Thursday, 12 March 2026

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

नाईट बीआरएम २०० किमी

कलिंगड आणि खीर बीआरएम

रायडर नं ८७ (८ तास १८ मिनिटे)



रायडर नंबर ८७ सक्रीय झाला...!

        यापुर्वी मी पुणे रँदोनियर्सकडून ब्रेवेमध्ये राईड करताना तब्बल तीन वेळा सुपर रँदोनियर झालेलो आहे. पुणे-सातारा-कोल्हापूर या महामार्गावर अतोनात सायकल चालवलेली आहे. पण त्याला आता खूप वर्षे होऊन गेलेली आहेत. मार्च २०१७ मध्ये मी शेवटची बीआरएम २०० केलेली मला आठवते. त्यानंतर मला ट्रायथलॉनचे वेड लागले. त्या वेडातुन पुढे २०१९ मध्ये मलेशियात आयर्नमॅन (१५ तास १४ मिनिटे) झाल्यावरच माझ्या जीवाला शांती मिळाली. आयर्नमॅनमध्ये ४ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे या तिन्ही गोष्टी सलग कराव्या लागतात. आयर्नमॅन किताब मिळवल्यानंतर मला ट्रायथलॉन सुद्धा निरस वाटू लागली. व्हिडीओ गेममध्ये जसे सीपीयूला हारवायला लागल्यावर त्या गेममधील मजा निघून जाते किंवा एकच पदार्थ सतत खात राहील्यावर जशी त्याची शिसारी येते तशी माझी अवस्था होऊ लागली. मग हाफ आणि फुल मॅरेथॉनमध्ये टायमिंगचे वेड लागले जे सर्व रनर्स समाजाला लागलेले आहे. वेळेशी स्पर्धा करता करता सब-टू हाफ मॅरेथॉन लिलया करू लागलो. मग सब-फोर मॅरेथॉन(फुल) पळण्याचे खूळ डोक्यात गेले. या वेडातुनच अनेकांना मोहात टाकणारी टाटा मुंबई मॅरेथॉन पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही प्रयत्नात सब-फोर पळालो आणि हे कमी आव्हानात्मक वाटले म्हणून की काय लोणावळ्यात होणारी टाटा अल्ट्रा मॅरेथॉन (५०किमी) सुद्धा चक्क सब-फाईव मध्ये पळालो. त्यानंतर आता बस्स झाले असे मला वाटु लागले. फिटनेस प्रवास सुरु करून जवळजवळ १२ वर्षांचा काळ लोटला होता. या कालावधीत रनिंग आणि सायकलिंगवर भरपूर पैसा उधळला पण या गोष्टीचा मला कधीही पश्चाताप झाला नाही कारण ते केल्यामुळे मला एक उत्तम, निरोगी आणि तंदुरूस्त शरीर मिळाले, "आरोग्यम धनसंपदा". नोकरी सांभाळून जे काही करता येणे शक्य आहे तेवढे सर्व करून झाले. आता दुसरे कुठले खूळ डोक्यात घेण्यापेक्षा म्हटले चला आता पुन्हा नव्याने बीआरएममध्ये भाग घेऊ. पुनश्च हरीओम! किंवा ज्याला आपण "देजा वु" सुद्धा म्हणतो.

        माझा ऑडॅक्स इंडिया रायडर नंबर दोन अंकी आहे याचे मला जाम कौतुक वाटते. रायडर नंबर ८७. ज्या दिवशी ऑडॅक्स इंडियामध्ये कायमस्वरुपी रायडर नंबर देण्याची पद्धत सुरु झाली अगदी त्याच दिवशी मी हा माझा रायडर नंबर मिळवलेला आहे आणि म्हणूनच तो दोन अंकी आहे. विशेष म्हणजे २०१५-१६ या ऑडॅक्स कॅलेंडर वर्षात मी ज्या मित्रासोबत (प्रशांत जोग) एसआर या श्रृंखलेतील माझ्या सर्व ब्रेवे पूर्ण केल्या सध्या तोच मित्र पुणे रॅंदोच्या सर्व राईडस (ब्रेवे) व्यवस्थितपणे आयोजित करतो. सध्या ब्रेवे (बीआरएम) चांगल्या पद्धतीने आयोजित केल्या जातात असे मी बऱ्याच जणांकडून ऐकले होते. माझ्या मेरीडा स्कुल्ट्रा३०० रोडबाईकला १०५ ग्रुपसेट बसवून मी नुकतीच अपग्रेड केलेली आहे. रोडबाईकवर खर्च केल्यामुळे अत्याधुनिक झालेली रोडबाईक चालवण्यासाठी ब्रेवे (बीआरएम) हा उत्तम पर्याय आहे असे मला वाटू लागले होते आणि म्हणूनच मी माझे ऑडॅक्स इंडीयाचे सभासदत्व पुनर्जिवित केले. रायडर नंबर ८७.

