Monday, 11 October 2021

दिवस पहीला, मनाली लेह खार्दुंगला सायकल मोहीम


सायकल मोहीम - मनाली लेह खारदुंग ला सायकलिंग (एमटीबी)

आयोजक - युथ हॉस्टेल असोसिअशन ऑफ इंडीया

कालावधी - १४ दिवस (१० जुलै ते २३ जुलै, २०२१)

शुल्क - २८००० रुपये (सर्व सुविधांसहीत)


सायकल - या प्रवासात चालवण्यासाठी लागणारी एमटीबी सायकल हि YHAI तर्फे दिली जाते. मध्यम स्वरुपातील नावाजलेल्या ब्रॅंडची उत्तम सायकल सर्व सहभागी व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार दिली जाते.

मेडीकल सुविधा - सोबत डॉक्टर, अ‍ॅम्बुलन्स, ऑक्सीजन सिलेंडर, प्राथमिक उपचार साहीत्य
सायकलिंगला लागणारे साहीत्य - हेल्मेट, ग्लोव्ज, एल्बो आणि नी गार्डस आणि रिफ्लेक्टीव बेल्ट ई. साहीत्य पुरवले जाते.

राहण्याची व्यवस्था - तंबुचे टॉयलेट (सार्वजनिक), ताडपत्री तंबु (एका तंबुत ८ व्यक्ती) तसेच झोपण्यासाठी स्लिपींग बॅग आणि चादर हे साहीत्य पुरवले जाते.

जेवणाची व्यवस्था - अमर्यादित शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली असते, जैन प्रकारचे जेवण सुद्धा बनवले जाते. चहा, सुप, वेलकम ड्रिंक, पिण्यासाठी गरम पाणी इ. तसेच १५९०० फुटांवर गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच...

जेवणाचे साहीत्य - ताट, वाटी, चमचा आणि मग (मोठा कप) हे स्वत: न्यावे लागते आणि जेवण झाल्यावर स्वत: स्वच्छ करुन ठेवावे लागते.

सायकल दुरुस्ती - सायकलला लागणारे सर्व सुटे भाग व आवश्यकता पडल्यास टायरसुद्धा पुरवले जातात.

अनुभवी मेकॅनिक - सर्व सायकल्सची व्यवस्थित देखभाल करण्यासाठी कुशल मेकॅनिक कायम सोबत असतात.

आवश्यक कागदपत्रे - आधारकार्ड, मेडीकल फिटनेस रिपोर्ट, शुगर रिपोर्ट, ईसीजी रिपोर्ट, २ फोटो, डोस घेतल्याचे प्रमाणपत्र (कोविद-१९) ई.

 कॅंपला पोचणे (१० जुलै)
 मनालीच्या अलीकडे ११ किमी अंतरावर असलेल्या युथ हॉस्टेलच्या कॅंपसाईटवर (पतली-कुहल) आपापल्या खर्चाने जायचे होते. मी पुणे ते चंदिगड विमानाने आणि चंदिगड ते मनाली वोल्वो बसने प्रवास केला. दिल्लीवरुन मनालीला जाणा-या सर्व बस चंदिगड मार्गेच जातात त्यामुळे दिल्लीला जाण्याची आवश्यकता नसते. दिल्लीवरुन मनालीला जायचे म्हणजे वाईमार्गे सातारा आहे....हाहाहा. रात्री जेवण करुन बसमध्ये गाढ झोपण्यात मला खुप मज्जा वाटते. माझा सहप्रवासी सुद्धा गाढ झोपणारा निघाल्यामुळे बसमध्ये बसल्यापासुन ते उतरेपर्यंत आमच्यात काडीचाही संवाद झाला नाही. वोल्वो बसच्या ड्रायवरने मी सांगितलेल्या गुगल लोकेशन वर मला उतरवले. कॅंप लिडर मिथुन दासने व्हाटसएप ग्रुपवर लोकेशन पाठवलेले होते. याअगोदर सर्व सहभागी रायडर्सची दोन वेळा झुम मिटींग घेऊन सर्वांना आवश्यक सुचना देण्यात आलेल्या होत्या. सर्व औपचारीक गोष्टींची पुर्तता करुन मी YHAI कॅम्पमध्ये दाखल झालो. मनालीचे निसर्गसौंदर्य, व्यास नदी, तिचा आवाज, सफरचंदांची विवीध झाडे, चोहोबाजुंनी हिरवळीने नटलेले डोंगर पाहुन मी अवाक झालो. व्यास नदीच्या अतिथंड पाण्याचा स्पर्श मला आजही आठवत आहे. संध्याकाळपर्यंत सर्व सहभागी रायडर्सना सायकलसहीत सर्व साहीत्याचे वाटप करण्यात आले. कॅम्प साईटचे हवामान मला पुणे येथील हवामानाशी मिळते-जुळते वाटत होते. पुणे, नाशिक तसेच मुंबई येथील बरेचसे रायडर्स या सायकल मोहीमेत सहभागी झालेले असल्यामुळे कॅंपमध्ये मराठी बोलले तरीही चालत होते. 

