Saturday 12 December 2020

पुणे गोवा पुणे सायकल मोहीम


 पुणे गोवा पुणे सायकल मोहीम



पुणे गोवा पुणे सायकल मोहीम

यावर्षी दिवाळी झाली की गोवा सायकल मोहीम करायचीच असे मनोमन ठरवलेले होते. कोरोना महामारीच्या कचाटयातुन कशीबशी हळूहळू सूटका होत चाललेली होती. त्यामुळे प्रवासासाठी सूट मिळालेली होती, हॉटेल्स वगैरे व्यवस्थित सुरु झालेली होती. माझ्यासाठी एवढे पुरेसे होते. सायकल चालवताना रस्त्यात तहान लागल्यावर पाणी आणि भूक लागल्यावर अन्न मिळाले कि सायकलचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा गोव्याला जाणार होतो आणि तेही सायकलवर. आणि परतीचा प्रवास सुद्धा सायकलवरच करणार होतो. तेवढंच थोडं जगावेगळं. मला जगावेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि सगळं जग जे करते त्यापासुन मी लांब राहतो. कदाचित याच कारणामुळे मी एवढे दिवस गोव्याला गेलेलो नाही. कधीतरी व्हिस्की पितो पण बीचवरील दृश्य बघण्यात मला कसलाही रस नाही. वातानुकूलित वाहनामध्ये प्रवास करण्याची मला अ‍ॅलर्जी आहे. एसी लावलेल्या कारमध्ये प्रवास केला कि मी आजारी पडलोच म्हणून समजा, असे ब-याचदा झालेले आहे. सायकल चालवताना मिळणारी स्वच्छ, मोकळी आणि ऑक्सीजनने परीपूर्ण असलेली हवा मला फार आवडते. बरेचजण गोव्याला सायकलवर जातात पण परत येताना मात्र सायकल बसमध्ये टाकुन आणतात. कोणाकडे वेळ नसतो तर कोणाकडे दम. गोवा सायकल मोहीमेसाठी मी एक आठवडा खास राखुन ठेवलेला होता आणि माझा दम मला किती साथ देतो ते मला पहायचे होते. मागच्या दिवाळीमध्ये मलेशिया येथील लंगकावीमध्ये मी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. त्या स्पर्धेत मी  ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे हे सलग १५ तास १४ मिनिटांत पुर्ण केलेले आहे. हे सर्व करण्यासाठी १७ तास वेळेची मर्यादा होती. आजतागायत टाटा मोटर्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये "आयर्नमॅन" हा किताब मिळवणारा मी टाटा मोटर्स समूहातील प्रथम कर्मचारी आहे आणि याचा मला खुप अभिमान वाटतो. यावर्षी कोरोना महामारीमुळे सरावामध्ये खंड पडलेला होता. तरीही गोव्याला सायकलवर जाण्याची मजबूत ईच्छा मनात तयार झालेली होती.

