Friday, 15 October 2021

माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन २०२१


स्पर्धा - माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन

 

अंतर - ५० किमी

तारीख - १० ऑक्टोबर, २०२१

आयोजक - रनबडीज

ठिकाण - माथेरान, थंड हवेचे ठिकाण

प्रवेश फि - ३०००/- (फिनिशर मेडल, टि-शर्ट ई)

फोटो - वेलोस्कोपच्या छायाचित्रकारांनी धावताना काढलेले फोटो हवे असतील तर ३५५/- रुपये आकारले जातात.

मुफ्त फोटो - चेतन घुसानी

हवामान - थंड अपेक्षित होते परंतु ऑक्टोबरची उष्णता ईथेही जाणवली. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे धावण्याच्या मार्गावर चिखल झालेला होता आणि वातावरणात उकाडा जाणवत होता. थंड हवेच्या ठिकाणी थंड हवा औषधालाही मिळाली नाही (धावताना). 

प्रवास - पुणे ते खोपोली जुन्या महामार्गाने गेल्यास उत्तम. पुणे ते माथेरान थेट प्रवास करण्याची कोणतीही सार्वजनिक सुविधा नसल्यामुळे स्वत:चे वाहन घेऊन जाणे अपरीहार्य. माथेरानमध्ये स्वयंचलीत वाहनांना प्रवेशबंदी आहे त्यामुळे माथेरानपासुन अडीच किमी अंतरावर वाहन लावावे लागते. त्यासाठी मोठा वाहनतळ आहे तिथे भरभक्कम दर आकारुन वाहन लावुन घेतात (दोन दिवसाचे १२० रुपये). माथेरानमध्ये प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश फि घेतली जाते. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आहे. छोटया रेल्वेने जायचे असेल तर तिकीट दर प्रतिव्यक्ती ४५ रुपये आहे आणि घोडयावर बसुन जाण्याचा दर २०० रुपये आहे. तसेच मोठया अवजड बॅगा वाहुन नेण्यासाठी हमालसुद्धा मिळतात परंतु त्यांचा दर विचारण्याचा प्रश्न आला नाही. तुम्ही मॅरेथॉन धावायला या नाहीतर ईथे फिरायला या तुम्हाला हे सर्व कर भरावेच लागतात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पैशाचे सोंग आणता येत नाही आणि मी हाडाचा मध्यमवर्गीय आहे. 

 धावण्याचा मार्ग - हॉटेलच्या आवारातुन सुरुवात आणि शेवटही त्याच हॉटेलमध्ये होतो. धावण्याचा मार्ग खुप आव्हानात्मक आहे. हा मार्ग जीवघेणे चढ-उतार, चिखल, ओली माती, दगड-गोटे, गवत यांनी परीपुर्ण आहे तसेच ब-याच ठिकाणी घोडयांची लीदही पसरलेली असते. धावण्याच्या मार्गात काळे डांबर औषधालाही पहायला मिळत नाही. त्यामुळे फक्त काळ्या डांबरावर धावण्याची सवय असलेल्या धावकांना चुकल्या चुकल्या सारखे वाटु शकते. १ किमी अंतर माथेरानच्या मुख्य भागातुन धावावे लागते जिथे खडी आणि सिमेंटच्या ठोकळ्यांनी बनवलेला रस्ता आहे तर उरलेले सर्व अंतर गर्द झाडी आणि दाट जंगलातुन धावावे लागते. दाट जंगल असुनही ईथे एकही जंगली प्राणी पहावयास मिळाला नाही. स्वच्छ आणि शुद्ध हवा काय असते याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ईथेच धावायलाच हवे. म्हणुनच मुंबईचे बरेचसे धावक या शर्यतीत भाग घेण्यासाठी येतात. हा मार्ग म्हणजे माथेरानच्या कडेकडेने माथेरानच्या माथ्याला मारलेली एक प्रदक्षिणाच होय. धावण्याच्या मार्गात एक छोटेसे धरण सुद्धा लागते. त्या धरणाच्या भिंतीवरुन धावताना खुप रोमांचक अनुभव येतो. दगड-गोटयांच्या रस्त्यावरुन पळताना खुप जपुन पाय टाकावा लागतो. "तळ्यात मळ्यात हातपाय गळ्यात" थोडी जरी चूक झाली तरी गुडघे फुटण्याची वेळ येऊ शकते. "नजर हटी दुर्घटना घटी" बरेचसे धावक धावताना पडुन रक्तबंबाळ झालेले दिसुन येत होते. ईथे धावताना माकडांपासुन स्वतःचा बचाव करणे सुद्धा खुप महत्वाचे आहे. धावताना खाण्याची वस्तु हातात दिसल्यास माकडे ती घेण्यासाठी तुमच्या मागे लागु शकतात. 

