नेत्रांना जे सुखावुन गेले मनाला जे भावले त्यांचे मनात उमटलेले प्रतिबिंब येथे शब्दात उतरवण्याचा प्रयत्न.
Thursday, 17 August 2017
एल्सॉमचा बोपदेव (हाफ मॅरेथॉन)
एल्सॉमचा बोपदेव
मला सायक्लिंगची फार आवड आहे, पळणे हा माझा विषय नाही. पण माझे बरेचसे सायकल चालवणारे मित्र धावण्याच्या स्पर्धेतही भाग घेतात आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यातले काहीजण पोडीयम फिनिशर्सही आहेत. मुंबई मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, माथेरानची दमछाक करणारी मॅरेथॉन, दुरशेत मॅरेथॉन, स्टोनरीज व्हॅली मॅरेथॉन, पुणे एल्सॉम (LSOM= Last Sunday of the month) तसेच दिल्ली, बेंगालुरु, हैद्राबाद, लेह-लडाख ईत्यादी ठिकाणी स्पर्धा होतात हे मला सोशल मिडीयामुळे माहीत झाले. पुणे मॅरेथॉन मला शालेय जीवनापासुन माहीत होती आणि ती अजुनही अखंडीतपणे चालु आहे. पुणे मॅरेथॉनचे फुकट मिळणारे बनियन/टि-शर्ट मिळवण्यासाठी मी आणि माझा मित्र नेहरु स्टेडीयमला जाऊन नावनोंदणी करायचो पण मॅरेथॉनमध्ये पळायला कधीच गेलो नाही. तेव्हा मॅरेथॉनचा लोगो असलेल्या बनियनचे फार आकर्षण वाटायचे. याअगोदर मॅरेथॉनशी संबंध आला तो एवढाच तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते की भविष्यात मी खरोखर मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी भाग घेईल. खरंतर या धावण्याच्या संसर्गाची फेसबुकवरील मित्रांच्या पोस्ट वाचुन वाचुन मला लागण झाली आणि त्यात "आज तुम्ही पळाला का?" (DID YOU RUN TODAY?) या ग्रुपमध्ये मला कोणीतरी ओढले. अगोदरच पळण्याचा संसर्ग होत चालला होता आणि त्यात त्या ग्रुपमध्ये तर सगळे वेडेच भेटले. वेडे म्हणजे पळण्याच्या बाबतीतले, तसे सगळे शहाणे आहेत. त्यांच्या पोस्ट वाचुन वाचुन त्या संसर्गाच्या दलदलीत मी आणखीनच खोलवर बुडालो. बुडत्याचा पाय खोलात गेला आणि मग मला पाय हलवण्याशिवाय पर्याय राहीला नाही. मी एकदाचा पळायला लागलो.
यावर्षीच्या पावसाळ्यात मी सायकलिंग सोडुन पळायला सुरुवात केली. कारण सायकल चालवायला गेलो की सर्व सायकल चिखलाने माखुन जायची आणि चिखलात माखलेली सायकल धुवुनच घरात घेण्याचा सौ. चा आग्रह असायचा. या आग्रहामुळे सायकल चालवायला जाण्याचा जाम कंटाळा यायचा. त्यामुळे सायकलिंग सोडुन मी धावाधाव करायला सुरुवात केली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात फेसबुकवरील "तुम्ही आज पळाला का?" या ग्रुपमध्ये पुणे एल्सॉम बोपदेवची पोस्ट वाचायला मिळाली. ३० जुलै रोजी बोपदेव घाटात अर्धमॅरेथॉन पळण्याची नामी संधी चालुन आली होती. बोपदेव घाटात पळण्याचे आव्हान मी स्विकारले. प्रवेश फी एकदम माफक होती फक्त १०० रुपये. १०० रुपये फी भरताना २४ रुपये टॅक्स गेला ते पाहुन असे वाटले की मोदी आणि जेटलीसुद्धा माझ्याबरोबर बोपदेवला पळायला येणार आहेत म्हणुन माझ्याकडुन २४ रुपये टॅक्स घेतला.