दिवस - १ 
पुणे ते कोल्हापूर २२५ किमी

कोणी सोबतीला आले नाही तर मी एकटयाने सुद्धा गोव्याला जाण्याची तयारी ठेवलेली होती. माझा एक वर्गमित्र म्हणाला जर कोणीच सोबतीला आले नाही तर मी तुझ्यासोबत दुचाकी चालवत येऊ शकतो. पण सायकल चालवणारा सोबतीला असेल तर आणखी मजा येते. मी गोवा सायकल मोहीमेबाबत जवळच्या मित्रमैत्रिणींना माहीती दिली. "सांगायचं ना राव, आलो असतो की.." अशी बोंब मारणा-या मित्रांची आपल्याकडे कमतरता नाही आहे. बरेचजण जाऊ म्हणाले. काहींना येण्याची ईच्छा असुनही येता आले नाही, मी येणार म्हणणारे आदल्या दिवशी गायब झाले आणि असे करता करता आम्ही दोघेच राहीलो. मी आणि को-रायडर. दोघांचाही निश्चय पक्का असल्यामुळे ईतर सभासद मागे हटले तरी आम्ही मागे हटलो नाही, ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी सकाळी आम्ही सायकलवर गोव्याला प्रस्थान केले.
माझा आणि को-रायडरचा दोघांचाही सायकल चालवण्याचा वेग चांगला आणि एकसारखा असल्यामुळे पुणे ते कोल्हापूर हे अंतर आम्ही बारा तासात पूर्ण केले (चहा-नाष्टा, जेवण व विश्रांतीच्या वेळा धरून). घरून निघताना आम्ही भल्या पहाटे ऊठण्याचा त्रासही घेतला नाही (स्मार्ट थिंकींग). आम्ही सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सिंहगड रोडवरील हायवे पूलापासुन राईडला सुरूवात केली. पुणे ते कोल्हापूर रस्ता सायकल चालवण्यासाठी भन्नाट आहे. यामध्ये कात्रजचा नविन घाट आणि खंबाटकी हे दोन मध्यम श्रेणीतील घाट लागतात. हे दोन घाट पार करताना जर तूम्ही संयम राखला तर तुम्ही आरामात कोल्हापूरला पोचणार एवढे मात्र नक्की. शिरवळ, सातारा, उंब्रज, कराड इ. गावे रस्त्यात लागतात. नसरापूर ओलांडल्यावर गूळाचा चहा, खंबाटकी सुरू होण्याअगोदर कांदा-पोहे, सातारामध्ये चहा-बिस्कीट आणि कराडमध्ये मसाला डोसा आणि उथप्पा असा विवीध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत घेत आम्ही कोल्हापूरला पोचलो. पाण्याच्या बाटलीत स्टेडफास्टचे सेनर्जी आणि मागच्या खिशातील पिनट बटर ठेवलेले होते जे मी अधुन-मधुन खात होतो. अशा प्रकारे खाण्यापिण्यावर व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे पूर्ण दिवसभर सायकल चालवण्याचा ऊत्साह जरासुद्धा कमी झाला नाही. लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये हेच सर्वात महत्वाचे असते. सूर्यास्त झाल्यावर आम्ही कोल्हापूरात पोचलो जिथे आम्ही पहील्या दिवसाचा मुक्काम करणार होतो. सायकलला सहा किलो वजन लावलेले असताना देखील २२५ किमी अंतर १२ तासात पार केले आणि संध्याकाळी हॉटेलवर विश्रांती घेतली. रात्री कोल्हापूरात तांबडा-पांढरा जेवणाचा आस्वाद घेतला. गोवा सायकल मोहीमेतील एक टप्पा पार झालेला होता. 











