दिवस दुसरा, मढी ते सिस्सु
दिवस - २
मढी ते सिस्सु
अंतर - ५० किमी
चढ - ७६२ मी (गारमिननुसार)
श्रेणी - मध्यम कठिण
हवामान - रोहतांग पास पर्यंत अतिशय थंड,
कमी-अधिक पाऊस, त्यानंतर आल्हाददायक आणि रम्य वातावरण
जेवल्यानंतर
हात धुण्यासाठी गेलो तेव्हा मी दहा मिनिटे त्या पाण्याकडे बघत बसलो होतो. थंडीच्या
दिवसात आंघोळीला गेल्यावर आंघोळ करण्याऐवजी जसे आपण बादलीतील पाण्याकडेच नुसते बघत
राहतो तसे. आता कसा त्या पाण्यात हात घालु? नंतर कळले कि ते पाणी गरम करुन ठेवलेले
आहे. हाहाहा.. हात धुण्याची हि अवस्था तर आंघोळीचा विचारही मनात येणे शक्य नव्हते.
एखादयाने बंदुक दाखवुन जरी आंघोळ करायला लावली असती तरीही मी आंघोळ केली नसती.
गोळी घाल बाबा! पण मी आंघोळ करणार नाही असे मी निक्षुन सांगितले असते. या अशा
असह्य थंडीमुळे कधी एकदा मढी सोडतोय असे झाले होते. पहील्याच दिवशी एवढी वाताहत
झाली होती कि आता पुढे काय वाढुन ठेवलेले असेल या चिंतेने ग्रासुन गेलो होतो.
"देवाक काळजी रे...माझ्या..." या गाण्याच्या ओळी आपसुकपणे माझ्या ओठांवर
येत होत्या. कुठुन बुद्धी सुचली आणि या राईडला आलो असे मला वारंवार वाटू लागले
होते. यात भर म्हणजे पाच रायडर्सनी राईड सोडण्याचा निर्णय घेतला. बॅगा आवरुन
त्यांनी थेट घरचा रस्ता धरला. या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नाही. आजही
काही ढग मढीच्या दिशेने येताना दिसत होते ते पाहुन तर तिथुन लवकरात लवकर पळ
काढावासा वाटत होता. पहाडी वातावरण हे एखादया अल्लड तरुणीच्या मनातील लहरींसारखे
असते. कधी आणि कसा बदल होईल काही सांगता येत नाही. आज पुन्हा त्या पावसात
भिजण्याची बिलकुल ईच्छा नव्हती. मस्त ऊन अंगावर यावं असं मनापासुन वाटत होते परंतु
ऊन तर तिथे औषधालाही नव्हते. भुक लागली तर पर्याय सोबत असावा म्हणुन राईडला
निघताना दुपारचे जेवण डब्यामध्ये सोबत घेतले.
आज
मला रोहतांग पास पहावयास मिळणार होता. आजपर्यंत सिनेमात पाहीलेला रोहतांग पास आज
मी प्रत्यक्षात पाहणार होतो. रोहतांगची पहीली भेट आणि तीही सायकलवर. हा केवळ
दुग्धशर्करा योग होता. अतिशय थंड वातावरणात राईडला सुरुवात झाली. गर्दीपासुन आणि
थंडीपासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी मी सुरुवातीपासुनच सायकलचा वेग वाढवला. अतिउंच
प्रदेशातील चढावर वेगात सायकल चालवल्यामुळे माझ्या हृदयाची धडधड काही क्षणातच
आगगाडीसारखी धाडधाड करु लागली. हृदयाची धडधड वाढताच थंडीचा असर कमी-कमी होत गेला.
मी रोहतांगच्या दिशेने मार्गक्रमण करु लागलो. रोहतांगकडे घेऊन जाणारा एकेक हेअरपिन
मला रोमहर्षक वाटत होता. प्रत्येक हेअरपिनच्या वळणावरुन खाली नजर टाकुन पाहीले कि
अदभुत दृश्य पहावयास मिळत होते. बर्फाच्या सान्निध्यातील ती नागमोडी वळणे चित्त
वेधुन घेत होती. कपडयांचे तीन थर चढवलेले असुनही घामाचा लवलेशही नव्हता.
