात गेल्यापासुन अफजलखानासारखा दोन्ही बाहु फैलावुन "आओ हमारे गले लग जाओ" असे सारखे मला म्हणत होता. पण मी बोलुन चालुन शिवाजी महाराजांचा मावळा. गनिमी कावा करुन कधी त्याच्या हातातुन निसटुन गेलो हे त्याला कळले सुद्धा नाही. आणि तेही बडे आरामसे... अर्धा ते एक किमी अंतराचे तीन भयंकर चढ मी सायकल हातात धरुन चालत लिलया पार केले. झाले असे कि मी चढावर सायकल हातात धरुन चालत होतो. रस्त्याच्या कडेला बरेचजण पायांना गोळे आल्यामुळे आकाशाकडे तोंड करुन आडवे पडलेले दिसत होते. वोलिंटीयर्स त्यांना मदत करत होते. त्यांना दरवर्षीचा अनुभव असणार म्हणुन ते अगदी जिथे पायाला गोळे (क्रँम्प) येतात अशा नेमक्या जागी थांबलेले होते. हि ९० किमी ची पहीलीच फेरी होती. पाठीमागुन एक फिरंगी आला...त्याच्याकडे हे महागडी सायकल..(कार्बनची टाईमट्रायल)..जीवाच्या आकांताने बिचारा पॅडल मारण्याचा प्रयत्न करत होता आणि मी आपला हातात सायकल धरुन आरामात चालत होतो. माझी आपली मेंटॉस जिंदगी (स्मार्ट थिंकींग) आणि त्याच्याकडे महागडी सायकल. त्या चढावर आमच्या दोघांचाही वेग सारखाच होता. जो त्याने जीवाच्या आकांताने मिळवलेला होता आणि मी आरामशीर चालत जाऊन. हे त्याच्या लक्षात आले. म्हणजे एवढा पण भैत्ताड (मंद) नव्हता. ब्रेक दाबुन थांबला आणि म्हणतो कसा, "Is it allowed to walk?" "अरे मंद माणसा, असे चालायला परवानगी नसती तर मला काय वेड लागले आहे का? अपात्र होऊन पैसे वाया घालवायला.." तो ही हसला. सायकलवरुन उतरला आणि माझ्यासोबत गप्पा मारत चालु लागला. त्यालाही खुप छान वाटले. जाताना खुप खुप धन्यवाद म्हणुन गेला. मलेशिया आयर्नमॅनमध्ये मी बर्याच जणांना हि विद्या शिकवली. मध्यमवर्गीय माणसाला चढावर चालुन अपात्र होण्याची नामुष्की परवडु शकणार नाही हे त्याला कोण सांगणार.    

तर असा हा चढ सायकलिंगमधील माझा एक नंबरचा शत्रु आहे. आता एवरेस्टींगच्या निमित्ताने या शत्रुवर प्रेम करण्याची वेळ आलेली आहे. ८८४८ मी चढ होईपर्यंत सायकल चालवणे म्हणजे एवरेस्टींग होय. स्ट्रावा किंवा गारमिनवर वर एलेवेशन दाखवलेले असते. ते ८८४८ मीटर होईपर्यंत सायकल चालवायची म्हणजे तुमचे एवरेस्टींग झाले. स्ट्रावावरील एखादा चढाचा सेगमेंट निवडुन तो एवरेस्टींग गणकयंत्रात (एवरेस्टींग ऑनलाईन कॅल्क्युलेटर) टाकुन पहावा लागतो. मग त्याचे किती फेरे करावयाचे हे ते गणकयंत्र सांगते. एकदा एवरेस्टींगला सुरुवात केली की झोपायचे नाही अशी त्यांची अट असते. हे माझ्यासाठी आकाशाला गवसणी घालण्याचे काम आहे. माझे कसे होईल मला माहीत नाही पण आता "न फिरे माघारी...". मी एवरेस्टींग करण्याचे ठरवले आहे. आता माघार नाही. असे किती दिवस या चढाचे भय बाळगावयाचे. आता ते काही नाही.. आता आक्रमण करण्याची वेळ आलेली आहे.

एवरेस्टींगचे स्वप्न पडले आहे, पाहु या हे स्वप्न माझी झोप उडवते का...
- आयर्नमॅन विजय वसवे. 
#steadfastathlete #trilife #Everesting #cycling #cyclist #cycle #cyclinglife #cyclingmotivation #cyclinglovers #cyclingaddict #cyclingislife #ridingonclimbs #8848m #Everest #MountEverest #EverestClimb 

1 comment:

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...