सोयीसुविधा - धावण्याच्या मार्गात पाणी, केळी, बिस्कीटे, लिंबुपणी, मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. धावताना छान छान फोटो काढले जातात. माथेरानमध्ये राहण्यासाठी मुबलक हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुम्हाला जर इतर झंझट नको असेल तर आयोजकांमार्फत योग्य दर आकारुन तुमच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली जाते. राहण्याची व्यवस्था त्याच हॉटेलमध्ये केली जाते जिथे स्पर्धा भरवलेली असते. 

रणनिती - यावेळेस बरोबर ६ वाजता शर्यतीला सुरुवात झाल्यामुळे पहीले २ किमी अंतर आंधळी कोशिंबीर खेळण्यातच गेले आणि तेही दगड गोटयांनी भरलेल्या तीव्र उतारावर. नशीब खडडयात पाय जाऊन किंवा त्या दगडगोटयांवरुन घसरुन पडलो नाही. पाय मुरगळला वगैरे नाही हेही नसे थोडके. पहील्या पाच किमी मध्येच भयाण चढ आणि तीव्र उतारांनी पळता भुई थोडी केली. जीवन नकोसे व्हायला लागले आणि कुठुन बुद्धी सुचली आणि या माथेरानला पळायला आलो असे वाटु लागले. परंतु पाच किमी नंतरचा मार्ग  सुसह्य होता. त्यानंतर हृदयाचे ठोके वाढवणारे चढ लागत नाहीत तसेच दगड-गोटयांचा रस्ता सुद्धा नाही. चिखल, ओली माती आणि जागोजागी साठलेले पाणी अशा विवीध घटकांनी परीपुर्ण असलेल्या रस्त्यावर धावताना सुसह्य वाटते. या पट्ट्यात पहील्या पाच किमी मध्ये कमी झालेल्या गतीची तुम्ही भरपाई करू शकता. गती वाढवण्याची उत्तम संधी मिळते. वाया गेलेला वेळ भरुन काढता येऊ शकतो. अशा प्रकारे याच मार्गावर दोन फे-या मारल्यावर शर्यत संपते. शर्यत संपतानालागणारा ५००मी अंतराचा जीवघेणा चढ जीवन नकोसे वाटायला भाग पाडतो. माझ्या गारमिनने या स्पर्धेचे अंतर फक्त 47.33 किमी दर्शवले. ५० किमी अंतर न भरल्यामुळे गारमिनने हि अल्ट्रा मॅरेथॉन म्हणुन स्विकारली नाही :(

 

शर्यतीतील माझी रसद - या शर्यतीत मी स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी (पाण्यात टाकुन) पिलो आणि दर आठ किमी नंतर एक पीनट बटर खात होतो. स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी हे एक उत्तम प्येय आहे जे धावताना आणि सायकल चालवताना आपल्या शरीरातील ऊर्जा कायम राखण्यास मदत करते. सेनर्जी विकत घ्यायचे असेल तर माझ्याकडे ३० टक्के सुट देणारा डिस्काउंट कोड आहे. CODE - STEADVIJAY

 

माझा सहभाग - मी ५० किमी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि ५ तास ४५ मिनिटांची वेळ नोंदवुन माझ्या वयोगटात चौथा आलो. माझी हि पाचवी अल्ट्रा मॅरेथॉन आहे. आतापर्यंत मी पुणे अल्ट्रा, एसआरटी अल्ट्रा, टाटा अल्ट्रा, कुंडलिका अल्ट्रा आणि माथेरान अल्ट्रा अशा पाच अल्ट्रा मॅरेथॉन केलेल्या आहेत.