        एवढ्या वर्षांचा कालावधी जाऊनही माझा रायडर नंबर ८७ जसाचा तसा मला मिळाला. आतापर्यंतच्या माझ्या सर्व ब्रेवे (बीआरएम) राइड्स मी हायब्रीड सायकलवर केल्या होत्या. त्याकाळी तीव्र ईच्छा असूनही मला कधी रोडबाईक घेता आली नव्हती. रोडबाईकची गती मला मोहात पाडत असे. साधीसुधी का होईना पण एखादी रोडबाईक असावी असे मला मनापासून वाटायचे. तेव्हा रोडबाईक मिळाली असती तर मी खऱ्या अर्थाने बीआरएमचा आनंद लुटला असता असे मला आजही वाटते. "अगर सबकुछ मिल जाये जिंदगीमें तो तमन्ना किसकी करोगे" असे म्हणत मी आपली हायब्रीडच चालवायचो. तेव्हा कार्बनची चाके आणि कार्बनची फ्रेम माझ्या स्वप्नातही येत नसे.

पुणे रँदोनियर्सची नाईट बीआरएम करण्याचे मी ठरवले आणि लगेच नाव नोंदवले. २०० किमी सायकलिंगसाठी १३ तास ३० मिनिटांचा कालावधी दिलेला असतो. वयाच्या पन्नाशीत पुन्हा सुपर रॅंदोनियर व्हावेसे वाटत आहे. बघू जमतंय का??

        प्रारंभ होण्याच्या ठिकाणी भरपूर रायडर्स जमलेले होते पण माझ्यासाठी सर्व अनोळखी (एक दोन सोडून). सिंहगड रोडने जाताना ब्रेवेला जाणारा एक रायडर भेटला पण आमच्यात कसलाही संवाद झाला नाही. तू तुझा जा, मी माझा जातो या प्रकारे आम्ही गेलो. प्रशांतने माझी बाईक चेक करून प्रारंभीचा शिक्का दिला. राष्ट्रगीत झाले आणि आठ वाजता राईडला सुरूवात झाली. संध्याकाळी आठची वेळ असल्याने वाहतूक कोंडीत अडकण्याची दाट शक्यता वाटत होती. मी सपासप पेडल मारत बऱ्याच रायडर्सना मागे टाकत वाट काढत काढत पुढे सटकलो. पाषाण सर्कल, बावधन आणि चांदणी चौकाचा चढ येईपर्यंत कुठेही वाहतूक कोंडी लागली नाही. चांदणी चौकाच्या चढावर गतिरोधक नसतानाही माझ्या गतीला ब्रेक लागला. बीआरएम मध्ये दुःख देणारी एकाच गोष्ट ती म्हणजे चढ. दुःखाचा चढ ओलांडल्याशिवाय सुखाचा उतार येत नाही. चांदणी चौकाच्या उतारावरून मी वाऱ्याच्या वेगाने वारजे पुलापर्यंत पोचलो. मुठेच्या बॉटलनेक पुलावर गती संथ करावी लागली पण वाहतूक कोंडीचा लवलेशही नसल्यामुळे मनाला दिलासा मिळाला. वडगाव पूल ओलांडून नवले ब्रीजवर सायकल चढवल्यावर मला हायसे वाटले. तोच “हाय” असा आवाज आला. एका रायडरने पाठीमागून येऊन मला “हाय” केले आणि तो पुढे निघुन गेला.

        आता खरंतर सुसाट जाण्याची वेळ पण नविन बोगद्याकडे जाणारा चढ सायकलची गती वाढवली की हृदयाची धडधडही सम प्रमाणात वाढवत होता. म्हणून हृदयाच्या गतीवर ताण येऊ न देता मी मध्यमगतीने नविन बोगदा ओलांडला. नविन बोगदा ते कापूरहोळ हा माझा सर्वात आवडता सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये जवळजवळ २० किमी अंतरापर्यंत नुसता उतारच उतार आहे. “नो पेन नो गेन" म्हणतात खरे पण या सेगमेंटमध्ये कसलीही पेन न होता आपण भरपूर गेन करतो.

