रायडर फ्रॉम जापान लिविंग इन पुणे

 जापानी रायडर!

मागच्या आठवडयात मी म्हणजे विजय वसवे सायकलवारीच्या तयारीसाठी सायकल चालवण्याचा सराव करत होतो. धायरीफाटा ते डोणजेफाटा हा घरापासून सर्वात जवळचा मार्ग मी निवडलेला होता. एके दिवशी काय झाले डोणजेला पोचल्यानंतर मी परतण्याच्या तयारीत होतो. तोच माझ्या जवळून एक रायडर सुसाट गेला. बहुतेक तो सायकलवर सिंहगड करून आलेला होता, महागडी रोडबाईक (ट्रेक डोमेन), भारीतले हेल्मेट, क्लिट्स, क्लिटशूज कवर (हे बघायला मिळणे फार फार दुर्मिळ), उत्तम शेडस (म्हणजे गॉगल) आणि सायकलिंगची दर्जेदार जर्सी आणि शॉट परिधान केलेला एक उत्तम रायडर माझ्या जवळून गेला आणि क्षणार्धात दिसेनासा सुद्धा झाला. मला जे काही दोन-चार सेकंद मिळाले त्यात माझ्या तीक्ष्ण नजरेने एवढ्या सर्व गोष्टी अवगत केल्या. सिंहगड रोडवर एवढा तामजाम करणारा रायडर पाहून मला खूप आश्चर्य वाटले. आणि एवढे दिवस हा मला भेटला कसा नाही? हा रायडर कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक झालो. हे सर्व त्याला गाठल्याशिवाय कळणारच नव्हते म्हणून मी त्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालो. माझे क्लिट्स टॅक आवाज करुन पेडलमध्ये अडकवले आणि मी सुद्धा सुसाट निघालो.

पुणे ग्रँड टूरमुळे सिंहगड घाट ते नांदेड सिटी दरम्यानचा रस्ता एकदम चकाचक झालेला आहे. या चकाचक रस्त्यावर डोणजेचा उतार क्षणार्धात पार झाला आणि झपाझप पेडल मारत त्या रायडरला गाठला. ओवरटेक करायची असेल तर काही रायडर्स पुढच्याचा अंदाज घेण्यासाठी त्याच्या चाकाच्या मागे थोड वेळ सायकल चालवतात आणि मग ओवरटेक करतात. मी असले काही करत नाही, आपण थेट खटक्यावर बोट ठेवतो. ओवरटेक करताना डाव्या हाताने सॅल्युट ठोकत गुडमॉर्निंग म्हटले आणि मी पुढे सटकलो. आता मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. तो डिवचला जाणार याबद्दल मला खात्री होती आणि तसेच घडले. त्याने सुद्धा माझा पाठलाग सुरू केला. आता हाचि नेम, न फिरे माघारी! मी मान तिरकी करुन उजव्या खांद्यावरुन मागे पाहिले तर तो माझ्या चाकाला चाक लावून भिडत होता. हमसे पंगा तो शहरमें दंगा...अब आयेगा मजा...म्हणत मी पण फुल तोडातोडी सुरु केली.
 
चाकाला चाक भिडले, मांडयांतून जाळ निघू लागला. रस्त्यात येणाऱ्या मोपेड्स आणि दुचाकींचा खुर्दा पडला. तसेच रिक्षा आणि इतर वाहने खर्ची पडू लागली. मी सायकलची चेन 53 दातांच्या क्रँकवर चढवली तसे चाक वेगाने फिरु लागले आणि गती वाढली. मी गरागरा पाय फिरवू लागताच तो रायडर मागे पडला. जशी मर्दाला गोफण लागावी आणि तो चवताळून उठावा तसा तोही मला भिडू लागला. मीही त्याच त्वेषाने सायकल चालवू लागलो. आता रस्त्याची तमा बाळगणे मी सोडून दिले होते. अंतरात्मा फक्त एकच आवाज देत होती तो म्हणजे "पळव जेवढी पळवता येईल"...जशी जमेल तशी. हे बघ धुव्वा! आता माघार घ्यायची नाही. ओवरटेक केल्याने जो डिवचला जात नाही तो रायडरच नाही असे माझे मत आहे. जे डिवचले जात नाहीत ते रायडर मुर्दाड असतात. 

