Friday 16 September 2022

हरीमुखे म्हणा...

पुण्याची गणना कोण करी?


"हरी मुखे म्हणा हरी मुखे...पुण्याची गणना कोण करी" मुखात हरीचे नाव आल्यावर जे पुण्य लाभते त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. ऐकायला किती साधे वाटते. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. काया, वाचा, मन आणि इंद्रियांच्या संयोगाने आपण ईतर जीवांना जो त्रास किंवा पीडा देतो ते म्हणजे पाप. एका क्षुद्र जीवाला त्रास दिल्याने पाप लागण्याचे काय कारण असावे बरे? कारण "हृदयेषु सन्निविष्टो". तुम्ही त्या जीवाला नाही तर त्याच्या हृदयात वास करणार्या प्रत्यक्ष भगवंताला त्रास देत असता. तुम्ही म्हणाल "कोण भगवंत?" तेच भगवंत "अहं सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते" हे अर्जुनाला सांगणारे. सर्व गोष्टींचा मालक मी आहे आणि माझ्यापासुनच सर्वकाही येते. जे जे दृश्य आणि अदृश्य आहे ते ते सर्व (सर्वस्य). हि पृथ्वी माझी, हा चंद्र माझा, हा सुर्य माझा, हे समुद्र माझे, ग्रह तारे माझे, एवढेच काय तु जो श्वास घेत आहेस तो वाराही माझाच आहे. ढगांतुन बरसणारा पाऊसही माझाच आहे. सर्वकाही भगवंतांचेच आहे. म्हणुन तुम्ही जेव्हा एखाद्या जीवाला पीडा देता तेव्हा तो अपराध मानला जाऊन त्याचे पाप लागते. आता पुण्य काय आहे ते पाहु.

परोपकार म्हणजे पुण्य. एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न दिले, तहानलेल्याला पाणी दिले तर यापासुन मिळणारे पुण्य अपरीमित परंतु मोजता येण्याजोगे आहे. कारण प्रत्यक्षात तुम्ही त्या जीवाच्या हृदयात वास करणार्या भगवंतांची सेवा केलेली असते. तो जीव भले तुमच्याशी चांगले वागेल अथवा न वागेल पण तुम्हाला तुमच्या परोपकाराचे पुण्य हे मिळणारच. या कर्माचे एवढे पुण्य आणि त्या कर्माचे तेवढे पुण्य या सर्वांचे परीमाण ठरलेले आहे. मोजण्याची पद्धत ठरलेली असल्यामुळे ते मोजता येते. आणि हे मोजण्याचे काम करणारा सुद्धा नेमलेला आहे आणि तो म्हणजे यमराजाचा सचिव चित्रगुप्त. आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांची तो नोंद करून ठेवतो. यात कोणतीही चूक होत नाही. 

आपण सध्या अत्याधुनिक मोजमापाची साधने वापरत आहोत. कालगणना, वेग, ऊंची, वजन, आकारमान, खोली, जाडी ई. अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपण मोजु शकत नाही. सोन्याची घनता मोजणे आर्किमिडीजमुळे शक्य झाले. मानवाने प्रगतीचा आलेख उंचावत प्रकाशाचा वेग मोजणेसुद्धा शक्य करून दाखवले. हल्ली तर सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅपच्या लॉजीकमध्ये गरजेप्रमाणे मोजमापाचे एकक वापरून वाट्टेल ते मोजता येते. आजकाल मी दोरीच्या उडया सुद्धा मोजतो. व्यायामाचे अनेक प्रकार मोजणे शक्य झालेले आहे. प्रकाशाचा वेग, सुर्यापासुन प्रत्येक ग्रहाचे अंतर, पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग तसेच अवकाशातुन निखळलेल्या तार्याचा वेग मोजणेसुद्धा शक्य झालेले आहे. वाहनाची गती, हृदयाचे ठोके, एका मिनिटातील अमुक तमुक, हे एवढे ते तेवढे... काही काही म्हणुन शिल्लक ठेवलेले नाही. मोजण्यातील अचूकता मिळवण्यासाठी आपण सेकंदाचे मिलीसेकंद आणि मिलीमीटरचे मायक्रॉन करुन ठेवले आहेत. 