#steadfastathlete #running #run #runner #runninglife #runningtraining #runningismylife #runningmotivation #marathon #ultra #runningismylife #runnersofinstagram #runnersworld #runnersofpune #runnersofindia #Matheran #ultrarunning #ultramarathon #matheranultra #runbuddies 







Monday, 11 October 2021

दिवस पहीला, मनाली लेह खार्दुंगला सायकल मोहीम


सायकल मोहीम - मनाली लेह खारदुंग ला सायकलिंग (एमटीबी)

आयोजक - युथ हॉस्टेल असोसिअशन ऑफ इंडीया

कालावधी - १४ दिवस (१० जुलै ते २३ जुलै, २०२१)

शुल्क - २८००० रुपये (सर्व सुविधांसहीत)


सायकल - या प्रवासात चालवण्यासाठी लागणारी एमटीबी सायकल हि YHAI तर्फे दिली जाते. मध्यम स्वरुपातील नावाजलेल्या ब्रॅंडची उत्तम सायकल सर्व सहभागी व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार दिली जाते.

मेडीकल सुविधा - सोबत डॉक्टर, अ‍ॅम्बुलन्स, ऑक्सीजन सिलेंडर, प्राथमिक उपचार साहीत्य
सायकलिंगला लागणारे साहीत्य - हेल्मेट, ग्लोव्ज, एल्बो आणि नी गार्डस आणि रिफ्लेक्टीव बेल्ट ई. साहीत्य पुरवले जाते.

राहण्याची व्यवस्था - तंबुचे टॉयलेट (सार्वजनिक), ताडपत्री तंबु (एका तंबुत ८ व्यक्ती) तसेच झोपण्यासाठी स्लिपींग बॅग आणि चादर हे साहीत्य पुरवले जाते.

जेवणाची व्यवस्था - अमर्यादित शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली असते, जैन प्रकारचे जेवण सुद्धा बनवले जाते. चहा, सुप, वेलकम ड्रिंक, पिण्यासाठी गरम पाणी इ. तसेच १५९०० फुटांवर गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच...

जेवणाचे साहीत्य - ताट, वाटी, चमचा आणि मग (मोठा कप) हे स्वत: न्यावे लागते आणि जेवण झाल्यावर स्वत: स्वच्छ करुन ठेवावे लागते.

सायकल दुरुस्ती - सायकलला लागणारे सर्व सुटे भाग व आवश्यकता पडल्यास टायरसुद्धा पुरवले जातात.

अनुभवी मेकॅनिक - सर्व सायकल्सची व्यवस्थित देखभाल करण्यासाठी कुशल मेकॅनिक कायम सोबत असतात.

आवश्यक कागदपत्रे - आधारकार्ड, मेडीकल फिटनेस रिपोर्ट, शुगर रिपोर्ट, ईसीजी रिपोर्ट, २ फोटो, डोस घेतल्याचे प्रमाणपत्र (कोविद-१९) ई.

 कॅंपला पोचणे (१० जुलै)
 मनालीच्या अलीकडे ११ किमी अंतरावर असलेल्या युथ हॉस्टेलच्या कॅंपसाईटवर (पतली-कुहल) आपापल्या खर्चाने जायचे होते. मी पुणे ते चंदिगड विमानाने आणि चंदिगड ते मनाली वोल्वो बसने प्रवास केला. दिल्लीवरुन मनालीला जाणा-या सर्व बस चंदिगड मार्गेच जातात त्यामुळे दिल्लीला जाण्याची आवश्यकता नसते. दिल्लीवरुन मनालीला जायचे म्हणजे वाईमार्गे सातारा आहे....हाहाहा. रात्री जेवण करुन बसमध्ये गाढ झोपण्यात मला खुप मज्जा वाटते. माझा सहप्रवासी सुद्धा गाढ झोपणारा निघाल्यामुळे बसमध्ये बसल्यापासुन ते उतरेपर्यंत आमच्यात काडीचाही संवाद झाला नाही. वोल्वो बसच्या ड्रायवरने मी सांगितलेल्या गुगल लोकेशन वर मला उतरवले. कॅंप लिडर मिथुन दासने व्हाटसएप ग्रुपवर लोकेशन पाठवलेले होते. याअगोदर सर्व सहभागी रायडर्सची दोन वेळा झुम मिटींग घेऊन सर्वांना आवश्यक सुचना देण्यात आलेल्या होत्या. सर्व औपचारीक गोष्टींची पुर्तता करुन मी YHAI कॅम्पमध्ये दाखल झालो. मनालीचे निसर्गसौंदर्य, व्यास नदी, तिचा आवाज, सफरचंदांची विवीध झाडे, चोहोबाजुंनी हिरवळीने नटलेले डोंगर पाहुन मी अवाक झालो. व्यास नदीच्या अतिथंड पाण्याचा स्पर्श मला आजही आठवत आहे. संध्याकाळपर्यंत सर्व सहभागी रायडर्सना सायकलसहीत सर्व साहीत्याचे वाटप करण्यात आले. कॅम्प साईटचे हवामान मला पुणे येथील हवामानाशी मिळते-जुळते वाटत होते. पुणे, नाशिक तसेच मुंबई येथील बरेचसे रायडर्स या सायकल मोहीमेत सहभागी झालेले असल्यामुळे कॅंपमध्ये मराठी बोलले तरीही चालत होते. 