दिवस - २ 
कोल्हापूर ते म्हापसा १८५ किमी

कोल्हापूरातुन पहाटे लवकर राईडला सुरूवात केली. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाकडुन महामार्गावर पोचलो. महामार्गावरील मोकळया वातावरणात कर्नाटक राज्याच्या हद्दीत सूर्योदयाचे नयनमनोहर दृश्य पहावयास मिळाले. अशा मोकळ्या वातावरणात सूर्योदय पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सकाळच्या रम्य वातावरणात आम्ही तवंदी (तौंदी) घाटाच्या माथ्यावर (गोवाफाटा) पोचलो. सायकल चालवुन फार भूक लागते त्यामुळे हॉटेल कावेरीमध्ये मनसोक्त नाष्टा केला. जे समोर येईल ते घशाखाली ढकलणे, तिथे आवड-निवड करायला वेळ नसतो. सायकल बाहेर लावुन हॉटेलात बसलो कि बाहेर लावलेल्या सायकलमध्ये जीव अडकलेला असतो. सायकलवर सतत लक्ष ठेवावे लागते. सायकल चोरीला जाण्याची भिती दूसरे काय. माझ्या सायकलिंगच्या वेशभूषेकडे हॉटेलमध्ये बसलेले आणि गोव्याकडे निघालेले लोक असे बघत होते जसे काही एखादा परग्रहावरील प्राणी पाहत आहेत. पण मला आता याची सवय झालेली आहे. नाष्टा झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता आम्ही सायकल चालवायला सुरूवात केली. आजरा-निपाणी लिंक रस्ता, आंबोली-आजरा रस्ता तसेच बेळगाव-सावंतवाडी रस्त्याने सायकल चालवत आम्ही आंबोली घाटातून कोकणात उतरलो. रस्ता म्हणावा असा उत्कृष्ट नाही, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. कोकणात येईपर्यंत दूपार होऊन गेलेली होती. आंबोली घाटातील धबधबा अजूनही वाहत होता. दिवाळीनंतरही धबधब्यातून वाहणारे पाणी पाहुन मला आश्चर्य वाटले. घाटमाथ्यावरून कोकणात नजर टाकल्यानंतर दिसणारे सौंदर्य नजरेत सामावून घेता येत नव्हते. आंबोली घाटातून कोकणात नजर टाकल्यानंतर जी काही दृश्य दिसत होती ती सर्वच्या सर्व विलोभनीय होती. आंबोली घाटाच्या उतारावरून सायकल चालवताना एखाद्या घनदाट अरण्यातून चाललो आहे असा भास होत होता. घाट उतरल्यावर सरळ सावंतवाडीकडे न जाता चेकपोस्टवरून आम्ही डावीकडे वळालो. को-रायडरला हा रस्ता माहीत असल्यामुळे मी फक्त को-रायडरच्या सूचनांचे पालन करत होतो. बावळाट मार्गे (रस्ता भयानक अवस्थेत होता)  तेरेखोल नदीच्या बाजूने जाता जाता आम्हाला वाफोली धरण लागले. वाफोली धरणापासुन ते मुंबई-गोवा महामार्गापर्यंतच्या रस्त्याची स्थिती ऊत्तम होती त्यामुळे ते अंतर लवकर पार झाले. गोव्यात जाताना भालेकर भोजनालय लागले पण ती वेळ जेवण करण्याची नव्हती. भालेकर भोजन कार्यक्रम पुढच्या वर्षी नक्की करण्यात येईल जर पुन्हा गोव्याला गेलो तर. संध्याकाळच्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्हा पार करून आम्ही गोवा राज्यामध्ये मध्ये प्रविष्ट झालो. मुंबई-पणजी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. गोव्यामध्ये सपाट नावाचा रस्ता औषधाला सुद्धा नाही. चढ आला की उतार अन उतार संपला कि पुन्हा चढ. एक चढ चढायचा तो उतरायचा कि लगेच दूसरा चढ. गोवा म्हणजे न संपणारा चढांचा खेळ जो पायांना नकोसा वाटतो विशेषकरून जेव्हा तुम्ही शंभरहून अधिक किमी खराब रस्त्यावरून सायकल चालवत आलेला असता. त्यावेळेस हा चढांचा खेळ म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा वाटत होता. त्यात हॉटेलचा पत्ता शोधताना रस्ता चूकलो. मग तर विचारूच नका. शेवटी कसेबसे को-रायडरने गोव्यात बुक केलेले हॉटेल शोधले आणि एकदाचा सायकल चालवण्याच्या श्रमातून त्यादिवशी मुक्त झालो.


































दिवस - ३
गोवामध्ये भटकंती

माझ्या को-रायडरला गोव्याची ईत्यंभुत माहीती असल्यामुळे मला कसलीही शोधाशोध करावी लागली नाही. गोव्यातील उत्तम बीचवर जाऊन समुद्राचा आनंद घेता आला आणि उत्तमातील उत्तम हॉटेलात जाऊन गोव्यातील खाद्यपदार्थ तसेच व्हिस्कीचा आस्वाद घेतला. गोव्यामध्ये जाऊन जे करायला हवे ते सर्व केले. थोडक्यात जीवाचा गोवा केला. अशा रीतीने माझी पहीली गोवा भेट अविस्मरणीय ठरली.  


















