Monday, 21 December 2020

माझे एवरेस्टींग

 माझे एवरेस्टींग 

माऊंट एवरेस्टची समुद्रसपाटीपासुनची ऊंची जवळजवळ 8848(+1) मीटर आहे. कोणत्याही ठिकाणी सायकल चालवुन एवरेस्ट एवढी उंची गाठणे म्हणजेच एवरेस्टींग होय. एवरेस्टींग म्हणजे एवरेस्टवर जाणे नव्हे. कोणताही एखादा चढ निवडावा, छोटा असो वा मोठा, तो बर्याच वेळा वर-खाली केल्यानंतर एवरेस्ट एवढी उंची आली कि एवरेस्टींग झाले असे समजावे. या उंचीला एवरेस्टींगचा दर्जा मिळण्यासाठी या राईडची लिंक (फक्त स्ट्रावा) एवरेस्टींग टिमला पाठवावी लागते. त्यांची संमती मिळाली कि आपले नाव एवरेस्टींगच्या वेबसाईटवर "हॉल ऑफ फेम" मध्ये कायमस्वरूपी नोंदवले जाते. एवरेस्टींग हाफ (4424मी) आणि फूल (8848मी) असे दोन प्रकारे करता येते. एवरेस्टींगचे वैशिष्टय म्हणजे यासाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नसते (सध्यातरी). कसलीही प्रवेश फि नाही, विमानप्रवास नाही, ना कसला हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च त्यामुळे यासाठी पैशाची आवश्यकता नसून फक्त कतृत्वाची गरज आहे. ज्या सायकलपटूंना आर्थिक परीस्थिती अभावी आपले कर्तब दाखवता येत नाही त्यांच्यासाठी एवरेस्टींग हि सुवर्णसंधी आहे. नेहमी प्रवेश फि आणि ईतर खर्चाबद्दल तक्रारी करणा-यांनी हे एवरेस्टींग अवश्य करावे. एवरेस्टींगचे नियम एकदम साधेसोपे आहेत ते म्हणजे एकदा सुरू केले कि एवरेस्टींग पूर्ण होईपर्यंत झोपायचे नाही आणि चढावर सायकल घेऊन चालत जायचे नाही. तुमच्यावर पाळत ठेवायला कोणीही नसते त्यामुळे खिलाडुवृत्ती आणि विश्वास या दोन गोष्टींवरच एवरेस्टींग अवलंबून आहे.


साधारण ऑक्टोबर महीन्यात मला हे एवरेस्टींगचे खुळ माहीत झाले. माझी चढावर सायकल चालवण्याची आवड बघता याविषयी ऐकल्या ऐकल्या मी याला स्पष्ट नकार दर्शवला आणि लांबूनच नमस्कार केला. कारण सायकल चालवताना येणारा चढ हा काही माझा आवडीचा विषय नाही. चढ हा मला नेहमीच नकोसा वाटत आलेला आहे. चढाचे आणि माझे कधीही जमले नाही. पण यामध्ये एक आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे "हाफ एवरेस्टींग". यामध्ये फक्त 4424 मीटर उंची होईपर्यंत सायकल चालवावी लागणार होती. "कर के देखते है ना यार" म्हणून मी हाफ एवरेस्टींगचा विचार करायला लागलो. परंतू या विचाराने सुद्धा माझ्या मांडया थरथरायला लागल्या होत्या. पण म्हटले .."होऊ दे खर्च..." एकदा करावयाचे ठरवल्यावर "हाचि नेम आता...ना फिरे माघारी". आता माघारी फिरायचे नाही. मग मी माझा एवरेस्टींगचा अभ्यास करायला सुरूवात केली. काय करता येईल? कसे करता येईल? कुठे करता येईल? याचा अभ्यास करून मी हळुहळू माझी रणनीती बनवु लागलो. बरेचजण अर्धवट माहीतीच्या आधारे एवरेस्टींगची माहीती देत होते. आणि त्यात ज्यांनी एवरेस्टींग केलेले नाही असे लोकच जास्त सल्ले देत होते. मी सर्वांचे ऐकुन घेत होतो. "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे" शेवटी मी माझ्या मनाप्रमाणेच केले. सर्वप्रथम मी एवरेस्टींगच्या वेबसाईटवर  जाऊन एवरेस्टींगबद्दल सखोल माहीती घेतली आणि मगच माझ्या एवरेस्टींगचे नियोजन करायला सुरूवात केली. मला भेडसावणारी एकच गोष्ट त्यात होती ती म्हणजे एकदा एवरेस्टींगला सुरूवात केली कि ते पूर्ण होईपर्यंत झोपायचे नाही आणि सुखदायक बाब ही होती कि पूर्ण करायला कितीही वेळ लागला तरीही चालणार होते. 