ईथे पृथ्वीवर आपण जे जे तंत्रज्ञान पाहतो ते कुठुन आलेले आहे? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, "ऊर्ध्वमुलम अध:शाखं" (ईथे तुला जे जे दिसत आहे त्या सर्वांचे मूळ माझ्यापाशी आहे) ईथे जे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे त्या सर्व गोष्टींचे मुळ उच्चतर लोकांमध्ये स्थित आहे. ईथले तंत्रज्ञान हे खेळण्यातल्या वस्तुंसारखे प्रतिकात्मक आहे. सांगायचे झाले तर जसा एखादा आघाडीचा ड्रायव्हर आपल्या लाडक्या मुलाला खेळण्यातली छोटी कार घेऊन देतो आणि ती घेऊन तो छोटा मुलगा वडीलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते पाहुन त्याच्या वडीलांना हसु येते आणि एक आनंदही मिळतो अगदी तसेच आपले तंत्रज्ञान हे भगवंतापासुन आलेले आहे. हे तंत्रज्ञान जर प्रतिकात्मक असुनही एवढे प्रगत वाटत असेल तर देवाचे तंत्रज्ञान काय दर्जाचे असेल याची कल्पना केलेलीच बरी. 

पापपुण्य मोजण्याचे काम चित्रगुप्त यांच्याकडे आहे. गरूड पुराणात दिलेल्या माहीतीनुसार जीवाच्या प्रत्येक कृतीचे बारा साक्षीदार असतात. पुण्याचे फळ घेताना जीव आनंदाने स्विकारतो परंतु पापाच्या वेळी "मी हे केलेले नाही" असे म्हणुन तो निरपराध असल्याचा आव आणतो. त्यावेळेस हे बारा साक्षीदार समोर येऊन ग्वाही देतात. आपल्या ईथे जसे "लाव रे तो व्हिडीओ" म्हणतात अगदी तसेच. "भुमीरापोनलो वायु खं" भुमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनलो अग्नि, वायु आणि खं म्हणजे आकाश हे पाच तसेच सूर्य, चंद्र, राशी, महीना, तिथी, वार आणि सर्वात शेवटी "हृदयेषु सन्निविष्टो" म्हणजे आपल्या हृदयात परमात्मा बनुन राहणारे परम पुरुषोत्तम भगवंत. आत्मा आणि परमात्मा ऐकले असेल त्यातले परमात्मा हेच ते. हृदयात आपल्या सोबत राहुन आपण केलेली कर्मे तर लक्षात ठेवतातच पण त्याचबरोबर आपल्या मनात आलेल्या विचारांची सुद्धा नोंद करुन ठेवतात. त्यांना केलेल्या प्रार्थनांविषयी तर काय बोलावे? भगवंत एखाद्या गुप्तहेराप्रमाणे आपल्यासोबत सतत आहेत आणि याचा आपल्याला मागमुसही नाही. त्यामुळे कधीही पंगा घेण्याचा प्रयत्न करू नका. पापपुण्य मोजण्यासाठी एवढे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपली कोणतीही कृती हि एकतर पाप असते किंवा पुण्य असते आणि त्याची अचूक नोंद ठेवली जाते आणि आपण जेव्हा या शरीरातुन बाहेर पडतो तेव्हा त्याचा हिशोब केला जातो. 

चित्रगुप्त या नोंदी ठेवत असताना जेव्हा सर्वप्रथम एका व्यक्तीने आपल्या मुखातुन हरी शब्द उच्चारला तेव्हा त्याला या कृतीचे वर्गीकरण करता आले नाही. याचे किती पुण्य द्यायचे याचे लॉजिक न सापडल्यामुळे तो आपल्या सिनियरकडे म्हणजे धर्मराज यमाकडे गेला. धर्मराज यमाला जे सॉफ्टवेअर दिलेले आहे त्यातसुद्धा हे लॉजीक टाकलेले नाही. आता काय करायचे? म्हणुन ते दोघे त्यांच्या बॉसकडे जातात. त्यांचे बॉस म्हणजे महाकाल भगवान शंकर. ते त्यांना सांगतात कि ते आपल्या विभागाचे काम नाही. अजामिळाने मृत्युसमयी जेव्हा "नारायण...नारायण" हे भगवंतांचे नाम उच्चारले होते तेव्हा त्या विभागाचे चार कर्मचारी (विष्णुदुत) यमदुतांना दिसले होते. ते यमदुतांपेक्षा महाबलशाली होते. भगवंतांची भक्ती आणि नामस्मरण याची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे जो आपल्याला अवगत नाही. म्हणुन येथे म्हटलेले आहे "पुण्याची गणना कोण करी?" मुखाने हरीचे नाव घेतले असता मिळणारे पुण्य चित्रगुप्ताला सुद्धा मोजता येत नाही. म्हणजे ते पुण्य किती असेल याची कल्पना केलेलीच बरी. 

म्हणुन देवाच्या द्वारी क्षणभर का होईना उभे रहा आणि मुखाने हरीनाम घ्या. यासाठी भगवंतांनी आपल्यासाठी अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज दिलेले आहे. त्यामुळे कोणतीही हयगय न करता मुखाने हरीचे नाम घेत रहा...
"रामकृष्णहरी"
- वि. सु. वसवे 


 

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...