दिवस - ४
म्हापसा ते कणकवली

लगेच परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळही झाली. परतीचा प्रवास आम्ही तळकोकणातून करणार होतो. गोव्यातील सूर्योदय पाहून सायकल चालवायला सुरूवात केली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला, कुडाळ मार्गे कणकवली मध्ये मुक्काम करावयाचे ठरवलेले होते. परतीचा सायकलचा प्रवास एवढा उत्कंठावर्धक होईल याची मी कल्पनाही केलेली नव्हती. रस्त्याच्या बाजूने पसरलेल्या निळ्याशार समुद्राच्या पाण्याकडे पाहत सायकल चालवणे हा एक स्वर्गीय आनंद होता. समुद्र, गोवा आणि सायकल यामध्ये मी एवढा हरवुन गेलो होतो कि मला तारीख व वाराचे भान राहीलेले नव्हते. एका ठिकाणी एक महाशय डोलत-डुलत कथ्थक नृत्य करत आमच्याशी  इंग्रजीमध्ये बोलले त्यावरून मी ओळखले कि आज रविवार आहे. यशवंतगडाचा रस्ता शोधत असताना आम्ही चूकुन सिद्धेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यशवंतगडाच्या जवळच समुद्रकिना-याला लागुनच असलेले सिद्धेश्वराचे मंदिर सुंदर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजुचा निसर्ग त्याच्या सौंदर्यात प्रचंड भर घालतो. नैसर्गिक सौंदर्य काय असते ते येथे अनुभवयास मिळाले. सौंदर्य पाहुन तृप्त झालेले डोळे आणि प्रसन्न झालेले मन यामुळे याठिकाणी आत्मिक शांती मिळाली. यशवंतगड हा कोकणातील जांभा तसेच चिरा या लाल दगडांपासुन बनवलेला आहे. लाल दगडांमध्ये केलेले बुरूजांचे आणि दरवाजाचे बांधकाम पाहताक्षणी लक्ष वेधून घेते. निळ्या समुद्राच्या कडेला नारळांच्या झाडांच्या सोबतीने स्थित असलेला हा लाल रंगाचा किल्ला अतिशय ऊठून दिसतो. यशवंतगडाचे मनमोहक आणि विलोभनीय सौंदर्य डोळ्यात साठवल्यानंतर आम्ही वेंगुर्ल्याकडे निघालो. वेंगुर्ला खूप छान आहे. येथील नैसर्गीक सौंदर्य अजूनही अबाधित आहे. शहरी मनुष्यांची वर्दळ ईकडे कमी आहे. त्यामुळे ईकडची बीच स्वच्छ, कमी गर्दीची आणि नैसर्गीक सौंदर्याने नटलेली आहेत. मुंबई-पुण्यापासुन लांब अंतरावर असल्यामूळे वेंगुर्ला वाचला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्हैचिआड्जवळ एक अतिशय सुंदर तळे आहे. त्यामध्ये शेकडो सुंदर श्वेतकमळे सर्वदूर बहरलेली होती. एखाद्या परीकथेत शोभतील अशी. एखाद्या श्वेतकमळाला हात लावला तर समोर एखादा यक्ष प्रकट होऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लावेल असेच क्षणभर वाटले. ती श्वेतकमळे अतिशय सूंदर होती. 
वेंगुर्ल्यामध्ये अस्सल कोकणी वातावरण अनुभवयास मिळत होते. वेशभूषा, बोलीभाषा, मच्छीबाजार, सभोवताली डोलणारी नारळाची झाडे तसेच सुक्या मासळीचा गंध यामधुन कोकण ओतप्रोत ओसंडुन वाहत होते. को-रायडरने दूपारच्या भोजनासाठी वेंगुर्ल्यातील रेडकर भोजनालय निवडले. अतिशय माफक दर आणि चविष्ट जेवण. त्यात भात आणि कढी अमर्यादीत. मला आणि माझ्या को-रायडरला हे हॉटेल अतिशय स्वस्त वाटले. सायकल चालवुन भूक लागलेली असल्यामूळे मी दम लागेपर्यंत रस्सा आणि भात खात राहीलो तसेच सुरमई, कोळंबी, सोलकढी आणि पूरणपोळी या पदार्थांवर सुद्धा आडवा हात मारला. थोडक्यात मी अजगर झालो होतो.  खाल्लेल्या पदार्थांच्या मानाने आलेले बिल हे फारच नगण्य होते. आता आम्हाला कुडाळकडे प्रस्थान करावयाचे होते. जेवण उरकल्यावर आम्ही लगेच कुडाळच्या दिशेने सायकल वळवल्या. वेंगुर्ला ते कुडाळ या प्रवासात पुन्हा चढ-उतार यायला लागले होते. भरपेट जेवणामुळे सायकल चालवणे जड जात होते परंतू आम्ही कुठेही न थांबता आणि वेळ न दवडता थेट कुडाळ गाठले. कुडाळमध्ये लिंबू-सरबत प्यायला थांबलो. सायकल महामार्गावर  आल्यावर वेगाने पळायला लागल्या. त्यामुळे आम्ही कणकवलीच्या दिशेने सूसाट गेलो. कुडाळ ते कणकवली आम्ही एवढे सूसाट गेलो कि या सेगमेंटमध्ये मला KOM (King of Mountain) आणि को-रायडरला QOM (Queen of mountain) मिळाला. कणकवलीमध्ये राहण्यासाठी उत्तम हॉटेल मिळाले. आम्ही हॉटेल रिलॅक्समध्ये मुक्काम केला.

































