सराव राईड (११ जुलै)
 कॅंपसाईटच्या जवळ नग्गर पॅलेस हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. येथे पोचण्यासाठी साधारण ५ ते ६ किमीचा जीवघेणा चढ चढावा लागतो. नग्गर पॅलेसला एक लाकडी राजवाडा असुन रात्रीच्या वेळी त्या राजवाडयात राजाचे भुत फिरते असा समज आहे. सर्व सायकलस्वारांच्या चढावर सायकल चालवण्याच्या क्षमतेचे निरीक्षण करुन त्यांचे ऑरेंज आणि ग्रीन अशा दोन गटात वर्गीकरण करण्यात आले. ऑरेंज म्हणजे हळु चालवणारे किंवा नवशिके आणि ग्रीन म्हणजे प्रशिक्षित.   याठिकाणाहुन बिजली महादेवकडे जाणा-या रस्त्यावर काही अंतर सायकल चालवण्याची संधी मिळाली. सराव राईडच्या संध्याकाळी कॅंप फायर आयोजित करुन सर्वांची ओळख परेड घेण्यात आली. भारतातील अनेक शहरांमधुन या मोहीमेत सहभाग नोंदवण्यात आलेला दिसुन येत होता. 

दिवस - १ 
पतलीकुहल ते मढी
अंतर - ४८ किमी
चढ - २०००मी+
श्रेणी - अत्यंत कठिण
हवामान - अतिशय थंड, कमी-अधिक पाऊस
 आदल्या रात्रीपासुन सुरु असलेल्या पावसामुळे तंबुमधुन बाहेर पडणे सुद्धा अवघड झाले होते. पावसामुळे पहील्या दिवसाची राईड नियोजित वेळेत सुरु होऊ शकली नाही. संपुर्ण राईडमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस चालुच होता. पावसात भिजु नये म्हणुन मी मोबाईल बाहेर काढलाच नाही. मोबाईल वाचला तर नंतर पाहीजे तेवढे फोटो काढता येतील या विचाराशी मी एकनिष्ठ राहीलो आणि फोटोग्राफीचा मोह टाळला. हे खरंच फार फार कठिण होते. तेथील स्वर्गीय सौंदर्य फक्त डोळ्यांमध्ये साठवुन घेतले. मनालीच्या पुढे आल्यावर एक रस्ता अटल बोगद्याकडे तर दुसरा रस्ता रोहतांग खिंडीकडे जातो. अटल बोगद्यामुळे संपुर्ण रोहतांग खिंड टाळता येते. आम्हाला रोहतांग बघावयाचा असल्यामुळे आम्ही अटल बोगदा टाळला. पावसामुळे तापमान अतिशय थंड झालेले होते. निम्म्या अंतरापर्यंत हाताचे तळवे आणि पायाच्या पंजांचा बर्फ झाल्यासारखे वाटत होते. राईडला सुरुवात झाल्यापासुन सुरु झालेला चढ संपण्याचे नाव घेत नव्हता. सायकल चालवता चालवता मी "चढ ईथला संपत नाही...." हे गाणे रचायला सुरुवात केली होती. राईडचा शेवटही चढावरच झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये पावसाने थोडी उसंत दिली आणि मी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत भरपुर फोटो आणि व्हिडीओ काढले. मी अधुनमधुन फोटो काढायला थांबायचो तेव्हा माझ्या सोबतचे रायडर्स (रायडर) माझ्यासाठी न थांबता तसेच पुढे निघुन गेले. हे बरंच झालं म्हणजे आता मला इथुन पुढे कोणासाठी थांबण्याची आवश्यकता नव्हती. मढी येथे पोचल्यावर आजुबाजुच्या शिखरांवर बर्फ पहावयास मिळाला. याचि देही याचि डोळा बर्फ पाहण्याचा हा माझा पहीलाच प्रसंग. बर्फाच्या अस्तित्वामुळे संध्याकाळच्या वेळेस येथे प्रचंड गारठा जाणवायला लागला होता. दिवसभर पावसात सायकल चालवावी लागली, संध्याकाळी सोसाटयाचा थंडगार वारा सुटला आणि भिजलेल्या जमिनीवर तंबु लावल्यामुळे मढी येथील वास्तव्य असह्य वाटु लागले. तंबुच्या कापडावर बाहेरच्या बाजुने दगडांचे थर रचुन आम्ही तंबु हवाबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तंबुमध्ये सुसह्य वाटायला लागले. असे म्हणतात कि मनाली लेह खारदुंग ला सायकल मोहीमेतील पहीला दिवस हा अत्यंत खडतर असतो. तुम्ही जर पहील्या दिवशी निभावुन नेले तर शेवटपर्यंत तुम्हाला कसलीही अडचण येत नाही.
क्रमशः