सराव राईड (११ जुलै)
 कॅंपसाईटच्या जवळ नग्गर पॅलेस हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. येथे पोचण्यासाठी साधारण ५ ते ६ किमीचा जीवघेणा चढ चढावा लागतो. नग्गर पॅलेसला एक लाकडी राजवाडा असुन रात्रीच्या वेळी त्या राजवाडयात राजाचे भुत फिरते असा समज आहे. सर्व सायकलस्वारांच्या चढावर सायकल चालवण्याच्या क्षमतेचे निरीक्षण करुन त्यांचे ऑरेंज आणि ग्रीन अशा दोन गटात वर्गीकरण करण्यात आले. ऑरेंज म्हणजे हळु चालवणारे किंवा नवशिके आणि ग्रीन म्हणजे प्रशिक्षित.   याठिकाणाहुन बिजली महादेवकडे जाणा-या रस्त्यावर काही अंतर सायकल चालवण्याची संधी मिळाली. सराव राईडच्या संध्याकाळी कॅंप फायर आयोजित करुन सर्वांची ओळख परेड घेण्यात आली. भारतातील अनेक शहरांमधुन या मोहीमेत सहभाग नोंदवण्यात आलेला दिसुन येत होता. 

दिवस - १ 
पतलीकुहल ते मढी
अंतर - ४८ किमी
चढ - २०००मी+
श्रेणी - अत्यंत कठिण
हवामान - अतिशय थंड, कमी-अधिक पाऊस
 आदल्या रात्रीपासुन सुरु असलेल्या पावसामुळे तंबुमधुन बाहेर पडणे सुद्धा अवघड झाले होते. पावसामुळे पहील्या दिवसाची राईड नियोजित वेळेत सुरु होऊ शकली नाही. संपुर्ण राईडमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस चालुच होता. पावसात भिजु नये म्हणुन मी मोबाईल बाहेर काढलाच नाही. मोबाईल वाचला तर नंतर पाहीजे तेवढे फोटो काढता येतील या विचाराशी मी एकनिष्ठ राहीलो आणि फोटोग्राफीचा मोह टाळला. हे खरंच फार फार कठिण होते. तेथील स्वर्गीय सौंदर्य फक्त डोळ्यांमध्ये साठवुन घेतले. मनालीच्या पुढे आल्यावर एक रस्ता अटल बोगद्याकडे तर दुसरा रस्ता रोहतांग खिंडीकडे जातो. अटल बोगद्यामुळे संपुर्ण रोहतांग खिंड टाळता येते. आम्हाला रोहतांग बघावयाचा असल्यामुळे आम्ही अटल बोगदा टाळला. पावसामुळे तापमान अतिशय थंड झालेले होते. निम्म्या अंतरापर्यंत हाताचे तळवे आणि पायाच्या पंजांचा बर्फ झाल्यासारखे वाटत होते. राईडला सुरुवात झाल्यापासुन सुरु झालेला चढ संपण्याचे नाव घेत नव्हता. सायकल चालवता चालवता मी "चढ ईथला संपत नाही...." हे गाणे रचायला सुरुवात केली होती. राईडचा शेवटही चढावरच झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये पावसाने थोडी उसंत दिली आणि मी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत भरपुर फोटो आणि व्हिडीओ काढले. मी अधुनमधुन फोटो काढायला थांबायचो तेव्हा माझ्या सोबतचे रायडर्स (रायडर) माझ्यासाठी न थांबता तसेच पुढे निघुन गेले. हे बरंच झालं म्हणजे आता मला इथुन पुढे कोणासाठी थांबण्याची आवश्यकता नव्हती. मढी येथे पोचल्यावर आजुबाजुच्या शिखरांवर बर्फ पहावयास मिळाला. याचि देही याचि डोळा बर्फ पाहण्याचा हा माझा पहीलाच प्रसंग. बर्फाच्या अस्तित्वामुळे संध्याकाळच्या वेळेस येथे प्रचंड गारठा जाणवायला लागला होता. दिवसभर पावसात सायकल चालवावी लागली, संध्याकाळी सोसाटयाचा थंडगार वारा सुटला आणि भिजलेल्या जमिनीवर तंबु लावल्यामुळे मढी येथील वास्तव्य असह्य वाटु लागले. तंबुच्या कापडावर बाहेरच्या बाजुने दगडांचे थर रचुन आम्ही तंबु हवाबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तंबुमध्ये सुसह्य वाटायला लागले. असे म्हणतात कि मनाली लेह खारदुंग ला सायकल मोहीमेतील पहीला दिवस हा अत्यंत खडतर असतो. तुम्ही जर पहील्या दिवशी निभावुन नेले तर शेवटपर्यंत तुम्हाला कसलीही अडचण येत नाही.
क्रमशः

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...