दिवस ५
कणकवली ते कोल्हापूर

या मार्गाने जाण्याच्या माझ्या आणि को-रायडरच्या योजना वेगवेगळ्या असल्यामूळे को-रायडर आणि मी स्वतंत्रपणे राईड करत कोल्हापूरला जाणार होतो. कणकवली ते तळेरे महामार्गाने आणि तळेरेपासुन उजवीकडे  वळून वैभववाडी कडे असा पल्ला गाठावयाचा होता. कसलीही घाई नसल्यामुळे मी राईडला निवांत सुरूवात केली. महामार्गाने येताना सूर्योदय पहावयास मिळाला. एके ठिकाणी चहा-बिस्कीट खायला थांबलो. वैभववाडी रेल्वेफाटकाजवळ आल्यावर माझ्या सायकलची चेन तुटली. आजतागायत माझ्या सायकलची चेन कधीही तुटलेली नव्हती त्यामुळे हि समस्या माझ्याकडुन सुटेल असे मला वाटले नव्हते. लांबच्या प्रवासात अशा प्रकारच्या समस्या सोडवता येणे अतिशय महत्वाचे असते. मी सायकलचे दूकान शोधत होतो. पण तेवढयात मला पंक्चरवाला दिसला. त्याच्याकडे गेलो पक्कड आणि स्क्रु-ड्रायवर घेतले आणि सर्व कौशल्य पणाला लावून  चेन पून्हा जोडली. पांडूरंगाचे आभार, संकटे देणारा तोच आणि त्यातून बाहेर काढणाराही तोच. वेळ वाया जाण्याव्यतिरीक्त चेन तुटण्याच्या संकटाने दूसरे काहीही केले नाही. खर्चही शून्य आला. वैभववाडीत एक चहा घेऊन करुळ घाटाशी सामना करायला निघालो. करूळ घाट सुरू होताना पोलिस चेकपोस्ट आहे. त्यांनी माझी बॅग तपासण्याची तसदी घेतली नाही. माझ्यापुढे चाललेल्या कारला थांबवुन डीक्की वगैरे सर्व उघडुन, गोव्यावरून जाताना दारूच्या बाटल्या तर घेऊन चालले नाहीत ना? याची खात्री केल्यावरच त्यांना सोडले. 
घाट सुरू होताच सह्याद्रीचा पहारेकरी गगनगड समोर दिसला. सभोवतालच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला गगनगड तेवढाच कणखर आणि दणकट भासत होता. घाटातील सौंदर्य जागोजागी टिपत मी करूळ घाटातून वरवर येत होतो. रस्ता कसा आहे? या समस्त सायकल जमातीला भेडसावणा-या प्रश्नाचे उत्तर तर द्यावेच लागेल. करूळ घाटातील रस्त्याचे काम सुरू आहे. निम्म्या अंतरापर्यंत काम झालेले आहे (सुपर फिनिश आहे) आणि निम्म्या अंतराचा रस्ता दगडाच्या खाणीसारखा आहे (किमान सायकल साठी तरी). त्यामूळे निम्मा घाट लवकर पार करूनही राहीलेले निम्मे अंतर पार करायला नाकी नऊ आले त्यात ऊन्हाचा तडाखा बसला.  मग तर विचारूच नका. घाटमाथ्यावरून दिसणारे कोकणचे सौंदर्य पाहतच रहावे असे आहे. सह्याद्रीचे नयनमनोहर रूप डोळ्यात साठवत करूळ घाट पार केला आणि गगनबावडा आला. गगनबावडा आला तरी मोबाईलला रेंज आलेली नव्हती आणि ती कोल्हापूर येईपर्यंत काही आली नाही. गगनबावडा ते कोल्हापूर हा रस्ता अतिशय उत्तम आहे. रस्त्याच्या आजूबाजूला झाडी आहे त्यामुळे ऊष्णता जाणवली नाही. या रस्त्यात कुठेही चढाचा अडथळा आला नाही. रस्त्याच्या दूतर्फा गावे आहेत. दूपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी मला रंकाळा दिसला. कोल्हापूरात एक साधेसे हॉटेल शोधले जिथे जेवताना सायकलसुद्धा समोर दिसेल असे. जेवण करुन थोडी विश्रांती घेतली आणि पुण्याच्या दिशेने निघालो.   
































