दिवस दुसरा, मढी ते सिस्सु


दिवस दुसरा, मढी ते सिस्सु

दिवस - २

मढी ते सिस्सु

अंतर - ५० किमी

चढ - ७६२ मी (गारमिननुसार)

श्रेणी - मध्यम कठिण

हवामान - रोहतांग पास पर्यंत अतिशय थंड, कमी-अधिक पाऊस, त्यानंतर आल्हाददायक आणि रम्य वातावरण

     जेवल्यानंतर हात धुण्यासाठी गेलो तेव्हा मी दहा मिनिटे त्या पाण्याकडे बघत बसलो होतो. थंडीच्या दिवसात आंघोळीला गेल्यावर आंघोळ करण्याऐवजी जसे आपण बादलीतील पाण्याकडेच नुसते बघत राहतो तसे. आता कसा त्या पाण्यात हात घालु? नंतर कळले कि ते पाणी गरम करुन ठेवलेले आहे. हाहाहा.. हात धुण्याची हि अवस्था तर आंघोळीचा विचारही मनात येणे शक्य नव्हते. एखादयाने बंदुक दाखवुन जरी आंघोळ करायला लावली असती तरीही मी आंघोळ केली नसती. गोळी घाल बाबा! पण मी आंघोळ करणार नाही असे मी निक्षुन सांगितले असते. या अशा असह्य थंडीमुळे कधी एकदा मढी सोडतोय असे झाले होते. पहील्याच दिवशी एवढी वाताहत झाली होती कि आता पुढे काय वाढुन ठेवलेले असेल या चिंतेने ग्रासुन गेलो होतो. "देवाक काळजी रे...माझ्या..." या गाण्याच्या ओळी आपसुकपणे माझ्या ओठांवर येत होत्या. कुठुन बुद्धी सुचली आणि या राईडला आलो असे मला वारंवार वाटू लागले होते. यात भर म्हणजे पाच रायडर्सनी राईड सोडण्याचा निर्णय घेतला. बॅगा आवरुन त्यांनी थेट घरचा रस्ता धरला. या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नाही. आजही काही ढग मढीच्या दिशेने येताना दिसत होते ते पाहुन तर तिथुन लवकरात लवकर पळ काढावासा वाटत होता. पहाडी वातावरण हे एखादया अल्लड तरुणीच्या मनातील लहरींसारखे असते. कधी आणि कसा बदल होईल काही सांगता येत नाही. आज पुन्हा त्या पावसात भिजण्याची बिलकुल ईच्छा नव्हती. मस्त ऊन अंगावर यावं असं मनापासुन वाटत होते परंतु ऊन तर तिथे औषधालाही नव्हते. भुक लागली तर पर्याय सोबत असावा म्हणुन राईडला निघताना दुपारचे जेवण डब्यामध्ये सोबत घेतले.