संतोष झेंडेने (सासवडचे सुभेदार) तयारी दर्शवल्यावर आम्ही एवरेस्टींगसाठी किल्ले पुरंदरची निवड केली. पुरंदर किल्ला हा स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. एवरेस्टींगसाठी याहून श्रेष्ठ काय असू शकते. छ्त्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेचा परीणाम असा झाला कि दिवाळीच्या अगोदर मी, संतोष आणि शंतनु फक्त सरावासाठी पुरंदरवर गेलो होतो पण सराव करता करताच आम्ही थेट हाफ एवरेस्टींग पूर्ण केले. ब्रिटीशांनी मराठयांची प्रेरणास्थाने नेस्तनाबूत का केली असावीत याचे कारण मला कळाले. ईथे गवतालाही भाले फुटतात. हाफ एवरेस्टींगचे पुढचे सोपस्कार पूर्ण केले आणि लगेच हाफ एवरेस्टींगच्या हॉल ऑफ फेममध्ये आमची नावे झळकली सुद्धा. हॉल ऑफ फेममध्ये नावे झळकल्यावर माझा हुरूप वाढला. यानंतर एवरेस्टींगचा खरा सराव करायला सुरूवात केली. आता फक्त आणि फक्त चढावर सायकल चालवायला सुरूवात केली. आम्ही पुरंदरवरच फुल एवरेस्टींग करणार होतो. परंतू सरावासाठी मी मरीआई घाट निवडला. पुरंदरच्या चढासाठी मरीआआई घाटाचा सराव म्हणजे ससा मारण्यासाठी एके-47 चा वापर करण्यासारखे होते. "अपना ऐसाच रहता है.." काही दिवस मुक्काम पोस्ट मरीआई घाटच होता. याच कालावधीत पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे अशी 875 किमीची सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. एवरेस्टींगचा सराव म्हणून या मोहीमेच्या शेवटच्या दिवशी न झोपता सलग २८ तास सायकल चालवली. एकदा मध्यरात्री कामावरून सूटल्यावर न झोपता तसाच राईडला गेलो आणि आंबेनळी घाट करून आलो (पुणे पोलादपुर पुणे). सह्याद्रीतील सर्वात लांब अंतराचा (32किमी) म्हणून ओळखला जाणारा आंबेनळी घाट भर ऊन्हात सायकलवर चढणे हि प्रयत्नांची पराकाष्ठा होती. असा सर्व प्रकारचा एवरेस्टींगला अनुकूल असा सराव झाल्यानंतर लवकरात लवकर एवरेस्टींग करून घेणे मला आवश्यक वाटत होते. ते म्हणतात ना, "लोहा गरम है, मार दो हाथोडा". 


१२ डिसेंबरला (शनिवार) पुरंदरवर एवरेस्टींग करण्यासाठी कोणीही तयार झाले नाही तसेच आर्मीची परवानगी घेणे हा क्लिष्टदायक प्रकार करावा लागणार होता. अमावस्येच्या अंधारात पुरंदरवर एकटयाने सायकल चालवणे सुरक्षित वाटत नव्हते कारण तिथे बिबटया आहे. त्यामुळे पुरंदरवर एवरेस्टींग करण्याचा बेत मी पुढे ढकलला. काहीही झाले तरी या आठवडयाच्या शेवटी एवरेस्टींगचा प्रयत्न करायचाच असे मी ठरवले. मी एक-दोनदा धायरीगावातील डिएसके विश्वच्या चढावर सराव करण्यासाठी गेलो होतो. एवरेस्टींग करण्यासाठी कोणताही चढ चालतो मग डिएसके विश्व काय वाईट आहे? सर्व बाबींचा विचार करून झाल्यावर डिएसके विश्वच्या चढावर एवरेस्टींग करण्याचे ठरवले. शनिवारी पहाटे साडेचारला ऊठुन सकाळच्या शिफ्टमध्ये कामाला गेलो. दिवसभर काम करून साडेचारला घरी आलो. ताजेतवाने वाटण्यासाठी मस्त खडे मीठ घालून गरम पाण्याने आंघोळ केली. असे केल्याने थकवा कमी होण्यास मदत होते तसेच त्यानंतर स्नायूंना वात येत नाही अशी नविन माहीती मला मिळालेली आहे. त्यामुळे आता ईथुन पुढे कोणत्याही रेसच्या अगोदर मीठाच्या (खडे मीठ किंवा सैंधव) पाण्याने आंघोळ करण्यात येईल. 