दिवस ५
कोल्हापूर ते पुणे

खरंतर कणकवली ते पुणे या सायकलप्रवासाने प्रचंड क्षीण आलेला होता. कोल्हापुरात मुक्काम करून दूस-या दिवशी सकाळी पुण्याच्या दिशेने जाणे सूज्ञपणाचे ठरले असते. परंतू माझ्यातील आयर्नमॅनने हा शुद्ध भेकडपणा समजून कोल्हापूरात मूक्काम करण्याचा विचार धुडकावुन लावला. कोल्हापूर ते पुणे हा सायकलप्रवास कैकवेळा केलेला आहे आणि त्यात रात्रीच्या वेळी तर खुपदा केलेला आहे. रस्ता पायाखालचा असल्यामुळे मीही प्रवास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. थकवा आलेला असल्यामूळे अतिशय निवांतपणे सायकल चालवत रात्री नऊ वाजता कराड गाठले. कराडमध्ये भरपेट जेवण केले आणि रात्री २ वाजता सातारा गाठला. जिथे चहाची टपरी दिसेल तिथे पाणी आणि चहा-बिस्कीट घेत राहीलो. रात्रीच्या प्रवासात स्टेडफास्ट न्युट्रिशनच्या पिनट बटरने भरपूर ऊर्जा दिली. खंबाटकी बोगदा येईपर्यंत पहाटेचे चार वाजले होते. तिथे मी भरपूर विश्रांती घेतली. रात्रीच्या वेळेस असंख्य लोक भेटले, सायकलवरून गोवा करून आलोय म्हटल्यावर त्यांनी खूप कौतुक केले, ब-याचजणांनी  सेल्फी काढल्या, मोबाईल नंबर पण घेतला. जे प्रेरणा घेतील ते घेतील आपण आपले काम करत राहणे. बस एवढंच. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत सूर्योदय पहावयास मिळाला. मजल-दरमजल करत कात्रजचा बोगदा गाठला आणि बोगदा आला म्हणजे घर आले. तिथुनच सौ. ला फोन केला बोगद्याजवळ आलो आहे, हे ऐकल्यावर तिलासुद्धा खुप आनंद झाला. अशा रीतीने सहाव्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी घरी पोचलो.
पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे असे एकूण ८७५ किमी अंतर सहाव्या दिवशी सकाळी पुर्ण झाले. पुणे ते गोवा बरेचजण करतात परंतू घरापासून गोवा आणि गोव्यापासुन घर (पुणे) हे अंतर सायकलवर पार करणारा मी एकमेव तर म्हणता येणार नाही परंतु दूर्मिळ नक्कीच आहे. असंच आपलं जगावेगळं काहीतरी माझ्या हातून घडत राहो.















8 comments:

  1. जबरदस्त सर!! खूप छान लिहिलं आहे.

    ReplyDelete
  2. विजय दादा, एक नंबर 😊

    ReplyDelete
  3. आपला ब्लॉग वाचून SRT अल्ट्रा रन पूर्ण करायला खूप मदत झाली आणि वेळेत पूर्ण झालं 🙂🙏

    ReplyDelete
  4. Tioga Wedding Bars | Titanium Artisan Art
    Tioga Wedding titanium wedding bands Bars in titanium nitride gun coating Titanium, United States. A premier destination wedding venue with titanium white dominus price stunning views. micro touch hair trimmer Specialty Wedding, Wedding, snow peak titanium flask Wedding & Wedding Halls, Wedding Halls, Wedding Halls,

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...