        बीयू भंडारीपासून कुठेही न थांबता मी थेट कापूरहोळ चेकपॉइंटला थांबलो तेव्हा ९ वाजून ३७ मिनिटे झालेली होती. एक केळ खाल्ले, संपलेली पाण्याची बाटली भरून घेतली आणि दुसऱ्या बाटलीतील कार्बोरन्स घशाखाली उतरवले. माझ्यासाठी कार्बोरन्स हे अशा लांब पल्ल्याच्या राईड दरम्यान संजीवनीचे काम करते. यातून कार्ब्स तर मिळतातच शिवाय ते रक्तातील मिठाच्या पातळीचा समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे लांब पल्ल्यापर्यंत गळून गेल्यासारखे वाटत नाही. माझा STEADVIJAY हा कोड वापरल्यास या कार्बोरन्सवर ३५ टक्के डिस्काउंट मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. LINK TO BUY

        बोगद्याकडून कापूरहोळ कडे जाणे जेवढ सुखकर तेवढे परत येणे वेदनादायी आहे. अगोदरच चढ आणि त्यात आता उड्डाणपूलांची भर पडलेली आहे. त्यामुळे तिकडून सायकल चालवत येताना कधी एकदा कात्रज बोगदा येतोय असे झाले होते.

        आता पुढचा चेकपॉइंट होता जुना कात्रज बोगदा. तिथे कलिंगडाच्या फोडी माझी वाट पाहत होत्या. बीआरएममध्ये आमच्या काळात कलिंगडाच्या फोडी वगैरे आम्हाला कधी मिळाल्या नाहीत. त्यावेळेस तर पाण्याच्या बाटलीवर सुद्धा मर्यादा असायच्या. त्या चेकपॉइंटवर कलिंगडाच्या दोन फोडींचा आस्वाद घेतल्यानंतर प्रशांतकडून ब्रेवे कार्डवर शिक्का घेतला आणि लोणावळ्याच्या दिशेने निघालो. पुढे एवढा उतार होता की मुठा नदी कधी आली ते कळलेच नाही. चांदणी चौकाच्या चढाचा मान ठेवत मी सहजपणे जो वेग मिळेल तो घेऊन पुढे सरसावत होतो. चांदणी चौक ते देहूरोड हे अंतर सुद्धा जवळपास २० किमीच आहे. देहूरोडला पोचलो तेव्हा माझ्यापुढे ३ रायडर्स गेलेले आहेत असे कळले. मला कोण पुढे आणि कोण मागे याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते, मला फक्त माझे आठ तासांचे लक्ष्य मला गाठता येतंय की नाही हे पहावयाचे होते.

        चतुर्थीचा चंद्र चांगलाच वर आलेला होता. सायकल चालवताना चंद्राच्या उजेडाचा काहीही उपयोग होत नसला तरी रात्रीच्या वेळी त्याची सोबत मौल्यवान वाटत होती. आजुबाजुला अंधार असण्याचा एक उत्तम फायदा होतो तो म्हणजे इतर गोष्टींकडे नजर जाऊन आपले लक्ष विचलीत होत नाही. तसेच रात्रीची वेळ असल्याने स्थानीक लोकांच्या लुडबूडीचा अडथळा होत नाही, फेरीवाले, रस्ता ओलांडणारे तसेच उलटया बाजुने येणारे रस्त्यावर दिसत नाहीत. दुचाकी आणि तीन चाकी सुद्धा नगण्य होत्या. यामुळे विनाअडथळा सायकल सुसाट पळवता येत होती.

        मी बीआरएम करताना कधीही कोणाच्या सोबत सायकल चालवत नाही. मला एकटयाला सायकल चालवायला आवडते. सायकलच्या सर्व समस्या मला सोडवता येत असल्यामुळे मला कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता वाटत नाही. बीआरएम मध्ये ड्राफ्टींग चालत असले तरी मला बीआरएममध्ये ड्राफ्टींग करायला सुद्धा आवडत नाही. मी देहुरोड चेकपॉइंटला १२:११ ला पोचलो. माझ्या योजनेप्रमाणे मी रात्री बाराच्या आत तिथे पोचणे अपेक्षित होते. पण मला ११ मिनिटे उशिर झाला होता. आता ही अकरा मिनिटे कशी कमी करता येतील याचे विचारचक्र माझ्या मेंदूत सुरू झाले. १०७ किमी ला ४ तास ११ मिनिटे, म्हणजे तसे पाहिले तर आवश्यक असणारा २५किमी/तास चा सरासरी वेग आलेला होता. पण माझे बॅड लकच खराब म्हणजे माझ्या दुर्दैवाने ब्रेवेचे अंतरच २०७किमी होते. ते २००किमी असते तर बरे झाले असते.