 

     आज मला रोहतांग पास पहावयास मिळणार होता. आजपर्यंत सिनेमात पाहीलेला रोहतांग पास आज मी प्रत्यक्षात पाहणार होतो. रोहतांगची पहीली भेट आणि तीही सायकलवर. हा केवळ दुग्धशर्करा योग होता. अतिशय थंड वातावरणात राईडला सुरुवात झाली. गर्दीपासुन आणि थंडीपासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी मी सुरुवातीपासुनच सायकलचा वेग वाढवला. अतिउंच प्रदेशातील चढावर वेगात सायकल चालवल्यामुळे माझ्या हृदयाची धडधड काही क्षणातच आगगाडीसारखी धाडधाड करु लागली. हृदयाची धडधड वाढताच थंडीचा असर कमी-कमी होत गेला. मी रोहतांगच्या दिशेने मार्गक्रमण करु लागलो. रोहतांगकडे घेऊन जाणारा एकेक हेअरपिन मला रोमहर्षक वाटत होता. प्रत्येक हेअरपिनच्या वळणावरुन खाली नजर टाकुन पाहीले कि अदभुत दृश्य पहावयास मिळत होते. बर्फाच्या सान्निध्यातील ती नागमोडी वळणे चित्त वेधुन घेत होती. कपडयांचे तीन थर चढवलेले असुनही घामाचा लवलेशही नव्हता. रस्त्याच्या बाजुने हिरवळ, त्या हिरवळीला बिलगुन वाहणारे झरे, कसलाही कोलाहल नाही कि हॉर्नचा कर्णकर्कश आवाज नाही फक्त मी आणि माझी सायकल शांतपणे त्या रस्त्यावरुन जात होतो. माझ्या सायकलचाही कसलाही आवाज येत नव्हता. रोहतांग पासचा रस्ता मला एखाद्या ईमारतीचा जिना चढल्यासारखा वाटत होता. मी वर वर जात राहीलो तरी खालुन येणारा सर्व रस्ता माझ्या कायम दृष्टीपथात होता आणि त्यावरुन येताना दिसणारे माझे चिमुकले सायक्लिस्ट मित्रही पहायला फार गंमत वाटत होती. हळुहळु मी ढगांच्याही वर जाऊ लागलो. एव्हाना सकाळी आलेल्या ढगांनी पावसाला सुरुवात केलेली होती. मी उंचावरुन खाली कोसळणा-या पावसाकडे पाहत होतो. आकाशात ढग नसतानासुद्धा ढगांच्या गडगडण्याचा आवाज मी अनुभवला कारण मी ढगांच्याही वर होतो. ढगांचा एकमेकांवर आदळण्याचा धडामधुडुम आवाज होऊन मस्त पाऊस पडत होता. मी ढगांपेक्षाही उंचावर असल्यामुळे पावसाचा एक थेंबही मला स्पर्श करु शकला नाही. मला लगेच ते व्हाटसअपवर येणारे एक फॉरवर्ड आठवले कि पावसाच्या समस्येवर मात करण्यासाठी गरुड कसा ढगांच्याही वर जाऊन उडतो. पाऊस आल्यावर ढगांच्याही वर जाऊन उडणा-या गरुडाला येणारा अनुभव मला अनुभवण्याचे भाग्य लाभले. अजुन वरवर गेल्यावर मला उंचावर राहणारी गिधाडे सुद्धा दिसायला लागली. मी, माझी सायकल, आणि त्या उंच शिखराकडे घेऊन जाणा-या रस्त्यावरील निरव शांतता त्या गिधाडांच्या आवाजाने भंग पावली. पुढे गेल्यावर राणी नाला लागला. तिथे फोटो घेण्यासाठी आवर्जुन थांबलो. बर्फाचा अवाढव्य थर आणि त्याखालुन वाहणारे पाणी पाहताना फार मजा आली. तो वळणा-वळणांचा रस्ता कधी संपला ते कळले पण नाही. YHAI चहा बनवणार-या टिमने मला थांबवले आणि चहा घेऊनच जायचे असा आग्रह केला. सर्वात पुढे आलेला रायडर म्हणुन त्यांनी माझे खुप कौतुक केले. रोहतांग इथे समोरच आहे असेही त्यांनी मला सांगितले. त्या अतिथंड वातावरणात गरम चहाचा एकेक घोट स्वर्गिय आनंद देत होता. महर्षी वेदव्यास यांचे मंदिर लांबुनच पाहीले. हे ठिकाण महर्षी व्यास यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले आहे. अशा या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी मी पुन्हा नक्की जाणार आहे. यावेळेस मी फक्त सायकल चालवायला आलेलो असल्यामुळे इतर कामांना प्राधान्य दिले नाही.