रस्त्याच्या बाजुने हिरवळ, त्या हिरवळीला बिलगुन वाहणारे झरे, कसलाही कोलाहल नाही
कि हॉर्नचा कर्णकर्कश आवाज नाही फक्त मी आणि माझी सायकल शांतपणे त्या रस्त्यावरुन
जात होतो. माझ्या सायकलचाही कसलाही आवाज येत नव्हता. रोहतांग पासचा रस्ता मला
एखाद्या ईमारतीचा जिना चढल्यासारखा वाटत होता. मी वर वर जात राहीलो तरी खालुन
येणारा सर्व रस्ता माझ्या कायम दृष्टीपथात होता आणि त्यावरुन येताना दिसणारे माझे
चिमुकले सायक्लिस्ट मित्रही पहायला फार गंमत वाटत होती. हळुहळु मी ढगांच्याही वर
जाऊ लागलो. एव्हाना सकाळी आलेल्या ढगांनी पावसाला सुरुवात केलेली होती. मी
उंचावरुन खाली कोसळणा-या पावसाकडे पाहत होतो. आकाशात ढग नसतानासुद्धा ढगांच्या
गडगडण्याचा आवाज मी अनुभवला कारण मी ढगांच्याही वर होतो. ढगांचा एकमेकांवर आदळण्याचा
धडामधुडुम आवाज होऊन मस्त पाऊस पडत होता. मी ढगांपेक्षाही उंचावर असल्यामुळे
पावसाचा एक थेंबही मला स्पर्श करु शकला नाही. मला लगेच ते व्हाटसअपवर येणारे एक
फॉरवर्ड आठवले कि पावसाच्या समस्येवर मात करण्यासाठी गरुड कसा ढगांच्याही वर जाऊन
उडतो. पाऊस आल्यावर ढगांच्याही वर जाऊन उडणा-या गरुडाला येणारा अनुभव मला
अनुभवण्याचे भाग्य लाभले. अजुन वरवर गेल्यावर मला उंचावर राहणारी गिधाडे सुद्धा
दिसायला लागली. मी, माझी सायकल, आणि त्या उंच शिखराकडे घेऊन जाणा-या रस्त्यावरील
निरव शांतता त्या गिधाडांच्या आवाजाने भंग पावली. पुढे गेल्यावर राणी नाला लागला.
तिथे फोटो घेण्यासाठी आवर्जुन थांबलो. बर्फाचा अवाढव्य थर आणि त्याखालुन वाहणारे
पाणी पाहताना फार मजा आली. तो वळणा-वळणांचा रस्ता कधी संपला ते कळले पण नाही. YHAI
चहा बनवणार-या टिमने मला थांबवले आणि चहा घेऊनच जायचे असा आग्रह केला. सर्वात पुढे
आलेला रायडर म्हणुन त्यांनी माझे खुप कौतुक केले. रोहतांग इथे समोरच आहे असेही
त्यांनी मला सांगितले. त्या अतिथंड वातावरणात गरम चहाचा एकेक घोट स्वर्गिय आनंद
देत होता. महर्षी वेदव्यास यांचे मंदिर लांबुनच पाहीले. हे ठिकाण महर्षी व्यास
यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले आहे. अशा या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी मी
पुन्हा नक्की जाणार आहे. यावेळेस मी फक्त सायकल चालवायला आलेलो असल्यामुळे इतर
कामांना प्राधान्य दिले नाही.
रोहतांगजवळील
बर्फ ब-यापैकी वितळलेला होता. त्यामुळे हा सर्व परीसर छानपैकी नजरेखालुन काढता आला.
रोहतांग (ला) लिहलेला मैलाचा दगड तर एवढा सुंदर दिसत होता कि विचारु नका. त्याच्या
सौंदर्याची मला भुरळ पडली होती. माझी खुप दिवसांची ईच्छा आज पुर्ण झाली. विरह आज
संपला होता. रोहतांग(ला) अजुन पाहीला नाही का? असे ईथे येऊन गेलेल्या मित्रांना
विचारण्याची फार खुजली असते. आज मी त्यांची ती खुजली मिटवली तेही सायकलवर येऊन.