धायरी गावातील डिएसके विश्व या ठिकाणी जेमतेम अर्धा किमी अंतराचा चढ आहे आणि त्यामध्ये 40 मीटर इलेवेशन मिळते. याठिकाणी एवरेस्टींग करावयाचे झाल्यास तब्बल 221 फेरे मारावे लागणार होते. जे मला फार कंटाळवाणे वाटले होते. परंतू इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामूळे मी या आव्हानास सामोरे जाण्याचे ठरवले. सौ. बरोबर चर्चा करून माझी योजना तिला सांगितली कारण तिच्या सहकार्याविना हे शिवधनुष्य पेलणे शक्यच नव्हते. एवरेस्टींगची तयारी करण्यामध्ये सौ. चे मोलाचे सहकार्य लाभले. मी जे जे सांगितले होते ते ते तिने सर्व तयार करून ठेवले होते. एवरेस्टींगला जाताना सायकलला लागणारे सर्व साहीत्य, भरपूर पाण्याच्या बाटल्या, रसद (खाण्याचे पदार्थ) आणि स्टेडफास्ट न्युट्रीशन (पीनट बटर, पॉवर प्रोटीन, सेनर्जी, कार्बोरन्स ई.) कारमध्ये भरले आणि डिएसके विश्वला पोचलो. माझी कार सेगमेंटच्या जवळ वाहतूकीला अडथळा होणार नाही आणि पोलिस उचलून नेणार नाहीत अशा ठिकाणी लावली. डोळे मिटून एकदा पांडूरंगाचे स्मरण केले. माझ्या हृदयाची धडधड वादळापूर्वीची शांतता अनुभवत होती. मी दिर्घ श्वासोच्छवास करू लागलो.  


डिएसके विश्वचा चढ जरी छोटा असला तरी याठिकाणी असलेल्या सोईसुविधा एवरेस्टींग करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत हे माझ्या अभ्यासू नजरेने हेरले होते. दूतर्फा झाडे जी दिवसा सावली देऊ शकतील, रस्त्यावरील दिवे जे रात्रीच्या वेळी अतिशय उपयुक्त आहेत, संपूर्ण रस्त्यावर रस्तादूभाजक आहेत ज्यांच्यामुळे उतारावरून जोरात येणा-या वाहनांचा कसलाही त्रास नाही, सेगमेंटच्या सुरूवातीला सुरक्षारक्षक आणि सेगमेंटच्या शेवटीही सुरक्षारक्षक...बस्स अजून काय हवंय आपल्याला?. ईथे कोणी दमदाटी करण्याची किंवा लूटालुट होण्याची शक्यता फारच कमी वाटली. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यामूळे ईथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नव्हती.


सूर्यास्त होऊन गेलेला होता. सायंकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी पेडल मारायला सुरूवात केली. दर एक तासाला ब्रेक घेऊन पाणी, चहा, इलेक्ट्रोलाईटस, केळी, खजूर, चिक्की जे हाताला लागेल ते पोटात ढकलुन लगेच पेडल मारायला सुरूवात करत होतो. माझ्या सोबतीला फक्त माझी कार होती. सायकल यायच्या अगोदर तिच्याच साथीने मी फिरायला जायचो. आज तीच माझी क्रू मेंबर होती. सोबतीला कोणी नसल्यामूळे स्टेडफास्ट्ची ड्रिंक्स मला स्वत:लाच बनवुन घ्यावी लागत होती आणि कारमध्ये कुठे काय ठेवलंय हे अस्ताव्यस्त पसारा करून ठेवल्यामुळे नेमकी वस्तू शोधण्यात वेळ वाया जात होता, जर कोणी अनुभवी मेंबर सोबतीला असता तर यामध्ये वाया जाणारा वेळ नक्कीच वाचला असता. पूढच्या वेळी यामध्ये कायझेन सुधारणा करण्यात येईल. सेगमेंटचे अंतर कमी असल्यामूळे सायकलला कोणतेही साहीत्य लावले नाही. सायकलला जेवढी हलकी ठेवता येईल तेवढी हलकी ठेवण्याचा प्रयत्न केला. सिपर बाटलीसुद्धा अर्धीच भरून घेतली होती. पंक्चर किट, मिनी पंप, बॅग, ट्युब्स इ. सर्व साहीत्य काढुन कारमध्ये ठेवलेले होते. मोठा पंपही सोबत होताच त्यामुळे सायकल पंक्चर झाली तर हवा भरताना होणारी दमछाक होणार नव्हती. सायकलला मागचा दिवा, पूढचा दिवा आणि अर्धी भरलेली सिपर बाटली एवढेच साहीत्य लावलेले होते. सायकलच्या कमी वजनाचा फायदा चढ चढताना होणार होता. पहील्या दोन तासात मी तीस फेरे मारले आणि थोडी विश्रांती घेतली. तीन तास झाल्यावर मी थोडा नाष्टा केला. 