एल्सॉमच्या दिवशी पहाटे ४ वाजता ऊठुन मी चक्क आंघोळ केली. सायकलिंगला जायचे असेल तर मी कधीही आंघोळ करुन जात नाही. आंघोळ केल्याने मॅरेथॉन पळताना ताजेतवाने वाटेल असा एक अंदाज लावला होता. ४ वाजुन ४५ मिनिटांनी घर सोडले आणि बरोबर ५ वाजता कोंढव्याचा सिल्व्हरस्टार हॉल गाठला. इवेंट पेजवर दिलेल्या सुचनांनुसार उजव्या बाजुला चारचाकी वाहने आणि डाव्या बाजुला दुचाकी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बरेच स्वयंसेवक हातात झेंडे आणि अंगात रेडीयमचे झबले घालुन जागोजागी उभे होते. एका स्वयंसेवकाच्या ईशार्यावरुन मी माझी ज्युपिटर डाव्या बोळात कोंबली आणि पार्क करुन निघताना शेजारच्या दुचाकीच्या सायलेंसरचा मस्त चटका बसला. त्या चटक्याने उडालोच मी. कोणती रे शिक्षा ही पांडुरंगा? पहाटे निघताना मी बायकोची झोपमोडसुद्धा होऊ दिली नाही. घरामध्ये कसलाही आवाज न करता भल्या पहाटे एल्सॉममध्ये धावण्यासाठी आलो हाच का माझा गुन्हा? नशीब अपना अपना दुसरे काय?. चटक्यातुन सावरल्यावर पहीला अॅक्शन कॅमेरा डोक्यावर चढवला तसेच सेल्फी स्टीक जर्सीच्या मागच्या कप्प्यात टाकली आणि बिब काऊंटरकडे मोर्चा वळवला. बिब नंबर घेण्याचे काम शून्य मिनिटात झाले. काऊंटरवरील मॅडमला विजय वसवे नाव सांगताच त्यांनी यादी पुढे-मागे करुन लगेच माझे नाव शोधले आणि त्यापुढे माझी सही घेऊन समोरच्या गठ्ठ्यातील एक बिब नंबर उचलुन माझ्यासमोर ठेवला. हा आकड्यांचा खेळ कसा मजेशीर आहे पहा. बिब नंबर मिळाला २१०८७, यात २१ किमी अंतर आणि ०८७ हा रनरचा क्रमांक. योगायोगाने माझा सायकलिंगमधला रायडर नंबरसुद्धा ०८७ हाच आहे. म्हणजे सायकलिंगचा आणि रनिंगचा चांगला संयोग जुळणार असं दिसतंय. चार सेफ्टी पिन्स उचलल्या आणि माझ्या थोड्याफार शिल्लक राहीलेल्या ढेरीवर २१०८७ नंबर लावु लागलो. ते पाहुन एक ज्येष्ठ स्वयंसेवक पुढे सरसावले आणि मी लावुन देतो म्हणत एका क्षणात त्यांनी लावुन दिल्यासुद्धा. आता मी पळण्यासाठी तयार होतो पण अजुन साडेपाच वाजलेले नव्हते. म्हणुन मी वॉशरुमकडे वळालो. वॉशरुमसाठी भलीमोठी रांग होती. डोक्यावर चढवलेला कॅमेरा तसाच होता आणि त्याच्यासहीत मला वॉशरुमकडे जावे लागणार होते. वॉशरुममध्ये कॅमेरा घेऊन जाणे हा आडवे पडुन हसण्यासारखा जोक होता. पण माझ्या केमिस्ट्रीमधले कोणीच भेटले नाही म्हणुन हा हशा टळला. माझे हसु मी आतल्या आतच दाबुन धरले. प्रशांत तिडकेंची भेट झाली. त्यांच्याशी हस्तांदोलन करुन शुभेच्छा घेतल्या. योगेश अलमलेसुद्धा भेटले आणि त्यांच्याबरोबर एक सेल्फी घेतली जी पहाटेच्या अंधारामुळे एवढी चांगली आली नाही आणि मनासारखी चांगली सेल्फी येईपर्यंत क्लिक करत बसायला वेळ नव्हता. या दोघांचाही ईवेंट माझ्यानंतर होणार होता तरीसुद्धा हे दोघे वेळेच्या अगोदर सिल्व्हरस्टार हॉलवर हजर होते. पळायला आलेले सर्वजण जय्यत तयारीत हॉलच्या बाहेरील अंगणात येऊन थांबले होते. बरोबर ५ वाजुन ३० मिनिटांनी धावण्याचा ईशारा झाला. आयुष्यात पहील्यांदा भारतात राहुन वेळेचे बंधन पाळण्याचा पश्चाताप झाला नाही. साडेपाच म्हणजे साडेपाचला रेस सुरु झाली. हाफ मॅरेथॉन पळणार्यांची गर्दी पाहुन मलाही हुरुप आला होता. हुरुप आला खरा पण एवढ्या पहाटे ऊठुन मी कधीही धावायला वगैरे गेलेलो नव्हतो. ही वेळ माझ्या धावण्याची नव्हतीच. त्याची चुणुक लगेच जाणवायला लागली. पाय म्हणावे तसा प्रतिसाद देईनासे झाले. तरीही मी त्यांना बळेच खेचत होतो. पहाटेच्यावेळी पायांवर आलेला ताण आणि लगेच सुरु झालेली बोपदेवची चढाई माझी परिक्षा पाहु लागले. बोपदेव घाट मला अंधारात लपुन बसलेला अघासुरासारखा भासायला लागला. पुढे माझे काय होणार याची मला जाणिव झाली. आ वासुन बसलेला अघासुर मला गिळंकृत करणार हे स्पष्ट दिसत होते. पहील्या चार किलोमीटरमध्येच माझा कार्यक्रम उरकलेला होता आणि मी व्हेन्टिलेटरवर आलो होतो. पाचव्या किलोमीटरला त्या जीवघेण्या चढाने माझ्यावर आणखी तीव्र हल्ला करुन मला नेस्तनाबुत केले. "हारना और गिरना दोनो अच्छे होते है, औकात का पता चलता है" बोपदेव घाटाने मला माझी लायकी दखवली होती. कुठुन दुर्बुद्धी सुचली आणि या एल्सॉममध्ये पळायला आलो असे वाटायला लागले. मी शरणागती पत्करली. शरणागती पत्करण्यासारखे दु:ख नाही. पायातील ताकद संपली होती. "जब कदम ही साथ ना दे....तो मुसाफीर क्या करे?, मॅरेथॉन दौडना जुर्म है तो... जुर्म हम से हो गया" हे बच्चनचे गाणे आठवु लागले. मंझिले अपनी जगह आणि रास्तेही अपनी जगह वरच होते. पळताना एकेक पाऊल उचलायला महत्प्रयास करावा लागत होता. आणि एका निवांत क्षणी मी पळायचे सोडुन दिले आणि चालत चालत अंतर कापु लागलो. निवांत चालताना पायांना काय बरे वाटले म्हणुन सांगु...अहाहा!! काय तो आनंद वर्णु मी!! फार फार सुख वाटले पायांना. पण हे सुख जास्त वेळ टिकले नाही. पाठीमागुन एकाने आरोळी ठोकली, "हा पळण्याचा इवेंट आहे चालण्याचा नाही...चालत काय चाललाय?..चला पळा" वर्मावरच बोट ठेवले पठ्ठ्याने. मग मी बळेच धावतोय असे सोंग आणले पण वेग मात्र चालण्याएवढाच ठेवला...हाहाहा.. एवढी वाईट परीस्थिती झाली होती की त्या परीस्थितीत एखादा वाघ जरी पुढे आला असता तरी त्याच्यापासुन वाचण्यासाठी मी धावण्याचा प्रयत्न केला नसता, मला खायचे तर खा बाबा पण पळायला लावु नकोस असेच म्हटले असते मी त्याला. आणि तो बोपदेव घाटही पानिपतातल्या अब्दालीसारखा डिवचत होता,"क्युं पटेल, और दौडना चाहते हो?" मी पण त्याला बजावले,"हां बचेंगे तो और भी दौडेंगे" मॅरेथॉनला सुरुवात झाली तेव्हा मी २ तास १५ मिनिटांची बस पकडण्याच्या विचारात होतो. पण या बोपदेवच्या चढावर ती कुठे अदृश्य झाली कोणास ठाऊक? मग मी त्यामागुन येणार्या २ तास ३० मिनिटांच्या बसबरोबर धावु लागलो. चढाच्या शिरजोरीमुळे मी त्या बसच्याही मागे पडायला लागलो. ते पाहुन मला वाटायला लागले की आता माझी ही हाफ मॅरेथॉन अडीच तासातही पुर्ण होऊ शकणार नाही. केवढी ही नामुष्की? पहील्या सहा किलोमीटरसाठी तब्बल ४४ मिनिटे आणि ४६ सेकंद लागले होते. पेस होता ०७:४६/किमी. सहाव्या किलोमीटरच्या अखेरीला बोपदेवचा तो जीवघेणा चढ आमच्यातला जीव काढुन घेत घेत कसाबसा संपला. त्यादिवशी "आणि बोपदेव संपला" या वाक्याला "आणि बुद्ध हसला" या वाक्याएवढे महत्व आले होते. दु:खाचा चढ आता संपला होता आता फक्त उताराची हिरवळ येणार होती. आणि खरंचच पुढे मस्त उतार होता. त्या उतारावर मी अघाशासारखा तुटुन पडलो. बोपदेवबरोबर झालेल्या पराभवाची सर्व खुन्नस मी त्या उतारावर काढली. माझ्या यथाशक्तीने जेवढे जोरात पळता येईल तेवढे जोरात पळालो. रस्त्यावर ठिकठिकाणी स्वयंसेवक ऊभे होतेच. रनर्सला वाहनांचा त्रास होऊ नये म्हणुन ते अतिशय तत्पर होते. पुणे ट्रॅफिक पोलिसांनीही या कामास चांगलाच हातभार लावला यासाठी त्यांचे कौतुक करावेच लागेल. पाण्याच्या बाटल्याही ठराविक अंतराने व्यवस्थित मिळत होत्या. मी पाठीला १ लिटरचे हायड्रेशन पॅक लावुन आलो होतो. संपुर्ण बोपदेव घाट हे ओझे उरावर घेऊन गाढवासारखा पळालो. अतिशहाणपणा करायला गेल्यावर अशा छोट्या छोट्या चूका होतातच. घाट संपल्यानंतरचे ३ किमी अंतर मी १७ मिनिटे ८ सेकंदात पुर्ण केले. पेस होता ०५:४३/किमी. त्यानंतरचा सर्व रस्ता टेबलासारखा सपाट होता. हृदयाची धडधड आता शांत झाली होती. त्यामुळे मला फोटो काढण्याची ईच्छा होऊ लागली. सेल्फी स्टीकला मोबाईल जोडुन स्व:ताचे मस्त फोटो काढुन घेतले. यु-टर्नला एक केळ घशाखाली सरकवले. चढ संपल्यानंतरचा सर्व प्रवास सुखकर झाला होता. यु-टर्नला ११ किमी अंतर दाखवत होते. आजुबाजुचा सर्व परीसर मस्त हिरवाईने नटलेला होता. सुर्याची कोवळी किरणे तर त्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होती. परतीच्या प्रवासात १४ ते १६ किमी अंतरात पुन्हा थोडासा चढ लागला. १६ किमी अंतर पुर्ण झाल्यावर बोपदेव घाटाच्या माथ्यावर पोचलो होतो. आता उताराची हिरवळ मिळणार होती. ज्या ६ किमी ने माझी पळता भुई थोडी केली त्याच ६ किमीच्या मी आता चिंध्या उडवणार होतो. ते म्हणतात ना, "मौका सबको मिलता है" आता मला मौका मिळाला होता. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तर पाकीस्तानलाही मौका मिळाला होता यावर्षी. उतारावर हुकुमत गाजावण्याची संधी मी थोडीच दवडणार होतो. कात्रज घाटातील उतारावर पळण्याचा सराव असल्यामुळे पायांना जास्त कष्ट पडले नाहीत. मी उतारावरुन वेगात पळायला लागल्यानंतर कहर म्हणजे एकजण मला थांबवत थांबवत म्हणाला,"मोबाईलमध्ये आमचा फोटो काढुन देतो का?" हाहाहा....मी पळण्यासाठी आलोय का फोटो काढुन देण्यासाठी? किंवा हा पळण्याचा इवेंट आहे की फोटो काढण्याचा? फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर ठेवलेले असताना मला थांबणे योग्य वाटले नाही. मी हाताने "नाही..नाही.." म्हणत तसाच पुढे निघुन गेलो. फोटो काढण्याची हौस समजु शकतो पण पळणे सोडुन फोटो काढुन देण्यासाठी थांबणे मला योग्य वाटले नाही. मोबाईलमधील स्ट्रावाच्या आकड्यांवर सारखे लक्ष जायचे आणि २१ किमी पुर्ण व्हायला किती वेळ लागेल याचे अंदाज बांधत रहायचो. उतार संपता संपता हातात पाण्याची बाटली घेऊन थांबलेल्या एका चिमुरडीने माझे लक्ष वेधुन घेतले. "पाणी घ्या काका" म्हणाली, मला तिचे फार कौतुक वाटले. स्ट्रावामध्ये २१ किमी पुर्ण झाले तेव्हा २ तास १७ मिनिटे आणि ४८ सेकंद झालेले होते. हाफमॅरेथॉन पुर्ण झाली आता पळणे थांबवायचे का? असा प्रश्न पायांनी मेंदुला विचारला, मेंदुचा निर्णय येईपर्यंत मनाने ठाम भुमिका घेत सिल्व्हरस्टार हॉल येईपर्यंत थांबायचे नाही असे सांगितले. शेवटचे १०० मी आणखी जोरात पळालो आणि २ तास २२ मिनिटे ४६ सेकंदांनी सिल्व्हरस्टार हॉलमध्ये पोचलो. स्ट्रावानुसार मी २२.१ किमी अंतर पळालो. ज्या कोणामुळे मला १ किमी अंतर जास्त पळावे लागले त्याचे त्याच्या बायकोबरोबर भांडण व्हावे आणि त्याच्या रविवारची वाट लागावी अशी मनोमन ईच्छा व्यक्त केली. नाहीतर काय जिथे १ मी अंतर कापायला मुश्कील जात होते तिथे १ किमी अंतर जास्त पळायला लावले. धावाधाव एकदाची संपली म्हणुन पायांनी सुटकेचा निश्वास टाकला. हॉलच्या प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर मीच माझी पाठ थोपटुन घेतली. कारण कौतुक करणारे मित्र कोणीच जवळपास नव्हते आणि जे कोणी ईतर होते ते सर्वजण फोटो-फोटो खेळत होते. सायकल चालवणार्या सर्व मित्रांना भेटलो. फेसबुक आणि ईतर सोशल मिडीयावर दिसणारे बरेच चेहरे दिसले पण प्रत्यक्ष ओळख नसल्यामुळे त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. सर्व मित्रांच्या मुलाखती कॅमेर्यामध्ये कैद केल्या, मुलाखती घेताना खुप मज्जा आली. सर्व सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर जास्त वेळ न दवडता लगेच ज्युपिटरवर सवार होऊन मी घर गाठले.
डावीकडुन चंद्रकांत पाटील, योगेश अलमले, प्रशांत जोग आणि मी विजय वसवे
डावीकडुन मी विजय वसवे, प्रशांत तिडके, चंद्रकांत पाटील आणि निखिल शहा (Did you Run today चे अॅडमिन)
डावीकडुन चंद्रकांत पाटील, मी आणि या मॅडमचे नाव विसरलो सॉरी.
२१ किमी, रनर क्रमांक ८७
फोटो म्हटले की लगेच स्माईल...हाहाहा..
दोन प्रशांत एक विजय
स्वत:च स्वत:चे फोटो काढणे
निखिल शहा, चंद्रकांत पाटील आणि २:३० च्या बसचे पेसर प्रविण झेले
No comments:
Post a Comment