आमच्या दोघांच्या सायकलींनी तुफान वेग पकडलेला होता. आम्ही पाठलाग पाठलाग खेळत गोऱ्हे पार केले आणि आर्मी संस्थानच्या टी-सेक्शनवरुन वेगात पुढे सटकलो. केंद्रिय विद्यालयाचा छोटा चढ केव्हा मागे गेला कळलेसुद्धा नाही. त्यापुढे आर्मी कँटीनच्या जवळ असलेल्या प्राचीन वटवृक्षाच्या दाट सावलीतून आम्ही खडकवासला चौपाटीच्या रँपवर वर आलो. एखाद्या रेसच्या फिनिश लाईनला जशी वातावरण निर्मिती केलेली असते तसे वातावरण चौपाटीवर भासु लागले. चौपाटीवर दुतर्फा जमलेली गर्दी आमच्या स्वागतासाठीच आलेली आहे असे मला वाटू लागले. पायात भिंगरी बसवल्यासारखे माझे पाय पेडलवर गरगर फिरत होते.

बदल्याच्या आगीने पेटलेला रायडर अजूनही शांत झालेला नव्हता. तो जीवाच्या आकांताने माझा पाठलाग करतच होता. एका छोटयाशा चढावर त्याने मला गाठले. मोठ्ठे स्मितहास्य करत म्हणाला, "आय एन्जॉइड रायडींग विथ यू" आणि तेवढयाच तीव्रतेने अंगठा वर करून मला अभिवादन केले. तेव्हा मी त्याचा चेहरा जवळून पाहिला. त्याचे इंग्रजीच्या उच्चारांमध्ये एक वेगळेपणा जाणवला.

खडकवासला गावातून पुढे आलो तरीसुद्धा मीच पुढे होतो. कोल्हेवाडी फाटा तसेच किरकटवाडी फाटयावरील वाहतूक कोंडीला आमच्यात लागलेल्या शर्यतीचे काहीही देणेघेणे नव्हते. आमच्यात न बोलता लागलेली शर्यत होती ती आणि ती प्रचंड आनंददायी होती. आमच्यासाठी कोणीही फ्लॅग ऑफ केलेला नव्हता, ना कसले बिब आणि ना कसले मेडल. पण तरीसुद्धा आम्ही जीव ओतून ही शर्यत खेळत होतो. किरकटवाडी नंतर येणाऱ्या सिल्क पटटयावर वेग म्हणजे वेगच मिळतो आणि मी जरसुद्धा कसर सोडली नाही. नांदेडफाटयावर भयानक वाहतूक कोंडी झालेली होती. 

पुढे धायरीफाटा म्हणजे माझे थांबण्याचे ठिकाण आल्यावर मी थांबलो. मला वाटले माझ्यासोबत तोही थांबेल, मी त्याला चहा पाजेन, त्याच्यासोबत सेल्फी काढेन, मग कोण? कुठला? काय? यावर गप्पाटप्पा होतील. पण तो नुसता स्मितहास्य करत हात दाखवून "आय एन्जॉइड रायडींग विथ यू" म्हणत निघून गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ बघत ऊभा राहीलो. नंतर मनात म्हणालो, "चलो ये भी ठिक है". ही सर्व राईड मी सुद्धा एन्जॉय केली. पण वह कौन थी?? या सिनेमातील प्रश्नासारखा "वह कौन था??" या प्रश्नाने माझ्या मनातही काहूर माजवायला सुरुवात केली. आता हा कोण होता ते देवालाच माहीत म्हणत मी सुद्धा घरचा रस्ता धरला.

पण सायंकाळी स्ट्रावामुळे वह कौन था? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्याची राईड स्ट्रावावर आली आणि माझ्या राईडसोबत त्याचे नाव दिसु लागले. विजय वसवे राईड विथ शुंजी हारा फ्रॉम जापान लिविंग इन पुणे.

तर अशा रितीने तो होता एक जापानी रायडर..
- आयर्नमॅन विजय वसवे.

Comments

Popular posts from this blog

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन 53 km

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)