रात्री साडेनऊनंतर रस्त्यावरील वर्दळ अतिशय कमी होऊ लागली. या सेगमेंटमध्ये एक हेअरपिन वळण आहे तिथे थोडासा ब्रेक दाबावा लागत असे. नंतर उतारावरील लुडबूड कमी झाल्यावर उतारावरून सुसाट जायला लागलो. आता एलेवेशनचे आकडे पटापट वाढत चालले होते. रात्रीच्या वेळी खूप थंडी वाजेल अशी अपेक्षा होती परंतू वातावरण नेमके उलट होते. उकाडा जाणवत होता आणि थंडी वाजण्याऐवजी सायकल चालवुन मला घाम यायला लागला होता. घामाने कपडे ओले झाले होते. उतारावरून वेगात गेल्याने सुद्धा म्हणावी अशी थंडी वाजत नव्हती. घामाने भिजल्यामुळे ऐन मध्यरात्री मला जर्सी बदलावी लागली. सिक्युरीटी गेटजवळील एक कुत्रा सुरूवातीला माझ्यावर भूंकला परंतू मी एवढया वेळा वर-खाली करत होतो कि नंतर त्याला माझ्यावर भूंकण्याचा कंटाळा आला. तोच नंतर माझा मित्र झाला आणि माझ्यावर भूंकणा-या दूस-या कुत्र्यावर भूंकला. एवढीच काय ती रात्रभर मिळालेली सोबत. त्याला एक सॅंडविच खायला दिले पण त्याने काही ते खाल्ले नाही. रात्री ऊशिरा फक्त एका कारवाल्याने मला विचारण्याची तसदी घेतली. त्याला एवढेच सांगितले कि सराव चालू आहे, एवरेस्टींग चालू आहे असे जर बोललो असतो तर माझ्याच डोक्याला ताप झाला असता कारण त्याने एकतर घेतलेली होती आणि व्यवस्थित समजावुन घेतल्याशिवाय तो काही गेला नसता. आजकाल सायकल चालवण्यापेक्षा अशा फालतू चौकशांना उत्तरे देणे मला फार तापदायक वाटते. रात्री दोन वाजता आणि पहाटे चार वाजता असे दोन-दोन तासानंतर मी ब्रेक घेतले. दर दोन तासांनी जे जे खायचे ठरवलेले होते ते ते मी खात पीत होतो (भूक लागो अथवा न लागो). 


सूर्योदय पहावयास मिळाला नाही कारण ढग आणि धूके दोन्हीही आलेले होते. ते पाहुन पाऊस येईल असे वाटायला लागले होते. सूर्याची कोवळी किरणे न पहावयास मिळाली न पृथ्वीस त्यांचा स्पर्श झाला. बारा तास होऊन गेले तरीही माझे हाफ एवरेस्टींग झालेले नव्हते. हाफ एवरेस्टींग पूर्ण व्हायला 14 तास लागले त्यावरून मला कळले कि काहीतरी गडबड आहे. 40 मीटर सेगमेंटचे 110 फेरे झाल्यावर हाफ एवरेस्टींग होणे अपेक्षीत होते परंतू ते तसे झाले नाही. ढगाळ वातावरणामूळे दिवसा ऊन्हाचा त्रास जाणवला नाही. सौ. ने चहा, नाष्टा व जेवण सर्व अगदी वेळेत पाठवले. सर्व रसद घरून येत असल्यामूळे मला काहीही विकत घ्यावे लागले नाही आणि कसलीही प्रवेश फि नसल्यामूळे या एवरेस्टींगसाठी आलेला खर्च हा शून्य म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. 