        मी जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतच्या राईडचा सराव केलेला होता. त्यामुळे देहूरोड चेकपॉइंटनंतर माझे काय होईल याबद्दल मला काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मी पण जास्त ताण येणार नाही अशा वेगाने लोणावळ्याच्या दिशेने निघालो. महामार्गावर जास्त करून अवजड ट्रकच धावताना दिसत होते. माझा रेडीयमने लख्ख चमकणारा सदरा त्यांना माझ्या महामार्गावरील अस्तित्वाची जाणीव करून देत होता. काळ्या डांबरावर पडणारा टॉर्चचा उजेड, अधूनमधून भूकंप आणणारे रम्बलर्स, क्रँकभोवती गोलगोल फिरणारे क्लिट्स आणि पेडलमध्ये अडकवलेले पाय, बाईक कॉम्प्युटर, अंतर आणि वेगाचा मेंदूत चाललेला ताळमेळ आणि मनात भरलेल्या खूप साऱ्या आशंका घेऊन मी सायकल चालवत होतो. महामार्गावरील रम्बलर्स वरून जाताना माझ्या अनेक सिपर बाटल्या रस्त्यावर पडून त्यांचा चुराडा झालेला आहे. त्यामुळे रम्बलर्स वरून जाताना मी खूप काळजीपूर्वक जात होतो. सिपर बाटली पडण्याची मला खूप भिती वाटत होती.

        सायकल चालवण्याचा ताण जसजसा वाढत जातो तसतसा आपला मेंदू नेहमीप्रमाणे काम करत नाही. म्हणून मी चेकपॉइंटला पोचल्यावर काय काय करायचे? याची अगोदरच मनात घोकंपट्टी करवून घेत होतो. एकूण ६ गोष्टी करायच्या हे लक्षात ठेवले की तिथे पोचल्यावर कोणत्या ६ गोष्टी त्या आपल्याला आठवता येतात. १. पाणी भरून घेणे २. केळ खाणे ३. मीठ घेणे ४. शिक्का घेणे ५. चिक्की/खजूर खाणे ६. खीर पिणे.

        या बीआरएमचे नावच कलिंगड आणि खीर बीआरएम आहे. बीआरएममध्ये खीर प्यायला मिळणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. आमच्या काळात बीआरएममध्ये एवढ्या सुविधा नसत. मी चांगली दोन कप खीर पिलो, शिक्का घेतला, पाणी भरले, केळी खाल्ली, एक चिक्की घेतली, मीठाची गोळी घशाखाली उतरवली आणि तिथून शेवटचा टप्पा पार करण्यासाठी निघालो. सायकल चालवताना मी चेकपॉइंट सोडून इतर कोणत्याही ठिकाणी थांबलो नाही. गारमिन घड्याळातील ऑटो पॉज बंद करून ठेवले होते. घड्याळात १४५ किमी अंतर २४.१किमी/तास च्या सरासरीने पार झालेले होते. आता २०७ किमी अंतर होईपर्यंत २५किमी/तास सरासरी गाठण्याचा प्रयत्न करावा लागणार होता. त्यासाठी मी परतीच्या प्रवासात वेगाने सायकल चालवायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात फक्त सायकल चालवण्याकडे लक्ष जात असल्यामुळे अंतर झपाझप कमी होत होते. मी सायकल चालवण्यात मग्न असताना एक कार माझ्या शेजारून चालू लागली. तिची पुढची काच सरकन खाली आली आणि एका सुंदर महिलेने मला पाण्याची बाटली देऊ केली. “Do you need water?” माझ्यासाठी ही आश्चर्यकारक घटना होती. पण माझ्याकडे मला लागणारे पाणी होते म्हणून मी 'धन्यवाद, माझ्याकडे पाणी आहे' असे सांगितले. तरीपण मंदस्मित करत पाणी घेण्याविषयी विचारणा होतच राहीली. “ये मुस्कान की चमकान कहीं और” असे मी मनातले मनात म्हणत स्पष्ट नकार दिला.

        रात्री अपरात्री सावधगिरी बाळगलेली बरी. मी कामशेतचा चढ आरामात पार केला आणि चढानंतर आलेल्या उतारावरून सुसाट गेलो. कामशेत, वडगाव, तळेगाव, सोमाटणे फाटा, तोलनाका करत देहूरोड पर्यंत पोचलो. उजवीकडे वळून चर्चच्या पुढच्या उतारावर एवढे रम्बलर्स होते की रस्त्यावर रम्बलर्स आहेत की रम्बलर्समध्ये रस्ता बनवलाय हे कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर डावीकडे रावेतच्या दिशेने वळालो. ईथून पुढे मला कुत्र्यांच्या टोळ्या दिसू लागल्या. माझ्यावर आक्रमणाची चाहूल लागल्यावर मी ब्रेक दाबून एका जागेवर ऊभा राहत असे. एकदा सायकल जोरात पळवून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न केला परंतू पुढच्या गल्लीतील कुत्री धावण्याचा पवित्रा घेऊन माझ्या स्वागताला हजर होती. आईच्या गावात अन बाराच्या भावात. सायकल पळवणे हा पर्याय मी सोडून दिला. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती पाहवत नाही. कुत्र्यांसमोर मी गती सोडून दिली. त्यांनी हल्ल्याचा पवित्रा घेतला की मी ब्रेक दाबून एका जागेवर ऊभा राहायचो. त्यांचे समाधान झाले की मी गुपचूप तिथून निसटायचो. असे चार ते पाच वेळा घडले. यातही बराच वेळ गेला. संत तुकाराम महाराज पूल, थेरगाव, डांगे चौक, काळेवाडी फाटा, औंध हॉस्पीटल, औंध, ब्रेमेन चौक या पट्ट्यात सायकल पळवता आली नाही की सायकल पळत नव्हती माहीत नाही पण सायकलला अपेक्षित वेग मिळाला नाही. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ बरोबर २०० किमी अंतर पूर्ण झाले आणि मी घड्याळात पाहिले तर बीआरएमसाठी लागलेला वेळ ७ तास ५९ मिनिटे दिसत होता. पण बीआरएम अजून संपलेली नव्हती.

            सिम्बॉयसिसचा चढ पार केल्यानंतर सायकल चालवण्याच्या त्रासातून सुटलो या भावनेने मी खूप आनंदी झालो. हा शेवटचा उतार आणि आता पेडल न मारताही मी रुपालीला पोचू शकतो या विचाराने मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आठ तासात ही बीआरएम करता आली नसली तरी २५किमी/तासाचा सरासरी वेग राखता आल्याचे समाधान वाटत होते. बीएमसीसी जवळ वेळ, अंतर आणि वेग बघण्यासाठी मी बाईक कॉम्प्युटरमध्ये बघू लागलो. बाईक कॉम्प्युटरचे बटण दाबण्यासाठी जसा मी एक हात सोडला तसा माझा सायकलवरचा ताबा सुटला आणि मी धाडकन सिमेंटच्या रस्त्यावर आडवा झालो. धोबी पछाड डावाने पैलवानाला आडवा पाडतात तसा मी धाडकन जोरात पडलो. हेल्मेटसहीत डोके जोरात रस्त्यावर आपटल्याच्या झटक्याने माझी दृष्टी दुहेरी झाली. मला सर्व गोष्टी दोन दोन दिसू लागल्या. उजव्या पायाचा खुबा जोरात आपटून तिथे खोलवर जखम झाली. अनेक जागी खरचटले. उजव्या हाताच्या कोपराजवळ भली मोठी जखम झाली. इतर अनेक जागी सुद्धा खरचटलेले आहे हे मला दुसऱ्या दिवशी समजले. तिथून दोन युवक दुचाकीवर चालले होते. त्यांना माझी दया आली. त्यांनी मला ऊठवले, माझी सायकल उचलली, माझ्या इतस्ततः विखुरलेल्या वस्तू गोळा करून मला दिल्या, एवढेच नव्हे तर सायकलची चेनसुद्धा बसवून दिली. सायकलचा मागचा डीरेलर जोरात आपटल्याने त्याच्यामध्ये बिघाड झाला आहे (आता हा खर्च वाढला). यात माझी दहा-बारा मिनिटे वाया गेली. मी लंगडत असूनही ऊठलो आणि सायकलवर बसून रूपालीला पोचलो. प्रशांतकडून शेवटचा शिक्का घेतला तेव्हा ४ वाजून १८ मिनिटे झालेली होती. एकट्याने राईड करत मी २०७ किमी अंतर ८ तास १८ मिनिटात पार केले. माझे लक्ष्य जरी गाठता आले नसले तरी मी पूर्ण समाधानी आहे. आता रायडर नंबर ८७ पुढची बीआरएम ८ तासांच्या आत करण्याचा प्रयत्न करील. अपघात होऊनही मी सायकल चालवत घरी गेलो.

-आयर्नमॅन विजय वसवे.

८ मार्च २०२६

#brm #punerandonneurs #brm200 #brevet #IronmanVijay #nightbrm200

4 comments:

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

नाईट बीआरएम २०० किमी कलिंगड आणि खीर बीआरएम रायडर नं ८७ (८ तास १८ मिनिटे) रायडर नंबर ८७ सक्रीय झाला...!           यापुर्वी मी पुणे रँदोनियर्...