Friday, 15 October 2021

माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन २०२१


स्पर्धा - माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन

 

अंतर - ५० किमी

तारीख - १० ऑक्टोबर, २०२१

आयोजक - रनबडीज

ठिकाण - माथेरान, थंड हवेचे ठिकाण

प्रवेश फि - ३०००/- (फिनिशर मेडल, टि-शर्ट ई)

फोटो - वेलोस्कोपच्या छायाचित्रकारांनी धावताना काढलेले फोटो हवे असतील तर ३५५/- रुपये आकारले जातात.

मुफ्त फोटो - चेतन घुसानी

हवामान - थंड अपेक्षित होते परंतु ऑक्टोबरची उष्णता ईथेही जाणवली. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे धावण्याच्या मार्गावर चिखल झालेला होता आणि वातावरणात उकाडा जाणवत होता. थंड हवेच्या ठिकाणी थंड हवा औषधालाही मिळाली नाही (धावताना). 

प्रवास - पुणे ते खोपोली जुन्या महामार्गाने गेल्यास उत्तम. पुणे ते माथेरान थेट प्रवास करण्याची कोणतीही सार्वजनिक सुविधा नसल्यामुळे स्वत:चे वाहन घेऊन जाणे अपरीहार्य. माथेरानमध्ये स्वयंचलीत वाहनांना प्रवेशबंदी आहे त्यामुळे माथेरानपासुन अडीच किमी अंतरावर वाहन लावावे लागते. त्यासाठी मोठा वाहनतळ आहे तिथे भरभक्कम दर आकारुन वाहन लावुन घेतात (दोन दिवसाचे १२० रुपये). माथेरानमध्ये प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश फि घेतली जाते. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आहे. छोटया रेल्वेने जायचे असेल तर तिकीट दर प्रतिव्यक्ती ४५ रुपये आहे आणि घोडयावर बसुन जाण्याचा दर २०० रुपये आहे. तसेच मोठया अवजड बॅगा वाहुन नेण्यासाठी हमालसुद्धा मिळतात परंतु त्यांचा दर विचारण्याचा प्रश्न आला नाही. तुम्ही मॅरेथॉन धावायला या नाहीतर ईथे फिरायला या तुम्हाला हे सर्व कर भरावेच लागतात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पैशाचे सोंग आणता येत नाही आणि मी हाडाचा मध्यमवर्गीय आहे. 

 धावण्याचा मार्ग - हॉटेलच्या आवारातुन सुरुवात आणि शेवटही त्याच हॉटेलमध्ये होतो. धावण्याचा मार्ग खुप आव्हानात्मक आहे. हा मार्ग जीवघेणे चढ-उतार, चिखल, ओली माती, दगड-गोटे, गवत यांनी परीपुर्ण आहे तसेच ब-याच ठिकाणी घोडयांची लीदही पसरलेली असते. धावण्याच्या मार्गात काळे डांबर औषधालाही पहायला मिळत नाही. त्यामुळे फक्त काळ्या डांबरावर धावण्याची सवय असलेल्या धावकांना चुकल्या चुकल्या सारखे वाटु शकते. १ किमी अंतर माथेरानच्या मुख्य भागातुन धावावे लागते जिथे खडी आणि सिमेंटच्या ठोकळ्यांनी बनवलेला रस्ता आहे तर उरलेले सर्व अंतर गर्द झाडी आणि दाट जंगलातुन धावावे लागते. दाट जंगल असुनही ईथे एकही जंगली प्राणी पहावयास मिळाला नाही. स्वच्छ आणि शुद्ध हवा काय असते याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ईथेच धावायलाच हवे. म्हणुनच मुंबईचे बरेचसे धावक या शर्यतीत भाग घेण्यासाठी येतात. हा मार्ग म्हणजे माथेरानच्या कडेकडेने माथेरानच्या माथ्याला मारलेली एक प्रदक्षिणाच होय. धावण्याच्या मार्गात एक छोटेसे धरण सुद्धा लागते. त्या धरणाच्या भिंतीवरुन धावताना खुप रोमांचक अनुभव येतो. दगड-गोटयांच्या रस्त्यावरुन पळताना खुप जपुन पाय टाकावा लागतो. "तळ्यात मळ्यात हातपाय गळ्यात" थोडी जरी चूक झाली तरी गुडघे फुटण्याची वेळ येऊ शकते. "नजर हटी दुर्घटना घटी" बरेचसे धावक धावताना पडुन रक्तबंबाळ झालेले दिसुन येत होते. ईथे धावताना माकडांपासुन स्वतःचा बचाव करणे सुद्धा खुप महत्वाचे आहे. धावताना खाण्याची वस्तु हातात दिसल्यास माकडे ती घेण्यासाठी तुमच्या मागे लागु शकतात. 

सोयीसुविधा - धावण्याच्या मार्गात पाणी, केळी, बिस्कीटे, लिंबुपणी, मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. धावताना छान छान फोटो काढले जातात. माथेरानमध्ये राहण्यासाठी मुबलक हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुम्हाला जर इतर झंझट नको असेल तर आयोजकांमार्फत योग्य दर आकारुन तुमच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली जाते. राहण्याची व्यवस्था त्याच हॉटेलमध्ये केली जाते जिथे स्पर्धा भरवलेली असते. 

रणनिती - यावेळेस बरोबर ६ वाजता शर्यतीला सुरुवात झाल्यामुळे पहीले २ किमी अंतर आंधळी कोशिंबीर खेळण्यातच गेले आणि तेही दगड गोटयांनी भरलेल्या तीव्र उतारावर. नशीब खडडयात पाय जाऊन किंवा त्या दगडगोटयांवरुन घसरुन पडलो नाही. पाय मुरगळला वगैरे नाही हेही नसे थोडके. पहील्या पाच किमी मध्येच भयाण चढ आणि तीव्र उतारांनी पळता भुई थोडी केली. जीवन नकोसे व्हायला लागले आणि कुठुन बुद्धी सुचली आणि या माथेरानला पळायला आलो असे वाटु लागले. परंतु पाच किमी नंतरचा मार्ग  सुसह्य होता. त्यानंतर हृदयाचे ठोके वाढवणारे चढ लागत नाहीत तसेच दगड-गोटयांचा रस्ता सुद्धा नाही. चिखल, ओली माती आणि जागोजागी साठलेले पाणी अशा विवीध घटकांनी परीपुर्ण असलेल्या रस्त्यावर धावताना सुसह्य वाटते. या पट्ट्यात पहील्या पाच किमी मध्ये कमी झालेल्या गतीची तुम्ही भरपाई करू शकता. गती वाढवण्याची उत्तम संधी मिळते. वाया गेलेला वेळ भरुन काढता येऊ शकतो. अशा प्रकारे याच मार्गावर दोन फे-या मारल्यावर शर्यत संपते. शर्यत संपतानालागणारा ५००मी अंतराचा जीवघेणा चढ जीवन नकोसे वाटायला भाग पाडतो. माझ्या गारमिनने या स्पर्धेचे अंतर फक्त 47.33 किमी दर्शवले. ५० किमी अंतर न भरल्यामुळे गारमिनने हि अल्ट्रा मॅरेथॉन म्हणुन स्विकारली नाही :(

 

शर्यतीतील माझी रसद - या शर्यतीत मी स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी (पाण्यात टाकुन) पिलो आणि दर आठ किमी नंतर एक पीनट बटर खात होतो. स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी हे एक उत्तम प्येय आहे जे धावताना आणि सायकल चालवताना आपल्या शरीरातील ऊर्जा कायम राखण्यास मदत करते. सेनर्जी विकत घ्यायचे असेल तर माझ्याकडे ३० टक्के सुट देणारा डिस्काउंट कोड आहे. CODE - STEADVIJAY

 

माझा सहभाग - मी ५० किमी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि ५ तास ४५ मिनिटांची वेळ नोंदवुन माझ्या वयोगटात चौथा आलो. माझी हि पाचवी अल्ट्रा मॅरेथॉन आहे. आतापर्यंत मी पुणे अल्ट्रा, एसआरटी अल्ट्रा, टाटा अल्ट्रा, कुंडलिका अल्ट्रा आणि माथेरान अल्ट्रा अशा पाच अल्ट्रा मॅरेथॉन केलेल्या आहेत.












#steadfastathlete #running #run #runner #runninglife #runningtraining #runningismylife #runningmotivation #marathon #ultra #runningismylife #runnersofinstagram #runnersworld #runnersofpune #runnersofindia #Matheran #ultrarunning #ultramarathon #matheranultra #runbuddies 







2 comments:

  1. Congratulations. Mi half marathon karto, Ultra marathon karnya sathi diet kay pahije

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...