दूपारनंतर माझा वेग थोडा मंदावला. सायकल पळवणे जड जाऊ लागले. चाकातील हवा कमी झाली असेल असे समजून नेहमीप्रमाणे दोन्ही चाकात पून्हा हवा भरून घेतली. चाकातील हवा कमी झालेली नव्हतीच पण तेवढीच मनाची समजूत काढून घेतली. खरंतर माझ्या मांडयांमधील हवा कमी होत चाललेली होती. मला हळूहळू थकवा यायला लागलेला होता. माझे इंधन संपत आलेले होते. मग मी सोबत जे जे आणले होते ते सर्व प्रकारचे इंधन पोटात भरले. थोडी विश्रांती घेतली आणि पून्हा जोमाने सुरूवात केली. विश्रांती घेण्याचा फायदा झाला. मंदावलेला वेग पून्हा वाढला. इलेवेशनचे आकडे आता चांगलेच वाढलेले होते परंतू चोवीस तास होत आले तरीही एवरेस्टींग संपण्याचे नाव घेईना. खरंतर एव्हाना संपायले हवे होते. 24 तासांचा कालावधी खूप आहे. संध्याकाळच्या वेळेस माझा मित्र गणेश मला भेटायला आला. येताना त्याने मस्त बिर्याणी आणली होती. आम्ही दोघांनी मस्त आनंद लूटला. गणेशने जे काही माझे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले तेवढेच फोटो आणि व्हिडीओ या एवरेस्टींग दरम्यान काढले गेलेले आहेत. यावेळेस मी फोटो आणि व्हिडीओ काढण्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवला नाही तसेच एवरेस्टींग दरम्यान सोशल मिडीयापासूनही लांब राहीलो.  


शेवटचे 1000 मीटर शिल्लक असताना पाऊस यायला सुरूवात झाली. पावसात सायकल चालवायला मिळणार म्हणून मी आनंदी झालो होतो पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. दिवसभर घामाने भिजलेली जर्सीसुद्धा पावसाने धुऊन निघाली नाही. पाऊस आला आणि फक्त रस्ता ओला करून निघुन गेला. रस्त्यावर चिकचिक करुन गेला. यामुळे उतारावरून खाली येताना चाक घसरून सायकल पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामूळे उतारावरून येताना ब्रेक दाबत दाबत खाली यावे लागत होते. चढावर सायकल चालवण्यापेक्षा उतारावरून खाली यायला जास्त कसरत करावी लागत होती. त्यात माझ्या सायकलचा ब्रेक हार्ड असल्यामूळे बोटांचे तुकडे व्हायचेच बाकी राहीले होते. या परीस्थितीमुळे एका फेरीसाठी लागणारा वेळ खूप वाढला. रात्रीचे अकरा वाजत आले तरी एवरेस्टींग काही संपण्याचे नाव घेईना. एवरेस्टींग संपल्यावर आम्ही पार्टी करणार होतो. पण आता एवढा उशिर झालेला आणि पाऊस आलेला पाहुन मी गणेशला घरी जावयास सांगितले. काही वेळ पाऊस थांबला होता. शेवटचे 200 मीटर इलेवेशन राहीले असताना पून्हा पाऊस आला तो काही थांबलाच नाही. रात्री 12 वाजून 02 मिनिटांनी गारमिनमध्ये 8848 मीटर इलेवेशन दाखवले आणि एवरेस्टींगची उंची गाठल्याचा आनंद माझ्या चेह-यावर झळकू लागला. ईच्छित ध्येय गाठण्याचा आनंद काही औरच असतो. एकदम काठोकाठ 8848 मीटर इलेवेशन ठेवायला नको म्हणून मी सायकलिंग तसेच चालू ठेवले. गारमिनमध्ये 8904 मीटर इलेवेशन आल्यावर ब्रेक दाबला आणि एवरेस्टींग संपवले. कसलेही लफडे नको आणि किरकिर नको म्हणून 8900+ मीटर इलेवेशन केले. माझ्या एकूण 270 फे-या झालेल्या होत्या, एका फेरीला 40 मीटर याप्रमाणे 10,800 मीटर इलेवेशन यायला हवे होते. परंतू गारमिन दर फेरीला वेगवेगळे रिडींग दाखवत होते. या गारमिनमूळे एवरेस्टींग करता करता माझे 10K इवरेस्टींग कधी झाले मलाच कळले नाही. हे ही नसे थोडके. शेवटी शेवटी शरीरापेक्षा माझे मन जास्त थकल्यासारखे वाटत होते. मी अजून सायकल चालवू शकलो असतो. पण सोबतीला कोणीही नव्हते त्यामूळे खूप एकटे एकटे वाटत होते. आणि एवरेस्टींगचे लक्ष्य गाठल्यावर त्यापुढे सायकल चालवायला मजा येईना. मन घराकडे धाव घ्यायला लागले होते. मग मीही घराकडे वळालो. डिएसके विश्व ते घरापर्यंतचा प्रवास अंगावर पाऊस झेलत आणि सायकल चालवतच केला. एकदाचा मी घरी पोचलो. दार उघडताच सौ. ने माझे जंगी स्वागत केले आणि माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या काही क्षणांमध्येच मी मागच्या तीस तासात अनुभवलेले कष्ट आणि सर्व क्षीण विसरून गेलो. 