अशा रीतीने रोहतांग(ला) सायकलवर सर करण्याचे स्वप्न पुर्ण झाले. आता पुढच्या
प्रवासाकडे लक्ष देणे गरजेचे होते. अजुन खुप मोठा पल्ला गाठणे बाकी होते. मैलाच्या
दगडापासुन पुढे उतारच उतार होता. असा उतार कि अहाहा..!! दु:खाचा चढ ओलांडल्याशिवाय
सुखाचा उतार येत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. तिथुन पुढे वातावरणामध्ये
आमुलाग्र बदल होत गेला. चढ चढताना अमावस्या आणि उतरताना पोर्णिमा म्हटले तरी वावगे
ठरणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सुर्यकिरणांचा स्पर्श झाला जो एकदम रोमहर्षक
वाटत होता. सुर्यदेवाचे दर्शन झाले आणि ऊन पहावयास मिळाले. जादुची कांडी
फिरवल्यासारखे वातावरण बदलले होते. स्वच्छ सुर्यप्रकाश आणि निरभ्र निळेनिळे आकाश
यांच्या संयोगातुन दिसणारे आजुबाजुचे नजारे एवढे सुंदर दिसत होते कि त्यांचे
सौंदर्य वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत.
रोहतांगचा
उतार संपल्यावर आम्ही थेट अटल बोगद्याजवळ पोचलो. ३२०० करोड रुपये खर्चुन बांधलेला
९.०२ किमी लांबीचा अटल बोगदा अगदी जवळ जाऊन पाहता आला. तेथील सुरक्षारक्षकाने
दिलेल्या माहीतीनुसार बोगद्यातुन सायकल चालवत जाण्यास परवानगी आहे. अटल बोगद्याचे
काम अवाढव्य आहे. या कामासाठी BRO ला सलाम! BRO म्हणजे Border Roads Organisation.
मनाली ते लेह या रस्त्याच्या कामाचा दर्जा एवढा उत्कृष्ट आहे कि या रस्त्यावर आपण
रोडबाईक सुद्धा घेऊन जाऊ शकतो. रोडच्या बाजुला BRO ने लावलेली घोषवाक्ये खुपच छान
आणि समर्पक आहेत. एक घोषवाक्य एवढे छान होते कि त्याचा फोटो काढण्यासाठी आम्ही
पुढे गेलेलो मागे वळुन आलो. बाजुने वाहणारी चिनाब नदी आमच्या सोबतच प्रवास करत आहे
असे वाटत होते. लेह-मनाली महामार्गावर जिथे नाल्यांचे पाणी रस्ता ओलांडुन वाहत
होते त्याठिकाणी हमखास एक पोलिस ऊभा असलेला दिसत होता. आमचा आजचा मुक्काम सिस्सु
याठिकाणी होता. हे ठिकाण गुगल मॅपवर MLK Day-2 Camp या नावाने पहावयास मिळेल.
मुक्कामाचे ठिकाण चिनार वृक्षांनी गच्च भरलेले होते. जवळच एक छान धबधबा आहे. तो
जिथुन कोसळत होता त्या कडयाचा आकार बदामासारखा आहे म्हणुन याला "Love
Waterfall" असे नाव पडले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी असलेली चिनार वृक्षांची
गर्दी पाहुन मला मराठीतील ते सुप्रसिद्ध गाणे आठवले, "हे चिंचेचे झाड दिसे मज
चिनार वृक्षापरी...."
एकंदरीत
सिस्सुचे वातावरण मढीपेक्षा हजारपटीने चांगले होते. राईड संपल्यावर आम्हाला
स्ट्रावा बघण्याची घाई झाली होती. याठिकाणी जिओ प्रीपेडचे मोबाईल इंटरनेट चालत
होते आणि मोबाईल हातात घेतल्यावर मग त्यातुन बाहेर पडणे अशक्य झाले.
क्रमश:
लई भारी
ReplyDeleteसुंदर वर्णन भाऊ👌👌👌
ReplyDeleteखुप छान विजू भाऊ
ReplyDeleteझकास विजयराव. मजा आला!
ReplyDeleteVijay you are great...
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete