अशिया कप अंतिम सामना २०२२!
अपेक्षित होते कि आपला भारत आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळेल परंतु अपेक्षा या भंग होण्यासाठीच असतात हेही तेवढेच खरे आहे. क्रिकेटमुळे भारतीय बोर्डाकडे अमाप संपत्ती आली पण त्या श्रीमंतीला यशाने बर्याचदा हुलकावणीच दिलेली आहे. नाही म्हणायला आपला एक पंच अंतिम सामन्यात दिसत होता हेही नसे थोडके आणि रवि शास्त्रीचे समालोचन ऐकायला मिळणार होते. रविच्या समालोचनाविषयी काय बोलावे. खरं सांगायचे तर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकाची भुमिका निभावत असताना मला त्याच्या समालोचनाची खुप आठवण येत असे. रविवारच्या दिवशी व्हिस्की सोबत तंदुरी चिकन मिळाल्यावर जी मजा येते तीच मजा एखाद्या रंगतदार सामन्यात रवी शास्त्रीचे समालोचन ऐकताना येते. सध्या हिंदी समालोचन सुद्धा बहरत चाललेले आहे पण मला ते कमी कपडे घालुन लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करणार्या एखाद्या नुतन अभिनेत्रीसारखे वाटते म्हणुन मी त्याच्या वाटेला जात नाही. हिंदी समालोचन मला झेपत नाही. विशेष म्हणजे काल कोणतीही तिथी आडवी न आल्यामुळे व्हिस्कीचा एकेक थेंब घशाखाली उतरवत अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद घेता आला. अर्थातच मी श्रीलंकेच्या बाजुने होतो. "कमॉन लंका..." म्हणत मी सोफ्यावर विराजमान झालो.
सामना सुरु होण्याअगोदरच निराशेचे सावट पसरले. आतापर्यंत "टॉस का बॉस" असणारी दुबई अंतिम सामन्यातही जो नाणेफेक जिंकेल त्यालाच विजयी करणार असे माझे ठाम मत झालेले होते. नाणेफेकीचा कौल लंकेच्या बाजुने लागावा अशी तीव्र ईच्छा मनात निर्माण झाली होती. परंतु नाणेफेकीचा कौल पाकडयांच्या बाजुने गेल्यामुळे मी लंका संपली असे गृहीत धरूनच सामना पाहत होतो. त्यात पहील्याच षटकात एका अप्रतिम आत येणार्या चेंडुने कुसल मेंडीसचा असा काही त्रिफळा उडवला कि ते पाहुन या पाकडयांच्या गोलंदाजीपुढे लंकेचा निभाव लागणे आता कठीण आहे असे वाटले. समालोचन करणार्या वासिम अक्रमला आनंदाच्या उकळ्या फुटून तो चेकाळु लागला. "What a cracker to start asia cup final" असे म्हणत रवीने सुरुवात केली. पाकडयांचे गोलंदाज लंकेच्या फलंदाजांना डोके वर काढु देत नव्हते. त्यांचा एकेक फलंदाज धारातीर्थी पडु लागला. रसेल अर्नॉल्ड स्वत:ला सावरत जपुन जपुन शब्दप्रयोग करत होता. सलामीवीर धनंजय डिसिल्वाची एकाकी झुंज चालु होती तो एका बाजुने अप्रतिम फटके मारत होता तेही कवर्समधुन. कवर्समध्ये मारलेले फटके पाहताना खुप मजा येते मग मारणारा कोणीही असो. पाकडयांच्या गोलंदाजांचे एवढे कौतुक सुरु होते कि एक फिरंगी समालोचक सोडला तर बिचार्या धनंजयसाठी स्तुतिसुमने वाहणारे कोणी नव्हते. तिसरा गडी बाद झाल्यावर भानुका राजपक्ष मैदानात उतरला. आता "आपला माणुस आला" असे म्हणत मी सोफ्यावर सावरून बसलो. तो अफाट गुणवत्ता असलेला फलंदाज आहे. तो जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा तेव्हा मी त्याची फलंदाजी आवर्जुन पाहतो. लंकेचा एकेक मोहरा तंबुत परतत होता. त्यांची गळती थांबता थांबेना. कर्णधार दासुन शनाकाने आडवा खराटा मारण्याच्या प्रयत्नात आत्महत्या केली आणि लंकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. नवव्या षटकात पाच बाद अठ्ठावन्न वरून आता डोंबल्याची लंका जिंकणार असे मी पुटपुटत होतो.
वानिंदु हसरंगा आणि भानुका राजपक्ष हि डावी उजवी जोडी मैदानावर एकत्र आली. भानुका एकदम शांत डोक्याने कसलाही धोका न पत्करता दुहेरी, एकेरी आणि प्रसंगी चौकाराच्या रुपाने धावा जमवत होता आणि दुसरीकडे हसरंगा "मारेल नाहीतर मरेल" या वृत्तीने पाकडयांवर तुटुन पडला होता. असेही हारणार आणि तसेही हारणारच आहोत तर मग लढुन हारू असे म्हणत त्यांनी जिद्दीने खेळायला सुरुवात केली. हसरंगा कसलेल्या फलंदाजासारखा कवर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून लिलया फटके मारत होता. त्याच्या फटकेबाजीमुळे धावगती सरस होत चालली होती. दरम्यान क्षेत्ररक्षण करताना पाकडयांनी जाम करमणुक केली. आतापर्यंत आपण फुटबॉल खेळताना डोक्याने चेंडु मारतात हे पाहीलेले आहे परंतु शादाबखानने क्रिकेटच्या चेंडुला "हेडर" मारला. ते पाहुन माझी हसता हसता पुरेवाट झाली. पाकडयांच्या लौकीकास साजेसे म्हणजे त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण सुरु होते. प्रत्येकजण एक दुसर्याला सुचना देण्याचा प्रयत्न करत होता पण कोणीच कोणाचे ऐकत नव्हते. सामना आपण जिंकलेला आहे या धुंदीतच ते खेळत होते. कर्णधाराने बळी मिळवण्याच्या नादात मुख्य गोलंदाजांची षटके जवळजवळ संपवलेली होती. याचा पुरेपुर फायदा हसरंगाने उचलला. भानुकाने फ्लिकवर एक नेत्रदिपक षटकार मारला जो मला एकदम युवराजने २००७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या षटकारासारखा वाटला. या दोघांनी अभेद्य वाटणार्या पाक गोलंदाजीला भगदाड पाडले. हि जोडी फोडण्यासाठी पंधराव्या षटकात कर्णधार बाबर आझमने हरीसला गोलंदाजीला आणले आणि त्याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत एकवीस चेंडुत छत्तीस धावा करणार्या हसरंगाला तंबुचा रस्ता दाखवला. आता पुढची पाच षटके भानुका अवश्य काहीतरी कमाल करणार असे मला वाटत होते.
आज भानुकाचे दैव फळफळलेले होते. तो फलंदाजीला येताना कर्णाची कवचकुंडले घालुन आलाय असे वाटत होते. लंकेला त्याने सरणावरून जीवदान दिले होते. शेवटच्या षटकातील घमासान पहायला मजा येत होती. हे सर्व रवी शास्त्री भन्नाटपणे वर्णन करत होता. रसेल अर्नॉल्डला आता वाचा फुटली होती. संजय मांजरेकर स्वयंघोषित तज्ञ असल्यासारखा तोंडाचा पट्टा चालवत होता आणि वासिम अक्रम तर पाकीस्तानने आशिया कप जिंकल्याच्या अविर्भावातच बोलत होता. दरम्यान पाकडे करमणुक करण्यात कुठेही कमी पडत नव्हते. भानुकाचा उडालेला झेल घेण्यासाठी दोन खेळाडु एकाचवेळी धावले आणि एकमेकांना धडकले, तो झेल घेण्याऐवजी त्यांनी तो चेंडु सीमारेषेबाहेर उडवुन लावला. अशी चमत्कारीक गोष्ट घडली कि ती एखाद्याने ठरवुन करावयाची म्हटली तरी होणे शक्य नाही. हे पाकडेच करो जाणे. जीवदानासहीत आयतामायता षटकार मिळालेल्या भानुकाने नंतर मागे वळुन पाहीलेच नाही. पाक गोलंदाजीची त्याने लक्तरे लोंबवली. पाकडयांचा धुव्वा उडवत लंकेने तब्बल १७० धावा उभ्या केल्या. एवढी समाधानकारक धावसंख्या उभी केल्यामुळे लंकेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. पण या स्पर्धेत हि धावसंख्या कैक वेळा लिलया पार झालेली असल्यामुळे ती विजय मिळवुन देईल असे वाटत नव्हते. पाकडे या धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग करणार याबद्दल कोणाचेही दुमत नव्हते. नंतर मला सामना बघता बघता केव्हा झोप लागुन गेली हे कळलेच नाही.
मी सकाळी झोपेतुन ऊठल्यावर औत्सुक्य म्हणुन निकाल पाहीला. तो पाहुन मी टणकन उडालो. झोपेतुन उठल्या उठल्या एवढी गोड बातमी दिल्याबद्दल लंकेचे खुप खुप धन्यवाद आणि आशिया कप जिंकल्याबद्दल अभिनंदन!
- वि. सु. वसवे
#cricket #AsiaCup2022Final #AsiaCup #marathi #blogger
No comments:
Post a Comment