मागील एक ते सव्वा महीन्यापासुन पाहीलेले हे एवरेस्टींगचे स्वप्न मी अथक परीश्रम घेऊन साकार केले. गारमिनच्या कृपेमुळे (खरंतर राग आला होता) 10K एवरेस्टींगही झाले. एका बाणात दोन शिकार झालेल्या आहेत. अजून काय हवंय आपल्याला. या एवरेस्टींगमध्ये इतर कोणाचीही मदत घ्यावी लागली नाही, मी पुर्णपणे आत्मनिर्भर होतो (सौ. ने केलेली मदत वगळता) आणि विशेष म्हणजे यासाठी मला कसलाही खर्च आला नाही. ना प्रवेश फि भरावी लागली ना बाहेरून काही विकत घ्यावे लागले. मी ब-याचदा लोकांच्या तोंडुन ऐकतो, जर माझ्याकडे तेवढे पैसे असते तर मी अमुक तमूक करून दाखवले असते. असे म्हणणा-या लोकांना एवरेस्टींग करून आपले कतृत्व सिद्ध करण्याची नामी संधी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसाच असायला हवा असे काही नाही. परमेश्वराने सर्व गोष्टींसाठी पर्याय दिलेले असतात फक्त आपल्याला ते शोधता आले पाहीजेत.


स्टेडफास्ट न्युट्रीशनचे खूप खूप धन्यवाद. स्टेडफास्ट न्युट्रीशनच्या सहकार्याविना एवरेस्टींग शक्यच नव्हते. त्यांनी दिलेले पॉवर प्रोटीन, पीनट बटर, सेनर्जी आणि कार्बोरन्स यांनी एवरेस्टींग करताना माझा ऊत्साह कायम वाढत ठेवला. 10K एवरेस्टींगमध्ये स्टेडफास्ट न्युट्रीशनचे मोलाचे सहकार्य लाभले.


अशा रितीने आणि अशा प्रकारे मी 10K एवरेस्टींग फिनिशर झालो. एवरेस्टींगचा आनंद साजरा करण्यासाठी प्रिय मित्र अभि याने मला जंगी पार्टी दिली. आपल्या आनंदात आनंद साजरा करणारा जिवलग मित्र एवरेस्टपेक्षा नक्कीच कमी नाही. 



STRAVA ACTIVITY LINK







16 comments:

  1. खूप सुंदर लेख आणि खूप खूप शुभेच्छा Everesting +10k challenge पूर्ण केल्याबद्दल

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद 😊

      Delete
  2. Heartiest congratulations bro 💐💐

    ReplyDelete
  3. Ek number bhau...
    Congratulations once again...

    ReplyDelete
  4. Congratulations Vijay..
    Everest veer..

    ReplyDelete
  5. नमस्कार विजयभाऊ, मनःपूर्वक अभिनंदन, तुमची मेहनत आणि तुमच्या जिद्दीला सलाम,
    खूपच छान अनुभव लिहला आहे, असेच लिहित रहा आणि आम्हाला प्रोत्साहन देत रहा

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...