  रोहतांगजवळील बर्फ ब-यापैकी वितळलेला होता. त्यामुळे हा सर्व परीसर छानपैकी नजरेखालुन काढता आला. रोहतांग (ला) लिहलेला मैलाचा दगड तर एवढा सुंदर दिसत होता कि विचारु नका. त्याच्या सौंदर्याची मला भुरळ पडली होती. माझी खुप दिवसांची ईच्छा आज पुर्ण झाली. विरह आज संपला होता. रोहतांग(ला) अजुन पाहीला नाही का? असे ईथे येऊन गेलेल्या मित्रांना विचारण्याची फार खुजली असते. आज मी त्यांची ती खुजली मिटवली तेही सायकलवर येऊन. अशा रीतीने रोहतांग(ला) सायकलवर सर करण्याचे स्वप्न पुर्ण झाले. आता पुढच्या प्रवासाकडे लक्ष देणे गरजेचे होते. अजुन खुप मोठा पल्ला गाठणे बाकी होते. मैलाच्या दगडापासुन पुढे उतारच उतार होता. असा उतार कि अहाहा..!! दु:खाचा चढ ओलांडल्याशिवाय सुखाचा उतार येत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. तिथुन पुढे वातावरणामध्ये आमुलाग्र बदल होत गेला. चढ चढताना अमावस्या आणि उतरताना पोर्णिमा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सुर्यकिरणांचा स्पर्श झाला जो एकदम रोमहर्षक वाटत होता. सुर्यदेवाचे दर्शन झाले आणि ऊन पहावयास मिळाले. जादुची कांडी फिरवल्यासारखे वातावरण बदलले होते. स्वच्छ सुर्यप्रकाश आणि निरभ्र निळेनिळे आकाश यांच्या संयोगातुन दिसणारे आजुबाजुचे नजारे एवढे सुंदर दिसत होते कि त्यांचे सौंदर्य वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत.

     रोहतांगचा उतार संपल्यावर आम्ही थेट अटल बोगद्याजवळ पोचलो. ३२०० करोड रुपये खर्चुन बांधलेला ९.०२ किमी लांबीचा अटल बोगदा अगदी जवळ जाऊन पाहता आला. तेथील सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहीतीनुसार बोगद्यातुन सायकल चालवत जाण्यास परवानगी आहे. अटल बोगद्याचे काम अवाढव्य आहे. या कामासाठी BRO ला सलाम! BRO म्हणजे Border Roads Organisation. मनाली ते लेह या रस्त्याच्या कामाचा दर्जा एवढा उत्कृष्ट आहे कि या रस्त्यावर आपण रोडबाईक सुद्धा घेऊन जाऊ शकतो. रोडच्या बाजुला BRO ने लावलेली घोषवाक्ये खुपच छान आणि समर्पक आहेत. एक घोषवाक्य एवढे छान होते कि त्याचा फोटो काढण्यासाठी आम्ही पुढे गेलेलो मागे वळुन आलो. बाजुने वाहणारी चिनाब नदी आमच्या सोबतच प्रवास करत आहे असे वाटत होते. लेह-मनाली महामार्गावर जिथे नाल्यांचे पाणी रस्ता ओलांडुन वाहत होते त्याठिकाणी हमखास एक पोलिस ऊभा असलेला दिसत होता. आमचा आजचा मुक्काम सिस्सु याठिकाणी होता. हे ठिकाण गुगल मॅपवर MLK Day-2 Camp या नावाने पहावयास मिळेल. मुक्कामाचे ठिकाण चिनार वृक्षांनी गच्च भरलेले होते. जवळच एक छान धबधबा आहे. तो जिथुन कोसळत होता त्या कडयाचा आकार बदामासारखा आहे म्हणुन याला "Love Waterfall" असे नाव पडले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी असलेली चिनार वृक्षांची गर्दी पाहुन मला मराठीतील ते सुप्रसिद्ध गाणे आठवले, "हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी...."

 

     एकंदरीत सिस्सुचे वातावरण मढीपेक्षा हजारपटीने चांगले होते. राईड संपल्यावर आम्हाला स्ट्रावा बघण्याची घाई झाली होती. याठिकाणी जिओ प्रीपेडचे मोबाईल इंटरनेट चालत होते आणि मोबाईल हातात घेतल्यावर मग त्यातुन बाहेर पडणे अशक्य झाले.

क्रमश:







कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...